-सत्यशील देशपांडे

प्रज्ञावंत गायक पं. कुमार गंधर्व यांचा भाषा, साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. हे जाणणाऱ्या ‘ग्रंथाली’ने १९८५ साली त्यांची सलग सहा दिवस मुलाखतमैफल आयोजित केली होती. हा अभिजात ऐवज अतुल देऊळगावकर यांनी संपादित केलेल्या ‘गंधर्वांचे देणे पं. कुमारजींशी संवाद’ या पुस्तकाच्या रूपात उपलब्ध होत आहे. या पुस्तकाला तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांची प्रस्तावना लाभली असून, पुस्तकाचे प्रकाशन ४ एप्रिलला मुंबईत होत आहे.

८ एप्रिल २०२३ ला सुरू झालेले कुमार गंधर्वांचे शताब्दी वर्ष जल्लोषात साजरे झाले. दहाहून जास्त शहरांत साजऱ्या झालेल्या उत्सवातील अनेक सत्रातून छोट्या मोठ्या गायक वादकांनी आपली कला प्रामाणिकपणे सादर केली. कुमारजी १९९२ साली आपल्याला सोडून गेले. त्यामुळे की काय, अधिकांश कलाकार साहजिकच कुमारजींचे ना अनुगामी होते ना त्यांच्या सांगीतिक विचारांशी परिचित. त्यामुळे या महोत्सवातून परिचित असलेली आपल्या संगीताची सद्या:स्थिती सामोरी आली आणि कुमारजी अधिकच आठवत राहिले.

या निमित्ताने ‘कालजयी’ संबोधले गेलेल्या कुमारजींचा कालबाह्य न झालेला संगीतविचार गायक, वादक आणि रसिकांसमोर यावा असे आज प्रकर्षाने वाटते. कुमारजींचा संगीतविचार ही सामूहिक स्वीकृतीची बाब नाही. साथीसारखा फैलावण्याचा त्याचा स्वभाव नाही. कुमारजींचा संगीतविचार ही अशी एक सांगीतिक कसोटी आहे, की जिच्यावर गायकाला आपण खरोखर कलाकार आहोत का? हे घासून पडताळून घेता येईल (तशी इच्छा असल्यास). कुमारजींचा संगीतविचार आत्मचिंतनास प्रवृत्त करणारा आहे. आपलं गाणं स्वान्तसुखाय असावं का? ते फुलवण्यात, ते बांधताना आपण रमतो का? आपल्या सवयीचे होऊ पाहणाऱ्या गाण्याचा आपल्यालाच लवकर कंटाळा येण्यासाठी लागणारे आवश्यक ते मानसिक आरोग्य स्वत:कडे आहे का? तसे असल्यास त्या गाण्यात काही फेरफार करून ते बदलण्यासाठी आवश्यक ती कलात्मक ऊर्जा आपल्याकडे आहे का? ‘आपुलाची वाद आपणासी’ अशी अवस्था आपण अनुभवतो का? असे म्हटले तर आत्मपीडाकारक आणि म्हटले तर नवनिर्मितीस पोषक असे प्रश्न निर्माण होतात. यातून स्वयंनिर्णयानेच वाट काढावी लागते.

हेही वाचा…बाइट नव्हे फाइट…

रागसंगीता ऐवजी ‘महोत्सव संगीत’ ही संकल्पना गेली काही वर्षं रूढ होऊ पाहत आहे. या महोत्सव संगीताचा अपरिहार्य भाग असलेल्या कलाकारांचं प्रा‘गति’क गायन-वादन ऐकून कुमारजी अ‘गति’क झाले नसते. आपल्या कोशात निवांत बसून ते कलेचं रेशीम विणत- उसवत होते. आपला विचार त्यांनी न कुणावर लादला न त्याचा प्रचार केला. ते समाजप्रबोधक किंवा संस्कृती सुधारक नव्हते. ठरावीक प्रकारेच गायचा पायंडा त्यांनी पाडला नाही. त्यांच्या प्रेमी लोकांना उद्देशून ते म्हणत, ‘‘तुम्हाला आवडतं म्हणून तेच तेच गाणं मी पुन:पुन्हा कशाला म्हणत बसू?’’

अशा कुमारजींचा संगीतविचार त्यांच्या गाण्यातूनच प्रकट व्हायचा. त्यांनी धूनउगम रागांची निर्मिती केली. ‘‘राग बनते है, बनाए नहीं जाते.’’ ही त्यांची उक्ती प्रसिद्ध आहे. हे राग त्यांनी तीन-चार स्वरातच सीमित असलेल्या लोकधुनांचा सांगीतिक परीघ वाढवण्यासाठी (त्या धुनांची स्वाभाविकता न घालवता) निर्माण केले. त्या धुनेतील सुप्त स्वरांकुरांना, स्वराकारांना उमलण्यासाठी, बहरण्यासाठी त्यांनी रागाचा परिसर उपलब्ध करून दिला. याखेरीज त्यांनी ज्या स्वयंसिद्ध जुन्या रागांची लोकधून प्रत्यक्षात सापडत नाही (उदा. राग बिहाग) त्यातली धून शोधली. पुनर्स्थापित केली. त्या धुनेला फुलवण्यासाठी शास्त्राचा आधार घेतला, मात्र ती धून फुलवण्याचा एक ठरावीक ठोकताळा किंवा आराखडा नेहमीसाठी निश्चित केला नाही. म्हणजे काय केलं किंवा केलं नाही हे जरा विस्ताराने सांगतो.

सर्वसाधारण पंजाबी हॉटेलात जाऊन तुम्ही कारलं मागवलं काय किंवा भेंडी मागवली काय, ती एकाच पद्धतीच्या रश्शात (gravy मध्ये) घालून शिजवलेली चाखायला मिळते. त्याचप्रमाणे सहसा बहुतेक गायक राग कुठलाही असो त्याला अष्टांगाच्या मुशीत घालतात. मग तो राग, देसकार किंवा अडाण्यासारखा आक्रमक असो, संकोची मुलतानी असो, लाजराबुजरा जयजयवंती असो, उखडलेला मारवा असो. आपल्या संगीतातले ‘अष्टांग’ म्हणजे राग विस्ताराची आलाप, बोल-आलाप, बोल-तान, तान आणि त्यांचे पोटभेद मिळून होणारी आठ अंगं. विस्तारासाठी ही अंगं याच सुनिश्चित क्रमाने गायक सहसा उपयोगात आणतात व प्रत्येक वेळी मैफिलीत सर्व अंगांवर असलेलं आपलं प्रभुत्व प्रदर्शित करू पाहतात. कुमारजींनी असं केलं नाही. कुमारजींनी हा सुनिश्चित, predictable बढतीचा क्रम प्रसंगी झुगारून दिला. ख्याल गाताना त्या रागाची विविध profiles दाखवण्याऱ्या बंदिशी बांधल्या व त्या फुलवण्यासाठी त्यांना शोभणारी अशीच अष्टांगातली काही अंगं उपयोगात आणली व काही जाणीवपूर्वक टाळली. कशासाठी? तर धुनेत दडलेलं गाणं, त्या गाण्याचं गाणेपण या दोहोंचं अस्तित्व ख्याल गाताना अखंडपणे, अतुटपणे जाणवत राहिलं पाहिजे म्हणून. पण हे करताना त्यांनी आपली त्या वेळची भावस्थितीही लक्षात घेतली. एखाद्या रागात केवळ मध्यलयच गायली व त्यातील धून फुलवण्यासाठी केवळ मध्यलयीलाच शोभणारी लयक्रीडा म्हणण्यापेक्षा शब्द-क्रीडा केली.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

कुमारजींच्या या सौंदर्यविचारमुळे त्यांचं गाणं कधी जमे तर कधी फसेदेखील; पण त्यांनी कधी ‘पूर्वनिश्चित’ ख्याल गायला नाही. ख्याल एक सुनिश्चित product म्हणून पेश केला नाही, तर आपल्या एका नव्या सौंदर्यशोधाच्या प्रयोगाचा process म्हणजेच त्यांची पेशकश असे. त्यांचे श्रोते याचे साक्षीदार होत. रागतालाच्या व्याकरणात व बढतीच्या सुनिश्चित क्रमात predictable झालेल्या गाण्यात त्यांनी सर्जनाचे धुमारे आणि तर्काचे अंकुर कधी उगवतील, दिसू येतील न येतील अशी संदिग्धता आणि पकडीत न येणारी अमूर्तता साधू पहिली. याचा फॉर्म्युला अर्थातच त्यांच्याकडे किंवा कोणाकडे असू शकत नाही. पण प्रसंगी त्यांचे गाणे ही अवस्था साधताना मी अनुभवले आहे.

कुमारजींचा आणखी एक सौंदर्यविचार म्हणजे रागाची एकरसता त्यांना मान्य नव्हती. माणसाप्रमाणे राग कधी दुखरा, हळवा असतो तर कधी उल्हसित. कधी शांत असतो तर कधी आक्रमक. रागाची बहुरसता त्यांनी वेगवेगळ्या बंदिशी गाऊन सिद्ध केली. या संदर्भात म्हणावेसे वाटते की, ‘‘एक बंदिश एका रागात उदा. भूपमध्ये असते, पण समग्र भूप त्या एका बंदिशीत असू शकत नाही. राग दरबारी हा धीरगंभीर अशी सर्वांप्रमाणे माझीही समजूत होती. मी गाताना ते वातावरण उभे करू बघत होतो.’’ ते ऐकून कुमारजी म्हणाले, ‘‘तू चेहरा गंभीर करून गायलास म्हणून राग गंभीर होत नाही!’’ कुमारजींचा दरबारी कधी खेळकर तर कधी लडिवाळही असे. ‘‘धैवताचं चर्वण करत गायकांनी त्याचा अजगर करून टाकला आहे,’’ असं कुमारजी म्हणत. सळसळत्या नागिणीचे चैतन्य असलेला त्यांचा दरबारी मी ऐकला आहे. त्यांनी गायलेल्या अनेक रागांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.

ख्यालाच्या प्रांगणात एंट्रीसाठी आवश्यक असलेल्या पासपोर्टपुरताच त्यांनी बंदिशींचा वापर केला नाही, तर गायनभर ते त्या बंदिशीची ‘identity’ कंठभूषण म्हणून वागवत. आपल्या गायनात या identityला त्यांनी कधीच ‘कंठाआड’ केलं नाही. त्यांच्या गायनात सबंध स्थायी अंतऱ्याची अनेकवार आवृत्ती तर होईच, पण बढत करतानासुद्धा बंदिशीचे बोल खंडाखंडानं म्हणतच त्यांचं स्वरवाक्य बांधलं जाई व आवर्तन भरलं जाई. ग्वाल्हेरच्या जुन्या गवयांची हीच पद्धत होती. त्यांच्या गाण्यात ख्यालदेखील सावकाश, स्वाभाविक फुलत असलेलं ‘song’ वाटे. बंदिशीत दडलेल्या काव्याची, शब्दाची मजा ते घेतच, पण भाषिक अर्थाच्या पुढे जाऊन त्या बंदिशीच्या ‘lyrics’ चा, त्यातील शब्दाक्षरांचे खुंट करून, त्यांचा टेकू घेऊन आवर्तनांवर वेगवेगळ्या स्वराकारांचे तंबू टाकले जात आहेत असं वाटे.

हेही वाचा…निमित्त: शिव्या-महापुराण

कुमारजींच्या सांगीतिक विचारांचा एक आविष्कार म्हणजे त्यांनी केलेली ‘गीतवर्षा’, ‘गीतहेमंत’, ‘गीतवसंत’ या ऋतुसंकल्पनेवर आधारित कार्यक्रमांची प्रस्तुती. या कार्यक्रमांमुळे अभिजात संगीतातल्या बंदिशींच्या जोडीने लोकमानसातील गीतांचा आणि ऋतूंचा दरवळ त्यांच्या मैफिलीत अवतरला आणि मैफिलीला सुगंधित करता झाला.

कुमारजींच्या संगीतविचाराचा एक प्रबळ हिस्सा म्हणजे त्यांनी भजन गायनाला कलात्मक दर्जा दिला. एक सांगीतिक आकारबंध म्हणून त्याची शास्त्रीय संगीताच्या मंचावर प्रतिष्ठापना केली. भजनाला त्यांनी सांगीतिक चिंतानाचं माध्यम केलं. त्यांनी भजन केलं नाही, ते भजन गायले.

कुमारजींच्या ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या प्रस्तुतीचा उल्लेख अतीव महत्त्वाचा आहे. संगीत नाटकाच्या समग्रतेचं भान ठेवून नाट्यप्रयोग वठवताना स्त्री-भूमिका करणाऱ्या बालगंधर्वांच्या स्वयंभू बहुपैलुत्वाच्या छायेत, भास्करबुवा बखल्यांसारख्यांनी त्यांच्या गळ्यात रुजवलेलं अभिजात संगीताचं रोपटं डवरलं, पण त्याचा वटवृक्षासारखा विस्तार होण्यासाठी त्या नाट्यप्रयोगात वाव नव्हता हे कुमारजींना जाणवलं. बालगंधर्वांच्या गाण्यातील सांगीतिक शक्यता स्वत: दोन तंबोऱ्यात बसून साकार करण्याच्या हेतूनं त्यांनी ही निर्मिती केली.

हेही वाचा…माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट

कुमारजींचा समग्र संगीतविचार सांगण्याचा या छोटेखानी लेखाचा उद्देश नाही, त्या चिंतनातील काही विचारशलाका मी इथे उजळवण्याचा प्रयत्न केला आहे. एकाचा विचार दुसऱ्याने सांगण्यात त्या विचाराच्या अर्थछटा गडद अथवा फिकट होऊ शकतात. एकाने चाखलेल्या पदार्थाच्या चवीचे वर्णन दुसऱ्याकडून तिसऱ्याने ऐकण्यासारखे! तो पदार्थ सामोरा येऊन प्रत्यक्ष चाखला तर त्या सारखे महद्भाग्य नाही. याचीच प्रचीती अतुल देऊळगावकर यांनी संपादित केलेल्या व ‘ग्रंथाली’ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या ‘गंधर्वांचे देणे- पं. कुमारजींशी संवाद’ या ग्रंथाने, येऊ घातली आहे. १९८५ साली ‘ग्रंथाली’ने ‘मला लोकांना शहाणं करण्याचा शौक नाही,’असं म्हणणाऱ्या कुमारजींना सलग सहा दिवस संगीतावर बोलतं करण्याची किमया केली होती. त्यांत माझाही सहभाग त्यांना विचारावयाचे प्रश्न निश्चित करण्यात होता.

हेही वाचा…शब्द शिमगोत्सव

कुमारजींनी या संवादसत्रांतून स्वर-लय-ताल, रागसंगीत व त्यातील प्रकार, संगीतातील घराणी, ऋतुसंगीत व लोकसंगीताचा पैस, त्यांनी ऐकलेले, पाहिलेले गाणे व त्यांचे गाणे यांवर सविस्तर मांडणी केली होती. यातील विचारांच्या पुष्ट्यर्थ त्यांचे जवळजवळ ५ तासांचे गायन या ग्रंथात दिलेल्या QR कोड्सद्वारे ऐकता येते. या ग्रंथाद्वारे कुमारजींना साक्षात भेटण्याचा प्रत्यय येतो. कुमारजींच्या सरत आलेल्या शताब्दी वर्षातील ही सर्वाधिक महत्त्वाची आणि फार मोठी ऐतिहासिक घटना आहे.

‘गंधर्वांचे देणे – पं. कुमारजींशी संवाद’,
संपादन- अतुल देऊळगावकर
ग्रंथाली प्रकाशन, पाने- १९२, किंमत- ८०० रुपये – सवलत मूल्य ५०० रुपये.

satyasheeld@yahoo.com