भूषण कोरगांवकर
गणपतीचे पाच दिवस हटकून शाकाहारी जेवणाचे. त्यामुळे तमाम मांस-मत्स्यप्रेमी जनता नाराज असली तरी माझ्यासारखे सर्वप्रेमी खूश असतात. कारण असंख्य मोसमी भाज्या, कापं, रायती, कोशिंबिरी, चटण्या यानिमित्तानं चाखायला मिळतात. फराळ आणि गोडधोड तर विचारूच नका. या सगळ्यात ऋषीची भाजी तर प्रचंड लाडकी. कारण ही एकच गोष्ट अशी आहे की जी संपूर्ण वर्षांत फक्त एकदाच बनते. घरी गणपती येत नसल्यामुळे गावी गेलो नाही तर शेजारी आणि मित्रांच्या घरीच आमचा गणपती साजरा होतो. गेली कित्येक वर्ष दुपारी ‘हायवे गोमंतक’फेम पोतनीस कुटुंबीयांकडे आणि रात्री पाल्र्याला गिरीश पटवर्धनकडे ही जेवणं ठरलेली. पोतनीसांकडे केळीच्या पानावर खास गोंयच्या पद्धतीचं आणि गिरीशकडे कोकणस्थी पारंपरिक. काकीचं खतखतं, मुगा गाठी, अंबाडीची भाजी, कापं आणि गिरीशकडची वाटली डाळ आणि मसालेभात म्हणजे अहाहा! हा एक दिवस असा आहे की मला किमान दोन पोटं असती तर किती छान असं वाटत राहतं. कारण इतरही अनेक घरी धावत्या भेटी द्यायच्या असतात आणि प्रत्येक घरी काही ना काही खासियत वाट पाहत असते. वीणा मुर्कीभावींच्या हातचं सुंडल, भारती पारिखचे छप्पनभोग, अमोल गायकवाडची ऋषीची भाजी, अमि कामदारच्या घरचे चटपटे स्नॅक्स आणि बाकीच्या तमाम घरांतून मिळणारे उकडीचे मोदक.. या अशा दीड दिवसातल्या असंख्य भेटी गेल्या काही वर्षांतल्या. लोक हौसेचे गणपती बसवत गेले आणि आमची घरं वाढत गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणी मात्र या दिवसांत मी फक्त अमेंबल आणि जाधव या दोनच घरी असायचो. हे आमचे जुने शेजारी. त्यातून अमेंबलांचा गणपती एकच दिवसाचा. त्यामुळे तो दिवस माझा मुक्काम पूर्ण वेळ तिथेच. हे चित्रापूर सारस्वत समाजाचं मंगलोरी कुटुंब. मराठी लेखकांच्या वर्णनांमुळे मासेखाऊ सारस्वत आपल्याला माहीत आहेत. पण हे त्यांच्या परिघाबाहेरचे. पारंपरिकरीत्या शुद्ध शाकाहारी सारस्वत. त्यांच्यामध्ये गणपतीच्या आधी गौरीची पूजा होते. तिचा नैवेद्यही खास. त्यातल्या करंज्या (न्हेवऱ्यो) नेहमीच्या पारंपरिक आकाराबरोबरीनेच त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी, गोल अशा वेगवेगळ्या आकारांत बनायच्या. लहानपणी त्या पाहायला आणि खायला भारी मजा यायची. त्यांच्या अळुवडय़ाही वेगळ्याच लागायच्या. कारण ते बेसनाऐवजी भिजवलेले तांदूळ आणि तूरडाळ वाटून लावायचे. शिवाय खोट्टे म्हणजे फणसाच्या पानात घालून वाफवलेल्या इडल्या, खोळंबो, घश्शी, उपकरी, सुक्कें, फोड्यों, पंचकदाय या सगळ्याची सौम्य, सुगंधी चव अजूनही जिभेवर आहे. आज मी पालेभाजी आवडीने खात असलो तरी त्या वयात ती जबरदस्तीने पोटात ढकलायची गोष्ट होती. पण अमेंबलांच्या नैवेद्यातली मिक्स पालेभाजी मला प्रचंड आवडायची. यावर आजी आणि आई दोघी वरवर खूश व्हायच्या; पण मागाहून वैतागायच्या. ‘त्यांच्या घराकडे जाव्न बरो आवडीन खाता..’ असं कुजबुजायच्या.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author bhushan korgaonkar chavichavine new recipes taste ganeshotsav ssh
First published on: 05-09-2021 at 00:33 IST