रघुनंदन गोखले

आज मी ‘चौसष्ट घरांच्या गोष्टी’चं अखेरचं पुष्प सादर करत आहे. जे लोक कधीही बुद्धिबळ खेळलेले नाहीत त्यांना बुद्धिबळ खेळाचं महत्त्व समजावून सांगणं; आणि त्याचवेळी त्यांचं मनोरंजन करणं अशी तारेवरची कसरत करणं हेच माझं उद्दिष्ट होतं. पालकांना आपल्या पाल्यांच्या बौद्धिक वाढीसाठी बुद्धिबळ शिकवणं आवश्यक आहे, हेसुद्धा अनेक उदाहरणांनी मी पटवून देण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिकांना स्मृतिभंशासारख्या (अल्झायमर) रोगांपासून दूर ठेवण्यासाठी नियमित बुद्धिबळ खेळणं चांगलं असतं.

MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

आज आपण महाराष्ट्रातील खेळाडूंच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेऊ. या वर्षीच्या उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर विदित गुजराथीपुढे बाकी सगळे झाकोळून जातील, इतके देदीप्यमान यश या वर्षांच्या उत्तरार्धात या नाशिककरानं मिळवलं. जगातील सर्वात कठीण स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणं आणि तेही पहिल्याच फेरीत हार खावी लागलेली असताना, यासाठी तुम्हाला मानसिकदृष्टया वेगळाच कणखरपणा लागतो. विदितनं तो दाखवला आणि आयल ऑफ मॅन येथील ‘फिडे ग्रँड स्वीस’ ही जगातील सर्वात मानाची स्पर्धा जिंकून जगज्जेतेपदाच्या शर्यतीत पाऊल ठेवलं. प्रज्ञानंददेखील आधीच एप्रिल २०२४ मध्ये होणाऱ्या आव्हानवीर निवडण्याच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत आपलं स्थान पक्कं करून बसला आहे.

संघर्ष काही विदित गुजराथीच्या आयुष्यात नवीन नाही. ग्रँडमास्टर पदानं त्याला तब्बल १३ वेळा हुलकावणी दिली होती, पण एकदा ते पद मिळवल्यावर विदितनं जी भरारी घेतली ती थेट जगातील पहिल्या २५ क्रमांकांत येईपर्यंत तो थांबला नाही. त्यानंतर आतापर्यंत विदितला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पहिलं बक्षीस कायम हुलकावणी देत आलं होतं. परंतु आयल ऑफ मॅन येथील जगातील सर्वात कठीण स्पर्धा जिंकल्यामुळे आता त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. आणि याच महिन्यात आपल्या सर्वोत्कृष्ट खेळया करणारा नवा विदित अझरबैजानमधील गबाला येथील प्रतिष्ठित गॅसिमोव स्मृती सामन्यात बघायला मिळाला. जलदगती आणि विद्युतगती या दोन्ही प्रकारांत खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत विदितनं पहिला क्रमांक मिळवला. त्यानं याच आत्मविश्वासानं खेळ केला, तर त्याला जगज्जेतेपदाचा दावेदार बनणं कठीण जाणार नाही. विश्वनाथन आनंदनंतर विदित गुजराथीशिवाय कोणीही भारतीय इतकी उच्च दर्जाची स्पर्धा जिंकलेला नाही.

आणखी वाचा-चौसष्ट घरांच्या गोष्टी: जगज्जेता गुप्तहेर?

सतत सगळय़ांशी मिळून मिसळून राहणाऱ्या विदितचे नेतृत्वगुण ऑनलाइन ऑलिम्पियाडच्या निमित्तानं सर्वांच्या लक्षात आले, पण विश्वनाथन आनंदनं ही गोष्ट आधीच हेरली होती. २०२०च्या ऑनलाइन ऑलिम्पियाडचा संघ जाहीर होणार होता त्या वेळी नेतृत्व आनंदकडे जाणं साहजिक होतं; पण मोठया मनाच्या आनंदनं स्वत: विदितच्या हाताखाली खेळणं पसंत केलं. या ऑलिम्पियाडमध्ये भारतानं रशियाच्या जोडीनं संयुक्त सुवर्णपदक मिळवलं होतं.

या वर्षी महाराष्ट्रातील एका दुसऱ्या खेळाडूनं सतत चमकदार कामगिरी केलेली आहे आणि ती आहे दिव्या देशमुख! नागपूरची ही खेळाडू या वर्षीची ‘डार्क हॉर्स’ म्हणता येईल. वैशालीला ऐन वेळेला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे दिव्याला कोलकत्ताच्या टाटा स्टील या मानाच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. आणि दिव्यानं त्या संधीचं सोनं केलं. जगज्जेत्ता जू वेनजूनला मागे टाकून तिनं जलदगती स्पर्धा जिंकली आणि नेदरलँड्समधील बहुमानाच्या टाटा स्टील स्पर्धेत प्रवेशाचा मान मिळवला. गेल्या वर्षी दिव्यानं आशियाई महिलांचं विजेतेपद मिळवलं होतंच! या वर्षी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद महाराष्ट्राकडे आणून दिव्यानं मोठी कामगिरी केली. त्यामुळे या वर्षी नाही तरी पुढील वर्षी तरी दिव्याचा अर्जुन पुरस्कार नक्की आहे. या वर्षी मित्तल आणि सामंत या दोघा आदित्यांनी ग्रँडमास्टर पदावर आपली मोहर उमटवली, तर नागपूरच्या ग्रँडमास्टर रौनक साधवानीनं थेट मॅग्नस कार्लसनच्या ऑफरस्पिल क्लबकडून खेळून युरोपिअन क्लब अजिंक्यपद जिंकण्यासाठी मोलाचा हातभार लावला. जळगावच्या भाग्यश्री पाटीलनं आशियाई १८ वर्षांखालील मुलींचं जलदगती अजिंक्यपद मिळवण्याचा पराक्रम केला. परंतु या वर्षांची सुवर्ण सांगता केली ती पुण्याच्या ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकनं! ३६ ग्रॅण्डमास्टर्स खेळत असलेली प्रख्यात ‘सनवे सिटजेस’ ही स्पेन मधील स्पर्धा अभिमन्यूनं अखेरच्या फेरीत राष्ट्रीय विजेता सेथुरामन याला हरवून जिंकली.

भारतीय बुद्धिबळ संघटनेनं तत्परता दाखवून केंद्र सरकारकडून विदित, प्रज्ञानंद आणि वैशाली यांच्या तयारीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. वाचकांना प्रश्न पडेल की इतके पैसे कशासाठी? त्याचं उत्तर आहे- या मोठया स्पर्धाची तयारी महिनोन् महिने चालते. तीन ते चार अनुभवी ग्रॅण्डमास्टर्सचा चमू अनेक महिने स्पर्धेसाठी तयारी करत असतो. उदाहरणार्थ- एक ग्रँडमास्टर पूर्वी विदितनं खेळलेले डाव तपासून त्यातील चुका शोधत असतो, तर दुसऱ्यावर जबाबदारी असते प्रतिस्पर्ध्याचे डाव शोधून त्यातून त्यांच्या कमजोरी शोधणं. तिसरा ग्रँडमास्टर विदितच्या सुरुवातीच्या खेळय़ांची नव्यानं उभारणी करण्याचं काम करतो.

आणखी वाचा-चौसष्ट घरांच्या गोष्टी: भारतीय बुद्धिबळाचा भाग्यविधाता..

हल्ली तर निकोलास तिरलीससारखा एक संगणकतज्ज्ञही असावा लागतो आणि काहीजण तर आपापल्या खोलीत छुपे कॅमेरे तर दडविले नाहीत ना हे बघण्यासाठी सुरक्षा यंत्रणेचा वापर करतात. माजी विश्वविजेता अनातोली कार्पोव मानसिक तणावामुळे झोपू शकत नसे म्हणून त्याच्याबरोबर एक संमोहनतज्ज्ञ- डॉ. झार्कोव्ह असायचा. हे सगळे मदतनीस गुप्तपणे काम करत असतात याचं कारण म्हणजे, नुसत्या त्यांच्या नावामुळे अनेक गोष्टी उघड होतात. उदाहरणार्थ, एखाद्याचा मदतनीस ग्रँडमास्टर स्वेशनिकोव्ह असला तर याचा अर्थ तो खेळाडू सिसिलियन बचावातील पेलिकन हा प्रकार खेळणार असा अंदाज येतो, कारण ग्रँडमास्टर स्वेशनिकोव्ह त्या प्रकारात तज्ज्ञ आहे.

या वरच्या दर्जाच्या सामन्यांची तयारी किती कसोशीनं केली जाते याचं एक उदाहरण वाचकांना देतो. आनंद-टोपालोव्ह जगज्जेतेपद सामन्याआधी एका विद्युतगती स्पर्धेत आनंद माजी विश्वविजेता लास्कर यांच्या नावानं प्रसिद्ध असलेला बचाव खेळला आणि त्याला परत आल्यावर रुस्तम कासिमझनोव्ह या त्याच्या मदतनीस ग्रँडमास्टरकडून भरपूर शाब्दिक मार खावा लागला. कारण आनंदच्या मदतनीस संघानं लास्कर बचाव आनंदचा हुकमाचा एक्का म्हणून टोपालोव्हविरुद्ध वापरायचं ठरवलं होतं. सुदैवानं टोपालोव्हच्या संघानं या डावाकडे दुर्लक्ष केलं आणि आनंदनं ऐन वेळी जगज्जेतेपदाच्या लढतीत लास्कर बचाव वापरून टोपालोव्हला पराभूत केलं.

पुण्यात झालेली पुरुषांची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्राच्या दृष्टीनं वाईट गेली, पण ती कसर छोटया खेळाडूंनी भरून काढली आहे. दिव्याच्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपदापाठोपाठ नंदुरबारची नारायणी मराठे (७ वर्षांखालील मुली), पुण्याचा अद्विक अग्रवाल (९ वर्षांखालील मुले), मुंबईचा अंश नेरुरकर (११ वर्षांखालील मुले) यांनी तमिळनाडूकडून राष्ट्रीय अजिंक्यपदे खेचून आणली. पण खरी कमाल केली ती सोलापूरचा विरेश शरणार्थी (१३ वर्षांखालची मुले) आणि सांगली जिल्ह्यातील जस तालुक्यातील संख या खेडयातील श्रेया हिप्परगी (१३ वर्षांखालील मुली) यांनी! तमिळनाडू वगळता एकाही राज्यानं मुलं आणि मुली या दोन्ही गटातील अजिंक्यपदे पटकावण्याची कामगिरी केल्याचं मला तरी आठवत नाही. विरेश आणि श्रेया यांच्या यशामागे मेहनत आहे ती त्यांचे प्रशिक्षक सुमुख गायकवाड यांची. बाकीच्या राज्यातून ग्रॅण्डमास्टर्स आणि आंतरराष्ट्रीय मास्टर्स यांच्याकडून प्रशिक्षित मुलांच्या पुढे विरेश आणि श्रेया यांना नेणाऱ्या सुमुखनं एक गोष्ट सिद्ध केली आणि ती म्हणजे मुलांवर योग्य प्रकारे मेहनत घेतली तर आपल्या खेडयापाडयातील मुलांमधून अजिंक्यवीर तयार करता येतात. एकाच वेळी एकाच गटातील दोन्ही अजिंक्यपदे आपल्या शिष्यांकडून आपल्या राज्यासाठी जिंकण्याचा चमत्कार मलासुद्धा कधी जमलेला नाही, तो एकेकाळी माझा साहाय्यक म्हणून काम करणाऱ्या सुमुखनं मिळवला आहे. या अतुलनीय कामगिरीमुळे सुमुख गायकवाड आता महाराष्ट्राच्या आघाडीच्या प्रशिक्षकांच्या मालिकेत जाऊन बसला आहे.

आणखी वाचा-चौसष्ट घरांच्या गोष्टी : खिलाडूवृत्तीचा ‘आनंद’

माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की, या लहान मुलांनी राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवलं आहे आणि आता ते भारतातर्फे परदेशात आशियाई आणि जागतिक युवा स्पर्धासाठी जातील. त्यांचा सगळा खर्च भारत सरकार करेल, पण राज्य सरकारनं त्यांच्याबरोबर जाण्यासाठी या छोटय़ांच्या पालकांचा खर्च उचलला तर या राष्ट्रीय अजिंक्यवीरांचा खेळ अधिक उंचावेल. सरकारला ही काही फार कठीण गोष्ट नाही.

आज भारताचे दोन खेळाडू जगज्जेत्या डिंग लिरेनचा आव्हानवीर निवडण्याच्या स्पर्धेत आहेत. परंतु त्यांचं स्वागत कसं झालं? प्रज्ञानंदच्या स्वागताला शेकडो लोक चेन्नईच्या विमानतळावर हजर होते. तेथून त्याला मिरवणुकीनं मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या भेटीला नेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी त्याचा शाल आणि श्रीफळ असा कोरडा सत्कार केला नाही, तर ३० लाख रुपयांचा धनादेश देऊन प्रज्ञानंदला गौरविलं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रज्ञानंद आपल्या कुटुंबीयांसोबत पंतप्रधान निवासस्थानी खास पाहुणा म्हणून हजर होता. सर्व वृत्तपत्रे प्रज्ञानंदच्या कौतुकांनी भरून गेली होती. त्या पार्श्वभूमीवर आपण कोणी १०५ ग्रॅण्डमास्टर्सच्या वर पहिला क्रमांक मिळवून कॅन्डिडेट्समध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विदितच्या सत्काराची बातमी वाचली तरी आहे का? मुख्य म्हणजे त्या स्पर्धेत प्रज्ञानंद असताना विदितनं हे यश मिळवलं होतं हे विशेष!

तमिळनाडू क्रीडा संघटना एक गोष्ट जाणतात की, त्यांचं राज्य कर्जात बुडालेलं असलं तरी खेळासाठी त्यांची तिजोरी नेहमीच खुली असते. त्यांचे पदाधिकारी त्यांच्या खेळाडूंच्या खास कामगिरीचे अहवाल ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोचवतात. इतर राज्यांच्या क्रीडा संघटनांनी तमिळनाडूच्या क्रीडा संघटनांकडून बोध घ्यायला हवा. आणि राजकारण्यांना हे पटवून दिलं पाहिजे की, इतक्या स्वस्तात एवढी चांगली प्रसिद्धी आणि जनतेच्या सद्भावना (गुडविल) कोण देणार आहे? आज ओडिशा राज्यानं तमिळनाडूला मागे टाकायचा विडा उचललेला दिसतो. नुकताच मुख्यमंत्री पटनायक यांनी राज्यभर १०० बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरं उघडण्याचा संकल्प केला आहे; आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पटनायक यांनी चीनमधील अंधांच्या आशियाई स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य मिळवणाऱ्या सौन्दर्य प्रधानला तब्बल दीड कोटी रुपयांचं बक्षीस दिलं. बघूया, महाराष्ट्र सरकार त्याच अंधांच्या आशियाई स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या डोंबिवलीच्या आर्यन जोशीचा काय गौरव करते ते!

माझ्या ‘चौसष्ट घरांच्या गोष्टी’वर भरभरून प्रेम करणाऱ्या वाचकांना अभिवादन करून मी आता या अखेरच्या लेखातून आपली रजा घेतो.

gokhale.chess@gmail.com