जुई कुलकर्णी

मराठीतील दलित आणि आंबेडकरी साहित्यात बाबूराव बागूल हे महत्त्वाचं नाव. साठच्या दशकातील बाबूराव बागूल हे नवकथालेखक. ‘जेव्हा मी जात चोरली होती’ हा त्यांचा कथासंग्रह १९६३ साली प्रकाशित झाला. ‘मरण स्वस्त होत आहे’ हा संग्रह १९६९ साली प्रकाशित झाला. ‘सूर्याचे सांगाती’ हा त्यांच्या कथांचा संग्रह जी. के. ऐनापुरे यांनी संपादित केला आहे. स्वत: एक साहित्यिक आणि समीक्षक असलेले जी. के. ऐनापुरे यांनी विचारपूर्वक हा कथासंग्रह संपादित केला आहे.

vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
Koyta Ganga, Pimpri-Chinchwad, Koyta Ganga news,
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगाचा पुन्हा उच्छाद
Congress and farmers organizations in Rajura need new leadership like arun dhote and adv deepak chatap
राजुऱ्यात काँग्रेस, शेतकरी संघटनेला नव्या नेतृत्वाची गरज! अरुण धोटे, ॲड. दीपक चटप यांची नावे चर्चेत
eknath shinde upset rohini khadse poem
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला ? रोहिणी खडसे यांचा एकनाथ शिंदे यांना कवितेतून चिमटा

संपादनाचे काम सूक्ष्म असते. या कामामागची विचारभूमिका आणि एकूणच अनुषंगानेच इतर अनेक विषयांवर केलेले विवेचन तब्बल शहाऐंशी पानी प्रस्तावनेत जी. के. ऐनापुरे यांनी लिहिले आहे. या प्रस्तावनेत दि. पु. चित्रे आणि विलास सारंग हे समकालीन नवकथाकारदेखील चर्चिले गेले आहेत.
बाबूराव बागूल यांचे आयुष्य अतिशय संघर्षमय आणि वेगळे गेले. नाशिकमधील विहीतगाव येथे १९३० साली त्यांचा जन्म झाला. दलित जातीत जन्मल्याने भेदभावाचे चटके बसू लागले ते या कथासंग्रहातील कथेतही दिसतात. नंतर त्यांना मुंबईत माटुंगा लेबर कँपमधील मावशीकडे शिक्षणासाठी पाठवले गेले. इथून त्यांचा संबंध आंबेडकरवादी चळवळीशी आला. शिक्षण झाल्यावर रेल्वेत नोकरी लागल्यावर साम्यवाद आणि कामगार चळवळीशी बागुलांचा संबंध आला.

सुरतेला नोकरीनिमित्त जावे लागले तेव्हा तिथे जातीय भेदभावाने जागा मिळण्यास त्रास होऊ लागला. त्या वेळी खोटी जात सांगून बागुलांनी जागा मिळवली, पण ते मनाला पटेना म्हणून ते परत आले. या अनुभवावर आधारित ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा प्रसिद्ध झाली. त्याच नावाने नंतर पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला.‘सूर्याचे सांगाती’ मधली पहिली कथा ‘पान’ आहे. ही अमेरिकेत घडणारी कथा आहे. वैश्विक वंशभेदाची वेदना ठळक करणारी ही कथा आवर्जून घेतली गेली आहे. टॉम आणि हेझल यांची प्रेमकथा एकीकडे फुलते आहे. दुसरीकडे मार्टिन ल्युथर किंग यांची चळवळ सुरू आहे. धगधगत्या पार्श्वभूमीवर प्रेम बळी जात आहे. वर्णद्वेष विरोधी या चळवळीतही भारतातील जातिभेदाचे उल्लेख आहेत.

‘धम्म’ या कथेत बौद्ध धर्माच्या आक्रमणाने अतिशय अस्वस्थ झालेला येसू भगत आहे. एकीकडे त्याला उखडत चाललेल्या प्राचीन देवतांचं भय वाटते आणि दुसरीकडे नवीन पिढीतील लोक दूर सारतायत, त्यांचं देवाच्या कोपानं काही नुकसान होईल का याचं भय वाटते. या कात्रीत येसू भगत सापडला आहे. महार विरुद्ध नवबौद्ध असा वेगळाच संघर्ष इथं आहे. धर्म असा एका रात्रीत बदलून टाकणे येसूसारख्या लोकांना जमत नाही. त्यांचा एक वेगळाच झगडा या कथेत ठळक झालाय.

‘मनूची मनाई’ या कथेचा आशय महत्त्वाचा आहे. गावगाडय़ातील जात व्यवहार मैत्रीच्या, प्रेमाच्या नात्यांतही विष कालवतो. महिपती मुंबईहून गावात परत येतो. बाळा पाटील हा त्याच्या वडिलांचा मित्र आणि स्नेही आहे. पण बाळा पाटीलच्या घरात जेवणे, आदर सत्कार स्वीकारणं महिपतीला जमत नाही. जातिभेदाची किनार सुटत नाही. बाळा पाटील म्हातारा माणूस आहे. महिपतीवर, त्याच्या बापावर त्याचे खूप प्रेम असले तरी एका मर्यादेनंतर जातिभेद न करणे त्यालाही शक्य नाही. महिपतीला त्याच्या बापाच्या थाळीतच जेवण वाढले जाते. पण नवीन आधुनिक जग पाहून इथं परत आलेला महिपती आता हा भेदाभेद सहन करू शकत नाही. महिपतराव असे संबोधन त्याला खोटे वाटते. गरोदर पत्नीला पाटलांच्या घरातील बायका माजघरात नेत नाहीत हेही खटकते. बाळा पाटीलची माया आणि तडफड त्याला दिसत असली तरी त्याचा स्वाभिमान अधिक वरचढ ठरतो. ‘सूर्याचे सांगाती’ ही शीर्षक कथा आहे. नाखवा, शंकर जाधव, संजय कुलकर्णी, श्रीधर सावंत आणि भाई मोहम्मद अली हे पार्टी मेंबर्स आहेत. त्यांची चर्चा सुरू आहे. कुलकर्णीची बायको त्याला सोडून घटस्फोट घेऊन परदेशात निघून गेली आहे. मुस्लीम महिलांची अवस्था बिकट आहे.

‘फकिराचा वंशज’ या कथेत नायक अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीतील पात्रामुळे प्रभावित झाला आहे. मुंबईचा पाऊस, शाळेचा पहिला दिवस, तमाशातील मास्तरांची थट्टा आणि शाळेतील मास्तरांची क्रूर आठवण अशी ही काहीशी विस्कळीत कथा आहे.‘सारंगीचे सूर’ या कथेत स्त्रीविषयक क्रौर्य दिसते. ऑनर किलिंगच्या घटना आजही घडत आहेतच. संभा गायकवाड त्याची बायको पाकोळी आणि घरी आलेली विधवा बहीण सारजा हे तिघंही एकमेकांचा द्वेष करतात. सारजाचे अस्पृश्य आत्मारामवर प्रेम आहे. पाकोळी सारजाला दहशतीत ठेवू पाहते. नणंद घरी आली आहे म्हणून नवऱ्यालाही त्रास देते. संभा तर या सगळय़ांवरच चिडलेला आहे. आत्मारामलाही सारजेला भोगून संभाचा अपमान करायचा आहे. ही कथा अपेक्षित क्रूर वळण घेते.

‘आंधळा उजेड’ या कथेत नवविवाहित बायकोला पहिल्या रात्री मालकाकडे पाठवण्याच्या प्रथेचा विरोध आहे. त्यातून होणारी शोकांतिका आहे. ‘तुरुंग’ या कथेत मुंबईतलं झोपडपट्टीतले जग आहे. संतापानं वेडसर वागणारी आई, आईकडून गरोदर पत्नीचा छळ होणं, नोकरी जाणं आणि झोपडपट्टीत यावं लागणं, एक मतिमंद मुलगी या सगळय़ामुळे धर्मा देशमुख पिचून गेला आहे. जगणं त्याला तुरुंग वाटते.बागुलांचं जग हे अस्पृश्यांचं जग आहे. कष्टकरी समाजाचं जग आहे. जिथे रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे. जिथे माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही, त्याचा मान पदोपदी आणि ठायीठायी तुडवला जातो आणि चिरडला जातो असं जग आहे. हे अपार कष्ट करणारं तरी अति दारिद्य्रात खितपत पडणारं जग आहे. हे बहुसांस्कृतिक झोपडपट्टीचं आणि कामगार वस्तीचं जग आहे आणि हे एक असं जग आहे जे अस्तित्वात आहे हे मानायलासुद्धा पांढरपेशी, सुसंस्कृत, उच्चवर्णीय जग तयार नसतं. क्रूरता आणि करुणा याचं मिश्रण या कथांमधे पाहायला मिळते. स्त्रीवादाची एक किनारही या कथांमध्ये आहे. या कथांमधला काळही एकोणीसशे साठच्या, सत्तरच्या आसपासचा आहे. काळाने आता पन्नासेक वर्षांत बरीच मोठी उडी मारलेली असली तरी आजही भारतात एक भिंतीपलीकडचं जग तसंच अस्तित्वात आहेच. त्या जगात आजही संघर्ष आहे, अपार शोषण आहे, जातीय भेदभाव आहे आणि हिंसाही आहे. त्यामुळे या कथा दुर्दैवानं आजही लागूच ठरतात.

‘सूर्याचे सांगाती’, बाबूराव बागूल यांच्या असंग्रहित कथा
संपादन- जी. के. ऐनापुरे, लोकवाङ्मय गृह,
पाने- १६८, किंमत- २०० रुपये.

Story img Loader