झुंबर आणि समई

‘‘सर, ‘जनात-मनात’मधून आजच्या महाविद्यालयीन जीवनावर लिहा..’’ एक आर्जवी पत्र आलं आणि माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. महाविद्यालय.. खूप काही बदललंय.

‘‘सर, ‘जनात-मनात’मधून आजच्या महाविद्यालयीन जीवनावर लिहा..’’ एक आर्जवी पत्र आलं आणि माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. महाविद्यालय.. खूप काही बदललंय. काही गोष्टी अक्षय असाव्यात असं वाटलं होतं; पण कालौघात त्याही वाहून गेल्या. काही गोष्टी इथं कधीच घडू नयेत अशी भाबडी इच्छा होती, तिला मूठमाती मिळाली. बदल-काळ-काम-वेगाच्या या गणितात काही बाबी मात्र टिकून राहिल्या. त्यांचे बाह्य स्वरूप बदलले. काहीसे प्रदर्शनीय झाले. बेगडी साज चढला. पण सभामंडपात झुंबरे लागली तरी गाभाऱ्यात फक्त समईच्या ज्योतीचेच स्थान असावे, तद्वत मूलभूत मूल्ये मात्र टिकून राहिली आहेत. आज या लेखांकात मला महाविद्यालयीन आयुष्य आणि शिक्षणाच्या बदलत्या दिशांचा मागोवा घ्यायचा आहे.
मला आठवतेय, माझे पूर्व-वैद्यकीय पुण्यातील कॉलेजविश्व.. आमचं आबासाहेब गरवारे तसं शिस्तीचं. स्ट्रेचलॉन नावाच्या कापडाच्या पँट्स, बेलबॉटम्स. मुलींच्या मॅक्सी, पायघोळ झगे. सायकलींचा सुळसुळाट.. आठवले सरांनी शिकविलेले गणिताचे तंत्र-मंत्र.. वाणी सरांची स्टाईलाइज्ड बॉटनी.. घाणेकर सरांच्या दुर्गगाथा.. कॉलेजातील मराठी वाङ्मय मंडळ.. नगरला जाऊन मी आणि माझ्या पार्टनर सुळेने जिंकलेला हिवाळे करंडक.. पुढच्या वर्षी मारलेली रानडे वादविवाद स्पर्धा.. पण या साऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीजवर असायचा अभ्यासाचा पगडा! A Group, B Group ही विभागणी झाल्यावर फर्न-मॉस आणि झुरळाच्या नव्‍‌र्हस सिस्टीममध्ये अडकलेलं इंटरचं वर्ष.. आणि मग वैद्यकीय महाविद्यालयाचे झिजवलेले उंबरे! पसे फारसे नसायचेच. वडा-पावचा उदय व्हायचा होता. चहा हीच मोठी चन होती! ‘सातच्या आत घरात’ न यायला क्लास हे एकमेव गृहमान्य कारण होतं. गॅदिरग म्हणजे उत्साहाची दिवाळी होती; पण तिचा ‘इव्हेन्ट’ झाला नव्हता. फॅशन परेड आणि रॅम्प-वॉक अवतरलं नव्हतं. आणि रस्त्यावरचं निसर्गसौंदर्य हे अंगभरल्या साडीत लपेटून सामोरं यायचं. निवडणुका असायच्या, पण िहसा नव्हती. गट असायचे, पण पक्ष नव्हते. िड्रक्स आणि ड्रग्ज या डफळ्या वाजायच्या होत्या. ते विश्वच कॉलेजला ठाऊक नव्हतं. प्रिन्सिपॉलचा दरारा होता. स्टाफरूमचा आब होता. लायब्ररीला सन्मान होता.
..आज खूप काही बदललंय. गुरुकुलातून कुलगुरू पदापर्यंतचा प्रवास मी अनुभवलाय. आमच्या शिक्षकांना आमची नावं आमच्या मधल्या नावासहित मुखोद्गत होती. आज आमच्या विद्यार्थ्यांना प्राचार्याचा परिचय असेल याची शाश्वती नाही. विद्यार्थी वर्गात कमी अन् कॅन्टीन वा ग्राऊंडवरच अधिक. पीरियडस् कट्टय़ावरच भरवावेत आणि शांतिनिकेतनचा कित्ता गिरवावा असं मला अनेकदा वाटतं. खिशात पेन नसेल, पण अँड्राइड फोन आणि ईअर-प्लग्ज या आवश्यक अ‍ॅक्सेसरीज. जीन्स म्हणजेच फॉर्मल. आणि कपडे अंग झाकण्यापेक्षा इतरही उद्दिष्टे पूर्ण करू शकतात याचे सांगोपांग दाखले. निवडणुका म्हणजे विधानसभा-लोकसभेची आवृत्ती.. साम-दाम-दंड-भेद यांचा वापर. पक्षांचा चंचुप्रवेश नाही, तर त्यांची पाशवी पकड.. गॅदिरग म्हणजे मॅनेजमेन्ट इव्हेन्ट. चार दिवसांचे बजेट हे महाविद्यालयाच्या शैक्षणिक अर्थसंकल्पाला खुजे ठरवणार! या सगळ्या पाश्र्वभूमीवर अ‍ॅकॅडेमिक्सचा कोंडलेला श्वास!  रिसर्च हा फक्त पीएच. डी.ची नतिक जबाबदारी म्हणून तोंडी लावण्यापुरता उरलेला. आणि अशा मौज-मजा-मस्तीत चार वष्रे काढल्यावर डिग्री हातात पडल्यावर सुशिक्षित बेकार म्हणून भत्त्याला अर्ज करण्यापलीकडे हाती न उरलेले धगधगते गाळीव वास्तव!
पुढच्या काही वर्षांत खूप काही बदलायला हवं आहे. पाश्चात्त्य विद्यापीठे भारताची दारे ठोठावत आहेत. उच्च शिक्षणामध्ये परकीय थेट गुंतवणुकीला अनुमती मिळणार, हे प्राक्तन आहे. मायबाप सरकार सार्वत्रिक प्राथमिक आणि फार फार तर माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी घेईल. पण तंत्राधिष्ठित उच्च शिक्षण स्वस्त आणि मोफत असणार नाही. तंत्रज्ञान पावला-पावलावर वापरले जाईल. नोटीस बोर्डची जागा व्हिज्युअल डिस्प्ले बोर्ड घेतील. Information Kiosks असतील. सगळ्या प्रक्रिया केवळ संगणकावर घडतील. Radio-frequency ID card ितुमची महाविद्यालयातील अस्तित्वाची निशाणी ठरेल. हजेरीची टक्केवारी शिथिल होईल. ‘स्वयंअभ्यास’ हाच परवलीचा शब्द होईल. पुस्तके हद्दपार होतील. ई-बुक्स हे एकमेव माध्यम उरेल. लायब्ररीचे रूपांतर सायब्ररीमध्ये होईल. व्यवसायाभिमुख कोस्रेसच तरतील. नवे विषय उदयाला येतील. त्यांची मागणी वाढेल. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, कॉपीराइटस्, इंटरनॅशनल बिझनेस, कॉर्पोरेट लॉ हे परवलीचे शब्द बनतील. ज्ञानापेक्षा सादरीकरण आणि हस्तकौशल्याचे महत्त्व वाढेल. शिक्षकांना बदलावे लागेल. पुन्हा विद्यार्थी होऊन नवे आत्मसात करावे लागेल. ‘आमच्या वेळी ही थेरं नव्हती,’ हे वाक्य ऐकायला कोणाकडे वेळ नसेल. अस्तित्व टिकवायचं तर बदल अपरिहार्य ठरेल आणि तो सुहास्य वदनाने स्वीकारणं हे शहाणपण असेल.
..काही गोष्टी मात्र बदलू नयेत.
संस्थेवरच्या निष्ठा बदलू नयेत.
गुरूवरची भक्ती बदलू नये.
महाविद्यालयातील मत्र बदलू नये.
धोरण बदलावे, पण मंगल तोरण बदलू नये.
मोल बदलावे, मूल्ये बदलू नयेत.
भाव बदलावा, पण देव बदलू नये.
झुंबरे लावा, पण समई बदलू नका.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व जनात…मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandelier and traditional lamps

Next Story
माझी हक्काची माणसं माझ्यासोबत..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी