सध्या निवडणुकांची धामधूम असली आणि उन्हाळा सुरू झाला असला, तरी मोसम मात्र लग्नाचा आहे. घामाच्या धारा लागत असताना मंगल कार्यालयातील गप्पांच्या ओघात वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. लग्न जमताना आलेल्या अडचणी, लग्नावर होत असलेला खर्च, जेवणावळीतले पदार्थ, अशी वळणे घेत घेत चर्चा अमकीचं लग्न जमत नाही, तमक्याचं लग्नाचं वय उलटून गेलंय, अशा विषयांवर येऊन ठेपतात. पूर्वी अशा चर्चा सुरू झाल्या की मी काढता पाय घ्यायचे. एखादी मुलगी दिसायला काळी आहे, त्यामुळे या जन्मात तिचं लग्न जमणार नाही. किंवा या दहावी नापास बिनडोकाला कोण मुलगी देणार, अशा प्रकारच्या शेरेबाजीवर या चर्चा संपत. पण अलीकडे परिस्थिती बदलत चालली आहे.
माझ्या ओळखीच्या एका मुलीचे लग्न जमत नव्हते. सुशिक्षित, सुंदर, चांगल्या घरातील या मुलीचे लग्न होत नव्हते. मुलीत कोणताच दोष नव्हता. तिची फक्त एकच अट होती, मुंबईच्या पश्चिम उपनगरात बोरिवलीपर्यंत मुलाचा स्वकष्टार्जित दोन बेडरूमचा फ्लॅट असावा. ज्याला मुंबईच्या जागांचे चढे भाव माहीत आहेत त्याला या मुलीचे लग्न न होण्यामागचे कारण समजेल.
स्वत:चे घर ही लग्न करण्यापूर्वीची एक पायरी असण्याचा एक काळ होता. पुरुषाकडून अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही, असे म्हणणारे लोक होते. पण आता काळ बदलला आहे. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही कमवत आहेत. पण या दोन इंजिनांच्या गाडीलादेखील- नवरा बायको दोघेही कमवणाऱ्या कुटुंबाला – मुंबईत घर घेणे फारच कठीण झाले आहे. अशा वेळी भावी नवऱ्याने घर, गाडी, वर्षांला एक पिकनिक इतकं सगळं एक रुपयाही कर्ज न घेता उभे करावे ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. स्त्री-पुरुषामधील विवाह संबंधांमध्ये ‘धम्रेच, अथ्रेच, कामेच नातिचरामि’ पकी आर्थिक बाजूचे महत्त्व अधिकाधिक वाढत जाणार हे नक्की आणि त्यातील गुंतागुंतही. बिल्डिंगमधल्या दळवीकाकू त्यांच्या मुलीसाठी स्थळ शोधताना मुलाचे स्वत:चे घर असावे, अशी अट घालतात. पण स्वत:च्या मुलाकडे त्याचे स्वत:चे घर नाही हे त्या विसरतात. आधीच्या पिढीला स्वत:मध्ये कालानुरूप बदल करणे कदाचित कठीण जात असेल, पण नवीन पिढीला मात्र हे घरगुती अर्थकारण नीट शिकावेच लागेल. लग्न आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या आर्थिक बाबी हा त्यातलाच एक महत्त्वाचा भाग आहे.
लग्न करत असताना भावी जोडीदाराकडे काय आहे, यापेक्षा आपल्या साथीने आपला जोडीदार किंवा आपली जोडीदारीण काय उभे करू शकतो किंवा शकते याचा आडाखा बांधून लग्न करायचे दिवस आहेत. आपल्या आधीच्या पिढीने प-प जोडून संसार उभा केल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर ठेवली आहेत, आणि ती स्तुत्य आहेत. त्या पिढीकडून ते जरूर शिकून घेतले पाहिजे. त्याच बरोबर आजवर दुर्लक्ष केलेल्या काही आर्थिक बाबींवर नीट विचार केला पाहिजे.
लग्नामध्ये हुंडा किंवा वरदक्षिणा बंद केली म्हणजे आपण सुसंस्कृत, सुशिक्षित आहोत असे समजायची गरज नाही. ज्या गोष्टीवर कायद्याने बंदी घातली आहे ती गोष्ट न करणे ही सभ्य समाजात सभासदत्व मिळण्याची किमान पात्रता असते, त्यात कोणताही पराक्रम नाही. लग्न करताना अवाजवी खर्च होतात. अगदी मध्यमवर्गीय लग्न आजच्या काळात दहा लाखांचा आकडा सहज पार करतात. तेवढय़ा पशात मुंबईजवळच्या डोंबिवली ते बदलापूर या पट्टय़ात किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या शहरात घराचे डाऊन पेमेंट सहज शक्य आहे. उरलेले पसे नवदाम्पत्याने गृहकर्जाच्या माध्यमातून उभे करावेत. त्यामुळे लग्नावर होणारा अनाठायी खर्च टळेलच आणि नवविवाहितांना भेडसावणारा घराचा प्रश्नही अंशत: का होईना पण सुटेल. जेथे स्वतंत्र घर ही प्राथमिक गरज नाही तेथे हाच पसा पुढील शिक्षण, धंद्यासाठी भांडवल अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरणे शक्य आहे. काहींना हा विचार म्हणजे निव्वळ स्वप्नरंजन वाटेलही, पण जी मंडळी केवळ आर्थिक कारणास्तव लग्न करू शकत नाहीत, त्यांना यातून कदाचित आशेचा किरण दिसेल.
कर्ज योग्य कारणासाठी काढले गेले तर त्यात काही वाईट नाही. घर खरेदी, व्यवसायवृद्धी यासाठी कर्ज काढण्यात काही चूक नसावी. अलीकडे कर्ज देत असताना बँका कर्ज मागणाऱ्याचे क्रेडिट रिपोर्ट तपासतात. त्यामुळे लग्न करत असताना आपल्या जोडीदाराचा क्रेडिट रिपोर्ट एकदा मागून घ्याच. उकइकछच्या वेबसाइटवर ४७० रुपयांत क्रेडिट रिपोर्ट काढून मिळतो. स्वत:चा क्रेडिट रिपोर्ट एकदा बघून घ्या आणि आपल्या भावी जोडीदारालाही दाखवा. एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये त्या व्यक्तीने आजवर घेतलेली कर्जे आणि त्यांची आजवर केलेली परतफेड यांची इत्यंभूत माहिती असते. कर्ज परतफेडीतील शिस्तबद्धता आणि भूतकाळातील बुडवलेली कर्जे यांचाही उल्लेख क्रेडिट रिपोर्टमध्ये असतो. क्रेडिट रिपोर्टमध्ये क्रेडिट कार्डाच्या मासिक शिलकीची अनियमित परतफेड, बँकांची बुडित कर्जे असे उल्लेख आढळल्यास अशा व्यक्तींच्या आर्थिक क्षमतेवर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. लग्नापूर्वी रक्त तपासणी एवढीच क्रेडिट रिपोर्ट तपासणीही आवश्यक आहे. क्रेडिट रिपोर्ट तपासणीमुळे कदाचित एखाद्या घोटाळेबाज व्यक्तीच्या गळ्यात वरमाला घालण्यापासून आपला बचाव होऊ शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2014 रोजी प्रकाशित
अथ्रेच नातिचरामि
सध्या निवडणुकांची धामधूम असली आणि उन्हाळा सुरू झाला असला, तरी मोसम मात्र लग्नाचा आहे. घामाच्या धारा लागत असताना मंगल कार्यालयातील गप्पांच्या ओघात वेळ कसा निघून जातो
First published on: 20-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changing senario of indian marriages