डॉ. स्वाती कर्वे
पेशव्यांचे सरन्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे. श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा खून गारद्यांच्या मदतीने केल्याबद्दल रामशास्त्री प्रभुणे यांनी राघोबादादांना (रघुनाथराव पेशवे) देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली होती. या घटनेने रामशास्त्री प्रभुणे यांचे नाव इतिहासात अमर झाल्याचे सर्वज्ञात आहेच. परंतु या घटनेमागे रामशास्त्रींच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास आहे. पेशवाईत ‘न्यायमूर्ती’ म्हणून रामशास्त्रींचे कर्तृत्व घडले. परंतु त्यापूर्वीचा त्यांचा जीवनप्रवास- संघर्ष, न्यायनिष्ठ, सत्यवचनी, नि:स्पृह व्यक्तिमत्त्वाची जडणघडण- तितकाच महत्त्वाचा आहे. ‘न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे’ या ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरीलेखनातही त्यांनी निश्चित यश मिळवले आहे.
रामशास्त्री प्रभुणे यांच्या जीवनप्रवासात तीन-चार टप्पे आहेत. सातारा जिल्ह्य़ातील माहुली गावातील लहानपण, काशीला जाऊन बारा वर्षांच्या अध्ययनातून ‘शास्त्री’ ही पदवी मिळवणे इ. शिकून परत आल्यावर पेशव्यांकडे शास्त्राधार सांगणारे शास्त्रीपंडित म्हणून प्रथम आगमन होणे, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी ‘सरन्यायाधीश’ म्हणून नेमणूक केल्यानंतर केलेले कार्य, आदर्श न्यायमूर्तीच्या प्रतिमेचा घडणारा आविष्कार, निवृत्त होऊन माहुलीला परत जाणे.. या रामशास्त्रींच्या जीवनप्रवासातील टप्प्यांनुसार रमाकांत देशपांडे यांनी कादंबरी विकसित केली आहे.
प्रथम वाचकांसमोर येतात ते राघोबादादांना शिक्षा सुनावल्यानंतर माहुलीला निघून आलेले रामशास्त्री प्रभुणे. संध्याकाळी रामशास्त्री कृष्णानदीच्या घाटावर बसले आहेत. आचार्य बाळंभटांच्या शिकवणीशी, श्रीमंत नानासाहेब पेशवे, श्रीमंत माधवराव पेशवे यांच्याशी प्रामाणिक राहून कार्य केल्याचे समाधान त्यांच्या मनात आहे. नदीकाठी खेळणारी मुले बघून रामशास्त्रींच्या मनात गतकाळातील आठवणी जाग्या होऊ लागतात. नदीकाठी मित्रांबरोबर खेळणारे स्वत:चे रूप त्यांना आठवू लागते. ..आणि फ्लॅशबॅक पद्धतीने रामशास्त्री प्रभुणे यांचा जीवनपट उलगडण्यास सुरुवात होते. रामशास्त्रींच्या जीवनाचा पूर्वार्ध म्हणजे बालपणापासून काशीला जाऊन ‘शास्त्री’ होण्यापर्यंतचा काळ. हा प्रारंभाचा टप्पा लेखकाने विस्ताराने रंगवला आहे. लहानपणी हूडपणा करणारा, दिवस-दिवस मित्रांबरोबर नदीकाठी खेळणारा राम, मुंज होऊनही संध्या न येणारा, कोणतेही संस्कृत श्लोक म्हणता न येणारा, वरवर बघता उनाड वाटणाऱ्या रामच्या स्वभावात मातृप्रेमाबरोबरच आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची प्रखर जाणीव होती. रामच्या स्वभावातील सर्व वैशिष्टय़ांसह लेखकाने पूर्वार्ध उत्तम रंगवला आहे.
विशेषत: साताऱ्याला अनगळ सावकारांच्या घरात झालेला अपमान रामच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरतो. झालेल्या अपमानातूनच आपणही वडिलांप्रमाणे ‘शास्त्री’ होण्याची ईष्र्या रामच्या मनात कशी निर्माण होते, माहुलीला घरी न जाता काशीला जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय रामशास्त्री वयाच्या दहाव्या वर्षी कसा घेतात, हा पूर्वार्धातील महत्त्वाचा भाग आहे.
यानंतर रामच्या ‘रामशास्त्री’होण्याचा पुढचा टप्पा सुरू होतो. हा महत्त्वाचा टप्पा लेखकाने घटना, प्रसंगांच्या मदतीने अधिक खुलवण्याची आवश्यकता होती. प्रारंभीचा टप्पा लेखकाने २१ भागांत विस्ताराने विकसित केला आहे. रामशास्त्री बनण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा केवळ निवेदनातून एकाच – बाविसाव्या भागात बसवल्याने त्रोटक उरकल्यासारखा- पूर्वार्ध व उत्तरार्ध यांना जोडणाऱ्या दुव्यासारखा वाटतो.
बारा वर्षांत राम प्रभुणेचा रामशास्त्री प्रभुणे होतो. कित्येक वर्षांत कोणालाही न दिलेली ‘शास्त्री’ पदवी त्यांना मिळते. काशीसारखी पाठशाळा माहुलीत सुरू करण्याची कल्पना मनाशी घेऊन रामशास्त्री माहुलीला परत येतात. रामशास्त्रींच्या जीवनाचा आणि कादंबरीचा उत्तरार्ध येथे सुरू होतो.
श्रीमंत नानासाहेब पेशवे रामशास्त्रींना शास्त्राधार सांगण्यासाठी ‘पेशव्यांचे शास्त्री’ म्हणून सन्मानाने पुण्याला बोलावतात. इथून रामशास्त्रींच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. पेशवाईतील घटनाक्रमाच्या संगतीने प्रसंगा-प्रसंगांतून रामशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट लेखकाने उत्तम विकसित केला आहे. नानासाहेब पेशवे रामशास्त्रींची ‘सरन्यायाधीश’ पदावर नेमणूक करतात. इथे कादंबरी वेग घेते.
कोणाचेही, कोणतेही दडपण न घेणारी रामशास्त्रींची स्वतंत्र बुद्धी, अचूक निर्णयक्षमता, स्पष्टवक्तेपणा, राजनिष्ठा, स्वामिनिष्ठा, नाना फडणवीस, हरिपंत फडके यांच्याबरोबर निर्माण होणारे नातेसंबंध, श्रीमंत नानासाहेब पेशवे, श्रीमंत माधवराव पेशवे यांच्याबरोबर निर्माण होणारे आदरयुक्त विश्वासाचे नाते लेखकाने घटनाक्रमाच्या बरोबरीने चित्रित केले आहे. प्रत्यक्ष माधवराव पेशवे यांना ‘राजा’ म्हणून त्यांच्या असणाऱ्या कर्तव्याची जाणीव स्पष्टपणे रामशास्त्री करून देतात. विसाजीपंत लेले यांना दोषी ठरवून वीस लाखांचा दंड करतात. दंड वेळेवर न दिल्यास विसाजीपंत लेले यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देतात. खोत वाटकरांच्या खटल्याचे कामकाज अध्रे झाले असताना दुसऱ्या न्यायाधीशांसमोर चौकशी करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करतात. भाऊसाहेब पेशवे यांच्या तोतयाचे प्रकरण, श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यावरचा हल्ला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रघुनाथरावांच्या समक्ष गारद्यांनी केलेला नारायणराव पेशवे यांचा खून, इत्यादी घटनांच्या मदतीने लेखकाने रामशास्त्री प्रभुणे यांचे सरन्यायाधीश म्हणून केलेले कर्तृत्व, त्यांचे निर्भीड, नि:स्पृह व्यक्तिमत्त्व परिश्रमपूर्वक रंगवले आहे. सर्वात महत्त्वाचा- कळसाचा संघर्षमय तणावपूर्ण नाटय़मय प्रसंग म्हणजे रघुनाथरावांनी पेशवाईची वस्त्रे स्वीकारून पेशव्यांच्या सनदीवर विराजमान होणे होय.
रघुनाथराव अमृतरावला सातारला पाठवून पेशवाईची वस्त्रे घेतात. आळेगाव येथे मोठा समारंभ करून पेशवेपदावर विराजमान होण्याचे ठरवतात. या सर्व प्रसंगांनी रामशास्त्री खूप अस्वस्थ असतात. नारायणरावांचा शनिवारवाडय़ात खून होतो; या घटनेमागे कर्ता-करविता रघुनाथराव असणार असे त्यांना मनोमन वाटते, परंतु बळकट पुरावाही आवश्यक असतो. हा पुरावा मिळाल्यानंतर ते, सर्वाच्या समक्ष नारायणराव पेशवे यांच्या खुनाचे खरे सूत्रधार रघुनाथराव पेशवेच असल्याचे पुराव्यासह सिद्ध करतात. ‘सरन्यायाधीश म्हणून आपले कर्तृत्व आपण पूर्ण केले.’ या भावनेने त्याच दिवशी माहुलीला निघून जातात.
खऱ्या अर्थाने कादंबरी या प्रसंगापाशी पूर्ण होते. (पेशवाईतील व रामशास्त्रींच्या जीवनातील उत्तरभाग लहानशा उपसंहारात पूर्ण केला आहे.) आळेगावमधील समारंभ कादंबरीतील अत्युच्यिबदू ठरतो. सदर प्रसंग लेखकाने वाचकांसमोर साक्षात घडवला आहे. वातावरणनिर्मिती, वाढत जाणारा ताण, संबंधित व्यक्तींच्या बदलत्या प्रतिक्रिया, रामशास्त्रींचे रोखठोक बोलणे, उपस्थितांमधे होणारी चलबिचल, इत्यादी सर्व तपशिलांवर लेखकाने आपला कॅमेरा हलता, फिरता ठेवत कादंबरीतील उत्कर्षिबदू विचारपूर्वक चढत्याक्रमाने उत्कंठावर्धक पद्धतीने रंगवत नेला आहे. एखाद्या कुशल दिग्दर्शकाने एखादा प्रसंग दृश्यरूपाने चित्रित करावा, त्याप्रमाणे निवेदनातील दृश्यात्मकता वाचकांना प्रसंगनाटय़ाची अनुभूती देणारी आहे. लेखकाची चित्रशैली सदर प्रसंग उभा करताना कळसाला पोहोचल्याचा प्रत्यय येतो.
संपूर्ण कादंबरीच रमाकांत देशपांडे यांनी प्रवाही, ओघवत्या भाषेत, चित्रशैलीत लिहिली आहे. माहुलीतील राम शास्त्रींच्या बालपणापासून ते थेट शेवटच्या नाटय़मय, संघर्षमय प्रसंगापर्यंत विस्तृत कालपट, घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा इत्यादींना चित्रशैलीत साकार केले आहे. ऐतिहासिक वातावरण असूनही आलंकारिक शैलीचा प्रभाव कुठेही दिसत नाही. चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबरी लेखनाचे शिवधनुष्य लेखकाच्या चित्रशैलीने यशस्वीपणे पेलले आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे नाही. ४६६ पृष्ठांची कादंबरी चित्रशैलीत लिहिणे सोपे नव्हेच. तसेच रामशास्त्रींच्या बोलण्याची, तर्कशुद्ध, रोखठोक विचार व्यक्त करणारी शैलीही अचूक पकडली आहे.
रामशास्त्रींच्या व्यक्तिरेखेची गडद सावली कादंबरीभर जाणवत राहते. तरीही त्या सावलीत अन्य व्यक्तिरेखा झाकोळून जात नाहीत, हे विशेषत्वाने नोंदवणे आवश्यक आहे. मध्यवर्ती व्यक्तिरेखेबरोबर अन्य लहानमोठय़ा व्यक्तिरेखांचा पट संवादी आणि पूरक स्वरूपात लेखकाने यशस्वीपणे विकसित केला आहे.
कादंबरीतून काही बाबी जाणवतात. काशीला होणाऱ्या पदवीदान समारंभात पदवी प्रमाणपत्रे दिल्याचा निर्देश येतो. परंतु प्रमाणपत्रे कशी होती, याविषयी तपशील नाही. छापील, मुद्रित प्रमाणपत्रे नसणारच. मग कशी होती? १८ व्या शतकात काशीसारख्या ठिकाणी पदवीदान समारंभाची सांगता ‘पसायदान’ म्हणून होत असेल का, अशी शंका येते. ‘मानसिकता’, ‘सूत्रसंचालन’ यांसारख्या शब्दांचा उपयोगही जाणवतो. परंतु या बाबी वाचनीयतेला परिणामकारकतेला बाधा आणत नाहीत.
ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी लेखनाचे एक उत्तम उदाहरण रमाकांत देशपांडे यांनी ‘न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे’ या कादंबरीच्या रूपाने घडविले आहे.
‘न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे ’
– रमाकांत देशपांडे
कॉन्टिनेन्टल प्रकाशन,
पृष्ठे – ४६८, मूल्य – ४५० रुपये.