श्याम मनोहर

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचेय : रस्ता.

रस्त्याने चालायचे. वाहने चालवायची. कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही, रिझव्‍‌र्हेशन लागत नाही, कुणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत, कुणाच्या अस्मितेला धक्का बसत नाही, धर्मिनदा होत नाही, राष्ट्रद्रोह होत नाही, राष्ट्रद्रोह होत नाही, विचारसरणीची गरज नाही. चालता येतेय ना? चाला. वाहन हाकायचे लायसेन्स आहे ना? रस्ता वापरा.

रस्ता सार्वजनिक, सर्व जनतेच्या मालकीचा? नाही सरकारच्या मालकीचा, जनतेला अर्पण.

रस्ता खराब आहे, उखणला गेला आहे. रस्ता फ्रॅक्चर्ड आहे.

रस्ता खराब आहे म्हणून कुणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत, कुणाच्या अस्मितेला धक्का पोचत नाही, धर्मिनदा होत नाही, कुणा आदर्शाची बदनामी होत नाही.

रस्ता खराब आहे. चालताना ठेचा लागतात, अपघात होतात, शारीरिक त्रास होतो, हाडे दुखावतात, कॅल्शियमच्या गोळय़ा खाव्या लागतात. हा उपाय?

रस्ता चांगला का केला जात नाही? मानसिक त्रास होतो.

खराब रस्त्यानेही सुदैवाने व चालण्याची योगासने नाहीत. खराब रस्त्याने सुखेनैव चालण्याच्या दृष्टीने कोणत्याच धर्माची वचने नाहीत. चांगला रस्ता करायची कोणत्याच धर्मात विधी नाहीत. पूजा, प्रार्थना करण्यासाठी वा चांगल्या रस्त्याचा प्रचार करण्यासाठी चांगल्या रस्त्याचे एकही प्रतीक नाही. खराब रस्त्याने नीट चालायचे मार्गदर्शन करणारी फी घेऊन वा मोफत शिबिरे नाहीत, पत्रके नाहीत, मासिके नाहीत, लेख नाहीत. नागरिकांना सवय, प्रतिक्षिप्त क्रिया होत नाहीय.

टीव्हीवर, वर्तमानपत्रातून खराब रस्त्यांवरची दृश्यासहित, छायाचित्रासहित बातम्या असतात. तरी शहरातल्या रस्त्यांच्या, खेडेगावातल्या रस्त्यांच्या बातम्या नाहीच. शहरातले रस्ते खराब नकोत, खेडय़ातले चालतील? असे आहे?

फ्रॅक्चर्ड रस्ते..

पंतप्रधानांच्या कानावर, नजरेला जात नाही? बांधकाममंत्र्यांच्या, इतर मंत्र्यांच्या, खासदारांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, इतर मंत्र्यांच्या, आमदारांच्या कानावर जात नाही, दृष्टीस पडत नाही? नगरसेवकांच्या लक्षात येत नाही?

रस्ता चांगला हवा, यासाठी चळवळ होत नाही, मोर्चा निघत नाही, महामोर्चा निघत नाही. शहर बंद होत नाही. रस्त्यावर दगड मुबलक असून दगडफेक होत नाही. टायर जाळले जात नाहीत, बसच्या काचा फोडल्या जात नाहीत, कार्यालयात घुसून फर्निचरची मोडतोड, तोडमोड होत नाही, तलवारी नाचवल्या जात नाहीत, दुकाने दमदाटीने वा स्वखुशीने बंद होत नाहीत, फटाके फोडले जात नाहीत, बॉम्ब फेकले जात नाहीत, गोळीबार होत नाही. पोलिसांना लाठीमार करावा लागत नाही. धूरगोळय़ा उडवाव्या लागत नाही, कुणाला दुपारी अटक करून संध्याकाळी सोडून द्यायचे करावे लागत नाही. कसली चौकशी करायची गरज पडत नाही.

रस्ते खराब आहेत, तर चौकशी कशाची करायची? कमिशन कशासाठी नेमायचे?

रस्ते चांगले होत नाहीत. एकदाचा सोक्षमोक्ष.. असे का होत नाही?

रस्त्यात खड्डे की खडय़ात रस्ते.. असा नागरिक नेमेची त्रासदायक विनोद सोसत राहतात.

मग रस्ते खड्डेमुक्त करायची योजना जाहीर होते, काम सुरू होते.

रस्त्यातले खड्डे भरले गेले, रस्त्याला चित्रविचित्र ठिगळे लागतात, खड्डय़ाच्या जागी बेफिकीर उंचवटे येतात.. खा धक्के उंचवटय़ांचे, उडू द्या स्कूटरी.. रस्ता कुरूप..

चांगला सुखदायी, सुंदर.. असा कायमचा का होत नाही?

पुन्हा खड्डे पडणार, रस्ता फ्रॅक्चर्ड होणार, पुन्हा खड्डे बुजवा.. पुन्हा पुन्हा हे.. खड्डे, बुजवणे.. पुन्हा पुन्हा रस्त्यांची दुरुस्ती म्हणजे नगरसेवक, इंजिनियर यांची पैसे खाण्याची खानावळ आहे, नागरिक आपापसात चडफडत बोलत राहतात.

रस्ते कायमचे सुखदायी, सुंदर का होत नाहीत?  

वाह्यातपणे आणि मूलभूतपणे कुणा एका नागरिकाच्या मनात येते : रस्ते सुखदायी आणि सुंदर होत नाहीत, कारण सर्वस्वी चांगले रस्ते करणे कुणालाच जमत नाही.

त्याला एक गोष्ट आठवते :

पुण्याचे तीन तरुण एकदा ठरवतात : सायकलने लोणावळय़ाला जायचे. त्या कुणा एकाला तेव्हाचे पुणे, तेव्हाच्या सायकली, तेव्हाचे लोणावळा आठवते. तो चिडचिडा होतो, तीन तरुणांची गोष्ट मनात चालू देतो.

तिन्ही तरुणांनी तीन सायकली भाडय़ाने घेतल्या.

एक तरुण इतक्या उत्साहात की त्याने लगेच सायकलवर टांग टाकली आणि फास्ट पॅडल मारली, दुसरा तशाच उत्साहाने सयाकल हाणू लागला, पहिला तरुण फास्टर, दुसरा तरुण फास्टर, पहिला तरुण फास्टेस्ट.. इतका पुढे गेला, दुसरा तरुणाच्या दृष्टीत राह्यला नाही. दुसरा तरुण जिद्दीला पेटला, फास्टेस्ट झाला. दोघांतले अंतर वाढत.. दुसरा तरुण अंतर कमी करण्यात.. अंतर हळूहळू कमी कमी हाते होत.. दोघे एकमेकांना भेटले.. थांबले.. सायकली हातात धरून.. श्वास नीट जुळवत श्वास नॉर्मल.. आपला तिसरा मागेच राह्यलाय रे.. चला, त्याला गाठू या घेऊन येऊ.. तरुणपणा.. दोघे उलटय़ा दिशेने फास्ट, फस्टर, फस्टेस्ट..

 दोघे तिसऱ्याशी पोचले.. अरे, सायकल हातात धरून चालतोयस? पंक्चर झाली का? पहिल्याने चाक दाबून पाह्यली. पंक्चर नाहीय रे? काय झालं मग? सायकल हातात धरून का चालतोयस?

‘‘मला सायकल येत नाही.’’

आधी सांगायचंस ना?.. दोघांपैकी कुणीच म्हणाले नाही.

सायकल येत नाही.

रस्ते चांगले करता येत नाही. सायकल येत नाही, हे आधी सांगायची लाज वाटली.

रस्ता चांगला करता येत नाही.. कोण मान्य करेल? कोण कबूल करेल?

माणूस चालत राहतो, पायवाट तयार होते.

पायवाट चढउताराची, खड्डय़ांची, दगडधोंडय़ांची वेडय़ावाकडय़ा वळणावळणंची असते. लक्ष देत उचलायचे, तशी अडखळायला होते, घसरायला होते, पडायलाही होते, ठेच लागते. पायांना पायवाटेची सवय काहीशी होते, बरीचशी नाही होत.

बैलगाडी जाते. पायवाट रुंद होते. भूमीतील फरक. बैलगाडी इकडे तिकडे कलंडत जाते. बैल जूमधे इकडे तिकडे होतात.

पावसाळय़ात चिखल उन्हाळय़ात धूळ..

मोटार हेलकांडत गेला की धुळीचा लोट.

डोळय़ात धूळ जाते, डोळे जाम चुरचुरतात.

लोक सोसतात. कसे काय लोक सोसत जगतात?

: लोकांचे उणेदुणे काढणे सोपे असते. ती छोटी गोष्ट असते.

दुसरा विचार करायचा.

कोणत्याही परिस्थितीत टिकून राहायचं, हे माणसाचे ब्रीद असते. ही मोठी गोष्ट आहे.

कधीतरी कुणा व्यक्तीला वाटते, रस्ता चांगला हवा.. असे सुचणे ही मोठी गोष्ट आहे. किंवा मोठय़ा गोष्टीची सुरुवात आहे..

चांगला रस्ता म्हणजे काय? कुणी प्रश्न निर्माण करणारे निघते. प्रश्न निर्माण होणे, ही मोठय़ा गोष्टीची पहिली पायरी. खड्डे नकोत, दगडधोंडे नकोत, पावसाळय़ात चिखल नको, उन्हाळय़ात धूळ नको, सहजपणे चालता यायला हवे, कुणा व्यक्तीला चित्र स्पष्ट होते. मोठय़ा गोष्टीची ही दुसरी पायरी. चांगल्या रस्त्याचे तंत्र कुणी शोधू लागते. मोठी गोष्ट रंगात येते, प्रयोग सुरू होतात. अनेक जण वेगवेगळय़ा प्रकारे प्रयोग करू लागतात.

मोठय़ा गोष्टीत अनेक पात्रे येतात. बरा, अधिक बरा, काहीसा चांगला, अधिक चांगला, अधिकाधिक चांगला रस्ता.. तंत्र विकसित होत होत पुढे सुंदर रस्ता! आहाहा! शोधण्यात, शोध लावण्यात माणूस मग्न होतो. माणूसही विकसित होतो आणि सुंदरही होतो. माणूस िझदाबाद! ग्रेट गोष्ट.

हे भारतात घडलंय? पुरावा आहे? घडतंय? पुरावा आहे? मनात विचार येतो.

इतर समाज शोधले गेलेले तंत्र शिकतात, उपयोगात आणू लागतात.

तंत्र उपलब्ध आहे, शिकायची व्यवस्था आहे, काहीजण शिकताहेत.

मग रस्ते फ्रॅक्चर्ड का आहेत?

शिकणे नीट नाहीय? उपयोगात आणण्यात मन लागत नाही?

एक भयंकर प्रश्न : बुद्धीच कमी पडतेय?

बुद्धी कमी पडतेय.

रस्ता सुखकर आणि सुंदर बांधायचे सिद्धान्त आणि तंत्र शिकले जाते. दोन्हीतली तार्किकता हरवली जाऊन आडाखे तयार होतात.

आडाखे धरून रस्ता केला जातो.

भयंकर आहे हे.

वातावरणात एक प्रमेय जोरदारपणे आहेच. आपल्या देशात बुद्धिमान लोक खूप आहेत. त्यांना संधी मिळत नाही.

समर्थनार्थ म्हटले जाते. आपल्याकडचे बुद्धिमान युरोप-अमेरिकेत जातात. त्यातले खरोखर किती चमकतात? शेकडेवारी काय आहे?

एक मुद्दामून मुद्दा : आपल्याकडचे युरोप-अमेरिकेत जाणाऱ्यांपैकी कोण किती जण युरोप-अमेरिकेत रस्ते बांधणीचे शिक्षण घेताहेत, रस्ते बांधणीत काम करताहेत? की युरोप-अमेरिकेत रस्ता बांधणी दुरुस्त करणे हे मुद्देच उरले नाहीत?

रस्ता बांधणीत आपले सरकार युरोप-अमेरिकेतल्या तज्ज्ञांना बोलवत, काँट्रॅक्ट देत नाहीयत? रस्ते बांधणी जगाला खुले झालेले नाहीय? कुणी परदेशी कंपनी रस्ते बांधणी व्यवसायात गुंतवणूक करायला अजून पुढे आलेली नाही. आपल्या इथे बुद्धिमान खूप आहेत, ते रस्ता बांधणी ह्यात नाहीत की काय? सिव्हिल इंजिनीअरिंगला बुद्धिमान तरुण जात नाहीत? बुद्धिमान तरुण कम्प्युटर टेक्नॉलॉजीला पहिला क्रम, मग मेकॅनिकल इंजिनीअरिंग शेवटी सिव्हिल इंजिनीअरिंग..

बुद्धिमान व्यक्ती कशाचा अभ्यास करू पाहते? प्राधान्य आहे. लगेच आणि चांगला पैसा मिळवणे अशा विषयाचा दुसरा प्रकार : आवडीच्या विषयाचा अभ्यास.

बुद्धिमान व्यक्ती : चांगला पैसा मिळवू लागते, त्या दृष्टीने नोकरी बदलतेही ती व्यक्ती सर्जनशीलता बाजूला ठेवते.

आवड : यातून व्यक्ती त्या विषयात निष्णात होते, असे नाही, सर्जनशीलता निर्माण होईल, असे नाही.

बुद्धीचा कल हवा तरी कलामुळे सर्जनशीलता होते असे नाही.

गती हवी केवळ गतीने सर्जनशीलता होते असे नाही.

गती विषयाचे तत्त्वज्ञान, विषयाचा इतिहास, विषयातले अनुत्तरित प्रश्न आणि कठोर परिश्रम अशी व्यक्ती सर्जनशील होते. सर्जनशीलता केवळ बुद्धीशी निगडित राहत नाही, मन, शरीर इथपर्यंत असते. अशा व्यक्ती मोजक्या असतात. पण समाजाच्या सर्व क्षेत्रात हव्यात. रस्ता बांधणीच्या क्षेत्रात अशा व्यक्ती आहेत का?

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्जनशील व्यक्तींना काम करू देत नाहीत, अशी बोलवा आहे. सर्जनशील व्यक्ती प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांना वठणीवर आणू शकत नाहीत.. असे दृश्य आहे काय?

रस्ता बांधणीतले तंत्रज्ञ प्रशासकीय आणि राजकीय हस्तक्षेपाने फ्रॅक्चर्ड होतात.

आणि फ्रॅक्चर्ड रस्तेच रस्ते.

काही बुद्धिमान फ्रॅक्चर्ड झाल्यावर आपले अस्सल काम बाजूला ठेवतात, सर्जनशीलतेवर झाकण घालतात आणि शासनाशी दोन हात करायला, समाज जागा करायला लागतात.

स्वातंत्र्य चळवळ होती, तेव्हा एक प्रश्न निर्माण झाला होता. आधी समाजसुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य?

आता प्रश्न आहे. आधी अस्सल काम की आधी शासनाला वठणीवर आणणे?

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाजात आणि व्यक्तीत अस्सल काम याबद्दल जाण आणि जाग आली नाही.

रस्ते चांगले आणि सुंदर हवेत.

डांबरी रस्ते..

नंतर काँक्रीटचे रस्ते असे?

काँक्रीटचे .. हे शेवटचे आहेच?

त्यापुढे नसणार चांगला, सुंदर रस्ता?

कुणी कल्पनाही नाही करू शकणार?

काँक्रीटचा रस्ता यापुढे असणार. तो अज्ञात आहे. शोधायचे आहे.

अज्ञातातले शोधणे हे अस्सल काम.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अस्सल कामाला व्यक्तीने बुद्धीत, मनात शरीरात भिनून जायचे आहे. या ऊर्जेने समाजसुधारणा, शासनसुधारणा होणार नाही? lokrang@expressindia.com