‘पर्सनल इज पोलिटिकल’ असं जे म्हटलं जातं, ते ‘मुक्त विहंग: चीनच्या तीन कन्या’ (मूळ इंग्रजी पुस्तक – ‘वाइल्ड स्वान्स : थ्री डॉटर्स ऑफ चायना’)  या पुस्तकात आपल्याला दिसतं. एक स्त्री, तिची मुलगी आणि तिची नात या तीन पिढय़ांच्या प्रतिनिधींची ही कहाणी म्हणजे तेवढय़ा वर्षांचा चीनचा राजकीय, सामाजिक इतिहासच आहे, पण तो इतिहासाच्या पटलावर कधीही न दिसणारा. तिथे म्हणजे इतिहासाच्या पटलावर कोणते राज्यकर्ते आले, गेले, त्यांनी काय केलं याची जंत्री मिळेल. पण त्या सगळ्या काळात सामान्य माणसाचं काय झालं, त्यानं कोणती धग सोसली आणि ती तरीही जीवनाकडे बघण्याचा आशावादी, सौंदर्यवादी दृष्टिकोन कसा सोडला नाही, नवनिर्मितीची आपली आस कशी तेवत ठेवली याबद्दल हे पुस्तक सांगतं. गेल्या काही वर्षांत चीमनधल्या जुलमी राजवटीच्या अमानुष छळाच्या, अत्याचारांच्या कहाण्या सांगणारी इतरही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यातली काही चिनी माणसांनीच लिहिली आहेत. पण त्या सगळ्यांपेक्षा या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे हे आई, मुलगी आणि नात अशा एकाच घरातल्या तीन पिढय़ांची कहाणी सांगतं. मुख्य म्हणजे या पुस्तकावर चीनमध्ये बंदी आहे. चीनमध्ये त्या काळात असलेल्या हजारो कानकुबाईन्सपैकी एकीच्या आयुष्यापासून (कानकुबाईन्स-अंगवस्त्र) सुरू झालेलं हे पुस्तक तिच्याच इंग्लडमध्ये राहणाऱ्या, स्वतंत्र, निर्भय आयुष्य जगणाऱ्या नातीच्या आयुष्यापाशी येऊन संपतं. या तीन पिढय़ांच्या दरम्यान हेलकावत राहिलेली अनेक आयुष्यं या पुस्तकातून भेटत राहतात, राजसत्तेचा, तिच्याशी संबंधित सगळ्या यंत्रणेचा जुलुम- जबरदस्ती, त्यानंतर माओच्या लहरीनुसार बदलत गेलेलं सगळ्या देशाचं जगणं, सत्तावर्तुळातल्या त्याच्यानंतरच्या उतरंडीतल्या लोकांचं वागणं, या सगळ्यामध्ये दडपली गेलेली चीनची जनता हे सगळं जसजसं आपण वाचत जातो तसतसा एक मोठा आलेख आपल्यासमोर उभा रहात जातो. त्याच्या पाश्र्वभूमीवर आपल्याकडच्या लोकशाहीची किंमतही मनात ठसत जाते.
दर बदलत्या राजवटीमध्ये चीनमध्ये थोडय़ाफार फरकाने सामान्य माणसाच्या, स्त्रियांच्या वाटय़ाला चिरडलं जाण्याखेरीज दुसरं काहीच आलेलं नाही, हे आपल्या अगदी शेजारी असलेल्या चीनचं दाहक वास्तव आपल्या मनावर ओरखडे उमटवत राहतं. पण त्याबरोबरच चिनी समाजाची अशी अनेक अंग, वेगवेगळ्या सामाजिक प्रथा-कुप्रथा, चालीरीती, मिथकं या सगळ्याचं दर्शन या पुस्तकातून घडतं.
‘मुक्त विहंग : चीनच्या तीन कन्या’ – युंग चँग, अनुवाद – डॉ. विजया बापट, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे- ६१२, मूल्य- ६०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व दखल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review
First published on: 12-01-2014 at 01:02 IST