आजच्या धकाधकीच्या जीवनात अयोग्य आहार, खाण्याच्या विचित्र वेळा, नैराश्य, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे नवनवीन आजारांनी माणसाला घेरलं आहे. त्यातच चुटकीसरशी आजार पळवून लावणाऱ्या औषधांकडे लोकांचा ओढा (अनेकदा डॉक्टरी सल्ल्याशिवाय) वाढतो आहे. ‘घे गोळी, हो बरी/बरा’ अशीच अनेकांची मानसिकता झाली आहे. शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वं मिळविण्यासाठी अनेकांना आहारापेक्षा ‘गोळी’चा आधार वाटतो. जीवघेण्या धावपळीत आजारी पडल्यावरही शरीराला आराम देण्याची आवश्यकता कुणालाही वाटत नाही. औषधांविषयीच्या साक्षरतेचं प्रमाणही भारतात खूप कमी आहे. नवीन पिढीला आपल्या पारंपरिक आजीच्या बटव्याचाही विसर पडला आहे. स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारा समाजही औषधांबाबत साक्षर नाही. अशा परिस्थितीत डॉ. मंदार जोशी यांचं ‘औषधी  विश्वकोश’ हे पुस्तक खूपच मार्गदर्शक ठरतं. या पुस्तकाला प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांची प्रस्तावना आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीला ‘औषधी अनुक्रम’मध्ये खनिज, रसायन, प्राणिजन्य व वनौषधींची शास्त्रीय, इंग्रजी व मराठीत नावं दिली आहेत. ‘थोडक्यात महत्त्वाचे’ यामध्ये छोटय़ा छोटय़ा आजारांवर कोणत्या औषधांचा वापर करावा याची माहिती दिली आहे. ही माहिती खूपच उपयुक्त आहे. काही छोटय़ा छोटय़ा आजारांवर घरगुती उपचार करणं कसं शक्य आहे, याची त्यातून दिशा मिळते.
लेखकाने औषधांची तीन वर्गात विभागणी केली आहे. खनिज, रसायन असा पहिला, प्राणिजन्य दुसरा व वनौषधींचा तिसरा वर्ग. ही वर्गवारी करताना त्या विशिष्ट पदार्थाची वा वनस्पतीची, प्राण्याची वर्गवारी, तिचं शास्त्रीय नाव, अन्य प्रचलित नावं, रासायनिक संज्ञा, वर्ग ओळखण्याच्या खुणा, उपलब्धता यांची माहिती दिली आहे. या पदार्थाचा/ वनस्पतींचा/ प्राण्यांचा अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथिक औषधांमध्ये होणारा वापर तसंच कोणत्या आजारांमध्ये त्यांचा वापर केला जातो याची ओळख करून दिली आहे. ही वर्गवारी डॉक्टरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य वाचकालाही समजण्यास सोपी जाते. अनेकदा एकाच वनस्पतीचा वापर विविध औषधीपद्धतींमध्ये केलेला आढळतो.
यातील रासायनिक/ खनिज औषधींचा विभाग वाचताना आपण रासायनिक व खनिज पदार्थाबाबत अधिक माहीतगार होतो. कारण अशा प्रकारच्या औषधींबाबत सामान्य माणूस अनभिज्ञ असतो. याविषयीची रंजक माहिती वाचताना आपल्या ज्ञानात भर पडते. तांबं, सोनं, लोखंड यांचा औषधांमधला महत्त्वपूर्ण वापर वाचताना त्यांचं मोल अधिकच जाणवतं. आपल्या मनात सोनं म्हणजे फक्त दागिने एवढंच समीकरण दृढ आहे. परंतु औषधांमध्ये सोन्याचा सहभाग सर्वाधिक मोलाचा आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात सोनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष म्हणजे सर्व पॅथींमधील औषधांमध्ये सोन्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केलेला आढळतो. नवीन संशोधनाद्वारे सोन्याचे ‘नॅनो पार्टिकल्स’ हे कॅन्सरच्या गाठींच्या उपचारात वापरले जातात. ही माहिती अचंबित करणारी आहे.
प्राणीजन्य औषधींमध्ये  मधमाशी, गायीचे दूध, गोगलगाय, शंख-शिंपले, मोती अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा जिवांची औषधी उपयुक्तता सांगितली आहे.
या पुस्तकातील वनौषधींचा विभाग आपल्यासाठी खासच. हा विभाग वाचताना आपल्या स्वयंपाकघरातही किती औषधं दडली आहेत, याची नव्यानं जाणीव होते. मसाल्याचे पदार्थ, भाज्या, पावसाळी भाज्या, फुलझाडं, फळझाडं यांचा विशिष्ट आजारांवर होणारा औषधी उपयोग लेखकाने विस्तृतपणे सांगितला आहे. रोजच्या आहारातील भाज्या, मसाल्याचे पदार्थ यांचे औषधी गुण सांगतानाच कोणत्या आजारावर त्या जास्त उपयुक्त ठरतील याविषयीही विस्तृत माहिती दिली आहे.
या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे प्रचलित असलेल्या अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी यांच्यासह अन्य पॅथींमधील रासायनिक, खनिज, प्राणीजन्य व वनौषधींचा वापर यांविषयीही माहिती दिली आहे.
सामान्य वाचकालाही कळेल अशी सहज-सोपी भाषा, विषय अधिक विशद करणारी पूरक छायाचित्रं, आजार व त्यावरील औषधांची उत्तम आणि परिपूर्ण माहिती यांबरोबरच पुस्तकाची रचना, मांडणी, छपाई याबाबतीतही हा कोश उपयुक्त ठरतो. विशेष म्हणजे अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद या तीनही पॅथींचा एकत्रित विचार हीसुद्धा या पुस्तकाची जमेची बाजू म्हणावी लागेल.
या पुस्तकात निसर्गाच्या नवलाईचं अनोखं दर्शन घडतं. निसर्ग मानवाला खूप काही देत असतो, आपण मात्र त्याचा सजगपणे उपयोग करून घेत नाही, याची जाणीव प्रकर्षांने होते. निसर्गापासून आपण दूर जात असल्याने निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या औषधी वनस्पतींकडे आपले लक्ष नाही, ही जाणीव मनाला चुटपूट लावते. या पुस्तकामुळे वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी आपल्या भोवतालच्या निसर्गाकडे अधिक सजगतेने बघतील.   तसेच सामान्य वाचकही औषधांच्या वापराबाबत अधिक सजग आणि साक्षर होतील, हे नक्की!
‘औषधी विश्वकोश’- डॉ. मंदार राजाराम जोशी, इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई, पृष्ठे – २००, मूल्य – ८०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aushadhi vishwakosh by dr mandar rajaram joshi
First published on: 21-09-2014 at 01:10 IST