News Flash

सांगतो ऐका : अभिजात पाश्चात्त्य संगीतज्ञान

पाश्चात्त्य आणि भारतीय स्वरसप्तकातील मूलभूत फरक हा आहे की पाश्चात्त्य संगीतपद्धतीत १२ स्वरांचं सप्तक असतं.

सांगतो ऐका : अभिजात पाश्चात्त्य संगीतज्ञान
मोझार्ट आणि बीथोवन यांची भेट- व्हिएन्ना- १७८७

मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

पाश्चात्त्य आणि भारतीय स्वरसप्तकातील मूलभूत फरक हा आहे की पाश्चात्त्य संगीतपद्धतीत १२ स्वरांचं सप्तक असतं. हे सगळे सूर एकमेकांपासून सारख्याच अंतरावर असतात. सप्तकामधील प्रत्येक स्वर एकमेकांपासून अध्र्या पायरीवर असून याला ‘इक्वि टेम्पर्ड स्केल’ असं यथोचित नाव आहे. तर भारतीय शास्त्रीय संगीतात हे सप्तक २२ श्रृतींमध्ये विभागलेलं असतं. यासंदर्भात आता पाश्चात्त्य जगतातील बरेच संगीतशास्त्री आणि कलाकारांचं मत बदलत आहे असं दिसतं. सप्तकाच्या सारख्या अंतरावर असलेल्या १२ स्वरांच्या विभागणीमुळे आपण निसर्गाकडे पाठ फिरवली आहे आणि मानवनिर्मित तडजोड आपण आपल्यावर थोपवली आहे असं त्यांना वाटू लागलं आहे. हाच विचार येहुदी मेन्युईन यांनी अतिशय नि:संदिग्धपणे पुढील शब्दांत व्यक्त केला आहे. ते म्हणतात, ‘‘I can’t pretend to regret a development that has fed my whole musical life, but equally, it is difficult to deny that tempered scale corrupts our western ears.’’ जवळजवळ याच सुरात ब्रिटिश रचनाकार आणि लेखक हावर्ड गुडॉल म्हणतात, ‘‘I want to castigate Indian composers and musicians for  their use of the sampler to sample, say, sitar or tabala. Every time they use western keyboard, they are slamming another nail into the coffin of their own ancient musical tuning system.’’ भारतीय प्राचीन स्वरव्यवस्थेबद्दलचे गुडॉल यांचे हे उद्गार भारतीय संगीतप्रेमींसाठी नक्कीच अभिमानास्पद आहेत. प्रश्न आहे तो आपल्या मंडळींचं याबाबतीत काय म्हणणं आहे याचा!

दोन्ही पद्धतींतील काही महत्त्वाचे आणि काही फारसे महत्त्व नसलेले गुणविशेष असे :

(१) आपल्यासारखी गुरू-शिष्य पद्धती पाश्चात्त्य संगीतात कधीच नव्हती. पण त्यांना त्यांचं संगीत जतन करून ठेवणाऱ्या आणि संगीतशिक्षण देणाऱ्या जुन्या आणि आधुनिक संस्थांचा- नेटवर्कचा यथायोग्य अभिमान आहे. (पूर्वी युरोपमध्ये अशा संस्थांना संगीत अ‍ॅकेडमी किंवा कॉन्सरवेटरी म्हणत असत. झुबिन मेहतांचं  सर्व सांगीतिक शिक्षण व्हिएन्ना म्युझिक अ‍ॅकेडमीमध्ये झालं आहे.) जुलियार्ड स्कूल (न्यू यॉर्क), ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक (लंडन), हॉशशुले फॉर म्युझिक (बर्लिन) या तीन ख्यातनाम आधुनिक संगीत संस्था आहेत. शिवाय जवळजवळ सगळ्या पाश्चात्त्य देशांच्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्वतंत्र म्युझिक डिपार्टमेंट्स असतात. (२) त्यांच्या संगीतात (अ) धार्मिक (चर्चसंबंधित) आणि निधर्मी (secular) अशी सुस्पष्ट विभागणी केली गेली आहे. आणि (ब) रेनसान्स, बरोक, क्लासिकल, रोमँटिक आणि २० व्या शतकातील अशीदेखील कालखंडानुसार विभागणी केली गेली आहे. आपल्याकडे अशी विभागणी नाही. (३) आपल्याकडे प्रत्येक ऋतूत विशिष्ट राग गाण्याची पद्धत आहे. शिवाय दिवसाच्या विशिष्ट प्रहरात ठरावीक राग गाण्याची पद्धत आहे. या दोन्ही पद्धती आपण अजूनही नेटाने चालू ठेवल्या आहेत. पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतात या संकल्पना नाहीत. (४) पाश्चात्त्य संगीताच्या सादरीकरणाच्या वेळी अतिशय काटेकोरपणे पाळले जाणारे ‘ड्रेस कोड’सारखे काही संकेत. तसेच श्रोत्यांसाठी अपेक्षित असलेली अलिखित आचारसंहिता. उदा. कार्यक्रमाच्या मधेच अवेळी वाहवा करणे, टाळ्या वाजवणे वा खोकणे याला असलेली बंदी. याउलट, आपल्या कार्यक्रमांच्या बैठकांमध्ये ‘वाहवा!’, ‘क्या बात है!’ आणि टाळ्या केव्हाही वाजवता येतात आणि त्यांची बरसात झाल्याशिवाय कार्यक्रम रंगत नाही.

जाता जाता.. माझा मित्र सोपान याने माझे तीनही लेख वाचल्यानंतर (या लेखाचा मसुदा त्याने वाचला होता.) जी प्रतिक्रिया दिली ती ‘आपलं संगीत व त्यांचं संगीत’ याविषयी आणखी जास्त जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्या एखाद्या उत्साही संगीतप्रेमीची असावी तशी होती. सोपानला अनेक प्रश्न विचारायचे होते, पण लेखाला जागेची मर्यादा असल्याने तो फक्त तीनच प्रश्न विचारणार होता. त्याला पडलेले प्रश्न हे इतर वाचकांचेही असण्याची शक्यता असल्यामुळे मी त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लगेचच राजी झालो. ते तीन प्रश्न व त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे :

सोपान : माझ्यासारख्या सामान्य श्रोत्याला जर पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताशी जानपेहेचान करून घ्यायची असेल तर मला वाटतं, त्यातील काही प्रसिद्ध संगीतरचना ऐकणं ही पहिली पायरी असेल. तुलाही जर असंच वाटत असेल तर यूटय़ूबवर सहज उपलब्ध होतील अशा निदान दहाएक प्रसिद्ध रचनांची तू शिफारस कर.

मी : फारच छान आहे तुझी ही सूचना. मी पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातील पुढील लोकप्रिय रचनांची शिफारस करीत आहे. यूटय़ूबवर त्या कोणीही आणि कधीही ऐकू शकेल. फक्त एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. ती म्हणजे या रचना जरी खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय असल्या तरी समीक्षकांकडून त्या पाश्चात्त्य संगीतातील सवरेत्कृष्ट रचना मानल्या गेल्या असतीलच असे नाही.

(१) बीथोवनची अत्यंत लोकप्रिय अशी ए मायनरमधली Für Elise (एलीससाठी) ही बॅगाटेल या संगीतप्रकारातली एक रचना. (बॅगाटेल ही वाद्यासाठी- विशेषकरून पियानोसाठी लिहिलेली छोटेखानी, हलकीफुलकी रचना असते.)

(२) मोझार्टची सर्वाधिक लोकप्रिय, पण सवरेत्कृष्ट नसलेली Eine Klein Nacht Musik (A Little Night Music) ही सेरेनाड या संगीतप्रकारातील एक रचना.

(३) इटालियन रचनाकार व्हिवाल्डीची Four Seasons (चार ऋतू) ही रचना. ही त्याची सर्वात लोकप्रिय रचना आहे. स्प्रिंग (वसंत ऋतू), समर (उन्हाळा), ऑटम (शरद ऋतू) आणि विंटर (हिवाळा) या वर्षांतल्या चार ऋ तूंशी निगडित पाश्चात्त्य रसिकांच्या भावना या रचनेत अतिशय प्रभावीपणे व्यक्त होताना दिसतात. यातला माझा सर्वात आवडता भाग म्हणजे स्प्रिंगसंबंधी. (क्रमांक एक एन इ)

(४) मोझार्टची सिम्फनी क्रमांक ४०. ही ‘द ग्रेट जी मायनर सिम्फनी’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. ही त्याची सर्वोत्तम सिम्फनी समजली जाते आणि आतापर्यंत लिहिल्या गेलेल्या दहा सिम्फनीज्पैकी एक. तू ही संपूर्ण रचना जरी ऐकली नाहीस तरी तिची ओपनिंग मूव्हमेंट मात्र काहीही करून ऐकावीच. सिम्फनीच्या याच भागाने प्रेरित होऊन सलील चौधरींनी लता मंगेशकर/ तलत मेहमूद यांनी गायलेल्या ए. व्ही. एम.च्या १९६१ सालातील ‘छाया’ या सिनेमातील ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ या सुमधुर गीताची रचना केली आहे.

(५) ‘किंग ऑफ वॉल्ट्झ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या योहान स्ट्रॉऊसची ‘Blue Danube’ ही वॉल्ट्झ संगीताची एक अतिशय प्रसिद्ध रचना. (वॉल्ट्झ हा एक नृत्यसंगीताचा प्रकार आहे आणि बराचसा दादरा या आपल्या तालासारखा याचा ऱ्हिदम असतो. ही रचना हॉलीवूडच्या ज्या अनेक सिनेमांत वापरली गेली आहे त्यात १९९७ सालचा ‘टायटॅनिक’ हा एक आहे.)

(६) चायकोव्हस्की या प्रसिद्ध रशियन रचनाकाराची ‘Blue Danube’ ही रचना ‘मार्च’ या संगीतप्रकारातली एक सर्वात लोकप्रिय रचना आहे. पण तिचा संबंध रशियाच्या झार राजवटीशी जोडला गेला असल्यामुळे सोव्हिएत रशियात ती कधीच वाजवली गेली नाही. पुतिन यांच्या नव्या रशियामध्ये तिची योग्य ती पुनस्र्थापना झाली असेल असं समजायला काही हरकत नाही.

(७) बिझे (Bizet) या फ्रेंच रचनाकाराने त्याच्या Carmen या  जगप्रसिद्ध ऑपेरामधील Habenara नावाची एक आरिया (ऑपेरामधील एक गीत). १९ व्या शतकात क्युबामध्ये उगम पावलेल्या व पुढे जगभरातील स्पॅनिश वसाहतींत प्रसार झालेल्या Habenara या नृत्यप्रकाराशी निगडित असलेल्या संगीतशैलीचा अतिशय कल्पक वापर बिझेने या आरियात केला आहे.

(८) Schumann (शूमान) या जर्मन रचनाकाराची Traumere (इंग्रजीत Reverie ही रचना. पियानो संगीताचा १३ भागांचा हा समूह Kinderscenen या नावाने ओळखला जातो. (इंग्रजीत Scenes From Childhood) ‘रेमंड सूटिंग्स’च्या टीव्हीवर आतापर्यंत आलेल्या असंख्य जाहिरातींमध्ये या रचनेचा अतिशय कल्पकतेने उपयोग केला गेला आहे.

(९) बीथोवनची सिम्फनी क्रमांक ९. ही  Choral (कोरल) सिम्फनी म्हणूनही ओळखली जाते. या रचनेत ऑर्केस्ट्रल संगीत आणि काव्य यांचा पहिल्यांदाच यशस्वीपणे मिलाफ केला गेला आहे. ही पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतविश्वातील एक अतिशय महान आणि सर्वपरिचित अशी रचना समजली जाते. हिचा जवळजवळ १८ मिनिटांचा Finale  (अंतिम भाग) तू जरूर ऐक.

(१०) वाग्नरचा जी मायनरमधील ‘Bridal Chorus’ म्हणून ओळखला जाणारा आणि मेंडलसॉनचा सी मायनरमधील ‘वेडिंग मार्च’ या दोन्ही पारंपरिक रचना ख्रिश्चन चर्चमध्ये लग्नप्रसंगी वाजवल्या जातात. त्या स्वतंत्र रचना म्हणूनदेखील अतिशय लोकप्रिय आहेत.

सोपान : मनोहर, तुला प्रामाणिकपणे सांगायचं तर तू ज्या दहा रचना वर सांगितल्या आहेस त्यापैकी Für Elise ही  अशी एकमेव रचना आहे जी मी खूपदा ऐकली असून, मी ती ओळखू शकतो. याबद्दल मला तुझ्याकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल. विशेषत: तिच्या अफाट  आणि सदैव लोकप्रियतेबद्दल..

मी : नक्कीच सांगतो. पण तिच्या सांगीतिक आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमीकडे वळण्यापूर्वी तुझ्यासारख्या सामान्य भारतीय श्रोत्यांना ती इतकी का भावली याबद्दल प्रथम सांगतो. कारण बऱ्याच वर्षांपूर्वी भारतीयांनी इतर कुठल्याही पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रित तुकडय़ापेक्षा ही सर्वात जास्त वेळा ऐकली असेल. याचं मुख्य कारण म्हणजे ही सर्वत्र जुन्या टेलिफोनची रिंगटोन आणि म्युझिक-ऑन-होल्ड म्हणून ऐकू येत असे. बीथोवन आजच्या काळातला रचनाकार असता तर या एकमेव संगीतरचनेतून मिळणाऱ्या रॉयल्टीवर तो जगातील सर्वात श्रीमंत रचनाकार झाला असता. हा झाला या रचनेच्या सुपरिचिततेचा पैलू. आता तिच्या अभूतपूर्व लोकप्रियतेबद्दल.. बीथोवनचं बरंचसं संगीत हे अमूर्त स्वरूपाचं असून सगळ्याच श्रोत्यांना सहज भावेल असं नाहीये. म्हणून त्याच्या ‘Moonlight Sonata’ आणि ‘Für Elise’- ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत- यासारख्या रचना सन्माननीय अपवाद म्हणाव्या लागतील. Für Elise ही एक अतिशय उल्हासदायी रचना असून तिला जरा खिन्नतेची झालर आहे. ही रचना फक्त पियानोसाठी असून तिच्याबरोबर कोणत्याच प्रकारचा ऑर्केस्ट्रा नाहीये. तिच्यातील मेलडी सुस्पष्ट आहे. लय धीमी आहे आणि हार्मनी तितकीशी गुंतागुंतीची नाही. यामुळे ती ऐकायला सोपी तर आहेच, पण तिच्या संगीताचा आस्वाद घ्यायला रसिकाला कसलाही जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागत नाही.

आता थोडंसं बीथोवनच्या असफल प्रेमजीवनाबद्दल.. ज्याचा संबंध Für Elise या रचनेशी आहे. सोपान, एखादी प्रेमरोग झालेली व्यक्तीच इतकी सुंदर, तरल आणि काव्यात्मक रचना करू शकते असा जर तुझा समज असेल तर तो अत्यंत योग्य आहे. बीथोवनच्या आयुष्यात एक काळ असा होता की तो उठसूट प्रेमात पडायचा आणि ते नेहमीच एकतर्फी असल्याने विफल होत असे. याची थोडक्यात कारणं अशी : बीथोवन एक सामान्य माणूस तर होताच; शिवाय मदनाचा पुतळाही नव्हता. त्याला कुरूप म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. आणि असा हा आपला जीनियस- महान कलाकार ज्या स्त्रियांच्या प्रेमात पडायचा त्या हमखास उमराव घराण्यांतल्या असल्याने केवळ अप्राप्य होत्या. १८१० साली लिहिलेली Für Elise ही रचना बीथोवनने आपली त्यावेळची प्रेयसी Elise ला अर्पण केली होती. आणि या पाश्र्वभूमीवर आपण या रचनेकडे बघायला हवं. (बीथोवन विद्वानांच्या मते, ही एलिस कदाचित एलिझाबेथ रोएकेल किंवा तेरेस व्हॉन ब्रन्सविक या दोन प्रत्यक्षातील स्त्रियांपैकी एक असावी. आणि या दोघी किंवा एकीवर बीथोवनचं असलेलं प्रेम हे नेहमीप्रमाणेच एकतर्फी असल्यामुळे असफल झालं असावं.)

सोपान : रुडयार्ड किपलिंगच्या एका कवितेत ‘‘East is east, and West is west, and never the twain shall meet’’ अशा दोन संस्मरणीय ओळी आहेत. या आपल्या आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतपद्धतींना कितपत लागू होतात?

मी : या दोन पद्धती पूर्णपणे समांतर रेषांसारख्या नसल्यामुळे कदाचित अनंतात (at infinity) मिळू शकतात. पण या भूतलावर त्या जेव्हा मिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यातून निर्माण होणारं तथाकथित फ्यूजन संगीत निदान मला तरी रसायनशास्त्रातील compound नसून Mixture सारखं वाटतं. हे उत्तर खूपच त्रोटक असून समाधानकारक नाहीये हे मी जाणतो. पण This is the best, I could do in the given situation

शब्दांकन : आनंद थत्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 4:39 am

Web Title: western music sangto aika dd70
Next Stories
1 अफसाना लिख रही हूँ.. : ‘बनके पंछी गाये प्यार का तराना..’
2 इतिहास संशोधनात बुडालेला विद्वान
3 हिंदू’ ही संकल्पना संकुचित करू पाहणारे चुकतायत..
Just Now!
X