एकेकाळी मशाली-पणत्यांच्या उजेडात वावरणारा माणूस पुढे विजेचा बल्ब, टय़ूबलाइट, सीएफएल, एलईडी दिव्यांच्या झगमगाटात आला.. माणूस आधी घोडय़ांवरून दूतांद्वारे खलिते पाठवत असे, पुढे त्याची जागा तारायंत्र, टेलिफोन, मोबाइल, फॅक्स, ई-मेल, समाजमाध्यमांनी घेतली.. हे बदल त्या-त्या वेळच्या शोधांमुळे झाले. त्यांनी मानवी जीवन सुखकर केले. नजीकच्या इतिहासात माणसाने परिश्रमपूर्वक शोध लावलेल्या काही यंत्र-वस्तूंनी तर दैनंदिन मानवी जीवन व्यापून टाकले आहे. अशाच काही यंत्र व वस्तूंच्या शोधांच्या कथा डॉ. प्रबोध चोबे यांनी ‘या शोधांशिवाय जीवन अशक्य’ या पुस्तकात सांगितल्या आहेत. टूथब्रश-टूथपेस्ट, पेन्सिल-खोडरबर, पेन-शाई, टाइपरायटरपासून छपाईयंत्र, शिलाईयंत्र, धुलाईयंत्रापर्यंत तब्बल २७ यंत्र-वस्तूंच्या शोधकथा या पुस्तकात वाचायला मिळतात. हे शोध कसे लागले, कोणी लावले, कुठे लागले.. अशा प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक देतेच, शिवाय या यंत्र-वस्तूंमुळे मानवी जीवनावर कोणता परिणाम झाला, याचीही माहिती देते. नियमित वापरातील या यंत्र-वस्तूंच्या शोधकथा सोप्या आणि रंजक शैलीत मांडल्यामुळे त्यातील तांत्रिक तपशीलही समजणे सुलभ झाले आहे. एकुणात, मानवी कल्पकतेच्या या दृश्यखुणांकडे थोडे चौकसपणे पाहायला हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देते.

‘या शोधांशिवाय जीवन अशक्य’

– डॉ. प्रबोध चोबे,

साकेत प्रकाशन,

पृष्ठे- २२१, मूल्य- २५० रुपये.