नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या माध्यमांतून आपला कलात्मक ठसा उमटविणाऱ्या सई परांजपे यांचे आपल्या कारकीर्दीचे सिंहावलोकन करणारे साप्ताहिक सदर…
आकाशवाणीच्या परिसरामध्ये मी पूर्णपणे रममाण झाले. रेडिओ हा आता एक फावल्या वेळचा छंद उरला नाही, तर माझ्या गलबताला पुढील मार्ग प्रकाशमान करून दाखविणारा दीपस्तंभ ठरला. माझ्या नकळतच आयुष्याची पुढची दिशा ठरली. माझा पगार वाढून रु. १५० वर येऊन टपकला आणि थबकला. व्यवहार कशाशी खातात, हे मला तेव्हा कळत नव्हतं.. आताही फारसं कळत नाही. आजपर्यंत माझ्या कलाकृतींवर इतरच कमावून गेले. विशेषत: चित्रपटांवर! ‘स्पर्श’, ‘कथा’ आणि ‘चश्मेबद्दूर’ (दोनदा) ही ठळक उदाहरणे सांगता येतील. असो. जमेची बाजू पाहिली तर माझ्या खात्यावर अनेक पुस्तके, नाटके, बालनाटके, दूरदर्शन मालिका, लघुपट आणि चित्रपट नोंदविले गेले; हेही नसे थोडके.
गोपीनाथ तळवलकर- नाना- हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. मुलांच्या प्रसिद्ध ‘आनंद’ मासिकाचे संपादक आणि स्वत: एक समर्थ लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. ‘बालोद्यान’ हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. भरभरून मुलं येत. स्टुडिओचे दार जेमतेम बंद करता येई. आता साठीच्या पलीकडे गेलेली कितीतरी ‘मुलं’ मला अजूनही कुठे कुठे भेटतात. रंजन व उद्बोधन यांचा सुरेख मिलाफ आणि बालकलाकारांचा सहभाग यामुळे ‘बालोद्यान’ कार्यक्रम फार लोकप्रिय झाला होता. या भातुकलीमध्ये मी कधी कशी सामील झाले ते आता आठवत नाही. पण आम्ही तिघे- स्वत: नाना, हरबा (नेमीचंद्र उपाध्ये) आणि ताई (मी) या कार्यक्रमाचे सूत्रधार होतो. गप्पाटप्पा करत, मुलांशी थट्टामस्करी करत आम्ही कार्यक्रम पेश करीत असू. आम्हा तिघांचा परस्परस्नेह आणि जिव्हाळा मला वाटतं माइकवरून थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचत असावा. मुलांना आवडणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, गोष्टी, नाटुकली, संगीतिका, संघगीते, नकला, कोडी, नाटय़छटा, तऱ्हेतऱ्हेच्या स्पर्धा.. जे जे काही श्राव्य आणि रंजक होतं, ते सारं काही आमच्या पोतडीत ठासून भरलेलं असे. बालगायकांच्या मैफिलींमधून नंतर किती गुणी मुलं पुढे आली, त्याचा हिशेबच नाही. कार्यक्रमाच्या शेवटी मी मुलांच्या पत्रांची उत्तरं देत असे.
वासंती नावाची एक मुलगी न चुकता दर आठवडय़ाला पत्र लिही. झालेल्या कार्यक्रमांचा परामर्श घेऊन करमणुकीचे नवनवीन प्रयोग ती सुचवीत असे. तिचे विचार परखड आणि शैली आकर्षक होती. दर पत्रात ती आग्रहाने मला घरी बोलवी. पण मी सौजन्यपूर्वक तिला ‘नाही’ म्हणत असे. आकाशवाणीच्या नियमावलीत खासगी भेटीगाठींना मुभा नव्हती. ‘‘तू पुण्यात राहतेस, तेव्हा तूच ‘बालोद्यान’ला का हजेरी लावीत नाहीस?,’’ असा सवाल तिला मी केला. तिचं हताश उत्तर आलं, ‘‘माझ्या प्रकृतीच्या अडचणीमुळे मी कधीच घराबाहेर पडू शकत नाही. असू दे. आता पुन्हा तुला बोलावण्याची धृष्टता (तिचा शब्द!) मी करणार नाही. रेडिओवरूनच भेटू.’’ मग नियम, उपचार डावलून मी वासंतीच्या घरी गेले. तिचे घर अगदी माझ्या वाटेवर होते. वासंतीचा कमरेपासूनचा खालचा भाग पार लुळा होता. पण ती खूप हसरी आणि समजूतदार होती. आम्ही खूप गप्पा मारल्या. मी बऱ्याच वेळा तिला भेटायला जात असे. कारण माइकचा अडसर आम्ही दोघींनी पार केला होता.
एकदा मला तातडीने एक फोन नंबर हवा होता. मी १९७ ला फोन करून विचारले, ‘‘मला ग. दि. माडगूळकरांचा घरचा नंबर देता का?’’ बस्स! एवढंच. पलीकडून टेलिफोन ऑपरेटर जोरात किंचाळली, ‘‘ताई! ताई ना? ‘बालोद्यान’ची ताई बोलते आहे का?’’ मी सर्दच झाले. सुखावले पण. थोडय़ा माफक गप्पा आणि जिव्हाळ्याची प्रश्नोत्तरे झाल्यावर तिने मला नंबर दिला. मी फोन खाली ठेवला आणि तडक तरंगत ढगात गेले. प्रसिद्धीची ती पहिली झुळूक विलक्षण सुखावह होती. पुढे माझ्या वेगवेगळ्या उद्योगांपायी जनलोभाचे बरेच आविष्कार अनुभवायला मिळाले; पण अशी उत्स्फूर्त दाद मात्र पुन्हा वाटय़ाला आली नाही. आवाजाच्या दुनियेमधल्या माझ्या अल्पशा कामगिरीचे कौतुक एका अनोळखी आवाजाकडून व्हावं, हा एक मजेदार योगायोग होता.
यथावकाश मी नानांची सहायिका म्हणून काम पाहू लागले. लहान-मोठी नाटके बसवणं, मुलांच्या तालमी घेणं, नित्य नव्या कार्यक्रमांचा वेध घेणं हे माझं काम होतं. एकदा ना. ग. गोरे यांनी लिहिलेलं ‘बेडूकवाडी’ हे मुलांचं छोटं पुस्तक माझ्या हाती आलं. बेडूक या प्राण्याविषयी गमतीदार पद्धतीने माहिती सांगणाऱ्या या दीर्घकथेत पिटुक मंडुके या छोटय़ा बेटकुळीच्या आयुष्यातल्या एका दिवसाचं रोमहर्षक वर्णन होतं. पिटुक शाळेला जायला निघतो. त्याच्या आईने डब्यात खारवलेल्या मुंग्या दिल्या आहेत. वाटेत त्याला अनेक भलेबुरे जलचर भेटतात. पाणसर्पाशी सामना होतो. असंख्य वेधक घटनांनी भरलेली पिटुकची साहसकथा उलगडत जाते. मी आजपर्यंत वाचलेल्या बालसाहित्यात ‘बेडूकवाडी’चा माझ्या हिशेबी असलेला अग्रणी क्रमांक अद्याप ढळलेला नाही. तर या कथेवर नभोनाटय़ लिहिण्यास आणि ते सादर करण्यास ना. ग. गोरे यांनी कौतुकाने मला परवानगी दिली. उत्तम कलाकार जमवून आम्ही तालमी सुरू केल्या. वासुदेव पाळंदे (आबा मंडुके), मीरा रानडे (ताई मंडुके) आणि छोटा चुणचुणीत सुहास तांबे (पिटुक) यांनी आणि सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका बहारीने वठविल्या. संगीत ही या श्रुतिकेची फार मोठी जमेची बाजू ठरली. आकाशवाणीवर तेव्हा राम कदम हा तरुण क्लॅरिओनेट वादक स्टाफवर होता. काहीसा अनियमित, पण हसतमुख आणि विलक्षण निपुण म्हणून त्याची ख्याती होती. संगीताची जोखीम त्याने आनंदाने पत्करली आणि आपल्या कामगिरीने सर्वाना चकित करून सोडले. त्याच्या संगीतनियोजनाचे वर्णन करायला एकच शब्द सुचतो.. भन्नाट! वेगवेगळ्या जलचरांसाठी निरनिराळी वाद्ये आणि आवाज वापरून राम कदमने अत्यंत संपन्न साऊण्ड ट्रॅक बनविला होता. संगीत निर्देशनाची ही त्याची पहिलीच बारी! ‘बेडूकवाडी’चे वारेमाप कौतुक झाले. माझीसुद्धा ती पहिलीच सत्त्वपरीक्षा होती.
‘बेडूकवाडी’च्या यशाने प्रोत्साहित होऊन मी माझे पहिलेवहिले नाटुकले लिहिले- ‘पक्ष्यांचे कविसंमेलन.’ हे नाटक पूर्णपणे ध्वनिरेखित होते. मथळ्यावरून सूचित होते त्याप्रमाणे नाना पक्षी कविसंमेलन भरवून ‘कविराज’ निवडण्याचे ठरवतात. गरुडमहाराजांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन भरते. मोठय़ा हिरीरीने त्यात मोर, पोपट, कोकिळा, सुतार, घुबड असे अनेक पक्षी भाग घेतात. प्रत्येकाला आपापल्या वैशिष्टय़ाचा तोरा असतो आणि बापडय़ा कावळ्याची सगळेजण हेटाळणी करतात. अर्थात शेवटी सर्व घमेंडखोरांचे पितळ उघडे पडते आणि कावळाच बाजी मारून जातो. नाटक रेडिओवरून प्रसारित झाले तेव्हा पु. ल. देशपांडे यांचे छानसे पत्र आले. नाटकाबरोबर त्यांनी आवर्जून सुदर्शन आठवलेचं- ‘कावळ्या’चं मनापासून कौतुक केलं होतं.
‘कविसंमेलना’नंतर मी भराभर मुलांची अनेक नाटकं लिहिली. ती जवळजवळ सगळीच ‘बालोद्यान’मधून सादर झाली. हाताशी हा हक्काचा ‘हवाई मंच’ होता, म्हणून एवढे लिहून झाले असावे. कढईतून काढले की तडक गरम गरम ताटात असा तो प्रकार होता. आकाशवाणी सप्ताहातदेखील माझी बालनाटके मंचावरून प्रेक्षकांपुढे आणि माइकवरून श्रोत्यांपुढे आली.
याच काळात मी लिहिलेल्या ‘पत्तेनगरीत’चा इतिहास मजेशीर आहे. हे बालनाटक मला बसमध्ये सुचले. दिवसाचे काम संपवून मी ससूनच्या स्टॉपवर बस पकडली. बस जशी गतिमान झाली तशी तिच्याशी शर्यत करायला म्हणून की काय, माझी कल्पनाशक्तीही दौडू लागली. बावन्न.. नव्हे, त्रेपन्न पत्त्यांच्या नगरीमधले नाटय़ डोळ्यांपुढे दिसू लागले. ताम्रवर्णी (बदाम, चौकट) विरुद्ध कृष्णवर्णी (इस्पिक, किलवर) या राज्यांमध्ये वैर! युगे युगे चालत आलेल्या लढाया! त्यांना अंत नाही. हार-जीत कधीच कुणाची नाही; कारण दोन्ही पक्ष तुल्यबळ! जोकर हा शांतिदूत. तो दोन्ही राज्यांमध्ये सौख्य नांदावे म्हणून झटत राहतो. लुच्च्या बदाम गुलामाचे उपकथानक. राजाविरुद्धचा त्याचा कट बहादूर बदाम दुळ्या सेनापती दहिल्ले यांच्या मदतीने मोडून काढतो. हा सगळा तपशील सुचेल तसतसा मी माझ्या शीघ्रतम लिपीमध्ये बसच्या तिकिटावर नमूद करीत गेले. नंतर काही विसरायला नको! या नादात माझा संभाजी पार्कचा स्टॉप कधी आला आणि गेला, ते कळलेच नाही. पार स्वारगेटच्या शेवटच्या स्थानकापर्यंत मी पोहोचले.
माझी एकूण सात बालनाटके लिहून झाली. पहिली दोन सोडली तर बाकी सर्व (‘शेपटीचा शाप’, ‘झाली काय गंमत!’, ‘भटक्याचे भविष्य’, ‘जादूचा शंख’, ‘सळो की पळो’) ‘मौज’ या मातब्बर प्रकाशन संस्थेने छापली. चार पुस्तकांना त्या- त्या वर्षीचे ‘मुलांचे सवरेत्कृष्ट पुस्तक’ म्हणून राज्य आणि केंद्र सरकारची बक्षिसे मिळाली.
आकाशवाणी- पुणे केंद्रावरचे वातावरण विलक्षण सृजनशील होते. आजवर ज्यांच्या छब्या पाठय़पुस्तकाच्या धडय़ाच्या प्रारंभी पाहिल्या होत्या ती मंडळी आता प्रत्यक्षात पुढे उभी ठाकली. सुप्रसिद्ध लेखक आणि कवी यांखेरीज राजकीय नेते, पट्टीचे गायक, वादक, सिने आणि नाटय़कलाकार, क्रीडापटू अशी कितीतरी ख्यातनाम मंडळी सेन्ट्रल बिल्डिंगमध्ये आवर्जून हजेरी लावीत असत. त्यांच्या वागण्यात माहेरी वावरल्याचा मोकळेपणा असे. आचार्य अत्रे, सी. डी. देशमुख, एस. एम. जोशी, क्रिकेटमहर्षी देवधर, भीमसेन जोशी, बिसमिल्ला खान, सुंदरीवादक सिद्धराम जाधव, कुसुमाग्रज, इंदिरा संत, शांता शेळके, गंगाधर गाडगीळ, राजा परांजपे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, वसंत कानेटकर, सुलोचनाबाई.. किती नावं घ्यावीत? यापैकी बऱ्याचजणांना मी अदबीने दुरूनच नमस्कार करीत असे, तर काहींशी दोन-चार औपचारिक वार्तालाप करण्याचा योग येई. काहींशी मनमोकळ्या गप्पाही झडत असत.
नानांची खोली तीन विभागप्रमुखांत- प्रोडय़ूसर्समध्ये विभागून होती. मराठी विभागाचे प्रमुख कवी बा. भ. बोरकर, ग्रामीण विभागप्रमुख व्यंकटेश माडगूळकर आणि बालविभागप्रमुख नाना! नानांच्या टेबलासमोरची खुर्ची माझी. ‘तेथे कर माझे जुळती’ हे महान काव्य प्रसवणारे कवी आणि ‘बनगरवाडी’ साकार करणारे श्रेष्ठ लेखक यांच्या सान्निध्यात नोकरीचे आठ तास घालवायचे, ही एक पर्वणीच होती. अनेकदा बोरकरांनी आपल्या नवीन कविता आपल्या काहीशा सानुनासिक शैलीत आम्हाला म्हणून दाखविल्या आहेत. त्यांच्या जुन्या कवितांचीसुद्धा आमच्याकडून फर्माईश होत असे. ‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली भिंत’चे त्यांचे चिंब स्वर अजूनही कानांत घुमतात. बोरकरांची विनोदबुद्धी मोठी मिष्किल होती. मला मासे आवडतात हे कळल्यावर त्यांनी एकदा घरी जेवायला बोलावलं. (‘तुम्हा भटांना पॉपलेटपलीकडे मासा ठाऊक नाही.’- इति बोरकर) त्यांच्या बायकोने समुद्रातली निवडक मत्स्यरत्ने रांधून अप्रतिम जेवण केले होते. बोरकर म्हणाले, ‘‘मी गेल्यावर ‘मला दूर समुद्रात नेऊन सोडून द्या,’ असं मी लिहून ठेवलं आहे. जन्मभर मी मासे खाल्ले. आता त्यांची पाळी!’’
व्यंकटेश माडगूळकर हे काहीसे अबोल आणि मितभाषी होते. पण कधी क्वचित ते रंगात आले की गावाकडच्या ‘माणदेशी माणसां’च्या गोष्टी सांगत. शिकारीच्या पण बहारदार कथा, किस्से सांगत. जिवाचे कान करून मी ते ऐकत असे. खरं तर मी मनातून त्यांच्यावर थोडी.. थोडी का, बरीच लट्टू होते.
रेडिओमधले मंतरलेले दिवस मजेत चालले होते आणि मग अचानक ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची जाहिरात पाहण्यात आली. नाटय़प्रेमी विद्यार्थ्यांसाठी सर्वागीण शिक्षण देणारी भारतामधली ही एकमेव संस्था दिल्लीमध्ये होती. लेखन आणि दिग्दर्शन या गुणांना वाव मिळेल अशा क्षेत्रात स्वत:ला झोकून देण्याचा निर्णय मी एव्हाना घेतला होता. सिनेमाचा विचारही तेव्हा मनाला शिवला नाही. आणि टेलिव्हिजनचा अवतार अद्यापि व्हायचा होता. तेव्हा माझ्या आवडीचे ‘नाटक’ हाच एक पर्याय ठरला. मी एन.एस.डी.ला अर्ज केला. चाचणी परीक्षेसाठी दिल्लीला गेले. माझी निवड झाली आणि मी आकाशवाणीला रामराम ठोकला.
माझ्या घडणीमध्ये रेडिओमध्ये केलेल्या मुशाफिरीचे फार मोठे योगदान आहे. माझ्या अवघ्या रु. १५० पगाराचं मला कितीही वैषम्य वाटलं, तरी जी संधी, जे शिक्षण, मार्गदर्शन आणि अनुभव मला आकाशवाणीने दिला तो अमोल आहे. पुणे केंद्राने माझी भक्कम शिदोरी बांधून दिली. पुढील वाटचालीसाठी मला समृद्ध केले.
‘बालोद्यान’साठी लिहिलेल्या बालनाटकांचे आजही सतत प्रयोग होतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शाळांची प्रयोगासाठी परवानगी विचारणारी असंख्य पत्रे येतात. विनापरवानगीच्या प्रयोगांची अर्थात गणतीच नाही.
निवेदिकेच्या चाचणीसाठी मी आकाशवाणीवर धडकणे, हा खरोखर एक योग होता. कुणी तो तपकिरी लखोटा माझ्या नावाने धाडला? कुणी माझे नाव सुचविले? त्या अज्ञात इसमाचा आजपर्यंत छडा लागलेला नाही. पण देव त्याचे भले करो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balodyan remembering days in akashwani
First published on: 12-01-2014 at 01:01 IST