उंट म्हटलं की शाळेत असताना परीक्षेतला तो हमखास येणारा प्रश्न आठवतो- ‘उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात?’ वाळवंटाच्या खडतर आणि रूक्ष हवामानात उंट हा माणसांचा एक मोठा आधारच नाही तर त्यांचा मित्र, कुटुंबातील एक सदस्य आणि त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आब. काही वर्षांपूर्वी  संयुक्त अरब अमिरातींमध्ये तेलाचा शोध लागला आणि वैभव, सुबत्ता, सुशासन याच्या बरोबरीने सगळ्या सुखसोयीसुद्धा इथे आल्या. त्याच काळात उंटाची जागाही रवश् ने घेतली. पण अरेबिक माणसांच्या मनातील उंटाची जागा मात्र आजवर कायम आहे. आजही उंटाला इथे खूप महत्त्व आहे.
शहरांच्या गगनचुंबी इमारतीत आणि रोजच्या धकाधुकीच्या जीवनात जरी आज उंट दिसले नाहीत तरी शहराबाहेर हायवेवर कधी रस्त्याच्या बाजूला वाळूत फिरताना तर कधी निर्वकिार मंदपणे रस्ता ओलांडताना दिसतात. किंबहुना, इथे ड्रायिव्हग स्कूल्समध्ये ‘उंटाबद्दल खास काळजी घ्या,’ असा इशारा आवर्जून दिला जातो. एक तर उंट खूप मोठा प्राणी आहे, त्याला विशेष वाहतुकीची भीती नसते, तो जर चुकून गाडीला धडकून पडला तर गाडीचं काही खरं नाही आणि त्याहून जर अवकृपेने त्याला काही इजा-दुखापत झाली तर मग तुमचं मात्र काही खरं नाही !
परदेशात राहायला गेल्यानंतर तिथल्या स्थानिक संस्कृतीचे विविध कंगोरे बारकाईने जोखण्याचा, त्याच सहभागी होण्याचा प्रवास आजही सुरू आहे. याच प्रवासात एक अत्यंत वैशिष्टय़पूर्ण गोष्ट मला समजली ती होती ‘अल दाफ्रा फेस्टिव्हल’बद्दल. तसे प्राणिप्रेम आपल्याला नवीन नाही. नागपंचमी, पोळा असे कित्येक सण आपण खास प्राण्यांच्या नावाने साजरे करतो. पण ‘अल दाफ्रा फेस्टिव्हल’बद्दलची माहिती आणि वर्णन ऐकून मनातल्या आश्चर्याची जागा कुतूहलाने घेतली आणि बघू तरी काय आहे, असा विचार करून तिथे जायचा प्लॅन केला.
डिसेंबरमध्ये, यूएइची राजधानी अबू-धाबीच्या पश्चिमेच्या दिशेला असलेल्या अल् घरबिया नावाच्या गावात १५-२० दिवस हा सोहळा चालतो. आम्ही शहरापासून लांब, सुमारे दोन तास विशेष रहदारी नसलेल्या रस्त्यावर ड्राइव्ह करून थकलो.  कित्येक मैल आजूबाजूला अथांग वाळवंट, फक्त रस्त्याच्या दुतर्फा ठिबकसिंचनाने जपलेली खजुराची झाडे. आपण रस्ता चुकलो की काय असे वाटतच होते, इतक्यात एक आलिशान प्रवेशद्वार दिसले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकत प्रवेश केला तो एका वेगळ्याच दुनियेत. ८० टक्के परदेशी वावरणाऱ्या शहरातून इथे आल्यावर १०० टक्के अरेबिक वातावरण होते. छोटय़ा छोटय़ा वातानुकूलित तंबूतून मध, सुंठ, अरेबिक वस्तू, कपडे, अत्तर, हीना इत्यादीचे स्टॉल लावले होते, सगळीकडे अरबी पेहेराव घातलेले लोक, जागोजागी त्यांनी आग्रहाने दिलेली त्यांची कॉफी आणि खजूर, अरेबिक जत्राच म्हणा ना. कुठे घोडय़ांची रेस चालू होती, कुठे वाळवंटातल्या सालुकी कुत्र्यांची रेस, तर काही हौशी आपले ससाणे दाखवण्यात मग्न होते. मात्र या सगळ्या समारंभाचे उत्सवमूर्ती होते ते उंट. फक्त यूएइ मधलेच नाहीत तर कतार, सौदी, येमेन, बहारीन अशा  कित्येक देशातून १५ हजार मालकांचे तब्बल २५ हजार उंट इथे या समारंभासाठी खास विमानाने आणले होते. उंटप्रेमींसाठी जणू एक सोहळा होता तो!
एके ठिकाणी अधिक दूध देणाऱ्या उंटिणींचा सत्कार चालू होता अन् एकीकडे उंटांची शर्यत चालू होती. दुसरीकडे उंटांचा बाजार होता, वेगवेगळ्या जातीच्या उंटांचा सौदा चालू होता. उंट दिसायला तसा गरीब असला तरी तो विकत घ्यायला मात्र बरीच किंमत मोजावी लागते. एका आयोजकाने सांगितलेल्या माहितीनुसार एखादा जातिवंत उंट १० मिलियन दिरहाममध्ये (१७ करोड रुपये) आरामात विकला जाऊ शकतो. आम्ही ही सगळी मजा बघत बघत पुढे जात होतो ती सगळ्यात महत्त्वाची आणि अनोखी सौंदर्य स्पर्धा बघायला. होय, उंटांची सौंदर्य स्पर्धा- ‘अल् मझायना’. एका मोठय़ा ग्राऊंडवर हजारो उंट मान वर करून मिरवत होते. कोणाच्या पाठीवर तर कोणाच्या गळ्यात दागिने घातलेले. काही नाजूक सजलेले तर काही भडक शाल पांघरलेले, काहींनी तर सुरेख मुकुटसुद्धा घातले होते. तिथे प्रेक्षकांसाठी छान सोय होती. तिथल्या छोटय़ा पोस्रेलिनच्या कपातून अरेबिक कॉफी आणि  दोन खजूर तोंडात टाकले. हजारो उंट एकाच ठिकाणी असल्याची एक वेगळीच मजा अनुभवत आणि गोठय़ासारखा वास घेत विसावलो. पण मनातल्या सर्वसामान्य सौंदर्याच्या कल्पना उंटाला लागू होईनात, म्हणून तिथल्या स्वयंसेवकाला मी विचारले, ‘‘उंटांच्या सौंदर्याचे निकष काय आहेत?’’ तेव्हा त्याने आनंदाने सगळी माहिती दिली. हे सगळे उंट जातिवंत असायला हवेत, म्हणजे त्यांच्या आई-वडिलांच्या नावाची, आणि त्या आधीच्या पिढय़ांचीही नोंद असावी लागते. भाग घेणाऱ्या उंटाचे वय साधारण ३ ते ५ वष्रे असते. हे उंट प्रामुख्याने याच कारणासाठी प्रशिक्षित केले जातात. शर्यतीचे उंट वेगळे असतात. सौंदर्याचे उपासक असलेल्या या उंटाची विशेष काळजी घेत त्यांना वाढवलं जातं. किंबहुना ‘मिस वर्ल्ड’ अथवा ‘मिस युनिव्हर्स’सारख्या स्पध्रेत सहभागी होणाऱ्या सौंदर्यवतींची ज्या पद्धतीने जोपासना होते, अगदी त्याच थाटात या उंटांची बडदास्त ठेवली जाते. यांना कधीच कोणतेही काम दिले जात नाही. या उंटांना कधी वजनही उचलायला लागत नाही. प्रत्येक उंटाचे नीट परीक्षण केले जाते. उंट जितका अंगाने मोठा, तितके अधिक चांगले. डोकं मोठं, कान ताठ, लांब मान आणि नाकाचा आकार आकर्षक असावा. पाय सरळ व मजबूत, पाठीवरच्या बाकाचा आकार, छातीची रुंदी, त्यांच्या कातडीचा रंग आणि चमक.. अशा कित्येक निकषांमधून उत्तीर्ण होऊन एकाला सर्वात सुंदर उंट असल्याचा किताब मिळतो आणि त्याच्या मालकासाठी लाखो दिरहामचे बक्षीस दिले जाते.
तिथे आजूबाजूला उंटांची फौजच होती. वेगवेगळ्या कामात गुंतलेले उंट आणि सौंदर्यस्पध्रेत सहभागी झालेले उंट.. यांच्यातील फरक निश्चितच लक्षात येण्याजोगा होता.  जेव्हा नेमकी माहिती समजून घेतली तेव्हा हा उंटाउंटातील फरक अधिक स्पष्ट होत गेला. जिथे प्रत्यक्ष सौंदर्यस्पर्धा सुरू होती, तिथे असलेले उंट बघताना तर खूपच गंमत वाटली. एरवी आजूबाजूने एखादा उंट गेला तरी सावधपणे चालणारी माणसं चक्क उंटांच्या जवळ जाऊन त्यांना निरखण्याचा प्रयत्न करत होती..  काहींना उंटासोबत फोटो काढण्याचा मोहही आवरला नाही..
या उंटांचे मालकही त्यांचे खूप लाड करतात. उंटाला उत्तम दर्जाचा चारा दिला जातो, पाइनच्या शाम्पूने धुतले जाते आणि स्पध्रेच्या आदल्या दिवशी, दूध व मध यांची मेजवानी दिली जाते. स्पध्रेच्या दिवशी, हेअर जेल लावून त्याचे केस सेट केले जातात, त्याला सोनेरी-चंदेरी पोशाख घातला जातो आणि विविध साजशृंगाराने उंटाला तयार केले जाते आणि मग वाळवंटातील जहाज बनते वाळवंटाची सुंदरी..
मनुष्यासह विविध प्राणिमात्रांची शरीररचना, व्यक्तित्व, शैली वेगळी.. परिभाषाही वेगळी. पण माझ्या घरातील पाळीव सिलो नावाचे मांजर असो, लता नावाच्या माझ्या मत्रिणीच्या घरी असलेला डौलदार कुत्रा ऑली असो किंवा हे वाळवंटातले सौंदर्यवान उंट असो.. त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न असतो, तो त्यांच्या डोळ्यांतील भाव वाचून. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि रूपवान व गुणवान आहोत, म्हणून आपल्याला विशेष वागणूक दिली जात असल्याचा भाव त्या उंटांच्या डोळ्यांत सहजपणे दिसला आणि.. अशा वैशिष्टय़पूर्ण आठवणी मनाच्या कॅमेऱ्यात टिपून आम्ही पुन्हा आमच्या दुनियेत परतलो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देशोदेशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Camel beauty in deserts
First published on: 19-04-2015 at 12:53 IST