मकरंद देशपांडे mvd248@gmail.com

मुंबईतील ‘पृथ्वी थिएटर’च्या बहुभाषिक नाटय़वर्तुळात सदासर्वकाळ वावर असलेले लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते मकरंद देशपांडे यांचे आपला नाटकीय प्रवास रेखाटणारे सदर.. ‘नाटकवाला’!

नव्वदच्या दशकात पृथ्वी थिएटरला नाटकं एका ठरावीक विचारधारणेला अनुसरून होत होती. सोमवारी थिएटर बंद असायचं (ते आजही असतं). या दिवशी पेस्ट कंट्रोल, टेक्निकल मेंटेनन्स, एसी, लाइट्स पॅनल, साउण्ड सिस्टीम, स्वच्छता, याचबरोबर जर एखाद्या ग्रुपला ग्रॅण्ड रिहर्सल करायची असेल तर ती सोमवारी!

मंगळवार, बुधवार हे प्रायोगिक नाटकांसाठी, म्हणजे खरंच ‘प्रायोगिक’! त्या दिवशी भाडं हे सात रुपये प्रति प्रेक्षक असं आणि खरंच या मंगळवार, बुधवारचा मी पुरेपूर फायदा उचलला. तिकीट जास्तीत जास्त ५० रुपये ठेवता यायचं. शक्यतो एखादा ग्रुप दिवसाला संध्याकाळी सहा आणि नऊ असे दोन शो एका नाटकाचे करेल; पण मी दोन नाटकं एका तिकिटात करायचो! कारण नाटक वेगाने लिहायचो. प्रयोग करायला तारखा मर्यादित, मग मिळाली तारीख की त्याचा पुरेपूर फडशा पाडायचो.

‘समरांगण’ आणि ‘कुत्ते की मौत’ अशी ही दोन नाटकं मी एका तिकिटात- म्हणजे ५० रुपयांत प्रेक्षकांना पाहायला द्यायचो.

‘समरांगण’ एक तास २० मिनिटांचा दीर्घाक होता. त्यात एक युवा योद्धा रक्तानं लाल झालेली तलवार हातात घेऊन रंगमंचावर फिरतो आणि सगळेच मेले आहेत तेव्हा मी जगज्जेता अलेक्झांडर, यशोवान अलेक्झांडर असे घोषित करतो. जगज्जेता झाल्यावर दहा मिनिटांत रंगमंचावर पडलेल्या प्रेतांच्या ढिगाऱ्यातून आणखी एक योद्धा उभा राहतो; पण तो म्हातारा आहे आणि आंधळाही. तो स्वत:ला जगज्जेता गुरू घोषित करतो आणि स्वत:ला ‘एक और द्रोणाचार्य’ नामांकित करतो. त्यात पुढची २० मिनिटं दोघांत एकमेकांना मारण्याचा प्रयत्न होतो. म्हातारा योद्धा धनुर्धर असतो. त्यामुळे युवा अलेक्झांडरला तलवार हातात असूनही म्हाताऱ्याला गुरू बनवावं लागतं. या दोघांमधलं द्वंद्व कधी भीषण, तर कधी हास्यास्पद होतं. पुढे त्या दोघांच्या शक्तिप्रदर्शनाच्या या व्यंगपूर्ण नाटय़ात आणखी एक योद्धा दाखल होतो. तो आहे अश्वत्थामा.. खरा शापित योद्धा! जो या दोघांच्या शक्तीवेडाचा मुखवटा दूर करतो. त्यांच्या अर्थहीन, स्वार्थी हिंसेने समरांगणाला दिलेल्या हीन पातळीची निंदा करतो. युद्ध म्हणजे काय? कशासाठी? हाती काय मिळालं? कोण जिंकलं? कोणासाठी जिंकलं? या मूलभूत प्रश्नांचा संवाद साधतो.

यशोवान अलेक्झांडर, जो या युवा पिढीचा प्रतिनिधी आणि एक द्रोणाचार्य हे गुरुस्थानी त्यांच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे. दोघांना हवंय समरांगण, एका पारंपरिक विचारसरणीसाठी; पण हाती येणार फक्त रक्त आणि कपाळी असणार जखम!

अश्वत्थाम्याच्या जळजळीत प्रतिक्रियेसमोर दोघेही शरमेने मान खाली घालतात. पण मूर्खपणे एकत्र येऊन त्या खऱ्या अश्वत्थाम्याला मारायचा हास्यास्पद प्रयत्न करतात. अश्वत्थाम्याच्या रागाने समरांगणाला भेगा पडतात. त्यात सगळी प्रेतं आणि हे दोघे खोटे योद्धे जिवंत गाडली जातात. आपल्या कपाळाचा भगवती मणी कृष्णाने काढून घेतल्यामुळे झालेल्या जखमेसाठी वर्षांनुवर्षे अश्वत्थाम्याने जे पीठ गोळा केलेलं असतं, ते तो समरांगणाला पडलेल्या भेगांत भरतो आणि पृथ्वीला झालेल्या जखमांची मलमपट्टी करतो.

या नाटकाला एक बांधणी होती. स्वगत (Soliloquy), सीन (scene), स्वगत, सीन आणि मग स्वगत. क्लायमॅक्स, अ‍ॅक्शन, स्वगत! या नाटकाचं मंचन करणं खूप अवघड होतं. कलाकाराच्या निवडीपासून सादरीकरणापर्यंत. दिग्दर्शक म्हणून मी युवा पिढीच्या, दमदार देहयष्टीच्या फैजलखान, गुरुसाठी अ‍ॅबनर रेजीनल्ड (जे गायक असल्यामुळे लोकगीतांचा वापर करता आला आणि त्यामुळे ‘समरांगण’ची आर्तता आणि व्यंग दोन्ही मांडता आलं.) अश्वत्थामासाठी अनुराग कश्यपची निवड केली. अनुरागची वाणी शुद्ध होती आणि तेव्हा तो फारच देखणा होता. अश्वत्थामा शापित, पीडित असला तरी मला या दोन खोटय़ा योद्धय़ांसमोर अश्वत्थामा सात्त्विक दिसायला हवा होता. कलाकारांची निवड तर झाली, पण नाटकाची मांडणी करण्यासाठी जो आपण सर्वसाधारणपणे ‘स्टेज क्राफ्ट’ असा शब्द वापरतो, त्यात रंगमंचावर पडलेलं प्रेत, अलेक्झांडरने रचलेल्या प्रेतांचा ढीग आणि अश्वत्थाम्याने जमीनदोस्त केलेल्या विजयी योद्धय़ांचा आत्मसन्मान दाखवण्यासाठी मी ‘जिम्नॅस्टिक’ या क्रीडा प्रकारातील ‘रोप एक्झरसाइज’ हा प्रकार निवडला. म्हणजे आता अनुराग आणि फैजलला रोपवर चढणं, उतरणं, त्यावर लोंबकळत संवाद बोलणं हे सगळं करणं भाग होतं. मी नरसी मोनजी कॉलेजमध्ये दिवसभर आधी कलाकारांसोबत संवाद आणि रंगमंचावरील बांधणी करायचो, मग संध्याकाळी अनुराग आणि फैजलला पार्ला पूर्वेच्या टिळक मंदिरात घेऊन जायचो.

तिथले महेश सर (बहुतेक) प्रेमाने, पण शिस्तबद्धरीत्या कसून मेहनत करून घ्यायचे. जर तुम्ही कधी रोपवर चढला-उतरला नसाल, तर सांगतो.. सुरुवातीला तुमच्या हाताचे तळवे आणि पायाचा अंगठा व पहिले बोट यांच्यात रस्सीच्या घर्षणामुळे जखम होते. अनुराग आणि फैजलच्या हातापायाला बँडेज पट्टी बांधून मग त्यांना मी एक ग्लास दूध पाजायचो, मलाई मारके! त्या दोघांनी खूपच मेहनत केली. प्रयोगात चित्रपटासारखा दुसरा टेक नसतो, त्यामुळे रस्सीवर चढावं तर लागणारच आणि एकदा तर मध्ये चढावं लागणार होतं. प्रकाश पडल्यावर अचानक हवेत उलटे लटकलेत असं दृश्य होतं; पण जितके प्रयोग केले, त्या सगळ्यांत त्या दोघांनी ते सहज केलं. याचं कारण त्यांनी आणि सरांनी केलेली प्रचंड मेहनत! महेश सरांना रस्सीवरचे प्रकार रंगमंचावर येणार याचं अप्रूप तर होतंच; पण त्याहीपेक्षा जास्त, नट स्वत: शिकून करतोय याचं होतं. रस्सी बरोबर बांधली आहे की नाही, हे बघायला ते स्वत: प्रयोगाआधी थिएटरमध्ये यायचे. ‘समरांगण’चा प्रयोग रस्सीशिवाय झालाच नसता!

‘समरांगण’मध्ये मी स्वत: प्रकाशयोजनाकार आणि ऑपरेटर होतो. मी पांढरा सायक्लोरमा वापरला होता. कारण मला लाल समरांगणाच्या पाश्र्वभूमीवर नाटक दाखवायचं होतं. त्यावर सहा लाइट्स मारून तो लालभडक केला होता. तर अश्वत्थामा रागावतो तेव्हा जमिनीच्या भेगा मी ‘गोबो’च्या सहाय्याने दाखवल्या होत्या. गोबो ही एक पातळ पत्र्याची प्लेट असते. त्यावर आपल्याला पाहिजे ते डिझाइन बनवायचे आणि मग ती प्लेट लाइट सोर्स आणि त्याच्या लेन्सच्या मधे बसवायची, म्हणजे पडणारा प्रकाश हा आपल्याला पाहिजे तसा मर्यादित पडतो. ‘समरांगण’मध्ये दोन लाइट्स गोबो घालून वापरायचो. त्याने अख्ख्या स्टेजभर भेगा दिसायच्या आणि मग अश्वत्थामा त्या खऱ्या पिठाने भरायचा. पृथ्वी थिएटरला सीट या स्टेजच्या तीन बाजूंनी वर उंचीवर असल्याने रंगमंचावर पाहिजे असलेला परिणाम (Effect) छान दिसतो. अनुराग पिठाने भेगा भरताना हळूहळू अंधार व्हायचा आणि नाटक संपायचं. तो शेवटचा लाइट ऑफ करतानाचं माझं बोट आजही ‘समरांगण’ची आठवण पकडून आहे.

‘कुत्ते की मौत’ हे नाटकसुद्धा एक दीर्घाकच! एका तिकिटातलं दुसरं नाटक प्रेक्षकांसाठी. पण याचाही स्टेज क्राफ्ट साधासुधा नव्हता.

कुत्रा आपल्या मालकाचा मृत्यू किंवा संकट आधीच ओळखतो आणि रडतो, असं कुत्रे पाळणारे म्हणतात. मी लेखक म्हणून क्रिएटिव्ह लिबर्टी घेत कुत्र्याला मृत्यू हुंगण्याची आणि त्यावर विजय मिळवण्याची शक्ती दिली. त्याचं प्रेम, प्रेमाने मिळवलेला विजय याचा परिणाम होतो यमाच्या कारकीर्दीवर आणि पृथ्वीवर!

हिंदुस्थानात एक म्हातारे आजोबा- शंभरी ओलांडलेले, तरीही तब्येतीने ठणठणीत. त्याचं श्रेय ते स्वत:च्या नेचरोपॅथीला देतात. ते त्या वेळचे, म्हणजे १९९४ सालचे ‘वेगन’- जे हल्लीचं फॅड आहे! त्यांची स्वत:ची गुलाबाची बाग आहे आणि भलेमोठे गुलाब. त्यांचं म्हणणं होतं की, या बागेत जोपर्यंत गुलाबाची सुंदर फुलं येताहेत तोपर्यंत त्यांना कुणीही मारू शकणार नाही. पण जेव्हा यमाचा तपासनीस आजोबांच्या ठणठणीत तब्येतीचा तपास काढायला न्हाव्याच्या रूपात येतो, तेव्हा त्याला काहीतरी वेगळाच वास येतो. आजोबांच्या गुलाबाच्या बागेत आहे कुत्र्याच्या नाकाची शक्ती असलेला त्यांचा चाळीस वर्षांचा नातू. पण काहीही कामाचा नसल्याने त्याला बागेत कामाला ठेवलंय. तो कळत-नकळत आजोबांना मृत्यूपासून दूर करतो, हे त्या न्हाव्याला कळल्यावर तो आपल्या वस्तऱ्याने नातवाचं नाक कापायचा प्रयत्न करतो. पण त्याला यश मिळत नाही

आणि नातवाला आपल्या शक्तीचा बोध होतो. आता न्हावी आणि नातवात एक वेगळाच संवाद होतो. तो म्हणजे नातू सांगतो की, ‘माझ्या वडिलांसारखं मी नाव काढू शकलो नाही. माझ्या आजोबांना वाटतं, मी काही कामाचा नाही. तर मला घेऊन जा आणि माझ्या आजोबांना त्यांना पाहिजे तेवढी वर्ष जिवंत ठेव. आजोबा-नातवाच्या नात्याला माझ्यामुळे डाग नको.’ नातवाचा महानिर्वाण दिवस ठरतो. त्याला न्हावी घेऊन जाणार असतो. त्याआधी आजोबांची दाढी करणार असतो. पण आजोबा न्हाव्याला आपले मनोगत सांगतात. त्या मनोगतात ते आपल्या नातवाची चिंता व्यक्त करतात आणि आपण नातवासाठी जिवंत आहे असे सांगतात. न्हावी त्यांना सांगतो की, ‘ती चिंता आता संपणार.’ नातू आजोबांच्या पाया पडतो, पण आजोबांना  झोप लागलेली असते. नातू न्हाव्याची वाट पाहत उभा असतो. पण न्हावी काही येत नाही. आजोबा जागे होत नाहीत. एक गुलाब बागेतच पडतं. नातवातला कुत्रा मरतो. नाटक संपतं.

आनंद मिश्रांनी नातू आणि कुत्रा हा pantomime  या शैलीचा वापर करून सादर केलेला आणि इ़क्बाल आजादने केलेला न्हावी हा stylized शैलीत, तर अ‍ॅबनर रेजीनल्डने केलेला आजोबा हा ब्रिटिश संस्कार असलेलं पात्र. आठवणींतील आजी थेट आपली वाटणारी. रश्मी शर्माने ती साकार केली.

स्टेज क्राफ्ट म्हणून मी रंगमंचावर गुलाबाची बाग तयार केली. म्हणजे अडीच फूट ते बारा फूट उंच गुलाबाची बाग बघताना प्रेक्षकांच्या मनात रोमांच उभे राहायचे! समीर नाडकर्णी या जिनिअसने ती अख्खी बाग स्वत:च्या हाताने बनवली. देठाला साडय़ांच्या निऱ्या करून बांधल्या होत्या. घर बनवताना त्या निऱ्या सोडल्या जायच्या आणि दुसऱ्या गुलाबाच्या देठाला अडकवून घराची भिंत बनायची.

आता विचार करा, ५० रुपयांत दोन नाटकं- ‘समरांगण’ आणि ‘कुत्ते की मौत’! याला तुम्ही वेडेपणा म्हणाल! पसा किती खर्च होतोय, याकडे माझं कधीच लक्ष नव्हतं. लक्ष होतं ते रिझल्टवर.. परिणाम साध्य होण्यावर! त्या प्रयोगांची दखल घेणारी तशीच काही अस्सल हाडाची आणि मनाची कलाकार मंडळी होती.

अमोल गुप्ते हे लेखक-दिग्दर्शक म्हणून सगळ्यांना माहिती आहेत. ‘तारे जमीं पर’ (लेखक), ‘स्टॅनली का डब्बा’ (लेखक – दिग्दर्शक), ‘हवाहवाई’ (दिग्दर्शक) आणि आता ‘बॅडमिंटन क्वीन’ हा सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवतोय. पण नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला मला लेखक म्हणून अमोलच्या प्रेमळ मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला. तो मला घरी बोलवायचा. स्वत: अप्रतिम भुर्जी बनवायचा आणि मग माझं लेखन ऐकायचा. त्यावर अचूक टिप्पणी आणि माझा आत्मविश्वास उंचावेल असं एखादं वाक्य जरूर म्हणायचा. जागतिक साहित्य आणि जागतिक चित्रपटांची माहिती असलेला अमोल मला सुरुवातीच्या काळात भेटला, हे माझं भाग्य!

दीपा गेहलोत ही खूपच ज्येष्ठ (आता) पत्रकार, पण तेव्हा तिने माझ्या प्रायोगिक अंगाला खूप पाठिंबा दिला. नाटकाच्या आधी नाटकाबद्दल माहिती देणारे लेख मिड-डेमध्ये त्यावेळी खूप वाचले जायचे. ती छापायची, मग नाटक बघितल्यावर रिवू.. असा डबल वेळ ती एका नाटकाला द्यायची. आत्ताच्या पत्रकारांना माझी विनंती आहे की, एखाद्या प्रयोगाबद्दल बरं-वाईट लिहिण्यापेक्षा त्याच्या प्रोसेसबरोबर राहिलात तर वाचणाऱ्यालाही त्याचा फायदा होईल. परीक्षणापेक्षा आकलनावर जोर दिलात, तर रंगभूमीला फायदा होईल. पण वेळ खऱ्या अर्थाने द्यायला आहे कुणाकडे? नक्कीच तेव्हा दीपाकडे होता.