शफी पठाण shafi.pathan@expressindia.com

साहित्य अकादमीचे अनुवादित साहित्यासाठीचे पुरस्कार नुकतेच घोषित झाले. डॉ. मंजूषा कुलकर्णी यांचा डॉ. प्रकाश आमटेकृत प्रकाशवाटाया आत्मकथनाचा संस्कृत अनुवाद आणि सोनाली नवांगुळ यांना तमीळ लेखिका सलमा यांच्या इरंदम जामथिन कथाइया कादंबरीच्या मराठी अनुवादास हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यानिमित्ताने..

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

घुसमटीच्या गर्भातच आकार घेत असते बंडखोरीचे अपत्य. टोकाचा अन्याय ही नांदी असते स्वनिर्मित न्यायालयाच्या न्यायदानाची. जिथे शरीराच्या नैसर्गिक हाकांना प्रतिसाद देण्यावरही बंदी येते, त्याच शरीरात क्रांतीची बीजे फुलारत असतात.. धमन्यांचे बांध फोडून शरीर फुटेस्तोवर. राबिया, वहिदा, रहिमा, जोहरा, फातिमा, फिरदौस याही त्यातल्याच. त्या जशा सलमाच्या ‘इरंदम जामथिन कथाइ’च्या प्रत्येक पानावर या घुसमटीचे विदारक चित्र उभे करतात वाचकांसमोर, त्याहीपेक्षा जास्त दाहकतेने शोषणाच्या कथा त्या सांगत असतात  सोनाली नवांगुळ यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’मध्ये. अर्थात हे श्रेय अनुवादाच्या कौशल्याचे. राबिया, वहिदा ही काही वानगीदाखल पात्रे. परंतु राबियाच्या ठिकाणी राधा वा वहिदाच्या ठिकाणी वंदना असती तरी पुरुषांनी उभारलेल्या कर्मठ भिंतींना तडा देण्यासाठीचा संघर्ष अटळच ठरतो. हा संघर्ष सलमाच्या आयुष्याचाच भाग होता, तर सोनालीच्या संघर्षांचा तोंडवळा जरासा वेगळा. पण दोघांत एक साम्य.. कर्मठ भिंतींचा अडथळा! सलमाच्या आयुष्यात हा अडथळा जातीपातीच्या मध्ययुगीन बुरसटलेल्या विचारांनी उभा केलेला. तर सोनालीच्या आयुष्यात शारीरिक व्यंगासोबत आंदणात मिळालेल्या असंख्य व्याधींनी! अशा अपार अडथळ्यांशी दिवस-रात्र लढणाऱ्या मुक्या महिलांच्या आक्रोशाला सलमाने आवाज दिला. त्या आवाजातली कंपनं, धग अन् संताप सोनालीने  नेमका टिपला. अगदी सलमासारखा नसेल, परंतु सोनालीच्या आतला आवाजही त्याच जातकुळीचा. घुसमटलेल्या भावनांना बंडखोरीचे प्रशिक्षण देणारा. म्हणूनच तिने या विस्तृत कादंबरीचा मूळ डौल तितक्याच प्रखरतेने आणि अलवारतेने मराठीतही सांभाळला. जणू काही ही तिचीच कथा आहे. तसे हे आव्हानात्मकच. पण सोनाली नवांगुळ हे नावच जणू आव्हानाचे प्रतिरूप. तिचा एकूण लेखनप्रवास पाहिला तर या काठिण्यात तिने प्रावीण्य मिळवणे अपेक्षित होतेच. आता साहित्य अकादमीच्या पुरस्काराने त्यावर शिक्कामोर्तब झाले, हीच काय ती नवी बातमी!

साहित्य अकादमीने अनुवादासाठीच्या पुरस्काराने गौरविल्यानंतर मराठी साहित्यविश्वात सोनाली अन् सलमाची चर्चा होतेय. पण या निर्मितीला सलमा व सोनाली हे दोनच कोन नाहीत. ही निर्मिती मुळात त्रिमितीतून जन्माला आली आहे. यातला तिसरा कोन आहे कविता महाजन. या त्याच- ज्यांनी ‘ब्र’द्वारे महिला-पुरुष भेदरेषेच्या पल्याड जाऊन पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे दिले. मूळ तमिळमध्ये ‘इरंदम जामथिन कथाइ’ ही कादंबरी लिहिणारी सलमा आणि ‘ब्र’ची नायिका प्रफुल्ला या जणू परस्परांच्या प्रतिरूपच वाटाव्यात इतके त्यांच्यात विलक्षण साम्य. म्हणूनच असेल कदाचित- भारतीय प्रादेशिक भाषांमधील बंडखोर लेखिकांची ओळख मराठी वाचकांना व्हावी, हा विचार मनोविकास प्रकाशनाच्या मनात पहिल्यांदा आला तेव्हा त्यांनी संपादकीय मार्गदर्शनासाठी कविता महाजनांनाच निवडले. आणि कविता महाजनांच्या नजरेसमोर ‘द अवर पास्ट मिडनाइट’च्या अनुवादासाठी पहिला चेहरा तरळला तो अर्थातच सोनालीचा. ‘इरंदम जामथिन कथाइ’ ही कादंबरी मूळची तमिळ. ‘द अवर पास्ट मिडनाइट’ नावाने ती इंग्रजीत अनुवादित झाली. आणि पुढे सोनालीने ती मराठीत आणली.

व्यवस्थेने कर्म म्हणून माथी मारलेल्या अंधाऱ्या गुहेत स्वअस्तित्व शोधताना जे बिंदू हाती लागले ते निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर एका आखीव रेषेत मांडताना सलमा, सोनाली आणि कविता महाजन यांचा हा अनपेक्षित त्रिकोण घडून आला. या कादंबरीतील स्त्री-पुरुषांमधील संबंधांचे व्यामिश्र दर्शन, मानसिक आजारपणातून आलेली पराकोटीची अगतिकता, असुरक्षितता, या दहशतीतही शरीराच्या नैसर्गिक हाकांना प्रतिसाद देण्याचे अचाट धाडस, त्यातूनच कायम रडक्या चेहऱ्यांवर उमललेले निरागस हास्य आणि त्या हास्यातून प्रसवणारा, कधीतरी यावर मात करून परिस्थितीला आपल्या बाजूने वळवण्याचा निग्रह.. असे सारेच पदर वाचकाला अंतर्मुख करतात.

मूळ कादंबरी लिहिणारी सलमा हे आयुष्य प्रत्यक्ष जगली आहे. तिचा जन्म एका रूढीवादी मुस्लीम कुटुंबातला. तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीजवळच्या थुवरनकुर गावचा. बाप-भावाचे नाते सांगणाऱ्या घरच्याच पुरुषांची  दडपशाही तिला रोज छळायची. हा अस छळच तिला आधारासाठी साहित्याच्या वळचणीला घेऊन गेला. किशोरावस्थेतच सलमा एक उत्सुक वाचक आणि लेखिकाही बनली. फ्योदोर दोस्तोयेव्स्की आणि लियो टॉलस्टॉय  तिला खुणावत राहिले. नेल्सन मंडेला आणि चे गवेरा तर तिचे आयकॉनच. पण घरच्या पारंपरिक चौकटी आरपार भेदणारे हे तिचे ‘व्यसन’ घरच्यांना सतत खुपायचे. त्यातूनच तिचा छळ आणखीन गहिरा झाला. पण मन आणि मेंदूत हिंदकळणाऱ्या अभिव्यक्तीच्या लाटा काही तिला स्वस्थ बसू देईनात. त्यामुळेच मग कधी कॅलेंडर वा नोटबुकमधल्या फाटलेल्या कागदांच्या तुकडय़ांवर ती चितारत राहायची तिच्या वाटय़ाला आलेल्या बाईपणाच्या वेदना. या अशा बाईपणाच्या वेदनांची नोंद सोनालीही बालपणापासूनच घेत आलेली. म्हणूनच जेव्हा सलमाच्या कादंबरीच्या अनुवादाचा प्रस्ताव तिच्यासमोर आला तेव्हा तिने तो लगेचच स्वीकारला. ‘हे सलमा आणि सोनालीतील साम्यामुळे घडले का?’ असे विचारल्यावर सोनाली सांगते.. ‘सलमाइतका संयमी विचार माझ्यात नाही. आम्हा दोघींत ही एक विसंगती नक्कीच आहे. परंतु आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुषांच्या पिळवणुकीला सामोरे जात असतानाही सलमा स्थिर राहते. उलट, संघर्षांतून नव्या लढय़ासाठीचे बळ मिळवते. मला मात्र तिच्या तुलनेत जास्त धडका द्याव्या लागतात व्यवस्थेला. कारण एकतर मी जन्माने बाई. त्यात पुन्हा अपंगत्वाची भर. यातून जी अंत पाहणारी उपेक्षा समोर उभी ठाकते तेव्हा मला सलमाचा संयम आठवतो अन् मग मी माझ्याही नकळत संयमी होत जाते. सलमाची ही कादंबरी अनुवादित करताना मलाही माझीच एक नवीन ओळख गवसली. सलमाच्या आयुष्यातील नवनवीन प्रवाह जसे नायिका व सहनायिकांच्या रूपात वाचकांच्या भेटीला येतात तसेच अनुवादाच्या प्रत्येक टप्प्यावर ते मलाही माझ्या आतल्या आवाजाशी अवगत करतात. बाई या प्रतिमेच्या भोवताली टिपलेल्या निरीक्षणांतूनच या कादंबरीतील पात्रे जन्माला आली आहेत. केवळ पुस्तकात विशिष्ट परिणाम साधण्याच्या अपेक्षेने ती खास रंगवलेली नाहीत. माझ्या लिखाणाचा पिंडही असाच वास्तवदर्शी. म्हणूनच या अनुवादाने साहित्य अकादमीला प्रभावित केले असावे. पण एक सांगते, अशा वलयांकित पुरस्कारांमुळे आजच्या प्रगत शतकातही आदिम जीवन जगणाऱ्या महिलांच्या वेदनांना वाचा मिळते. ते वाचून तार्किकदृष्टय़ा सुसंगत असे निर्णय घेण्याचे बळ त्यांना प्राप्त होते. जग नावाच्या या अतिविशाल पटावर स्त्री नावाची जी गोष्ट आहे ती केवळ वापराजोगी वस्तू नाही, तर तिलाही एक स्वतंत्र अस्तित्व आहे, ती जगाच्या उत्पत्तीकथेचे मूळ उगमस्थान आहे याची ठळक जाणीवही असे पुरस्कार समाजाला नव्याने करून देत असतात. हे कुठल्याही व्यक्तिगत गौरवापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे,’ असे सोनाली सांगते. यासोबतच आपल्या भाषेच्या बंदिस्त दारापलीकडे जाऊन जगभरातील माणसे वाचण्याची संधी अनुवादित साहित्यामुळे मिळते. त्यामुळे मूळ साहित्यकृतीसोबतच अनुवादाचाही सन्मान तितक्याच उत्साहाने आणि आणखी व्यापक स्तरावर व्हावा अशी नम्र अपेक्षाही ती व्यक्त करते. उण्यापुऱ्या ४२ वर्षांच्या प्रवासात सोनालीने जे मिळवले, ते विलक्षण आहे. ‘ही अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठीचे बळ तू तुझ्या संवेदना हरवलेल्या पायांशिवायही नेमके कसे अन् कुठून आणतेस?’ असे विचारल्यावर सोनाली हसते आणि तिने ज्याचे आत्मचरित्र साकारले आहे त्या ऑस्कर पिस्टोरिअसकडे बोट दाखवते. वयाच्या पहिल्याच वर्षांत दोन्ही पाय गमावणाऱ्या या वेगवान धावपटूने केवळ स्वप्नांचा पाठलागच केला नाही, तर त्यांना वास्तवात उतरण्यास भाग पाडले. सोनालीही अशीच आहे.. स्वप्नांचा पाठलाग करणारी.. ड्रीमरनर!