‘बो लावे ते आम्ही..’ हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पेडीतला नवा कवितासंग्रह आहे. त्यांची एक रीत अशी आहे की, संग्रहातील कवितांचे विभाग ते स्वत:च कल्पितात. या संग्रहात पाच विभाग कल्पिले आहेत. अशाने कवी आपल्या वाचकांची सोय करतोच, शिवाय एक माला कवितांच्या गुंफणीतून काही दीर्घ भावना प्रकट करू बघतो तो हेतू साध्यही होतो. कविता हा चिंतनाचा चिरेबंद आविष्कार असतो. तो आपल्या वाचकांना नीटपणे कळावा ही भावना कवीच्या कवितेच्या पुस्तकामागे असल्याचे स्पष्ट होते.
भारतीय संस्कृती कृषिवल संस्कृती आहे. या संस्कृतीच्या जगण्याचे मुख्य साधन शेती आहे. कालौघात अनेक विदेशी बादशहांनी व व्यापारी प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांनी या कृषीसंस्कृतीला खिंडार पाडले आणि या संस्कृतीच्या जीवावर जगत तिला उद्ध्वस्त केले. मध्ययुगाचा इतिहास सांगतो की, या संस्कृतीमधून खूप काही शोषून घेतले व ती घेण्याची क्रिया परंपरेने तशीच पुढे चालू राहिल्याने समस्या निर्माण झाल्या. जागतिकीकरण वगैरेचा सबंध हा आत्ताचा. सर्वच मौजमजेत जगत असतील तर कुणब्याच्या पिढीला मौजमजेत जगण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. श्रीकांत देशमुखांच्या कवितेची प्रेरणा या मोहात, पडझडीच्या काळात जिवट तग धरून राहणाऱ्या प्रवृत्तीची आहे. कवी म्हणजे आतले सांगू बघतोय, परंतु तो अंत:स्वर पकडण्याची व्यवस्था आपल्या जगण्याच्या संस्कृतीमध्ये नाही. त्यामुळे आतली प्राणप्रतिष्ठा न झाल्याने जुन्या मंदिराचे भग्नावशेष नवीन मंदिरात उजाडपणे, हताशवत दिसतात. बोलावे ते तुम्हीच आम्ही काय? अशी असहाय अगतिकता कृषिसंस्कृतीच्या त्रात्याची झालेली आहे. कवीची कविता वेगवेगळी रूपे पालटून हेच सांगत आहे.
वस्तूच्या बदल्यात वस्तू देणाऱ्या व घेणाऱ्या संस्कृतीला वस्तुमूल्य ही संकल्पना मान्य झाली नाही; परिणामी, वस्तूचे मूल्य ठरविण्याचा, त्याच्याच वस्तूचा अधिकार त्याच्याकडे राहिला नाही. कारखानदार आपल्या वस्तूचे मूल्य ठरवून ती वस्तू बाजारात आणतो. सर्वाना श्रममूल्य देऊन स्वत:चा अमाप फायदा कारखानदार करून घेतो. शेतकऱ्याचे काय? शेतमाल तो निर्माण करतो ते कधी बाजारात न्यायचे, त्याची किंमत काय असेल, तो कुठे पोचवायचा यातले त्याच्या हाती काहीच नसते. म्हणून जगाला पोसणारी कृषिसंस्कृतीची अवस्था बिकट झाली. जो देश शेतीनिष्ठ आहे, त्याचे दरडोई उत्पन्न पाहा. ही सल कवीला आहे. कर्जवसुलीसाठी बँकेचा अधिकारी येणार आहे, हा सुगावा लागताच सारा गाव शेतात जातो. गाावाला जप्ती टाळायची असते. (‘एका गावाची गोष्ट’) हजारो प्रश्न आहेत. त्या प्रश्नांपासून तो पळ काढत नाही. पण त्याला पळवण्याची, त्याच्या हक्कापासून हुसकावण्याची व्यवस्था उदारीकरण आणि खुलेपणा म्हणून स्वीकारली की त्याच्या धान्याच्या थप्पीत त्याला हातपाय न हालवता मरावे लागते. जगाला जवळ जाण्याची (जागतिकीकरण) प्रक्रिया भयानक उग्र आहे. मुलं सोडून जगण्याची आशा धरली म्हणजे सर्वनाश असतो. हे कवी विषधारी व नेमक्या प्रतिमेत प्रकट करतो.
‘‘आला धावत एचआयव्हीचा ट्रक
तिच्या नकळत तिला कवटाळत
गर्भातला कोवळा अंकुरही
खुडला नखानं जागच्या जागी’’ (नुसता आंबट वास)
सारे कळत असूनही अंगावर अरिष्टं ओढून घेण्याची प्रवृत्ती उद्याची रम्य पहाटसुद्धा आपण जाळत सुटलो आहोत. कवीने हा संग्रह ‘बळिवंत’ संग्रहापेक्षा वेगळी थीम घेऊन वाचकांच्या हाती सुपूर्द केला आहे. ‘बळिवंत’ मध्ये शेतकऱ्याच्या भौतिक दु:खाला पारावार राहिला नाही, हे कोरडेपणाने दाखविले होते तर प्रस्तुत संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष दिलेले दिसते. जन्मजात सोशिकता हाच बळिवंताचा पिंडधर्म आहे, हे कवीला सांगावयाचे आहे.
जन्म, मरण, अब्रू, बाप, पाटील, झाड, डुक्कर, मोर, समुद्र, मुंबई, अडत, अडत्या, गाडय़ा, समाधी या गोष्टी कवीच्या कथनपर कवितेत येतात. माती, रेत वीर्य यांद्वारा विश्वाच्या पोकळीमध्ये अविरत नवसर्जन घडत असते. ‘साक्षात साकार लिंगवैभवी सांड, सांडाच्या वीर्यानंच पोसलीय काळीसावली माती सालोसाल.’ यामधील माती आणि सांडवीर्य ही मस्तीची प्रतीकं आहेत. ही मस्ती सृजनाचा कोंभ धरते. परंतु कवीला आता दु:ख आहे. तरणेबांड खोडाचे लिंग-वैभव ठेचले जाते म्हणजे पुन: सर्जनच नष्ट करणे! कसलेच क्षार, पालाश स्फुरद, नत्र उत्सर्जित न करणारे यंत्र मशागत करत असल्याने शेतकऱ्याला आता बरकत नसल्याची खंतही कवी व्यक्त करतो.
‘उजळमाथ्यानं भूमिपुत्र’ या भागात कवीला भविष्याविषयीचं दु:स्वप्न पडतं. उंदरा-कोल्ह्यानं हंगाम नष्ट करू नये म्हणून शेतकरी डोळय़ांत तेल घालून पहारा करतो. पण त्याची पुढची पिढी मातीपासून दूर होत आहे, हे सूचकपणे आविष्कृत केले आहे.
परंपरेचे संचित आणि समकालातील भिगुलवाणी अवस्था अशा कात्रीत कवीची संवेदना दिसते. ६८ कवितांचा हा सचिंत संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे. असे असले तरी वाङ्मय हे कलाभिसरण होत असेल तर झालेच पाहिजे. केवळ रूक्ष, नकारात्म अभिव्यक्तीला कवटाळून बसण्यात बऱ्याच चांगल्या शक्यतांना मुकावे लागते. कवितेची बांधणीच मुळी कलात्म असेल तर लोभस शब्दकळकडे पाहिले पाहिजे.
‘बोलावें ते आम्ही..’- श्रीकांत देशमुख,
ग्रंथाली प्रकाशन, पृ. १५३,
किंमत- १८० रु.
