अरतें ना परतें.. : वडिलोपार्जित

बारकी बारकी स्वप्नं पूर्ण करण्यासाठीही किती संघर्ष करावा लागला आहे त्यांना, हे मला ऐकून माहीत होतं.

प्रवीण दशरथ बांदेकर samwadpravin@gmail.com
बाबा गेले तेव्हा दिवसभर घरातले दिवे जळत राहिले होते. रात्रीही कुणी झोपलं नव्हतं. दिवे सुरूच होते. बाबांना ही गोष्ट कधीच आवडली नसती. गरज नसताना दिवे जाळणं, टीव्ही किंवा पंखे सुरू ठेवणं, पाणी वाया घालवणं, झाडांची पानं वा फांद्या तोडणं अशा काही गोष्टींच्या ते नेहमीच विरोधात होते. अशा गोष्टींवरून ते नेहमीच करवादत राहायचे. मुंबईहून येणाऱ्या बहिणींची वाट बघत आम्ही ताटकळत बसलो होतो, तेव्हा बाबांच्या निष्प्राण देहाकडे बघताना माझ्या मनात चमत्कारिकपणे येत राहिलं होतं- आता कोणत्याही क्षणी बाबा उठून बसतील. डोळे उघडतील. समोर भगभगणारे सगळ्या खोल्यांतले दिवे पाहतील, गरगर फिरणारे पंखे पाहतील नि माझ्यावर ओरडतील, ‘‘बाळा! अरे, काय चल्लांहां काय? कशाक् व्हय्तें इतके सगळे लाय्टी आणि फॅन लाव्न ठेवलास् गरज नसताना?’’

आम्ही बाबांचं हे असं करवादणं फारसं कधी मनावर घ्यायचो नाही. उलट हसण्यावारीच न्यायचो. आम्हाला वाटायचं, बाबा काय म्हणून अशा किरकोळ गोष्टींचा बाऊ करत असतात? एवढं काय मोठ्ठंसं बिल येणाराय? किंवा एवढं काय कुणाचं नुकसान होणाराय? बाबांनी त्यांच्या आयुष्यात खूप खस्ता काढल्या आहेत. बारकी बारकी स्वप्नं पूर्ण करण्यासाठीही किती संघर्ष करावा लागला आहे त्यांना, हे मला ऐकून माहीत होतं. त्यामुळे साहजिक आहे, त्यातूनच त्यांच्यात ही काटकसरी वृत्ती आली असावी. आता कितीही समृद्धीचे दिवस आले तरी त्यांना ही अंगवळणी पडलेली आयुष्यभराची सवय अशी सहजासहजी सोडून देता येत नसावी. यात त्यांचीही काही चूक आहे असं म्हणता आलं नसतं. त्यांच्या पिढीच्या अनेक माणसांची ही अशीच काटकसरी वृत्ती होती. ती एकूणच त्यांना जगाव्या लागलेल्या त्यांच्या अभावाच्या दिवसांची परिणती असू शकत होती.

अलीकडे मात्र मला अचानक जाणवू लागलं आहे की, मीही हल्ली बाबांसारखाच वागू लागलो आहे. म्हणजे तितका काटकसरी नसेन कदाचित; पण काही काही गोष्टींबाबत त्यांच्यासारखाच आग्रही झालो आहे. मुलं माझ्यावरही अगदी तसंच हसत असतात; चेष्टा वा टिंगलटवाळी करत असतात. मीही तसाच करवादत असतो. किरकिर करत असतो. एवढय़ा तेवढय़ा गोष्टींवरून घरातल्यांवर वैतागत असतो. हे असं कसं काय घडून आलं, मला कळत नाही. पण असं झालंय खरं. कदाचित आपण बाप बनतो तेव्हाच आपण आपल्या मुलामध्ये काहीतरी अदृश्य गोष्टी हस्तांतरित करत असतो. हे तेच काहीतरी असतं- जे आपण जन्माला येताना आपल्या बापाने आपल्याला दिलेलं असतं. जसजसं आपण पोरवय संपवून प्रौढत्वाच्या वाटेवरून चालायला सुरुवात करतो, तसतसं ते आजवर फारसं कधी न जाणवलेलं असं काहीतरी आपल्यामधून अधिक ठळकपणे बाहेर डोकावायला सुरुवात करीत असावं. हे तसंच काहीतरी घडत असावं काय? द. भा. धामणस्करांच्या त्या प्रसिद्ध कवितेतल्या बापाने हात जड झाल्याचं निमित्त करून आपल्या माथ्यावरची विसर्जनाची गणपतीची मूर्ती मुलाच्या माथ्यावर दिली होती. आपल्या माथ्यावरचं ओझं गेलं, जबाबदारी संपली, हात मोकळे झाले.. यापेक्षाही आपली परंपरा पुढे गेली, आधल्या पिढीतून पुढल्या पिढीकडे सरकली याचा आनंद बापाला लपवता येत नव्हता. तसंच काहीसं असावं का हेही? पण हे निव्वळ परंपरेशी, जबाबदारीच्या ओझ्याशी, प्रौढत्वाच्या भावनेशी किंवा आपल्या काही विशिष्ट आनुवंशिक म्हणता येतील अशा सवयींशीच जोडलेलं असू शकतं का? शिवाय हे माझ्या बाबतीत आहे तसं जगातल्या कुठल्याही बाप-लेकांबाबत असू शकत नाही का? की हे काहीतरी वेगळंच आहे, आपल्याला नेमकेपणाने त्याचा अर्थ लावता येत नाहीये?

शाळकरी दिवसांत वाचलेली प्रेमचंदांची एक कहानी मला आठवतेय. त्यातही हे असंच काहीतरी होतं. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून त्रासलेला बाप मुलांवर राग काढत असायचा. सतत ऐकवत असायचा- ‘‘आपण लहान असताना आपल्या कुटुंबाला कसे कोंडय़ाचा मांडा करून दिवस ढकलावे लागत होते. साध्या पेन्सिलीच्या एका क्षुल्लक तुकडय़ासाठीसुद्धा बापाकडे किती वेळा तोंड वेंगाडावं लागत होतं. आणि त्यातून समजा, कधी चुकून हाती आलेला असा तुकडा हरवलाबिरवला, तर किती बोलणी खावी लागत होती; प्रसंगी मारही खावा लागत होता. कसे दिवस काढले आम्ही! एक शर्ट नि एक पँन्ट घालून! नि तुम्हाला आता सगळं आयतं मिळतंय, तुम्हाला किंमत नाही उरलेली कशाची.’’ ही कथा वाचताना मला माझे बाबा आठवत होते. आमच्याही घरात हे असेच संवाद नेहमी ऐकावे लागायचे. ही खरं तर माझ्याच नव्हे, तर अनेकांच्या घरातली गोष्ट आहे. तपशिलांत थोडाफार फरक होऊ शकतो; बाकी संवाद याच आशयाचे असतात तिथंही. पण प्रेमचंदांची ती गोष्ट इथंच संपत नव्हती. गोष्टीतला मुलगा हळूहळू मोठा झाला होता. तोही आता बाप बनला होता. एके दिवशी त्याचे वडील मरण पावतात. इतके दिवस वडिलांच्या सावलीत वाढणारा मुलगा आता कुटुंबाचा प्रमुख बनतो. मुलाला आता वडिलकीच्या प्रौढपणाची, त्यातून येणाऱ्या जबाबदारीची नकळतच जाणीव होते. त्याची चिडचिड वाढू लागते. शेवटी अशी वेळ येते की त्याच्या वागण्या-बोलण्यातच नव्हे, तर चालण्याच्या लकबीत, खाण्यापिण्याच्या सवयींत, जवळपास प्रत्येक हालचालीत त्याच्या बापाचाच भास व्हावा इतकं सगळं साधर्म्य दिसू लागतं. जणू तो आधीचा हट्टी, खुशालचेंडू, आपलं ते खरं करणारा मुलगा कुठेतरी हरवून गेलेला असतो, नाहीसा झालेला असतो, आणि त्याचे वडीलच पुन्हा नवा जन्म घेऊन त्याच्या बा रूपात घरात वावरत असतात.

आपलं तरी काय वेगळं असतं म्हणा! गोष्टीतली फक्त पात्रं बदलतात, काळ आणि स्थळ बदलतं, बाकी आशय तोच आणि तसाच तर असतो. बाबांविषयी मी आजवर फारसं काही लिहिलं नसलं तरी मला माहीत आहे, माझ्या कवितेत वा गद्य लेखनातही त्यांची कितीतरी रूपं, कितीतरी संस्मरणं कळत-नकळत विखुरलेली आहेत. माझ्या व्यक्तिमत्त्वातल्या अनेक बऱ्यावाईट जागा बाबांचीच प्रतिरूपं आहेत. रक्तामधून संक्रमित होत आलेले, संस्कारांतून आलेले, कळत-नकळत केलेल्या अनुकरणातून पाझरलेले माझ्या स्वभावातले अनेक गुणदोष आईपेक्षाही बाबांशीच साधर्म्य सांगणारे आहेत हेही जाणवत असतं. दुनियेच्या अनुभवांच्या चष्म्यातून काही ठोकताळे बांधता येत असले तरी शेवटी आपल्याला आपल्या स्वत:च्या अनुभवांच्या प्रकाशातच त्यांच्याशी तोलून पाहायला हवं असतं, हेही तितकंच खरं आहे ना! मीही अलीकडे हळूहळू माझ्या बाबांसारखाच वागू-बोलू लागलो आहे याची जाणीवही म्हटलं तर अशाच एका काहीशा किरकोळ अनुभवावरून झाली होती.

त्या दिवशी काहीतरी निमित्त होऊन वाटेत अचानक गाडी बंद पडली होती. रिक्षा करून घरी येता येणं सहज शक्य होतं. पण मनात आलं, नाही तरी अधेमधे आपण वॉकिंगला जात असतो, तसंच आताही समजायचं. जेमतेम तीन-चार किलोमीटरवर तर आपलं घर आहे. कशाला वाहनाची वाट बघत बसायची? जाऊ या की चालत! आणि मग दुसऱ्या कुठल्या वाहनाला हात न दाखवता मी चालत घरी आलो. दुपारची वेळ होती. घामाच्या धारा वाहत होत्या. चालल्यामुळे थोडीफार धाप लागली होती. माझी ती अवस्था बघून मुलगा म्हणाला, ‘काय गरज होती एवढं चालत यायची? रिक्षा मिळत नव्हत्या का?’

आणि मला अचानक बाबांची आठवण झाली. बांद्याहून सावंतवाडीत येताना वा इकडून तिकडे जाताना, बसमधून उतरल्यावर एस. टी. स्टॅण्डवरून रिक्षा करून घरी येण्याऐवजी तेही असेच घामाघूम होत चालत घरी यायचे. किती वेळा मी सांगायचो, ‘‘तुम्ही आता तरुण नाही आहात. चांगले ऐंशी वर्षांचे झालाय. चढाव चढताना धाप लागतेय. असे कितीसे पैसे लागतात रिक्षाला? पैसे वाचवून काय करणार आहात? अशाने आजारी पडलात तर वाचवलेल्या पैशांच्या किती पट द्यावे लागतील डॉक्टरला?’’ पण यात शेवटपर्यंत कधी बदल झाला नव्हता. कडाक्याचं ऊन असो वा आडवातिडवा कोसळून चिंब भिजवणारा पाऊस; चालत यायचा हट्ट त्यांनी कधी सोडला नव्हता.   याउलट माझं असायचं. चार पावलांवर जायचं झालं तरी मी गाडी काढणार.. चालायचा आळस करणार. त्यावरनं ते बडबडायचे, ‘‘एवढय़ा तेवढय़ासाठी कशाक् व्हयी रे गाडी? चार पावलां चाललां तर बिघडलां खंय? उलट झालो तर फायदोच व्हय्त ना थोडाफार चालल्याचो!’’

मी चटकन् मुलाला म्हटलं, ‘‘अरे, एवढय़ाशा अंतराला कशाला हवी होती रिक्षा? चार पावलं चाललं तर बिघडलं कुठे? उलट झाला तर फायदाच होईल ना थोडंफार चालल्याचा!’’

मुलगा काहीच बोलला नाही. कदाचित त्यालाही त्याच्या आजोबांशी मी याच गोष्टीवरून कसे वाद घालत असायचो ते आठवलं असेल का? तेव्हा त्यांना याच गोष्टीवरून टोकणारा मी आता तीच गोष्ट कशी काय करतोय, तसंच कसं बोलू लागलोय, याचं त्याला नवल वाटलं असेल. कदाचित त्याला याचंही आश्चर्य वाटत असेल, की हे असं कसं वडिलोपार्जित असलेलं काहीतरी एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आपोआपच जात राहिलंय..

वडिलोपार्जित? वडिलोपार्जित काय काय आलेलं असतं आपल्यात? कधी प्रकटत असावं ते? कधी कळतं आपल्याला?

म्हणजे आपल्याला वाटत असतं तसं काही नसावंच का? म्हणजे वडील गेल्यावरही आपण समजतो तसे ते गेलेले नसतातच, असं म्हणायचं का? ते असेही असावेत का आपल्या आत रुजलेले? आपल्या नकळत असं किती काय काय त्यांनी हस्तांतरित केलेलं असू शकतं. हे सगळंच कदाचित त्यांनाही त्यांच्या वडिलांकडून मिळालेलं असू शकतं. त्यांच्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून.. असं किती पिढय़ांपर्यंत मागे मागे जावं लागेल हे शोधायला? चौदा? बेचाळीस? किती? आपल्यात हे काय काय आहे कुणाकुणाचं आधल्यांचं? कसं समजणार हे आपल्याला? आणि आईचं काय? तिच्याकडून काहीच मिळालं नाहीये असं कसं म्हणता येईल? म्हणजे पुन्हा तिच्याकडूनही पुन्हा अशीच मागे मागे नेणारी आणखी एक अदृश्य आणि तरीही तितकीच समृद्ध गुंतागुंत. या दोन्हीची सरमिसळ म्हणजे आताचे आपण जे कुणी आणि जसे आहोत ते. म्हणजे आपलं नवं असं काहीच नसावं कदाचित. जे काही आहे ते आधीच्यांचंच आहे. आपण नुसतेच निमित्तमात्र. हे असं असेल किंवा तसं नसेलही. आपल्याला पृष्ठस्तरावर दिसणारं धड माहीत नसतं, तर हे आतलं, इतक्या मागचं काय कळणार आहे म्हणा!

काही वर्षांपूर्वी एक इराणी फिल्म पाहिली होती. तिचा नव्याने अन्वयार्थ आता लागतो आहे असं वाटतं आहे. परदेशात नोकरीला गेलेला मुलगा खूप वर्षांनी गावी परततो. मधल्या काळात त्याचा गावाशी फारसा संपर्क राहिलेला नसतो. आपला बाप मरून गेल्याचंही त्याला माहीत नसतं. तो गावात शिरतो तसा त्याला पाहणारा प्रत्येक माणूस दचकू लागतो. घाबरून ओरडत घाईघाईने त्याच्यापासून दूर पळू लागतो. हे असं का होतंय, त्याला आधी कळत नाही. पण मग त्याला काही लोक पकडून, त्याच्या मुसक्या आवळून गाव पंचायतीच्या समोर आणून उभं करतात. त्याला उलटसुलट प्रश्न विचारून त्याची कसून चौकशी करतात. शेवटी एक जाणता बाप्या म्हणतो, ‘‘डरने की जरूरत नहीं है. ये हुसैन नहीं, उसका बेटा है. इसका मतलब हुसैन मरकर भी अपनी जिंदगी जी रहा है. हर एक आदमी जिंदा रह सकता है, अगर वो भी इसकी तरह अपना अब्बू बन सके तो..’’

हेच खरं असावं बांदेकरांनू! काहीच नष्ट होत नसतं या जगात.. फक्त आदल्यातून पुढच्यात हस्तांतर होत जात असतं सगळ्याच बऱ्यावाईटाचं नव्या आकारात, नव्या रूपात. नाही तरी आमच्या थोरल्या बाने म्हटलंच आहे ना, ‘तुका म्हणे सिंधुभेटी। उदका तुटी वोहोळासी।।’ वाहाळाचं पाणी एकदा समुद्राला जाऊन मिळालं की तेही समुद्रच होऊन जातं. मग समुद्र कुठला आणि वाहाळ कुठला, कुणी कसं ठरवायचं?

काही अपरिहार्य कारणामुळे सुभाष अवचट यांचे ‘रफ स्केचेस्’ हे सदर यावेळी प्रसिद्ध होऊ शकले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arten na parten ancestral matters sense of responsibility sense of maturity zws

Next Story
रसग्रहण : ललितकलांच्या अभ्यासाचे अपरिचित दालन
ताज्या बातम्या