हेमंत कर्णिक

सध्या जोमाने लिहीत असलेल्या मराठी लेखकांमध्ये अविनाश कोल्हे यांचं नाव आवर्जून घ्यायला हवं. परंतु या लेखकाला ‘नव्या पिढीतला लेखक’ म्हणता येत नाही. कारण त्याच्या लिखाणात बदलत्या वास्तवाची दखल जरी असली तरी बदलती संवेदना, झपाटय़ाने बदलत असलेले तंत्रज्ञानप्रधान तपशील यांचा आढळ कमी आहे. त्यांच्या ‘चौकट वाटोळी’ या कादंबरीच्या बाबतीतही हे खरं आहे.

‘चौकट वाटोळी’ वाचून संपवल्यावर त्यातील सर्वात ठळक वैशिष्टय़ म्हणून ‘सेक्स’च्या वर्णनांची विपुलता आठवत राहते. यामुळे कादंबरीवर असा एक आरोप होण्याची शक्यता आहे, की ही कादंबरी सेक्समध्ये रमते; एक पुरुष आणि एक स्त्री कसे शरीरसुख घेतात, याला अवाजवी जागा देण्यात आली आहे. यावर एक उत्तर असं सुचतं की, स्त्री-पुरुष जोडीच्या शरीरसुखाचं तपशीलवार वर्णन या कादंबरीत येतं, हे खरं असलं; तरी त्याला ‘अवाजवी’ म्हणणं अन्याय्य ठरेल. कारण तपशील देणे हा या लेखकाच्या शैलीचा भाग आहे. बारीक बारीक प्रसंगवर्णनांनी कादंबरीचा अवकाश भरणे ही लेखकाची भूमिका आहे. आणि याहीपुढे जायचं तर असं म्हणावं लागेल की, शैली वा भूमिका यांच्यापेक्षा लहान लहान प्रसंगांचं खुलासेवार वर्णन हा या कादंबरीचा भक्कम आधारच आहे. बारीक तपशिलांच्या आधारावरच ते कादंबरीला भरीवपणा आणतात.

या कादंबरीतील कथानकाच्या ओघात पुण्यातील अप्पा बळवंत चौक आणि त्याच्या परिसराचं वर्णन येतं. तिथले रस्ते, हॉटेलं, दुकानं यांचा उल्लेख होतो. एका कंपनीच्या कार्यालयातलं वातावरण येतं. तिथल्या कामाचं वर्णन येतं. कॉलेजकाळातले दोन मित्र अनेक वर्षांनी भेटतात आणि कॉलेजच्या दिवसांत घडलेल्या सलगीने एकमेकांना हृदयांतरीच्या गोष्टी सांगू लागतात, तेव्हा दोन पुरुष मित्रांमधली मोकळी भाषा येते. एका कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातल्या सासू-सुनेमधल्या ‘शब्देविण (व शाब्दिकदेखील) संघर्षां’ची वर्णनं येतात. एक पुरुष पात्र मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हचा सुपरवायझर झाला आहे; त्याच्या कामाची माहिती येते. यातल्या प्रत्येक वेळी लेखक त्या-त्या वेळचे, ठिकाणाचे, कृतीचे बारीक तपशील देतो. पण ते तपशील नुसती जागा भरण्याचं काम करत नाहीत, तर त्या तपशिलांमुळे प्रसंगातल्या वातावरणात जीव भरतो. त्यामुळे त्या-त्या क्षेत्राशी संबंधित वाचकाला वातावरणाची ओळख पटते व मग तो त्या पात्रांनादेखील खरी मानू लागतो. पात्रं, प्रसंग वरवरची रेखाटनं न राहता त्यांना माणसं, घटना यांचं रूप येतं. लेखकाची विश्वासार्हता वाढते आणि इतर संदर्भातल्या प्रतिपादनावरही विश्वास ठेवण्याची वाचकाची मानसिक तयारी होते. सेक्सच्या संदर्भात येणारे तपशीलही याच भूमिकेतून येतात, असं समर्थन होऊ शकतं.

परंतु हा बचाव पुरत नाही. जसे प्रत्येक वातावरणाचे, कृतीचे, पेशाचे, अधिकारपदाचे वास्तवाच्या जवळ जाणारे तपशील येतात, तसेच सेक्सचेही येतात- हे समर्थन लागू होत नाही. मनुष्याचा सेक्सचा अनुभव सार्वत्रिक असला, तरी अत्यंत खासगी असतो. त्यामुळे ‘वास्तवाच्या जवळ जाणारे तपशील’ हे वर्णन सेक्सच्या संदर्भात लावताना अडचण होते. असे कोणते तपशील आहेत, जे मांडण्यातून स्त्री-पुरुषांमधल्या शरीरसंबंधातल्या वर्णनात ‘खरेपणा’ येईल? हा प्रश्न अवघड असला; तरी ‘सेक्स करणारा पुरुष म्हणजे अंगी रग असलेला नर आणि जोडीला रसरशीत, भरदार शरीर असलेली स्त्री’ हे त्याचं उत्तर नाही. (‘..त्यांचे पोट सुटलेले नव्हते, शरीर पीळदार होते. पावणेसहा फूट उंचीचे कलालसाहेब युनिफॉर्ममध्ये भलतेच रुबाबदार दिसत असत..’ आणि ‘..रसरशीत बाई, आकर्षक बांधा..’) हे तर सेक्सच्या फॅण्टसीतलं, पोर्नोग्राफीतलं सामान्य गृहीत आहे! बाकी ठिकाणी वास्तवाशी इमान सांगणारे तपशील देणाऱ्या या कादंबरीत सेक्सच्या संदर्भात मात्र फॅण्टसी जवळ केली जाते, हे सुसंगत नाही. आता, ‘सौंदर्य नजरेत / मन:स्थितीत असतं’ याचीसुद्धा जाण लेखकाला आहे. त्यामुळे ‘जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन आनंदी असतं तेव्हा ती व्यक्ती आपोआप सुंदर दिसायला लागते’ असं निवेदक म्हणतो आणि पुढे एक पुस्ती जोडतो- ‘हे स्त्रियांच्या संदर्भात विशेष खरं आहे.’ अशा स्थितीत सेक्स करणाऱ्या पुरुषाचं नर म्हणून आणि स्त्रीचं मादी म्हणून वर्णन करण्याचं काम लेखकानं निवेदकावर टाकता कामा नये.

ते निवेदकानं केल्यामुळेच लक्षात येतं, की कादंबरीचं ठळक वैशिष्टय़ ‘सेक्सची तपशीलवार वर्णनं’ हे नसून ‘निवेदकाचा वरचष्मा’ हे आहे. हा निवेदक कुठल्या पात्राशी समरस होऊन कथानक पुढे नेतो आहे, असं होत नाही. ललित साहित्यात निवेदक प्रथमपुरुषी असतो, तेव्हा संपूर्ण कथानक कथानकातल्याच एका पात्राच्या नजरेतून वाचकाच्या समोर मांडलं जातं. त्या पात्राला जे माहीत, तेच वाचकाला माहीत होतं. त्या पात्राचे ग्रह-पूर्वग्रह आपोआप वाचकाच्या माथी मारले जातात किंवा गळी उतरवले जातात. निवेदक जेव्हा कथानकाबाहेर असतो, तेव्हाही तो पूर्णपणे अलिप्त असा क्वचित असतो. साहित्यकृतीत एखादं मध्यवर्ती पात्र असतं, ज्याच्या भावभावनांशी आणि जगाविषयीच्या आकलनाशी निवेदक बहुधा समरस होताना आढळतो. यात एक बारीक भेद म्हणजे अशी समरसता एकाच पात्राशी न राखता वेगवेगळ्या पात्रांशी ठेवत कलाकृतीत रंग भरता येतात, एकाच घटनासंचाकडे वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांमधून बघून कथानकाला त्रिमित करता येतं, वगैरे.

‘चौकट वाटोळी’त हे दोन्ही नाही. तिचा निवेदक कुठल्याच पात्राच्या फार जवळ जात नाही. परिणामी वाचकही गोष्टीत ‘शिरत नाही’. पात्रांच्या सुखदु:खांमध्ये वाचकाची भावनिक गुंतवणूक होत नाही. याचा एक परिणाम असा होतो, की वाचकाचं तारतम्य जागं राहतं. पात्राशी समरस झाल्यावर वाचक पात्राची कड घेऊन त्या पात्राच्या कृतीचं, विचारविकारांचं समर्थन करण्याकडे झुकतो, तसं इथे होत नाही. वाचक तटस्थपणे पात्रांचं निरीक्षण करत राहण्याची शक्यता वाढते.

मात्र, या कादंबरीला तटस्थ, अलिप्त- एकूण मूल्यनिर्णय वाचकाच्या आकलनावर सोडणारी साहित्यकृतीसुद्धा म्हणता येत नाही. कारण कादंबरीतल्या घटनांपासून जरी वाचक एका अंतरावर राहिला तरी लेखकाच्या नियोजित आशयापासून दूर जाऊ नये; यासाठी घटना घडताना वा ती होऊन गेल्यावर त्यातून काय अर्थ काढावा, याचं मार्गदर्शन निवेदकाकडून कादंबरीभर सतत होत राहतं. एखाद्या लटपटणाऱ्या बालकाला त्याचं बोट धरून इथून तिथे न्यावं, तसं ही कादंबरी वाचकाला निवेदनाच्या चमच्यानं आशयामृत भरवत राहते. कोणाचं काय होणार, हे लेखकानं अगोदरच ठरवून ठेवलं आहे आणि निवेदक पात्रांना त्या दिशेनं ढकलतो आहे असं होत राहतं. म्हणजे, वासंती जोगळेकर ही एक सर्वसाधारण स्त्री असली तरी निवेदक वाचकाला स्पष्ट शब्दांत सांगतो की, तिच्यात एक मादी आहे. जी मर्दानी सौंदर्याची दखल घेते.. अगदी कठीण परिस्थितीत सापडलेली असताना, असहाय झाली असतानासुद्धा!

कादंबरीतल्या पात्रांच्या जाती हा एक अवघड विषय आहे. लेखक पात्रांच्या जातीविषयी आणि जातीमधून तयार होणाऱ्या मानसिक ठोकताळ्यांची जाणीव ठेवणारा आहे.  परंतु या कादंबरीत ‘जात’ हा स्थितिदर्शक घटक असला, तरी कृतीला वळण देणारा नाही. कादंबरीतल्या कुठल्याही पात्राच्या निकट न जाणाऱ्या तृतीयपुरुषी निवेदकाला सर्व पात्रांच्या मनाचे व्यवहार सांगता येतात. इथे बरेचदा ते तसे सांगितले जातातही; पण त्यांच्या परस्परसंपर्कात जात हा घटक कधीच मोजला गेलेला दिसत नाही. किंबहुना कुठल्याही दोन भिन्न जातीय पात्रांच्या संबंधामध्ये जात आडवी येत नाही की उभी राहत नाही. कलाल आणि खाडिलकर हे कॉलेजपासून जिवलग दोस्त असतात; इतकंच नाही, कलाल हिरो असतो आणि खाडिलकर दुय्यम असतो. दलित समाजातल्या पुरुषाशी सुनेनं लफडं केलं म्हणून तिळपापड होणाऱ्या सासूच्या बोलण्या-वागण्या-विचार करण्यावर याची छाया पडत नाही. गोष्टी व्यावहारिक पातळीवरच राहतात.

पण लेखकाची आशयप्रवाहावर जी पकड आहे, तिच्यामुळे हे खटकत नाही. कादंबरी वाचनीय तर राहतेच; निवेदकाकडून होणाऱ्या प्रॉम्प्टिंगमुळे कथानक सुरळीतपणे सरकत राहतं. एक सामान्य पार्श्वभूमीची बाई भावनेच्या भरात वहिवाटीची चाकोरी सोडते आणि बिकट वाट पत्करून पुढे पुढे का जाते, याची सुसंगत कारणं समोर येतात. कुटुंबाच्या आत सासू-सून किंवा नवरा-बायको यांची नाती कशी बदलत जातात, याचीही कारणं नीट मांडली जातात. बाई कधी, कशी बदलते; सासू नरम केव्हा पडते व केव्हा आक्रस्ताळी वागते; ऑफिसातल्या वातावरणात फरक का पडतो, हे सगळं नीट खुलासेवार समोर येतं. याचा शेवट काय होणार, या उत्सुकतेतून कादंबरी वाचकाला धरून ठेवते व शेवटी तिढा सुटतो, तेव्हा त्याला फसवल्यासारखं होत नाही. गोष्ट खुलासेवार प्रसंगवर्णनांमुळे उठावदार होत, चटकदार वळणं घेत पुढे जात राहते व प्रत्येक पात्राची जणू समजूत काढून फार न ठेचकाळता संपते.

सुभानराव कलाल हा एक आश्वासक व्यक्तिमत्त्वाचा, व्यवस्थेमध्ये हाती आलेले अधिकार वैयक्तिक उद्देशांसाठी सोयीस्करपणे वापरण्यात न कचरणारा, ‘अनुभवी’ प्रौढ पुरुष आणि वासंती जोगळेकर ही नवऱ्याला कंटाळलेली, सासुरवासाने नाडलेली, पांढरपेशा मध्यमवर्गीय चाकोरीत अडकलेली स्त्री. असे दोन जीव एकत्र आले की काय होतं, याची ही कहाणी! पण वर्णनाला उठाव आणण्यासाठी तो पुरुष मर्दानी, व्यायामातून कमावलेल्या शरीराचा असावा लागतो व ती स्त्री डौलदार बांध्याची, रसरशीत असावी लागते. मगच त्यांच्यातलं सेक्स दखलपात्र होतं, हेदेखील लक्षात घ्यायला हवं. रंजकता, वाचकप्रियता या मूल्यांना लेखक किती महत्त्व देतो, हेच यातून दिसून येतं. एकुणात, तपशिलांमुळे व्यक्तीला – घटनांना सामाजिक परिमाण येतं. पण मूल्यांना न भिडता आशय व्यवहाराच्या पातळीवरील संघर्षांपुरता मर्यादित ठेवण्यानं कलाकृतीचा आवाका तोकडा राहतो. या कादंबरीचंदेखील हेच होतं.

‘चौकट वाटोळी’ – अविनाश कोल्हे,

विश्वकर्मा प्रकाशन, पृष्ठे – २६२, मूल्य – ३५० रुपये

hemant.karnik@gmail.com