बाळकृष्ण कवठेकर  

जागतिक कीर्तीचे मराठी कवी व लेखक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या इतस्तत: विखुरलेल्या, पुस्तकरूपाने वाचकांसमोर न आलेल्या लेखनाचा प्रयत्नपूर्वक शोध घेऊन ते ‘साहित्य आणि अस्तित्वभान भाग २’ या ग्रंथातून अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबद्दल विख्यात लेखक रंगनाथ पठारे व शब्दालय प्रकाशन यांचे आभार मानले पाहिजेत. ६५३ पानांच्या या ग्रंथात पाच भाग असून त्याशिवाय दोन टिपणे व परिशिष्टात तीन लेखही देण्यात आलेले आहेत. असा हा ग्रंथ दिलीप चित्रे यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांना महत्त्वाचा व अतिशय उपयुक्त ठरणारा असा झालेला आहे, हे प्रथमच नोंदवणे योग्य ठरेल. ‘कवितेविषयी’ या पहिल्याच भागात कवितेवरील वीस लेख, ‘साहित्य आणि समाज’ या दुसऱ्या भागात त्यासंबंधीचे दहा लेख, ‘मूल्यसंदर्भ’ या तिसऱ्या भागात मूल्यचर्चा करणारे सात लेख, ‘समकालीन आणि बाकीचे सगळे’ या चौथ्या भागात महत्त्वाच्या चित्रे यांना समकालीन व महत्त्वाच्या वाटणाऱ्या लेखकांविषयीचे बारा लेख, पाचव्या भागात चित्रे यांचा महत्त्वाचा लेख, समीक्षकांनी घेतलेल्या दहा मुलाखती व उर्वरित दोन भागांत पाच लेख असा भरभक्कम ऐवज या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे. एवढे जरी नोंदवले तरी या ग्रंथाचे माहात्म्य जाणकारांच्या सहजच लक्षात येईल.

या लेखांपैकी बहुतेक लेख हे काही ना काही निमित्ताने लिहिलेले आहेत. काही प्रस्तावना म्हणून, काही प्रकाशन समारंभातील भाषण म्हणून, काही चर्चासत्रातील उद्घाटनपर भाषण म्हणून. अशा वेळी उपचार म्हणून काही स्तुतिपर वाक्ये उच्चारली जाणे स्वाभाविकच असते. अशा वाक्यांतील मते कितपत गंभीरपणे विचारात घ्यायची, हा एक प्रश्नच असतो. प्रमाण फार नसले तरी अशी काही विधाने याही लेखनात आहेतच. संकलक, संपादक यांनी या बाबतीत आपला संपादकीय अधिकार वापरणे उचित ठरले असते. अशी काही उदाहरणे देता आली असती, पण मग शब्दमर्यादा पाळणे अवघड झाले असते.

हा ग्रंथ वाचताना प्रथमच जाणवणारी महत्त्वाची उणीव म्हणजे सलग, सुसंगत अशा मूल्यदृष्टीचा अभाव ही होय. मग जीवनाविषयीची असो की साहित्याविषयी असो. विशेषत: ‘समकालीन आणि बाकीचे सगळे’ हा भाग वाचताना ही उणीव अधिकच तीव्रतेने जाणवते. अन्यथा देशीवादी नेमाडे आणि अरुण कोलटकर यांच्याविषयीचे लेख लिहिताना सारख्याच गुणवत्तेचे वर्णन करणाऱ्या विशेषणांची उधळण झाली नसती! ‘साहित्य आणि समाज’ या विभागातही असेच झाल्याचे जाणवते.

चित्रे वाङ्मयीन गुणवत्तेला महत्त्व देतात की सामाजिकतेला? असा संभ्रम निर्माण करणारी काही विधाने या विभागातील लेखनात येतात. नेमाडे, ढसाळ आणि अरुण कोलटकर कोणत्या मूल्यसादृश्यामुळे चित्र्यांना स्तुत्य वाटतात, असा प्रश्न मनात उभा राहतो. तीच बाब बाबूराव बागुल, भाऊ पाध्ये व विलास सारंग यांच्याविषयीच्या लेखाची. मूल्यदृष्टय़ा या तिघांना एका रांगेत बसवणे तर्कदुष्टपणाचेच होणार नाही का?

बागुलांचे मूल्यनिष्ठ जीवनचित्रण, ‘वासूनाका’मधील जीवनदर्शन यांत कोणते साम्य? आणि या दोघांबरोबर विलास सारंग? सगळेच मूल्यसंभ्रम निर्माण करणारे की मूल्यसंभ्रमातूनच निर्माण झालेले? ‘वासूनाका’च्या निमित्ताने अत्रे यांच्यावर केलेली टीका योग्यच. पण ती त्याच वेळी केली गेली असती, तर ती अधिकच महत्त्वाची वाटली असती. ‘देर आये लेकिन दुरुस्त आये,’ असे फार तर तिच्याविषयी म्हणता येईल. त्या काळातील साहित्य विचारातील प्राथमिकता आणि हळवेपणा यांची होणारी वेदनादायक जाणीव त्यामुळे लक्षात येते, हे श्रेय मात्र चित्रे यांच्या या लेखाला द्यावे लागेल. तेही स्तुत्यच!

करंदीकरांविषयीचे लेखन व्यक्ती म्हणून वाटणाऱ्या आदर व आपुलकीपोटी तर झालेले नाही ना? अशीही शंका निर्माण करते. ‘मराठीचे भवितव्य’ हा लेखही या संभ्रमाला पुष्टी देणाराच वाटतो. चित्रे मराठी भाषेविषयी लिहीत आहेत की मराठी साहित्याविषयी? चित्रे यांनी या संदर्भात ‘जागतिक किंवा बहिर्गामी धोरणाचा’ विचार या संदर्भात मांडलेला आहे, म्हणून हा प्रश्न निर्माण होतो.

चित्रे यांचे बहिर्गामी धोरण म्हणजे मराठी साहित्यकृतीचे इंग्रजीत अनुवाद करणे. चित्रे यांच्या मते, विश्वव्यापी माहितीजालात मराठी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती यांना इंग्रजी अनुवादाद्वारे प्रभावी स्थान मिळवून देणे ही आपणा सर्वाचीच जबाबदारी आहे. यावर ‘कित्ती सोपे’ असा उद्गार काढण्यापलीकडे आपण काय करू शकतो? असो!

असे आणखीही बरेच दाखवता येईल. पण असे असले तरी चित्रेंसारख्या श्रेष्ठ साहित्यिकाचे ग्रंथबद्ध न झालेले साहित्य परिश्रमपूर्वक मिळवून ते ग्रंथरूपाने वाचकांना उपलब्ध करून देणे, हे मोठेच वाङ्मयीन, सांस्कृतिक कार्य आहे. ते केल्याबद्दल प्रकाशक व त्यांचे साहाय्यक अभिनंदनास निश्चितपणे पात्र आहेत.

‘साहित्य आणि अस्तित्वभान- भाग २’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– दिलीप पुरुषोत्तम चित्रे,  शब्दालय प्रकाशन, पाने- ६५३, मूल्य १००० रुपये.