गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

कार्यकर्ता एक

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

हुऽऽऽश्यऽऽऽ! आज सगळी धावपळ संपली. मंजे कालच संपली तशी. काल रात्री भाऊंच्या फाम हाऊसला पारटी झाली जंक्शान. खंबेच्या खंबे आन् बारबेक्यू. अगागागा ऽऽऽ काय पिवून लास झालीएत पोरं. ..अबाबाबाबा..! भाऊपन खुशीत व्हते. म्हनले, ‘‘ऐनवेळी तुमी रिक्षा-गाडय़ातनं मान्सं मतदानाला आन्ली तितं फिरली सीट.’’ मी येकदम बारबेक्यूसमोरची शीट पकडली होती. सगळा ताजा माल पोळत आसूनसुद्धा वडत होतो प्लेटमदी. लई खाल्लं. भाऊंनीपन. बरोबर खाल्ल्यानी एकदम भारी वाटलं. भाऊपन लेगपीस खाताना बोटं चाटत होते त्ये पाहून आपलेपना वाटला. तशेपन भाऊ एकदम प्रेमळच्येत म्हना. पिंटय़ा नावाच्या- माज्या मावसभनीच्या मुलाला इंग्लिश मीडियमला अ‍ॅडमिशनची चिट्टी त्यांनी लगीच दिली व्हती. पन सगळ्यात भारी म्हनजे, पशे वाटायला मलाबी पाटवलं तवा सगळ्यात भारी वाटलं. आपल्यावर दाकवलेला विश्वास कसा फेडायचा काय कळत नाय. मागं ते बुथ कॅप्चिरग वगेरे असायचं तेव्हा निदान कायतरी अ‍ॅक्शन दाकवायला संदी होती. पन आता े इव्हीएमनी घोटाळा केलाय. निकालापर्यंत पुंग्या ताईट. सगळे गॅसवर  ऱ्हानार. भाऊ रुलिंग पारटीचे आसल्यानी मी त्यांच्याकडं आलो. अन्नांना सोडताना हृदयावर दगड ठेवावा लागला आन् साताठ दोस्तांच्या डोक्यात हॉकी घालावी लागली होती. भाऊंनी लगेच बेल केली. आता चौकीला फोन करून हाजेरीपन बंद करनारेत. अन्नांना सोडू का नको असा प्रश्न पडला असताना भाऊ म्हनले, ‘‘े बग, राजकारनात सत्याची बाजू म्हत्त्वाची आस्ती. म्हनूनतर मीपन पक्षांतर केलं.’’ त्ये वाक्य आजून इसरलो नाहीए. फक्त सत्या कोन ह्यचा उलगडा मात्र झाला न्हवता. काल धीर करून विचारावं म्हनलं, पन सगळेच खूप ताईट व्हते. आनी पाप्लेट कमी पडल म्हनून मी बारबेक्यूसमोरून हाल्लो न्हाई आनी चार पीस मिळावले. भाऊंच्या बॅनरवर फोटो लावल्यावानी भारी फिलिंग आलं. पक्या कुटं दिसंना म्हनून चौकशी केली. त्यानीपन लई धावपळ केल्ती. तर भाऊंनीच त्येला ‘‘पारटी कॅन्सलए’’ आसा निरोप पाटवला व्हता. भाऊ लई डोकेबाजे. त्यान्ला पक्याच्या जागेवर नवा मानूस आनायचाय म्हनून त्यांनी गेम टाकली. मी रिजल्ट दिवशी मोठ्ठा बॅनर लावनारे, त्यान्ला कळंलच काय ते.

कार्यकर्ता दोन

आज राडा झाला. दादांचा मॅसेज आला. म्हन्ले, ‘‘व्हिडीओ व्हायरल करायचाय, लवकर पोच.’’ मी लगीचच गेलो, तर तीतं समदी तयारी केल्ती. आपोजीशनच्या शिंदेंच्या पारटीच्या शिंबॉलचे टी-शर्ट घालून पशे वाटायचे आन् त्याचा फेक व्हिडीओ करायचा व्हता. म्हनून मला दादा आवडतात. त्ये टेक्नॉलॉंजी वापरतात. व्हिडीओमदी चेहरा झाकून जायचं व्हतं, पन तरीबी रिक्स होतीच. मी म्हनलं- जातो. सापडलो अस्तो तर गजाच्या गॅंगनी मरुस्तोवर मारला आस्ता. गजाला शिंदेंनी पाव खोका दिला म्हनून तो जास्तीच इमानदारी दाखवतो. व्हिडीओमदी मी अनिल कपूरछाप तिरपा चाल्लो. कुनाला कळू ने म्हनून. नायतर मी सरळच चालतो. राजकारनात आपली चाल कुनाला कळली नाय पायजेल आसं दादा सारकं सांगतात आनि खरंच्ये हॉं! दादांनी ऐन इलेक्शनच्या तोंडावं जुन्या पार्टीला तोंडघशी पाडत फुलाची निवड केली. फुल गेम! मी पन लक्श ठय़ून राहनारे. रिजल्ट लागूं दे फक्त. नाय तिसरीला चौथी टपरी टाकली ना तं नावाचा दिल्या नाय. आई म्हंती, ‘‘भाई व्हतोस का काय?’’ तर मी म्हनलं, ‘‘नाही आई, भाई एवढय़ात न्हाई.’’ पन मी पॉलिटिक्ससाटीच्चे आसं वाटतं. कालच स्वप्न पडलं व्हतं. बॉम्बेला चाल्लोय फॉच्र्युनरमदी. माजी गाडी टोलला येती. मी फक्त ऑटोमॅटिक बटनानी काच खाली घ्येतो. बाऽऽऽस ! टोलचा दांडा आपसूक वर. डायरेक आसेम्ब्लीच्या दारात. तर तीतं पन त्येच. पीएसाय सॅल्यूट मारतो आनि म्हंतो, ‘‘लक्ष आसुंद्या.’’ आता आत जानार तेवढय़ात आईनी उटावलं. पोलीस आल्ते. काय नाय मंग चौकीवं नेलं. जरा फटके टाकले त्यांनी पन मी दत्तू काळे हाप मर्डरमदी आसल्याबद्दल काईच म्हाईती न्हाई म्हनत ऱ्हाइलो. कंटाळले शेवटी. दिलं सोडून. म्हनले, ‘‘परत आत घिवू’’ मी म्हनलं- म्हंजे मनात म्हनलं, ‘रिजल्ट लागूं देत. मग भेट तू मला.’ काटा किर्र्रला मिसळ खाऊनच आलो. झनझनीत र्ती! बाळ्याची भन तीतं दिस्ली. लाईन देत व्हती. मी न्हाई घ्येतली. म्हनलं सद्या नको. शादीशुदा झाल्यानी आडचनी वाढून ठेवायच्या नस्त्या. आयटम चांगलाय पन. बाळ्याच यडय़ा ०चंय. आसूं दे. त्याला रिक्षाचं परमिट द्यायचं गाजर दाखवलंय. म्हनून तर आयटम लाईन देत नसंल? जाऊं दे. मंग नाईट शो टाकला पोरांबरुबर तर तीतं त्यो अ‍ॅक्टर दिस्ला. म्हनलं, ‘‘येक शेल्फी?’’ तर आखडू नाय म्हनला. ह्य़ेच्या मायला, येवढीशे भिकारडे. दादांकडं येत्यान सुपारीवर. दहीहंडी, गणपती सगळं करत्यात. रिजल्ट लागू दे. मंग बगू.

आता झोपतो उद्या काऊंटिंगे. दादा म्हनलेत, ‘आंगोळ करून या. पानी आलं पायजे मायला टायमावं. नायतर बॉडी स्प्रे हाएच. गुड नाईट. हॅ हॅ हॅ.. मलाच गुड नाईट? च्यु० मी

कार्यकर्ता तीन

कष्टावीणा फळ न्हाईचे हे खरचे. आज मी येवडी दमले. त्यात पिरेड चालू व्हतो का काय भीती व्हती. न्हाई झाला. आता उद्याच. महिला आघाडीचं प्रमुखपद सोप्पं नाई ए बाई. ..पन उगाच घाई करन्यात पन अर्थ नाहीए. तुका म्हने त्यातल्या त्यात. आज उपप्रमुखतरी झालेचेना? उद्या सीट लागली की दिवस भरतील जळनाऱ्यांचे! एके पन, की राजकारनात ५० टक्के आरक्षन केल्यामुळंच माज्यासार्कीला चान्से. नाना म्हनले, ‘‘पुढच्या वर्षी राखीव होनारे मतदारसंघ.’’ हुंदे बाई. एमेसडब्ल्यूचे विषय काडले पायजेत तवर. एजुकेशन आसलं की वजन पडतं. इंग्लिश टॉकिंग कलासपन लावलाच पायजे. झोपडपट्टीत साडय़ा वाटताना तितली अवस्था बगून वाईट वाटत होतं. इतकी घान. पुर्न फेरीपन करू शकले नाई. आता उरलेल्या साडय़ा गपचिप शीतल कलेक्शनवाल्याला दिल्या पायजे. पन रिजल्ट नंतरच. उगा बोम्ब नको. म्हात्रे बाईचं बारीक लक्ष आसतं. डोमकावळी मेली. मतदारसंघात वंचितांची संख्या काडा म्हनलं तर म्हंती, ‘‘ह्यंच्या राज्यात खुद्द बामनापासून सगळे वंचितचे.’’ आगं माजी आई, नाना काय म्हंताएत? तू काय सांगतीए? तिच्या डिवोर्समुळं तिला वंचितटाईप वाटत आसन म्हना. पण म्हनून काय सगळे वंचिते का?

आज पॅड आन्ताना मॅडिकलवाला तेलंग नीट बोलला. रिजल्ट लागला चांगला तर उदारी द्यून टाकू त्याची. नाना म्हंताएत दोन नंबरला आलंच पायजे. येतीन पन. पशे वाटलेत धो धो. त्ये पशेपन म्हने दुसरीकडनं आल्ते. घडय़ाळाच्या हाताकडनं. मला तर वाटतं कमळातलीच लक्षुमीए. मला दहाच हजार दिले म्हात्रे बाईनं. खा खा म्हणावं. एक दिवस सत्य भाएर येनारच. मागच्या सा डिसेम्बरला मानसं नेली तर ५०० पन न्हवती. ह्य़ा म्हशीनं नानांकडून हज्जारचे पशे घ्येतले. नाना पन खुळंच्ये. आसुंदे. आपल्याला सद्या उपयोगाचंय. पडनाऱ्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनापन प्रॉफिट होतो हे कुनाला कळतंय. समाजाची सेवा कराय पायजेल. पन घर नीट केलं पायजे. म्हाडाच्या लॉटरीत नाना नंबर लावून देतो म्हनलेत. नानांचं भुसारी कॉलनीत कायतरी झेंगाटे म्हने. त्याची म्हाईती काडून ठय़ेवते. सुदाम्याला सांगितलं तर ऐकतच न्हाई. मोट्टी भन म्हनून आदर न्हाई भाडखावला. बाईकचे इंष्टॉलमेंटच थकवते. मंग वटनीवर यील. जाऊंदे. झोपते आता. काऊंटिंगच्या प्रेशरने पिरेड मागं पुडं व्हतात का काय?

कार्यकर्ता चार

वाहनफेरीचा उपयोग झाला. परिवारातील पाठिंबा सम्यक नव्हता. तत्त्वाची लढाई लढताना ताई खंबीर जिजाऊप्रमाणे उभ्या राहिल्या. ताईंची भाषणशैली मात्र सुधारणे गरजेचे आहे. थोडय़ा बारीक झाल्या तरी बरे. असो.

नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहति पावक: नैनं..

सत्तासुंदरीचा बाहुपाश खुणावतो आहे.

मोहं न कुरु.

निवडणूक निकालानंतर

कार्यकर्ता एक

भाऊ लागले. सीट लागली. भाऊंनी करिष्मा दाकवला. गॅस उडाला. मला तर काय करावं सुचतंच नवतं. भाऊंनी गुलाल आनायला पाटवलं तेव्हा चेष्ट ५६ इंच झाल्यागत फिलिंग आलं. मिरवणुकीत जाम नाचलो. पहाटे झोपलो. लई भारी स्वप्न पडलं. भाऊ मंत्री झालेत आन् मी त्यांचा ओएसडी. ऑफिसर ऑने स्पेशल डूटी. आशी डूटी करंल ना..! पन स्वप्न सत्यात उतरवायला कष्ट करावे लागनार.. एक मिंटं! सत्या! सत्या म्हंजे सत्य तर नसंल? ‘सत्याची बाजू!’ आएला! भाऊऽऽऽ कोडं सुटलं. आपन सत्याच्या बाजूला ऱ्हानार. आता खरी दिवाळी. बानच बान! सुईंऽऽऽ सटॅक. दादाऽऽऽ धोतर संभालो. बान घुसेंगा ऽऽऽ हॅ हॅ हॅ हॅ

कार्यकर्ता  दोन

हे ऽऽऽ धताड, तताड.. तताड तताड..

फुल्ल गेम.. शिंदेचं डिपॉजिट गायब..

धताड.. तताड. आज नाय लिवू शकत. खरंच आईच्यान नाई लिवू शकत.

आज आपन हॅप्पीए

म्हंजे आउटे. पूर्न आउटे. हॅ हॅ हॅ हॅ!

दिन दिन दिवाळी, गाई, म्हशी, कुत्री ववाळीऽऽऽ

कार्यकर्ता तीन

राजकारन म्हंजे उकिरडाए नुस्ता. नाना नंबर तीन्ला गेले. पन तरी खुश होते. लक्षूमी कमळातूनच आली तर..आमचा उगाच दिवस मोडला. तरी मी नको म्हनत होते. तरी म्हात्रे बाईनी उगाच गुलाल आनायला पाटवलं. मी ग्येलेच नाई. परस्पर गुल झाले. शीतल कलेक्शनवाल्याचा फोन एंगेज कशानं येत होता कुनास ठाऊक. सुदाम्यानं तेलंगला उगाच दम दिला. त्याची नजर साफे. नाना म्हाडाच्या लॉट्रीचं विसरू ने म्हंजे मिळवली. तशे ते सत्तेवर येतायत म्हना. त्यानी बरोबर आघाडी करून ठेवलीए. राज्यमंत्री होनार म्हनताएत. पडूनच्या पडून पुना मंत्री. म्हात्रेबाई जातीचे मग बंगला सजवायला. पडल्यावर गुलाल उधळतीए. वंचित मेली.

कार्यकर्ता चार

समर्थाचिया सेवका वक्र पाहे

असा सर्व भू मंडळी कोण आहे

नको रे मना..

ताई! हनुमानाप्रमाणे छाती फाडता यायला हवी होती. दिसलं असतं तुम्हाला सगळं. असो. तुम्ही काही द्यावं ही अपेक्षा नाही. मात्र तुम्हाला सर्व मिळावं. तुम्ही पतपेढीत शब्द टाकाल हे ठाऊक आहे. चिरंजीव चिकटले की मी तृतीय वर्ष शिक्षित व्हायला मोकळा. एकूण निकाल उत्तम नसला तरी समाधानकारक. कार्यकर्त्यांकरिता चहा फराळ आयोजित करायला सांगितलंत तेवढं पुरेसं होतं. पैसे कशाला दिलेत. ही म्हणाली, ‘‘कष्टाची कमाई आहे.’’ रात्र फार झाली. दिवा मालवला पाहिजे. मग पूर्ण अंधार. फिटे अंधाराचे जाळे, व्हावे मोकळे आकाश!

निकालानंतर बरेच दिवसांनी

कार्यकर्ता १

ह्य़ांच्या तं आयला ०

बोललोच नाई म्हंतात? आरे युतीए ना आपली? आता आमचे युवराज छाताडावर बस्तील म्हनून पालथे पडताय होय? साहेब सोडनार न्हाईत. मुख्यमंत्री आमचाच. आनि भाऊंला कॅबिनेट मिळालंच पायजे. आता तीन दिवस आमदार निवास. व्हाईट पॅंटीवर कसला डाग पडलाए कुनास ठाऊक. लांब झब्बा टाकू वर.

कार्यकर्ता २

एकच वादा.. आमचे दादा! आज वरडून नरडं बसलं पन थांबलो नाई. परवा पन बॅनर लावतानी थोडक्यात वाचलो. पोरं म्हनली बाजूच्या हाय टेन्शन वायरला चिकटला आस्ता ना, निस्ता धूर न जाळ संगट झाला आस्ता. लगीच जोक टाकला, म्हनलं आपलं कामच सराटे. हॅ हॅ हॅ हॅ! आज एबीपीनी आमचा फेक व्हिडीओ दाकवला म्हने. मीडिया माजलाय सगळा. कायपन दाखवतो. मुंबईत लई उकाडाए राव. कपडे लय खराब होत्यात. ह्य़ा दळभद्र्यास्नी मदीच बान मारला नस्ता तर एव्हाना मलबार हिलचा गारवा मिळाला आस्ता. भाऊंला शिवनेरी बंगला मिळाय पायजे. तीतं आऊट हाऊसला चांगली सोये. कमोड बीमोड सगळंय. चला म्हनावं बनवा सरकार. आल्या लक्षुमीला खेटार दाखवताय येडफुकन्यानो. काय म्हंता काय व्हील. माजू नका. चना जोर गरम कमी खाल्लं पायजे. गॅसवर नकोय आता. कुटल्याच.

कार्यकर्ता ३

म्हात्रेबाई सोत्ता झायलो घेऊन घरी आल्या. मला मागंच बसवलं पन काही का होईना मुंबईला तर घेऊन आल्या. त्या कुटल्या म्हना आटवन ठेवायला. नानांचाच जीवे माझ्यावर. सुदाम्याला भारी वाटलं एकदम. सोत्ताहून बॅग उचलली. तीन दिवसात डायरी लिहिताच आली नाई. निस्तं चेंबूर ते व्हीटी गाठुस्तोवरच जीव जातोय. चेंबूरला समाज कल्यानच्या लेडीज होस्टेलला मला ठेवलंय. तीतं ढेकूनेत लई. एकदाचा नानांचा शपथविधी झाला की लगीच निगनारे. पण कष्ट करायला पायजेचेत. म्हात्रे बाई पन ढेकनातच झोपती की.

कार्यकर्ता ४

पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर करून मुंबईला आलो त्याला आज तीन दिवस झाले. मी आल्याचं ताईंना कळलं नाही बहुदा. त्या भेटल्याच नाहीएत. अर्थात त्यांना साऱ्या राज्याची चिंता आहे. मी स्वयंपूर्ण राहायला हवं.

अपेक्षाम् कुरु!

देव पावावे अन ताईंसह मंत्रिमंडळ व्हावे.

होईल. सगळं ठीक होईल.

घनतमी शुक्र बघ राज्य करी

रे खिन्न मन बघ जरा वरी!

तमसो मा ज्योतिर्गमय!

girishkulkarni1@gmail.com