अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com

१९८८ साली डॉ. जेम्स हॅन्सेन यांनी ‘मानवी हस्तक्षेपामुळे जगात हवामानबदल होत आहे’ असा इशारा दिला. त्याला जगातील वैज्ञानिकांनी १९९० मध्ये मान्यता दिली. त्याच वर्षी जगभरात खासगीकरणाची लाट सुरू झाली आणि तेव्हापासून जगात वेगवान बदल होऊ लागले. पत्रकार व लेखक नाओमी क्लायन म्हणतात, ‘हा केवळ हवामानबदल नाही. हा मूल्यबदल आहे. र्सवकष बदल आहे.’ १९९० सालीच बर्लिनची भिंत पडून दोन जर्मनी एकत्र आल्यामुळे जग एकवटणाऱ्या विधायक शक्तींना ती स्फूर्तिदायक घटना वाटली. त्यामुळे इतिहासकार एरिक हॉब्जबॉम यांनी ‘एकविसाव्या शतकाचा आरंभबिंदू हा १९९१ आहे,’ असं मत तेव्हाच व्यक्त केलं होतं.

व्यक्तिवाद, उपभोक्तावाद व हवामानबदल हे हातात हात घालून आले. मागील ३० वर्षांत या तिन्ही समस्या वरचेवर उग्र होत आहेत. हवामान- बदलाच्या प्रकोपामुळे येणाऱ्या आपत्तींची तीव्रता व वारंवारिता यांत वाढ होत असून त्याच्या यातना सहन करणाऱ्या कुटुंबांची संख्या ही गुणाकाराने वाढत आहे. दुष्काळामुळे ग्रामीण विश्वाची होणारी दुर्दशा अनेक मराठी कादंबऱ्यांतून आलेली आहे. मात्र, इथे १९९० नंतर बदलत गेलेलं हवामान व जीवनमान यांचं चित्रण करणाऱ्या कादंबऱ्यांची दखल घेत आहे.

१९९८ मध्ये सदानंद देशमुख यांची ‘तहान’ ही कादंबरी आली. अवर्षणामुळे गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणं ही तशी नित्याचीच बाब. अशा काळात विहिरीत मुबलक पाणी असणारे पूर्वी गावकऱ्यांना पाणी देत. पण आता ही संधी वाटून बबन शेवाळे हा बैलगाडीनं पाणी विकू लागतो आणि घरात पैसा खेळू लागतो. हे पाहून बहीण वर्षां व त्याची आई रामकोर यांना आनंदाचं भरतं येतं. घरात अनेक नवीन वस्तू, उपकरणं येऊ लागतात. त्यांच्या सवयी बदलतात. बबनचं घर आर्थिक स्तर उंचावल्याच्या खुणा दाखवू लागतं. पाण्याच्या खेपा वाढल्याने बैलांना अतिश्रम होताहेत. दुसरीकडे गावात पाण्यावरून भांडणं वाढताहेत. मात्र बबनकडे शीतपेयाच्या बाटल्या दिसू लागतात. बबनचे वडील राघोबांना हे सारं खटकतंय. पण कुणीही त्यांना जुमानत नाहीच, वर घालूनपाडून बोलायलाही कचरत नाहीत. अशात एकाएकी पाणी आटल्यानं पैसाही थबकतो. अनेक मितींची ही ‘तहान’ आहे. खेडय़ांत व्यक्तिवादाने प्रवेश केल्याने उपभोक्तावाद फोफावला. त्यातून माणसांतील कणव, सहानुभूती लोप पावत चालली, याचं प्रत्ययकारी वर्णन यात आहे. वरचेवर दुष्काळदाह गहिरा होत असून जमिनीतील पाणी खोल खोल चालल्याने घशाला कोरड पडणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जमिनीतला आणि मनांतला जिव्हाळा आटत चालला आहे. या समस्येचे अनेक पैलू जाणिवेच्या विविध पातळ्यांवरून  देशमुख यांनी यात उलगडले आहेत.

१९९५ पासून आजवर महाराष्ट्रातील सुमारे ७५,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या निरपराध विधवांना निराधारपणाची जन्मठेप व उद्ध्वस्त जीवन जगण्याची सक्तमजुरी भोगावी लागते आहे. २०१० नंतर हवामानबदलाचे चटके अधिकाधिक तीव्र होत आहेत. मागील पाच वर्षांपासून मराठवाडय़ात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे वास्तव बातम्या व लेखांमधून दिसतं. परंतु कविता-कथा-कादंबऱ्यांतून ती वेदना थेट हृदयात घुसते आणि जनमानसाला प्रदीर्घ काळ प्रभावित करू शकते.

२०११ साली आलेल्या आनंद विंगकर यांच्या ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ या कादंबरीतील यशवंता व पार्वती आपल्या तीन कन्या उषा, आशा आणि नकोशीसह संसाराचा गाडा कसाबसा ओढत आहेत. शांत व संयमी यशवंता पिकांचा दगा, कर्जाचा सापळा व सावकरी तगादा यांत पिचून निघतो. बोकड विकावा आणि मुलींना कपडे करावे, हे त्याचं स्वप्न आहे; पण कुत्रे बोकड फस्त करतात. हाताशी आलेला शाळू अवकाळी पावसात साफ होतो. कीटकनाशक पिऊन यशवंता व पार्वती आयुष्य संपवतात. गावातल्या लोकांची व भावकीची अजिबात साथ नाही. अशा जीवघेण्या वातावरणात थोरली मुलगी धीराने शेतकामासाठी बाहेर पडते आणि तिच्या साथीला मातंग व बौद्ध वस्तीतल्या बायका येतात. विंगकरांनी संपूर्ण गावातील समाजमन तटस्थरीत्या, परंतु प्रभावीपणे दाखवले आहे.

२०१० नंतर तरुण झालेली पिढी ही रोकड देणाऱ्या पिकांकडे वळू लागली. विहिरीवर अवलंबून न राहता दाणदाण ‘बोअर’ घ्यावं अन् ऊस, द्राक्षं, केळी घेऊन घराचा कायापालट करावा, ही आस घेऊन अनेक जण कामाला लागले. २०१३ मधील नामदेव माळी यांच्या ‘खरडछाटणी’ या कादंबरीतील आवडाक्का पतीच्या पश्चात संसाराचा गाडा खेचतेय. सुदामा, संपत, तानाजी व सुगंधा ही तिची मुले. वडिलांनंतर अथक कष्टाची ती परंपरा चालू ठेवणारा तानाजी हे प्रमुख पात्र आहे. तो कर्ज काढून द्राक्षबाग तयार करतो. घरातून, नात्यागोत्यातून कोणीही साथ देत नाही. एकटी आवडाक्का खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी आहे. पहिल्या वर्षी फळ धरत नाही. दुसऱ्या वर्षी उत्तम बहराच्या आनंदात स्वप्नं रंगवत असतानाच जोरदार कीड पडते. महागडी कीटकनाशकं, सावकाराचा तगादा, अंतर वाढवत नेणारे सोयरे, हातातून निसटत चाललेलं पीक पाहत तानाजी विस्कटून जातो. सर्व बाजूंनी संकटं येत असताना आवडाक्का म्हणते, ‘असं अंग गाळून कसं चालंल लेकरा? आपुन कुणबी. आशेवर जगायचं. आजचा न्हाई, उद्याचा दिस तरी सोन्याचा उगवंल. ऊठ, बागंची खरडछाटणी हाय, ती झाली की बागंला नवी पालवी फुटती. नवा जलम असतोय बागंचा- आन् आपलाबी!’  डोंबाऱ्याच्या तारेवरील कसरतीसारखं शेतकरी कुटुंबाचं जगणं माळी यांनी उलगडून दाखवलं आहे. कीटकनाशके, द्राक्षाचे दलाल, जमिनीवर डोळा ठेवलेले सावकार, सर्व शासकीय योजनांचा पद्धतशीर लाभ उठवणारे राजकीय नेते या ग्रामीण वातावरणाच्या व्यापक कॅनव्हासवर शेतकऱ्यांचं आयुष्य त्यांनी रेखाटलं आहे.

नामदेव माळी यांचीच ‘छावणी’ (२०१४) ही कादंबरी ‘छावणीतल्या मुक्या जनावरांना आणि जनावरांतल्या निर्मळ माणसांना’ अर्पण केली आहे. गावोगावच्या गुरांच्या दुष्काळी छावण्या  कुणाकुणाला, कशी संधी मिळवून देतात? ती हस्तगत करण्यासाठीच्या चाली व त्यात सामील होण्यासाठी क्षुद्रत्वाची स्पर्धा दाखवत माळी यांनी सामाजिक विच्छेदन केलं आहे. छावणीत कुजलेल्या घाणीवर वाढलेल्या डास, चिलटं, माश्या, पिसवा, तांबवा व गोचिड जनावरांचं रक्त शोषण करतात आणि हेच ग्रामीण भागातील अस्वस्थ वर्तमानाचं प्रतीकही आहे.

कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ (२०१७) या कादंबरीत धरणामुळे जंगलानजीकच्या गावातून विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांची परवड दाखवली आहे. सभोवतालच्या निसर्गसंपन्न जंगलाला पारखे झाल्याने मुळं तुटल्याच्या वेदना घेऊन हे विस्थापित जगत आहेत. गाव सोडताना ‘वांझ म्हणून सोडून दिलेल्या म्हशीला परत आण’ हा आईचा पिच्छा ऐकून देवप्पा जंगलाकडे जातो. अतोनात पायपीट केल्यावर त्याला जिवाभावाची म्हैस दिसते; पण ती आता ओळख पार विसरून गेलीय. जंगलातल्या रानटी म्हशींच्या सोबतीनं तिचं वागणंही बदललंय. तिच्या जुन्या आठवणींनी प्रेमाचं भरतं आलेला देवप्पा जिवाच्या आकांतानं तिला परत नेण्याचे प्रयत्न करतोय. पण ती म्हैस अजिबात दाद देत नाही. आग ओकणारे लाल डोळे, कान फुटावेत असा ओरडा करत ती उलट शिंगं रोखून देवप्पावरच चालून येते आणि त्याच्याभोवती सगळ्या म्हशी रिंगण धरतात. निसर्गाच्या हद्दीला न जुमानता माणसाने आक्रमण केल्यामुळे प्राणीही बिथरून गेले आहेत. त्यातून ठिकठिकाणी माणूस व प्राणी यांच्यात संघर्ष होत आहेत. खोत यांच्या विलक्षण प्रतिभेमुळे मराठी साहित्यात प्रथमच माणूस-प्राणी-निसर्ग यांच्या संबंधांतील अकल्पित मिती समोर आल्या आहेत. या तिघांतील बदल व त्यामुळे वाढणाऱ्या जटिल समस्यांचं भयावह सूचन या दोन्ही कादंबऱ्यांतून होत आहे.

कृष्णात खोत यांच्याच ‘झडझिंबड’ (२०१२) कादंबरीत आपल्या अतिपरिचित अवर्षणमय वातावरणाच्या एकदम विरुद्ध टोक दिसतं. त्यात सलग आठ दिवस धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने कोल्हापूरजवळील एका खेडय़ातील रहिवाशांची केलेली दारुण अवस्था दाखवली आहे. यात पाऊस हेच प्रमुख पात्र आहे. हवामानबदलाच्या काळात निसर्गाचा विनाश होत असताना निसर्गाचा क्रोध म्हणजे हा पाऊस! अक्षरश: मुसळासारख्या धारांचा पाऊस पडत असताना गावात वीज नाही. घरात कोरडी जागा कमी होत चालली. पेटत्या चुली विझू लागल्या. आंबा-फणसांच्या फांद्या धुणं पिळल्यागत झाल्या. झाडं उन्मळू लागली. डोंगर खचू लागला. अशा पाऊस-वाऱ्यात विजेची तार अंगावर पडून माणसाचा कोळसा झाला. कुणी भिंत कोसळून गेलं. कुणी नदीत वाहून गेलं. भर पावसात प्रेतही जाळता येईना. शेळ्या, म्हशी मरून पडल्या. डोळ्यांदेखत केळीची बाग, उसाचं शिवार पूर्ण पाण्याखाली जातं. हानीचा विचार करायलाही कुणाला फुरसत नाही. पावसाचं ते महाभयंकर रौद्र रूप पाहून खेडय़ातली माणसं पावसालाच शिव्या देत सुटतात. अशा भेसूर पावसात बाळंतिणीच्या कळा वाढल्यानं बैलगाडी निघते. पण पुढं जाता येत नाही. इकडे कळा वाढत जातात. वाटेतच पांघरूण झाकून ती बाळंतीण होते. या अशा प्रलयंकारी वातावरणात जात-धर्म, वाद-तंटे विसरून सगळी माणसं एकमेकांना धरून असतात. स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत करणारे हमीद, नाना, शाम यांचा एकमेकांना व गावकऱ्यांना आधार आहे. तीच यांची क्रू र अंधार सहन करण्याची ताकद व त्यातून पार पडण्याची आशा आहे. खोत यांनी या पावसाचं व त्या तडाख्यात सापडलेल्या गावकऱ्यांच्या जीवघेण्या प्रयत्नांचं वर्णन विलक्षण सामर्थ्यांनं केलं आहे. वाचकाला पिळवटून टाकणारे, सुन्न करणारे व अंतर्मुख करणारे अनेक प्रसंग ‘झडझिंबड’मध्ये असूनही ही कादंबरी कुठेही भावनेच्या आहारी जात नाही.

वरचेवर ग्रामीण भागातील सामाजिक वीण कमालीची विस्कटून जात आहे. जातीच्या गटा-तटांतून गावे शतखंडित होत आहेत. सर्व काही विसरून एकमेकांसाठी धावून जाणं आता दुर्मीळ झालं आहे. परस्परसंवाद जवळपास तुटला आहे. आधीच लहरी हवामान व त्यात बदलणारं बाह्य़ जग यामुळे खेडी आतून धुमसत आहेत, पोखरत आहेत. हा असह्य़ ताण ग्रामीण जीवनात स्पष्टपणे जाणवतो. त्यापासून पळ काढण्यासाठी अनेक तरुण स्वत:ला कुठल्या तरी जल्लोषात गुंतवून घेतात किंवा चलत्ध्वनीवरील चाळ्यांत मग्न होतात. काही वर्षांपूर्वी दृढ सामाजिक बंधामुळे रसरसलेल्या गावांचा चेहरा आता विद्रूप होत आहे. बहुसंख्यांना खेडं व शेतीपासून सुटका करून घ्यायची आहे. अशा सामाजिक पर्यावरणात वैयक्तिक दु:ख व्यक्त करण्याची जागा नसल्यामुळे कित्येक आत्महत्या होत आहेत. हवामानबदलाच्या यातना सहन करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुण पिढीने स्वत:ला विविध माध्यमांतून अभिव्यक्त करायचं ठरवल्यास त्यातून नवनिर्मितीच्या अनेक दिशा सापडू शकतील. कलेचं मर्मच ते आहे. यादृष्टीने सभोवताल पाहता येईल. २०१२ पासून खरिपात कसाबसा पाऊस पडतो. मग ऐन काढणीच्या वेळी जोरदार अवकाळी पावसानं पिकं झोपवतो. त्यातून उठून रब्बीची पेरणी केली तर पीक आल्यावर पुन्हा काढताना फेब्रुवारी-मार्चमध्ये गारांसह जबर पाऊस.. अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. वडिलांच्या आत्महत्येनंतर उमेदीनं शेती कसणारा मुलगाही पाच वर्षांत तोच मार्ग पत्करतो. (दादाराव गोविंद शिंदे : २९- १०-२०१० आणि संदीप दादाराव शिंदे : १५ मार्च २०१५. पाटोदा, जि. बीड) मोठय़ा भावाने केलेल्या आत्महत्येतून सावरत शेती सांभाळणारा धाकटाही त्याच रस्त्यानं जातो. (संभाजी भागवत शिंदे : ५- १०- २०१० आणि सुग्रीव भागवत शिंदे : ११- ६- २०१४. गाव- पारगाव घुमरा, जि. बीड) पतीच्या आत्महत्येनंतर आलेल्या भयाण तणावामुळे मूकबधिर मुलगी होते. (अर्जुन रामभाऊ दिडूळ, पाटोदा)

२०१५ नंतर तर हवामानाचा कहर सुरू झाला आहे. उन्हाळ्यात तापमान सर्रास ४७-४८० सेल्सियसचा पारा गाठतं. शेतातील मजुरांना कामं टाळता येत नाहीत. पारनेर तालुक्यातील शेतमजूर संगीताबाई फटांगरे (२८ वर्षे) नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेल्या आणि  एकाएकी चक्कर येऊन पडल्या. त्यांना संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करताना त्यांच्या शरीराचं तापमान होतं ११०० फॅरेनहिट (४३.३० सेल्सियस)! सूर्याघात असे कित्येक बळी घेत आहे. तर हिवाळ्यात २० सेल्सियसची शीतलहर कशी सहन करायची, ही समस्या असणारे लोकही कमी नाहीत. कुठे अजिबात न येणारा, तर कुठे अजिबात न थांबणारा पाऊस हा पक्का वैरी झालाय. क्वचित कधीतरी येणारा पूर आता नेहमीच येतो. एकाच जिल्ह्य़ात महापूर व अवर्षण दोन्ही दिसू लागलं आहे. २०१५ च्या खरिपात मराठवाडय़ात पेरणीच करता आली नाही असा पाऊस गायब झाला. असं आक्रीत पूर्वी कधी घडल्याचं मराठवाडय़ातील नव्वदीतील वयोवृद्धांनाही आठवत नाही. सणासुदीच्या काळात सर्वत्र उदासी दाटून होती. गावात इतर काही कामं नाहीत. दुकानांत चिटपाखरू दिसत नाही. सगळं कसं ठप्प! सगळेच कर्जबाजारी. कुणी कुणाला काय सांगावं अन् मागावं? (अन् आता २०२०! कैक वर्षांनी वेळेवर अप्रतिम पाऊस. पिकं जबरदस्त. सप्टेंबरमध्ये दणकून अतिवृष्टी. ढगफुटी ! मराठवाडय़ातील सगळी पिकं पाण्यात!)

२०१५ च्या जूनमध्ये वेळेवर पाऊस आला. लातूर जिल्ह्य़ातील भोकरंबा गावच्या हणमंत भिसेला काय करू अन् काय नाही असं झालं. चार एकरांपैकी एक एकर मूग, एक एकर उडीद, दोनवर सोयाबीन लावून मोकळा झाला. आणि पाऊस गायब. उगवलेलं वाळून चाललं. दुबार पेरणी करावी लागणार. आधीचे ५० हजार थकलेत. सावकाराकडं जावं कसं? हणमंतच्या डोक्याचा भुगा. बोअरच घ्यावं. मग बटन दाबलं की पाइपानं धडाधडा पाणी. कल्पनेनंच हणमंत हरखून गेला. पैसा? बोअरवाला म्हणाला, ‘जमीन लिहून दे. बोअर मारून पंप, पाइप बसवून देतो. पीक आल्यावर फेड.’ मशीन आलं. ‘घर्र..घर्र’ आवाज शिवारात घुमू लागला. सगळं गाव जमा झालं. हणमंतच्या धैर्याला दाद देऊ लागलं. शंभर फूट. दोनशे फूट. नुसता धुराळा. ‘लागंल बरं आता. आता दगड येगळा लागलाय. भुसभुस आत चाललं की पानी लागतंय बग.’ तीनशे फूट. इकडं फुटाचा रुपया वाढू लागला. तीनशे तीस फुटाला झरा लागला. खाली गेल्यावर मोठं पाणी लागलं तर? नाही तर आहे ते पाणी गेलं तर? चारशेला थांबू. ‘एक इंच पाणी हाय. पुन्हा वाढंल. ऊस येतंय बग.’ एकामागून एक सल्ले येत होते. हणमंतनं सोयाबीन लावून उसाचा विचार चालू केला. महिन्याच्या आत पंपानं उचक्या देत देत पाणी थांबवलं. पावसाचा पत्ताच नाही. ‘फेडायचं कसं?’ हैराण, उद्विग्न हणमंतनं दोर घेऊन झाडाच्या साक्षीनं शेवटचे आचके दिले. नवऱ्याची कुतरओढ व दैना बघणाऱ्या मीनाबाईनं कोरडय़ा विहिरीत आयुष्य संपवलं. घरी चौदा वर्षांची मुलगी व बारा वर्षांचा मुलगा मागे उरले.

असं हे वर्तमानातील बहुपेडी वास्तव उमजून दाखवत भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या कादंबऱ्या मराठीत येऊ शकतात. इंग्रजीमधून हवामान- बदलाचा वेध घेत ‘हवामान कादंबऱ्या’ (क्लायमेट फिक्शन्स) आल्या. त्यातल्या काही भविष्यकाळातील भयप्रद चित्र रंगवणाऱ्या आहेत. आपल्याकडील अनेक कहाण्यांत मोठय़ा कादंबऱ्यांची बीजं दडलेली आहेत. ठिकठिकाणच्या कित्येक करुणोपनिषदांमध्ये अभिजात साहित्याचं द्रव्य आहे. त्यातून सघन साहित्यनिर्मिती व्हावी, त्याचा सर्वत्र प्रभाव पडावा. आयुष्याशी झगडत ‘जीवनाशी पैजा’ घेणाऱ्या असंख्य लोकांच्या संघर्षांची गावोगावी चर्चा होऊन सघन कृतीची पेरणी व्हावी, त्यातून पुन्हा एकदा ‘अमृताशी पैंजा’ घेता याव्यात, हीच छोटीसी आशा!