आसाराम लोमटे – aasaramlomte@gmail.com
लोकशाहीर आणि साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीची सांगता कालच झाली. तळागाळातील लोकजीवनाचे भाष्यकार आणि कृतीशील उद्गाते ही त्यांची सर्वपरिचित ओळख. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचे मर्म उलगडून दाखविणारा लेख..
संयुक्त महाराष्ट्र आज साठीत पोहोचलाय. त्याच्या निर्मितीची घुसळण शाहिरीतून मांडणारे आणि नवमहाराष्ट्राचा भौतिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक नकाशा कसा असावा याचे चित्र रेखाटणारे अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष काल सरले. त्यांच्या शब्दांतून अवतरलेला संयुक्त महाराष्ट्र मोठा मनोज्ञ आहे. महाराष्ट्रभूमी ही घामाची, प्रेमाची आहे. संतांची, शाहिरांची आणि त्यागाच्या तलवारीची आहे. स्वातंत्र्याची आण घेऊन, त्यासाठी लढण्याची मनीषा बाळगून ‘महाराष्ट्रावरूनि टाक ओवाळून काया’ असे चिंतन अण्णा भाऊंच्या शाहिरीत येते. साम्राज्यशाहीची काळी माकडं हातातला घास खाऊ देत नाहीत. दिवसाढवळ्या आंबराई लुटतात. अशावेळी काळावर चाल करायला हवी. त्यासाठी ‘एकीचा बांधून किल्ला रे शिवारी चला’ असं आवाहन अण्णा भाऊ करतात. ‘माझ्या शिवारात दुनियेची दौलत पिकली आहे..’ असे एका शाहिरी रचनेत ते म्हणतात. मग वेगवेगळ्या पिकांचं प्रतीकात्मक वर्णन येतं. अशावेळी गोफण हाती घेऊन एकीनं रान राखू, ऐतखाऊंना हाकलून देऊ असा आशावाद ते बाळगतात. थंडी-पावसात भिजत मुंबईत काम करणारा कामगार एका छत्रीचीही वानवा असलेला आहे. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात सुरू झालेली आहे. या लढय़ात अन्यायाविरुद्धची संगीन चकाकते. कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीयांची बिनीवरची फौज उठते. मुंबईत पोट भरण्यासाठी आल्यानंतर गावाकडं राहिलेल्या मनेमुळे जीवाची काहिली होते, तशीच गत जणू खंडित महाराष्ट्रामुळे सीमाभागातील जनतेची झाली आहे असे परिमाण अण्णा भाऊ या लढय़ाला मिळवून देतात. त्यांच्या शाहिरीतून सतत एकीची वज्रमूठ आवळण्याचे आवाहन दिसते. बिनीवरती धाव घेण्याची असोशी त्यांच्या शाहिरीत कायम आहे. ‘रे चल बदल ही दुनिया सारी’ अशा प्रबळ ऊर्मीसह त्यांची शाहिरी कायम व्यवस्थाबदलाची ललकारी देत राहिली. अण्णा भाऊंच्या या स्वप्नांचे गेल्या साठ वर्षांत काय झाले याचे चित्र आपल्या समोरच आहे.
थेट रस्त्यावर उतरणारा संघर्ष करत असताना विपुल प्रमाणात कथात्म साहित्य अण्णा भाऊंनी लिहिले. संघर्ष आणि प्रेम ही दोन्ही टोके अण्णा भाऊंच्या साहित्यात दिसतात. जीवनासंबंधीचे त्यांचे चिंतन आणि साहित्याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांचे १९५८ सालचे एक भाषण पुरेसे आहे. या बहुचíचत भाषणात ते म्हणतात, ‘मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवनसंघर्षांने झडली आहे..’ अशी पाश्र्वभूमी विशद करून ‘शब्दांना नुसता आकार देणे सोपे असते, त्या आकाराला आत्मा देणे त्याहून अवघड आहे. तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस असा साक्षात्कार मानवाला करून देणे हे साहित्याचे खरे वैशिष्टय़ आहे..’ या शब्दांनिशी ते मॅक्झिम गॉर्कीला या भाषणात अधोरेखित करतात. अण्णा भाऊ यांची साहित्याबद्दलची धारणा किती पक्की होती हे त्यातून दिसून येते. टोकाची आíथक विषमता आणि त्यात पिचलेले जीवन हा अण्णा भाऊंच्या कथात्म साहित्याचा आंतरिक प्रदेश होता. या दोन टोकावरच्या जगण्याची आणि मरण्याची रीत आगळी आहे हेही त्यांनी ठासून सांगितले. सुरुंगांना पेट देता देता मरणे अथवा पोलादाच्या रसात बुडून किंवा विजेच्या धक्क्याने मरणे आणि दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे- या दोन्ही मरणांतले अंतर लेखकाने मोजावे आणि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित करावे असे त्यांनी सांगितले. सामाजिकदृष्टय़ा तळाशी असलेल्यांच्या जगण्यावर लिहिणाऱ्यांनी आधी या माणसांशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस. हे जग तुझ्या हातावर आहे याची जाणीव लिहिणाऱ्याने करून घेतली पाहिजे. या माणसांचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त केली पाहिजे आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबर असावा लागतो अशी भूमिका अण्णा भाऊंनी घेतली.. जी त्यांच्या अनेक कलाकृतींमधून दिसून येईल.
लोकमानस घडवणाऱ्या असंख्य कथा त्या- त्या परिसरात असतात. अनेक लेखकांच्या चित्रणात असे प्रदेश रूप-रंग-गंधासह आविष्कृत होतात. अण्णा भाऊंच्या साहित्यातून वारणा- कृष्णेच्या खोऱ्याचा परिसर जिवंत होऊन साकारतो. या परिसराला ते ठसठशीत अशी ओळख प्राप्त करून देतात. लोकजीवनाचे सर्जनशील भाष्यकार हीच त्यांची ओळख त्यातून अधिकाधिक दृढ होत जाते. लोकमानस घडवणाऱ्या कथनात्म परंपरेला वाङ्मयीन आकार देण्याचे काम अशा साहित्यातून घडते. जो जीवनसंघर्ष अण्णा भाऊ चित्रित करतात, तो सपाट नाही. त्यांनी प्रचंड संख्येने कथात्म साहित्य निर्माण केले. हे कथात्म साहित्य वाचनीय आहे. घटनाप्रधान आहे. त्यात चित्तथरारक प्रसंग आहेत आणि शृंगाराची वर्णनेही आहेत. पण ही फारच वरवरची ओळख झाली. अण्णा भाऊंच्या कथात्म साहित्याला तळपातळीवरील जगण्याचे असलेले अस्तर ही फार महत्त्वाची बाब आहे. उपेक्षित, वंचित आणि पदोपदी न्याय नाकारला जाणारी माणसे, या माणसांच्या जगण्यातली तगमग त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून येते. पण अण्णा भाऊ केवळ हे पृष्ठस्तरावरचे जगणे मांडून थांबत नाहीत. वर्गसंघर्षांच्या अनेक मिती या साहित्यातून व्यक्त होतात. अन्याय- अत्याचारांविरुद्ध बंड पुकारणारे, भूक आणि शोषणाविरुद्ध लढा देणारे, आíथक-सामाजिक विषमतेला उलथून टाकण्याची आकांक्षा बाळगणारे नायक त्यांच्या कथात्म साहित्यातून दिसतात. शेतकरी, शेतमजूर, राबणाऱ्या स्त्रिया, भटके-विमुक्त, तमाशा कलावंत, गुन्हेगार जमाती असे असंख्य घटक त्यांच्या अतीव आस्थेचे विषय होते. या घटकांच्या जीवनसंघर्षांला उत्कटतेने साकारणारी भाषा त्यांच्याकडे होती. चळवळीच्या मुशीतून तावून- सुलाखून निघालेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी या भाषेचे अभिन्न नाते होते. जीवनातले नाटय़ जेव्हा ही भाषा वाचकांसमोर उकलू लागते तेव्हा या भाषेने लोकजीवन किती रसरशीतपणे पचवले आहे याचा प्रत्यय येतो. जीवनातले थरारक प्रसंग चित्रित करताना ही भाषा अनेकदा जणू बखरीचे रूप घेऊ लागते. ही बखर मात्र रयतेची आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये येणारी भूक, उपासमार, दारिद्य््रा याचे कारण अनेकदा दुष्काळ आहे. अण्णा भाऊ हा पोटापाण्याचा संघर्ष वर्गीय दृष्टिकोनातून चित्रित करतात. ‘फकिरा’ ही कादंबरी या संघर्षांचे जिवंत उदाहरण आहे. भुकेल्या आणि उपासमार सहन करणाऱ्या माणसांचे विकल दुख पाहून फकिरा कळवळतो. तो गावातल्या पंतांच्या वाडय़ात येतो. आतापर्यंत किती माणसं दगावली, असा प्रश्न पंत विचारतात. ‘चार दिवसात बारीक-मोठी वीस..’ हे फकिराचे उत्तर असते. गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे पंतांनी सरकारला कळवलेले असते. सरकारचे मात्र उत्तर येत नाही. ‘मग आम्ही जगायचं कसं?’ असा प्रश्न फकिरा विचारतो. तेव्हा ‘तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका. उकिरडय़ाचाही पांग फिटतो. तुम्ही तर माणसं आहात..’ असं पंत म्हणतात. ‘तुम्ही जगलंच पाहिजे’ हे पंतांचे शब्द फकिराला जागं करतात. अण्णा भाऊ त्या प्रसंगाचे वर्णन करतात- ‘काजळी झाडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वत फकिराचं मन उजळलं. गगनाला गवसणी घालण्याची प्रबलता त्याच्या छातीत निर्माण झाली. त्याच्या तरुण पायांत विजेप्रमाणे िहमत संचारली. तो चिखल तुडवावा तसा अंधाराला तुडवीत बेभान होऊन मांगवाडय़ाकडं विद्युतगतीने निघाला..’ या शब्दांत हा प्रसंग सजीव होतो. वस्तीत आल्यानंतर फकिरा एकेकाचे नाव घेतो. त्यानंतर क्षणभर धावपळ होते. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसतात. तलवारी झळकतात. फकिरा निघतो आणि त्याच्यामागे दीडशे हत्यारं चकाकतात.पोटात अन्नाचा कण नाही म्हणून व्याकूळ होऊन बसलेल्या वस्तीला जगविण्याची प्रबळ आकांक्षा फकिरा बाळगतो. ‘‘क्षणभर मग म्हाताऱ्याकोताऱ्यांना उद्देशून फकिरा म्हणाला- आम्ही येईपातुर तुम्ही मढय़ांस्नी पानी पाजून जतन करा. उद्या सकाळी अन्नाचा हतं ढीग लावतो. घाबरू नका.’’ उपाशी माणसे खचून अथवा उन्मळून जात नाहीत. ती संघर्षांला सिद्ध होतात, आपला न्याय्य हक्क मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध एल्गार करून उठतात, हे अण्णा भाऊंच्या साहित्याचे प्रमुख लक्षण आहे. ‘फकिरा’ कादंबरीतले हे सारेजण माळवाडीच्या मठकऱ्याला लुटतात. मठकऱ्याच्या धान्याचा माग गावापर्यंत येतो आणि लोकांच्या घरात भाकरी सापडलेली असते. एवढय़ा कारणावरून पोलीस वस्तीपर्यंत येतात. घरात भाकरी सापडणे हा जणू आरोपी असल्याचाच पुरावा ठरावा अशी ही क्रूर आíथक विषमता अण्णा भाऊंच्या साहित्यात आपल्याला जागोजागी चटके देत राहते. माणसांच्या भुकेचे, उपासमारीचे चित्रण करताना अण्णा भाऊ त्याकडे तटस्थपणे पाहत नाहीत. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतले अनेक नायक हे व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारणारे आहेत. वास्तव कसे आहे, यापेक्षा ते कसे असायला हवे, या दिशेने अण्णा भाऊंच्या साहित्याचा जीवनसंघर्ष आपल्याला दिसून येतो. त्यांचा फकिरा तर अजरामर आहेच; पण त्यांच्या कथा- कादंबऱ्यांची नावे पाहिली तरी या संघर्षांची कल्पना येते. ‘ठासलेल्या बंदुका’, ‘निखारा’, ‘आग’, ‘संघर्ष’, ‘अग्निदिव्य’, ‘वारणेचा वाघ’ यांसारखी त्यांच्या काही कथा-कादंबऱ्यांची नावे जरी पाहिली तरी क्रांतीचे, बंडाचे आणि अन्याय-अत्याचारांविरुद्धच्या ठिणग्यांचे आकर्षण त्यांना किती होते याची कल्पना येईल. ‘फकिरा’प्रमाणेच ‘वारणेचा वाघ’चा नायक सत्तू हासुद्धा एका परिसराचा लोकनायकच आहे. ‘मास्तर’ ही कादंबरी प्रतिसरकारच्या आंदोलनाची धग घेऊन येते.
जिथे सारा संघर्षच पोटाची आग शमवण्यासाठी होता असे जग अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यात उभे केले. राबणाऱ्यांच्या जगातली सुख-दुखे त्यांनी शब्दांतून मांडली. शाहिरीपासून कादंबरीपर्यंत आणि पोवाडय़ांपासून कथालेखनापर्यंत सर्व वाङ्मयप्रकार अण्णा भाऊंनी हाताळले. शब्दांवर त्यांची निष्ठा होतीच, पण हे शब्द केवळ पुस्तकांतूनच अवतरले पाहिजेत असा आग्रह त्यांनी कधी धरला नाही. ‘मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही..’ असेही ते एके ठिकाणी म्हणाले आहेत. लेखकाकडे एकूणच मानवी जगण्याविषयी आस्थाभाव असायला हवा, वंचितांविषयी सहानुभाव असायला हवा. मानवी मूल्यांबद्दलची कळकळ असायला हवी. हे सगळे गुण अण्णा भाऊ यांच्या व्यक्तिमत्त्वात होते आणि तेच त्यांच्या साहित्यातूनही झिरपले. त्यांच्या लेखणीने श्रमिकवर्गाच्या आशा-आकांक्षा साकारल्या. त्यामुळे ‘वंचितांचा भाष्यकार’ हेच त्यांचे वाङ्मयीन विशेषण सार्थ ठरते. कलावाद की जीवनवाद, या दुफळीचा धुराळा उठलेला असताना अण्णा भाऊंचा जीवनसन्मुख वास्तववाद किती महत्त्वाचा होता हे आजही त्यांचे साहित्य पाहिले म्हणजे लक्षात येते. सामाजिक लढय़ांत एक पाऊल पुढे असणाऱ्या अण्णा भाऊंनी भूक, अन्याय, अत्याचारांचे आणि त्याविरुद्धच्या संघर्षांचे चित्रण केले. ‘फकिरा’सारखी कलाकृती ही केवळ एखाद्या समूहाचे चित्रण करणारी कलाकृती ठरत नाही, तर ती संपूर्ण समाजाची कलाकृती ठरते. भुकेविरुद्धचा संघर्ष पेटविण्यासाठी आणि लढय़ासाठी ‘फकिरा’ कायमच प्रेरणा देत राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्रोहाचे क्रांतीविज्ञान अण्णा भाऊंच्या लेखणीत प्रतििबबित झाले. ‘जग बदल घालूनि घाव, गेले सांगून मज भीमराव’ हे त्यांनीच सांगून ठेवले आहे. ‘धनवंतांनी अखंड पिळले, धर्माधांनी तसेच छळले’ हा शोषणाचा इतिहास त्यांनी सांगितला. आज सर्वच श्रमिकांचे जगणे हे एका कडेलोटावर उभे आहे. असंघटित कष्टकऱ्यांचे; विकासाच्या, प्रकल्पांच्या नावाखाली नागवले गेलेल्यांचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. वाचा नसलेल्या आणि वरवंटय़ाखाली भरडल्या जाणाऱ्या माणसांच्या चळवळी क्षीण होत आहेत. त्या-त्या ठिकाणच्या सामाजिक प्रश्नांवर लढा उभारणाऱ्यांच्या संघर्षांची धार बोथट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी अण्णा भाऊंच्या विचारांचा आधार प्रकर्षांने वाटू लागतो.
आज साहित्यातून सर्व प्रकारच्या जाणिवा व्यक्त होतात. मात्र, राबणाऱ्यांची, कष्टणाऱ्यांची दुनिया अजूनही जोरकसपणे उमटत नाही. वरवरची वर्णने येतात, मात्र शोषणव्यवस्थेच्या गाभ्याला हात घालण्याचा प्रयत्न अपवादात्मक दिसतो. अशावेळी अण्णा भाऊंचे मोठेपण किती सार्वकालिक आहे याची खात्री पटते व शोषणमुक्त समाजव्यवस्थेसाठीचा लढा अजूनही थांबलेला नाही, तो किती जोरकसपणे उभारण्याची गरज आहे याची यथार्थताही उमगते.