scorecardresearch

आदले । आत्ताचे: अर्नाळकरांचं मेटाफिक्शन

बाबूराव अर्नाळकरांच्या हजारभर कादंबऱ्यांमध्ये त्यांनी निवेदनाचे, रचनेचे जे प्रयोग केले ते आपल्या वाङ्मयसंस्कृतीतल्या रहस्यकथांविषयीच्या घट्ट पूर्वग्रहांमुळे दुर्लक्षित राहिले.

आदले । आत्ताचे: अर्नाळकरांचं मेटाफिक्शन

निखिलेश चित्रे

बाबूराव अर्नाळकरांच्या हजारभर कादंबऱ्यांमध्ये त्यांनी निवेदनाचे, रचनेचे जे प्रयोग केले ते आपल्या वाङ्मयसंस्कृतीतल्या रहस्यकथांविषयीच्या घट्ट पूर्वग्रहांमुळे दुर्लक्षित राहिले. या कादंबऱ्यांच्या मौलिकतेविषयी हेटाळणीयुक्त शेरेबाजी झाली, तशी त्यांच्या सामाजिक महत्त्वाची चर्चा झाली नाही. साहित्याच्या सीमेपलीकडले म्हणून ठरविल्या गेलेल्या रहस्यकथेतील एका महत्त्वाच्या पुस्तकावर जगभरचे साहित्य रिचवलेल्या वाचक-लेखकाची चर्चा.
बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांचं नाव काढलं की ‘एके काळी आम्ही हे खूप वाचायचो’ किंवा ‘लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात लपवून या रहस्यकथा वाचल्या’ वगैरे ठरावीक प्रतिक्रिया उमटतात. ‘आता हे वाचवत नाही’ किंवा ‘ते सगळं कसं उचललेलं आहे.’ असे आवाजही ऐकू येतात. पण अर्नाळकर आणि त्यानंतरच्या रहस्यकथांचा निवेदनशास्त्रीय, समाजशास्त्रीय किंवा वाङ्मयीन अभ्यास अद्याप झालेला नाही. त्यामुळे अर्नाळकर आणि त्यांच्या वाङ्मयीन वंशजांकडे गांभीर्यानं पाहणाऱ्या अभ्यासकांची गरज अधोरेखित होते.

अर्नाळकरांच्या हजारभर कादंबऱ्यांमध्ये त्यांनी निवेदनाचे, रचनेचे जे प्रयोग केले ते आपल्या वाङ्मयसंस्कृतीतल्या रहस्यकथांविषयीच्या घट्ट पूर्वग्रहांमुळे दुर्लक्षित राहिले. या कादंबऱ्यांच्या मौलिकतेविषयी हेटाळणीयुक्त शेरेबाजी झाली, तशी त्यांच्या सामाजिक महत्त्वाची चर्चा झाली नाही.
मी अर्नाळकरांच्या ज्या रहस्यकथा वाचल्या त्यातली कल्पनाशीलता, खेळकरपणा, निरागसता या घटकांनी अनेकदा मला गुंतवलं. या सगळय़ापल्याड अर्नाळकरांच्या लेखनातून काय जाणवत असेल तर या लेखकाचं फिक्शनप्रेम. त्यांनी ‘काळापहाड’सारखं दुहेरी लेखक-पात्र निर्माण केलं.

काळापहाडच्या अनेक रहस्यकथांतून रहस्यकथेच्या लेखनप्रक्रियेविषयी रोचक गोष्टी वाचायला मिळतात. पण आज मी ज्या कादंबरीविषयी सांगणार आहे, ती काळापहाड-कथा नसून झुंजार-कथा आहे. झुंजार या साहसप्रिय पात्राचा तसा साहित्य वगैरे गोष्टींशी संबंध नाही. पण त्याची एक कथा मात्र थेट लेखनप्रक्रियेलाच आशयाच्या केंद्रस्थानी ठेवते. तिचं नाव ‘रत्नराज झुंजार’. ही रहस्यकथा साधारण सत्तरच्या दशकातली. म्हणजे अर्नाळकरांचा लेखक म्हणून उतारकाळ सुरू असतानाची. अर्नाळकरांच्या इतर अनेक झुंजारकथांप्रमाणे ही रहस्यकथाही लेस्ली शार्तरीजच्या एका कादंबरीवर आधारित आहे. अर्नाळकरांनी मूळ रहस्यकथेत किती आणि कसे बदल केले हा या लेखाचा विषय नाही. मात्र अर्नाळकरांच्या इतर रहस्यकथांमध्ये ती वेगळी उठून दिसते. या वेगळेपणाची अनेक कारणं आहेत. एक तर हे मेटाफिक्शन म्हणजे फिक्शनविषयीचं फिक्शन आहे. दुसरं म्हणजे त्यातलं रहस्य हे कल्पित साहित्य आणि वास्तव यांच्या गुंतागुंतीच्या नात्यावर आधारित आहे. त्याविषयी काही बोलण्याआधी कादंबरीच्या कथानकाविषयी थोडं सांगणं गरजेचं आहे.

भानुविलास या टोपणनावाने लिहिणारा एक लोकप्रिय रहस्यकथाकार आहे. हा लेखक कोण, दिसतो कसा, त्याचं वय किती हे तपशील फक्त त्याच्या प्रकाशकालाच ठाऊक आहेत. त्यामुळे हा लेखक म्हणजे वाचकांसाठी एक गूढ आहे. झुंजार या भानुविलासच्या कथेवर आधारित एक चित्रपट बघायला जातो. चित्रपट संपल्यावर भानुविलासचा प्रकाशक झुंजारला भेटून त्याची मदत मागतो. काही गुंड या भानुविलासच्या मागावर आहेत. त्याच्या घरावर पाळत ठेवत आहेत. त्यांच्यापासून झुंजारनं भानुविलासला वाचवावं अशी प्रकाशकाची अपेक्षा आहे. त्यासाठी तो झुंजारला भानुविलासच्या ठाण्यातल्या घरी घेऊन जातो. भानुविलासला पाहिल्यावर झुंजारला धक्का बसतो, कारण ती प्रत्यक्षात वनलीला नावाची स्त्री असते. तेवढय़ात भानुविलासच्या मागावर असलेले गुंडही घरात घुसतात. भानुविलास नक्की कोण हे माहीत नसल्यानं ते झुंजार आणि वनलीला या दोघांचं अपहरण करतात. त्यांना ते आपल्या अघोरनाथ नामक म्होरक्याकडे घेऊन जातात. अघोरनाथ हे या म्होरक्याचं खरं नाव नाही. तर भानुविलास ऊर्फ वनलीलेच्या रहस्यकथांमध्ये अघोरनाथ नावाचं खलनायकाचं पात्र आहे. त्याच्या कृत्यांनी प्रभावित होऊन त्यानं अघोरनाथ हे नाव घेतलं आहे. एवढंच नाही, तर भानुविलासच्या रहस्यकथांमध्ये वारंवार येणाऱ्या इतर पात्रांची नावं त्यानं आपल्या टोळीतल्या माणसांना दिली आहेत. हा अघोरनाथ झुंजारलाच भानुविलास समजतो आणि त्याला कैदेत ठेवून बँक दरोडय़ावर आधारित रहस्यकथा लिहायला सांगतो. त्या रहस्यकथेतला दरोडा प्रत्यक्षात आणण्याचा त्याचा डावा असतो. मग झुंजारही लेखक असण्याचं आणि रहस्यकथा लिहिण्याचं नाटक करतो. मात्र त्याला हे काम भलतंच अवघड वाटतं. मग तो वनलीला म्हणजे खऱ्या भानुविलासला लेखनिक म्हणून मदतीला घेतो. पुढे काय होतं आणि ते अघोरनाथाच्या तावडीतून कसे सुटतात हे मूळ कादंबरीतच वाचलं पाहिजे.

रहस्यकथेचा तोंडवळा असलेली ही कादंबरी रहस्यकथेचे प्रचलित नियम शांतपणे बाजूला सारून आकार घेते. वरवर पाहता झुंजार या कादंबरीचा नायक आहे. मात्र प्रत्यक्षात या कादंबरीतला पेच कल्पित साहित्यानं वास्तवात आयुष्यात केलेल्या हस्तक्षेपावर आधारलेला आहे. इतर झुंजारकथांमध्ये असतो तसा इथं झुंजारच्या शौर्याला फारसा वाव नाही. उलट खलनायकानं समोर ठेवलेलं रहस्यकथा-लेखनाचं आव्हान तो समर्थपणे पेलू शकत नाही. एरवी झुंजारकथांमध्ये दुय्यम असणाऱ्या स्त्री-पात्राला इथं झुंजारपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झालेलं दिसतं. कारण ती लेखिका आहे आणि प्राप्त संकटातून सुटण्याचा मार्ग फिक्शन लिहिल्याशिवाय सापडणार नाही. त्यामुळे एका पातळीवर रहस्याचं जाळं विणताना, दुसऱ्या पातळीवर ही कादंबरी फिक्शनचं महत्त्व स्पष्टपणे उच्चारते. रूढ नायकाला मागे सारून नायिका आणि फिक्शन हे इथं त्रात्याची भूमिका निभावतात. इथलं अघोरनाथाचं पात्र भानुविलास या लेखकावर ताबा ठेवत त्याला आपल्या मनाप्रमाणे कादंबरी लिहायला लावतं. लेखकावर हुकूमत गाजवतं. दुसरीकडे लेखकाची ओळख गुप्त असल्यामुळे एका न-लेखकाला, म्हणजेच झुंजारला लेखक होण्याची अयशस्वी धडपड करावी लागते.

वास्तववाद हा वास्तवाचं कल्पितात रूपांतर करतो. त्यात वास्तवाचं कल्पित विश्वातलं सादरीकरण अपेक्षित असतं. मात्र या कादंबरीत कल्पितानं वास्तवाचं अनुकरण केलेलं दिसतं. अघोरनाथ या पात्रावर भानुविलासच्या कादंबऱ्यांचा एवढा खोल प्रभाव आहे, कीत्याचं अवघं आयुष्यच भानुविलासच्या कादंबऱ्यांच्या अनुकरणातून घडत जातं. त्याच्या निवासस्थानाची रचना, तिथलं स्थापत्य, त्यातले बारीकसारीक तपशील हे सगळं भानुविलासच्या कादंबऱ्यांमधल्या तपशिलांचं वास्तवातलं अनुकरण आहे. याविषयी कादंबरीतला उतारा पाहा :
‘या अघोरनाथाने केवळ भानुविलासच्या रहस्यकथेतील सर्व पात्रेच सजीव केली नव्हती तर त्याने तिच्या कथांतील अघोरनाथाचे मुख्य ठाणेही लाखो रुपये खर्च करून तयार केले होते. त्या अघोरनाथाच्या मुख्य ठाण्यात वनलीलेने कल्पनेने शोधून काढलेल्या सर्व युक्त्या, गुप्त दारे, तळघरे आणि छळ करण्याची नाना यंत्रे अघोरनाथाने तयार केली होती आणि अशा या त्याच्या मुख्य अड्डय़ातच त्याने झुंजार आणि वनलीला यांना कैद केले होते.’
पण हे वास्तव कोणतं? तर बाबूराव अर्नाळकरांच्या ‘रत्नराज झुंजार’ या कादंबरीतलं. म्हणजे वाचकाच्या दृष्टीनं तेही कल्पितच. अशा वास्तव आणि कल्पिताच्या विविध पातळय़ांच्या परस्परसंवादातून ही कादंबरी घडत जाते.

इथं अॅरिस्टॉटलच्या अनुकृतीच्या (Mimesis) सिद्धांताचा विचार करणं रोचक ठरेल. अनुकृतीजन्य वास्तववादी साहित्यात वास्तवातल्या निवडक घटकांची पुनर्रचना केली जाते. म्हणजेच अमर्याद वास्तवाला विशिष्ट परिघात बंदिस्त केलं जातं. ‘रत्नराज झुंजार’मध्ये याउलट घडतं. कादंबरीतल्या कल्पित वास्तवाला प्रत्यक्षात आणून त्यावरच्या मर्यादा काढून घेतल्या जातात. त्यांना मुक्त केलं जातं.

अर्नाळकरांच्या या (आणि इतरही) कादंबरीची रचना एखाद्या खेळासारखी आहे. लेखकानं वाचकासमोर पट मांडलेला आहे. खेळाचे
नियम ठरलेले आहेत. ते स्वीकारून वाचकानं खेळाशी समरस व्हायचं आहे. खरं तर खेळाच्या चौकटीतून एकूणच रहस्यकथा या वाङ्मयप्रकाराकडे बघता येतं.

डच तत्त्वचिंतक जोहान हिंझगा (Johan Huizinga) याने आपल्या ‘होमो ल्युडेन्स’ या ग्रंथात खेळाचा सांस्कृतिक अंगाने अभ्यास केला. त्यात त्यानं खेळ या कृतीची पुढील लक्षणं मांडली :
खेळ ही एक मुक्त कृती असते. ती कोणत्याही प्रकारे लादलेली नसते.
ही कृती वास्तवापासून फारकत घेणारी असते.
खेळाला स्वत:ची अशी अंतर्निहित व्यवस्था असते आणि ही व्यवस्था काळ आणि अवकाशाला बांधलेली असते.
खेळाडूंना या व्यवस्थेचं पालन करत विशिष्ट उद्दिष्ट साध्य करायचं असतं.
साठ ते सत्तरच्या दशकातल्या मराठी रहस्यकथा आज वाचताना लहानपणीच्या खेळातल्या
निरागस मौजेचा पुन:प्रत्यय येतो. त्या खेळातली गुंतवणूक तात्कालिक असते. मात्र समरसता अतिशय उत्कट असते.
‘रत्नराज झुंजार’ या कादंबरीत वाचक खेळाडूची भूमिका घेऊन पात्रांच्या बरोबरीनं या खेळात सहभागी होतो. लेखकाच्या बरोबरीनं तो स्वत:ची खेळी रचतो आणि ती लेखकाच्या निर्णयाशी ताडून बघतो. त्याला या खेळात
गुंतवून ठेवण्याचं काम अर्नाळकरांची थेट, सालस भाषा करते.

अर्नाळकरांच्या रहस्यकथा या निरागसतेचा अंत होण्यापूर्वीच्या गोष्टी आहेत. ‘रत्नराज झुंजार’ही त्याला अपवाद नाही. त्यातल्या गुन्ह्यंमध्ये गडदपणा जाणीवपूर्वक टाळलेला आहे. खलपात्राची नैतिकता विशिष्ट चौकटी ओलांडून जात नाही. अशा चौकटींची मर्यादा पाळत अर्नाळकरांनी या आणि अशा इतर रहस्यकथांमधून या वाङ्मयप्रकाराच्या नियमांची उलटापालट करण्याचं जे सूक्ष्म बंड केलं ते दखलपात्र आहे.

जागतिक साहित्य आणि सिनेमाचा अभ्यासक. दुर्र्मीळ मराठी- हिंदी-उर्दू पुस्तकांचा संग्राहक ही दुसरी ओळख. गेल्या दीड दशकापासून
विविध नियतकालिकांमधून ग्रंथ आणि चित्रपटांवर भरपूर लेखन.‘आडवाटेची पुस्तके’ हे अकथनात्मक लेखांचे आणि ‘गॉगल लावलेला घोडा’ हे कथांचे पुस्तक लोकप्रिय.

satantangobela@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 05:22 IST