मेधा पाटकर medha.narmada@gmail.com

लतादीदींचा स्वर शांत झाला, पण त्यांच्या आवाजाचा साज ल्यायलेले शब्द मात्र भारतभूमीवरील साऱ्या लेकरांच्या कानी घुमत आहेत व राहतील.. पिढय़ान् पिढय़ा! जगभरातील अनेक मंचांवर त्यांचे सूर निनादले; परंतु देशी, राष्ट्रीय भाषा जाणणाऱ्यांच्या हृदयावर कोरले गेलेले शब्द त्यांच्या गळ्यातून निखळताच आपल्या दुनियेत पेरले गेले, नाही का? लतादीदींनी सात दशके उधळलेल्या २५ हजार गीतांपैकी कुठले गान कुठले भान कुणाला देऊन गेले, ते आता आठवांच्या श्रद्धांजलीत फुलांसम वाहताहेत सारेच! कुणी कलाकार, फिल्मकार, संगीतकार, कुणी मंत्री-संत्री, तर कुणी धनाधीशही! परंतु आमच्यासोबत चालणाऱ्या श्रमिक, आदिवासी, शेतकरी पोरासोरांनाही त्यांचे नाव अनोळखे नाही हे जाणवले ते त्या गेल्यावर! नर्मदेच्या पात्रात बोटीतून प्रवास करताना त्यांची सुरीली गाणी आमच्या कर्मठ विचारांनाही सादच नव्हे, तर साथ देणारी होती. म्हणूनच आम्ही आळवत राहिलो, जेव्हा त्या निवर्तल्याची बातमी.. बाहेरील जगाच्या नेटवर्कमध्ये काही मिनिटेच आमची बोटही तरत असताना! आमची ती गीतांजली बेसूरही असेल हो, पण बेहोशी आणणारी होती, हे कशासाठी करावे जाहीर? मनोमन जपावे ना आपले मनस्वी नाते, जिथे लतादीदी पोहोचल्या नाहीत कधीच अशा दुनियेतच राहून, त्यांनी मागे ठेवलेल्या शब्दस्वरांच्या ठेवेशी!

त्यांच्या प्रेमाच्या सादेलाही सारे व्यक्तिगत आयुष्य बाजूला सारून कार्यात गढलेले, वंचितांशी जडलेल्या प्रेमात अडकलेले कार्यकर्ते मनस्वी झेलताना मी पाहिले आहे, अनुभवलेही आहेच!

‘अजीब दास्तां है ये

कहाँ शुरू कहाँ खतम

ये मंज़िलें है कौन सी

न वो समझ सके न हम!’ या गीतामध्ये हातून निसटलेले आयुष्य कुरवाळत कधी प्रवासात पुढे जात राहतो आम्ही.. जीपमध्येच चालते त्या तबकडीत! ऌी१ टं२३ी१ह्ण२ श््रूी असतो  तो! ‘मन क्यूं बहका रे बहका आधी रात को’ हा प्रश्न एका विधवा स्त्रीने विवाहोत्सुक युवतीच्या साक्षीने उठवला होता, तो एकल आयुष्य जगणाऱ्या लतादीदींच्याच नव्हे तर अनेकानेक एकल महिलांचे मन प्रकटणाराच असतो! आपले आयुष्य वेगवेगळे वळण घेत राहते. कधी ते झाडा-पहाडावर चढते, तर कधी दऱ्याखोऱ्यांत कोसळते. तेव्हा आपण खूश आहोत ना, हा प्रश्न मनात आणू नये अशी गतीही असते! तरीही अनेक टप्प्यांवर जेव्हा असा प्रश्न स्पर्शू लागताच स्वत:लाच ऐकवण्याचे गीतही दीदींच्या शब्द-सुरांतून निघालेले.. ‘तुझसे नाराज नहीं ऐ जिंदगी, हैरान हूँ मैं..’ हे स्वत:लाच धरते जबाबदार.. करते खबरदार!

समाजाशी जोडून जगताना अनेक मंचांवर चढावे, उतरावे लागतेच! प्रत्येक मंचाचा साज, गाज वेगवेगळा असतो. तिथेही आपला आवाज उमटवण्यासाठी कधी गळा खुलतो! कुठल्या ना कुठल्या गीतामध्येच मिळते आपल्या कार्यसाधनेसाठी आवाहन.. ते समोरचे श्रोते-कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे होते आव्हान!

शेतकऱ्यांच्या त्या थंडी-पावसात, उन्हातान्हात पोळून, परखून अन् अखेर जिंकूनच उठलेल्या डेऱ्यासमोर ‘शहीद किसान अमर रहे’च्या घोषणांइतकाच शहीद- ए-आझम भगतसिंगांचा पिळलेल्या मिशीतली ताकद अन् रोखलेली नजर घेऊन उभा चेहरा जसा आव्हान देत राहिला, तसाच लतादीदींचा शब्दही घुमला की आसवांतूनच वाहायची श्रद्धांजली! ‘ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी!’ हे गीतच त्या वातावरणास प्रेरणेची ललकारी बनवत होते! ते कधी लाऊडस्पीकरवर, पण अनेकदा मनाच्या तबकडीवर उमटवत राहायचे ऐलान! ‘हम खेल रहे थे होली, वे झेल रहे थे गोली’ हे शब्द ऐकत कुणी हटवू शकेल का नजरेतून शहादतीने भारलेले आंदोलन? मला आठवते की लखिमपूर-खिरीच्या घटनेपूर्वी काही दिवसच सीतापूरमधील किसान महापंचायतीच्या मंचावर २६ जानेवारी २०२१ च्या समांतर घटनेत शहीद झालेल्या उत्तराखंडातील नवरीतच्या वडिलांसह बसले असताना हेच गीत तर मनभर गुंजत होते!

एकेका गीतातून व्यक्त होणारे आपलेच विचार, आपल्याच भावभावना घोळवत राहतो तेव्हा अनेकांपासून लपतात, पण आपले मन जपतात. हे अनेकदा अनुभवले अत्यंत परस्परविरोधी परिसरात! खास आठवते ते अहमदाबादमधील मॅजिस्ट्रेट कोर्टातील कटघऱ्यात उभी असतानाचे गुणगुणणे! गुजरातमधील बीभत्स, निर्घृण दंग्यानंतरच्या शांती समितीच्या बैठकीत माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतरच्या त्या केसमध्ये माझ्याच फिर्यादीवर चाललेल्या सुनावणीत माझीच ‘क्रॉस’ परीक्षा घेणारे वकील ४० गांधीवादी, धर्मनिरपेक्ष कार्यकर्ते, नेते साक्ष असतानाही व्हिडिओही नाकारत ती घटनाच खोटी, काल्पनिक असल्याचे माझ्या उत्तरांतून वदवू पाहत होते तेव्हा तासन् तास ओठांच्या आत उमटत राहिले एकच गीत- ‘इन्ही लोगों ने, इन्ही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा!’ ते होते ‘पाकिजा’तील लतादीदींचे सूर.. असुरांच्या हल्ल्यातील प्रत्येक महिलेला पाक-अपाकच्या पार जात राहणाऱ्या माझ्यासारखीलाही बळ देणारे!

लतादीदींच्या स्वरामागील शब्द कधी हिंदी, कधी मराठी.. न जाणे कितीतरी भाषांमधून प्रगटलेले. मात्र, गीतकार पडद्यामागे दडलेले. संगीतकारही भोंग्यापासून दूर बसलेले! गुलजार ते ए. आर. रहमानांपर्यंत साऱ्यांची लयबद्ध साथ सर्वच जाणतात. त्यात कोणी जात, धर्म तपासत नव्हते अशा काळातली ती समन्वयाची लाट आज ओसरताना लतादीदींनी एका मुलाखतीत दु:ख व्यक्त केले, हे वाचूनही धन्य वाटले! माझ्या बालपणी श्रीनिवास खळेंच्या शेजारीच राहताना संगीतकार म्हणून लतादीदींच्याबद्दलचे भावभरे अनुभव मी विसरू शकत नाहीच. परंतु तुकोबांच्या संदेशाला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती!’ हे जल, जंगल, जमीन व प्राणवायूसाठी तडफडणाऱ्यांना वाचवू पाहणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांना मिळालेले हे स्वर पुकारत देतात आयुष्यासाठी शिदोरी.. ‘येणे सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत!’ अहो, पण भवताल जर भरला आहे विनाशकारी विकासाने- तर जे ना आकाशमंडप वाचवू पाहतात, न ही पृथ्वीचे आसन’ त्यांना आव्हान देत संघर्षरत राहावेच लागते साऱ्या कष्टकऱ्यांना! त्यांच्यासह आम्हा कार्यकर्त्यांनाही ज्यावेळी नर्मदेतील पाणी चढते, गाव गाव बुडवते, किंवा एखादी वस्ती तुटून नव्हे, तोडून पडल्याचे चित्र अन्यायाची भीषणता दर्शवते त्यावेळेस नर्मदेच्या काठावर स्मरलेले ते गीत..

‘अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव। दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव। कुणी न उरला वाली आता, धरती दे गं ठाव!’

३६ वर्षे उरल्यासुरल्यांसाठीही टिकून लढावेच लागते तेव्हा अनेकदा प्रश्नही उमटतो लतादीदींच्याच सुरात कानीमनी.. ‘असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ? नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ?’’

लतादीदींचे पहिले गुरू दीनानाथ मंगेशकर! त्यांच्या नावे आम्हाला मिळालेला पुरस्कार. त्यावेळी नासिकमध्ये लतादीदी हजर असताना नदीखोऱ्यातील त्यावेळच्या परिस्थितीचे भान ठेवून मला मांडावे लागलेले कठोर विचारही आठवतात. हृदयनाथजींनी गायलेल्या गाण्यांनी बेभान होऊन कवीवर्य ग्रेस यांनी मला ऐकवलेले कौतुक आठवते. आशा भोसलेंचाही दमदार आवाज दम भरतो!

आणि मग आपापल्या परीने कार्यरत असताना लतादीदींच्या साथीसंगतीत असलेल्या साऱ्यांचा गुणगौरव ठाऊक नाही. अंबानींसाठीही त्या अखेरचे गाणे गायल्या हेही विसरू शकत नाही. मात्र, त्यांच्या अविस्मरणीय गीतांपैकी आम्हाला पटलेले, सतत पटवणारे गीत हे गांधींचेच!

‘वैष्णव जन तो तेने कहिये

पीड परायी जाने रे।

परदु:खे उपकार करे तोए

मन अभिमान न माने रे॥’

लतादीदींनी गांधींच्या विचारांना यानिमित्ताने अमर करून टाकले, तर आज गांधींना कोण मारू शकेल? ते गेले व लतादीदीही गेल्या! गांधी शहीद झाले.. त्यांना मारणारे, त्या मारेकऱ्यांना सन्मान देणारेही लता मंगेशकरांना भारतरत्न मानतात.. श्रद्धांजली वाहतात! अशा भोवळ आणणाऱ्या विषम वातावरणातही संघर्षगीते, घोषणा यांनी पेटून उठणारे आम्ही कार्यकर्ते लताजींच्या देहान्ताच्या घटनेने क्षणभर स्तब्ध होतो!  लताजींची गाणी आठवत, धावतपळत आयुष्य जगणाऱ्यांना मनभर वाटत नाही का चार क्षणांसाठी..‘मालवून टाक दीप, पेटवून अंग अंग..’ अशा त्यांच्या स्वरमाधुर्यातच डुंबत पडून राहावं असं? पाहा आठवून.. त्यांची तन-मन पेटवणारी गाणी सोबत ठेवून, पण जगत राहावं तर कसं? स्वरांनीच ‘गुगल’ होत नव्हे, तर विचारांसहही!