तेजस मोडक
मला लहानपणापासून ‘कॉमिक्स’ वाचायला आवडायची. ‘ग्राफिक नॉव्हेल’ आणि चित्रकथांनी सजलेल्या कॉमिक्सची जातकुळी खरी तर एकच. म्हणजे दोघांचे मूळ व्याकरण आणि रचनानियम सारखेच. काही फरकांमुळे काही कॉमिक्सचं ‘ग्रॅज्युएशन’ होऊन ती ग्राफिक नॉव्हेल म्हणून संबोधली जाऊ लागली.

‘कॉमिक्स’ सापडली की ती मी आधाशासारखा वाचून संपवायचो. तेव्हापासून चित्रांनी भरलेल्या या माध्यमाशी सान्निध्य वाढतच गेले. पण पुढे अभिनव कला महाविद्यालयात शिकत असताना योगायोगाने एक संधी माझ्याजवळ चालून आली. मी तेव्हा दुसऱ्या वर्षात होतो आणि कॉलेजबाहेरच्या वयाने माझ्याहून थोड्या मोठ्या उत्साही तरुणांशी माझी ओळख झाली. त्यांना ‘मॅड’ मासिकाच्या धर्तीवर, पण पूर्णपणे भारतीय रुपडे असलेले नवे काहीतरी साकारायचे होते. त्यांनी मला या कामात सहभागी करून घेतले. त्या नवख्या ऊर्जेतून ‘फियास्को’ नावाचा एकच अंक निघाला. पण या साऱ्या प्रक्रियेत मला भरपूर शिकायला मिळाले. मी वयाने आणि आकलनानेही कला महाविद्यालयातील एक साधा विद्यार्थी होतो. त्या अंकाच्या निर्मितीच्या निमित्ताने माझ्या कॉमिक्सच्या आवडीचे हळूहळू ‘पॅशन’मध्ये रूपांतर झाले आणि ग्राफिक नॉव्हेल हे माझे क्षेत्र असल्याचा शोध लागला. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला मी माझ्या पहिल्या ग्राफिक नॉव्हेल ‘प्रायव्हेट आय अॅनॉनिमस’चे काम सुरू केले.

novels, graphic novels,
नवा दृश्यसंसार… ग्राफिक नॉव्हेलच्या जगात…
Shyam Manohar, Shyam Manohar's stories, Deep Societal Insights, story on contemporaray situation, story on contemporaray political situation, lokrang article, loksatta lokrang,
म्हणा…
expensive, books, children,
महागडी पुस्तके आपण मुलांच्या हाती केव्हा देणार?
bold novel on an uncommon subject dubhangalel jivan
अचर्चित विषयावरची धाडसी कादंबरी
Loksatta chaturnag Nobel Prize winning Canadian novelist Alice Munro passed away recently
‘आपल्या’ गोष्टी!
Loksatta lokrang Documentary A journey of professorial documentaries Film Institute
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माझ्या आयुष्यातील रजतयोग!
tonglen meditation marathi news
‘टाँगलेन’ची अनोखी गल्ली!
V W Shirwadkar and Sadashiv Amarapurkars play Kimayagar
‘ती’च्या भोवती : किमया तिच्या जिद्दीची!

आणखी वाचा-‘समजुतीच्या काठाशी…’

ही २००६ ची गोष्ट आहे. त्या काळी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुणांना आजच्या इतके पर्याय बिलकूलच नव्हते. अॅड एजन्सी, अॅनिमेशन आदींमध्येच करिअर-विचार संपून जाई. त्या काळातही स्वतंत्रपणे या माध्यमात काम करून उदरनिर्वाहाचा विचार करणारे फार थोडे होते आणि आता या स्थितीत फार बदल झालेला असेल असे वाटत नाही. नऊ ते पाच कारकुनी करण्याची माझी बिलकूल तयारी नव्हती. फायनल इयरला असताना मी माझ्या ग्राफिक नॉव्हेलच्या लिखाणाचे काम सुरू केले. परीक्षा संपल्यावर त्यासाठी चित्र पूर्ण करण्यात काही महिन्यांचा कालावधी लागला. २००८ साली ‘प्रायव्हेट आय अॅनॉनिमस’ प्रकाशित झाले. त्यानंतर वेळेचे स्वातंत्र्य मिळत राहावे म्हणून मी पूर्णपणे ‘फ्रीलान्स’ काम करायचा निर्णय घेतला. २०११ साली ‘अॅनिमल पॅलेट’ प्रकाशित झाले. ‘फियास्को’मधीलच चेतन जोशी या मित्रासोबतचा हा प्रकल्प. चेतनच्या काही कथांना मी चित्रांची जोड दिली. मोठ्या वयाच्या वाचकांना समोर ठेवून मानवी वृत्ती असलेल्या प्राण्यांच्या चार अगदी भिन्न चवीच्या मजेशीर कथांचा यात समावेश होता. मी प्रत्येक कथा वेगळ्या शैलीत चित्रबद्ध केली. त्यानंतर इतर अनेक छोटी-मोठी कामे करता करता सिनेमा क्षेत्राशी माझा संबंध आला आणि त्या क्षेत्रात काम सुरू झाले. पण त्या दरम्यान २०१३ पासून २०१९ पर्यंत मी पुढल्या एका ग्राफिक नॉव्हेल प्रकल्पावरही काम करीत होतो. मात्र त्याचा आवाका हळूहळू इतका वाढला की वेळ आणि खर्च या दोन्हीदृष्ट्या ते हाताबाहेर चालल्याचे दिसायला लागले. मग अनिश्चित काळासाठी हा प्रकल्प थांबविण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येक ग्राफिक नॉव्हेलच्या कामाने मला वेगळ्या प्रकारचा अनुभव आणि आनंद दिला. ‘प्रायव्हेट आय अॅनॉनिमस’ पूर्ण केले तेव्हा स्वतंत्रपणे काम करण्याचे समाधान मिळाले. या माध्यमात काम करण्याचा अनुभव आणि माहिती नसताना, कुठल्याही प्रकारचा ‘रिसर्च’ नसताना माझ्याकडून ते पूर्णत्वाला गेले. पहिले स्केच काढण्यापासून ते अखेरच्या प्रिंटिंगपर्यंत मी पूर्णपणे त्यात समरस झालो होतो. ग्राफिक नॉव्हेलचे काम कित्येक तास एकट्याने एका खोलीत बसून केले जाणारे. आपला वाचक कोण, आपण जे सांगू पाहत आहोत ते कुणाला कळेल की नाही, या प्रश्नांना बगल देत मी पुढे सरकत होतो. मी कसलेही हिशेब न करता केलेल्या कामाचे चीज झाल्याचा अनुभव या चित्रकादंबरीने मला दिला. या चित्रकादंबरीत मला आता अनेक त्रुटी दिसत असल्या, तरी हे काम माझ्या मनात फार महत्त्वाच्या स्थानी आहे.

आणखी वाचा-निखळ विनोदाची मेजवानी

‘अॅनिमल पॅलेट’बाबत पहिल्यांदा दुसऱ्याच्या लिखाणासाठी चित्रकार म्हणून काम करता आले. दुसऱ्याच्या कथेला चित्ररूप देताना मला स्वत:ला घडविता आले आणि नव्याने शोधता आले. पुस्तक आले तेव्हा जयपूर साहित्य महोत्सवातील ग्रंथ प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी होते. महोत्सवातील ग्रंथदालनामध्ये एक अपरिचित व्यक्ती ‘अॅनिमल पॅलेट’च्या जवळून जाताना थबकली. त्यातील चित्रांमध्ये थोडावेळ रमली. ती व्यक्ती काय करते याकडे मी कुतूहलाने काही फुटांवरून पाहत होतो. त्या व्यक्तीने ते ग्राफिक नॉव्हेल विकत घेतले. आपली कोणतीही ओळख नसताना आपण या माध्यमाच्या पटलावर अगदी कुणीच नसताना आपल्या कामाच्या गुणवत्तेच्या आधारे एका वाचकाने आपल्या पुस्तकाची निवड करताना पाहण्याचा हा छोटा अनुभव माझ्या मनात एक कायमची ऊर्जा पेरून गेला.

तिसऱ्या अप्रकाशित कामाला कधीतरी पूर्ण करायचे माझ्या मनात आहे. एका छोट्या झाडाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, तसे या प्रकल्पाचे झाले. त्यातला चित्रआवाका आणि कथापसारा इतका वाढत गेला की एका टप्प्यानंतर त्याला थोपवणे अशक्य झाले. पण पुढल्या काही वर्षांत त्यावर पुन्हा काम करून ते पूर्णत्वाला नेता येईल, असा मला विश्वास आहे. हे काम पूर्ण झालेले नसले, तरी त्याच्या निर्मितीमध्ये माझी वैयक्तिक खूप वाढ झाली. संकल्पना आकलन आणि समजुतींमध्ये प्रचंड भर पडली. या काळात सिनेमे, अॅनिमेशन, ग्राफिक नॉव्हेल्स यांचा अभ्यास आपसूक आणि बारकाईने झाला. माझी माझ्यापुरती दृश्यात्मक जाणीव विस्तारली.

गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये ग्राफिक नॉव्हेल या माध्यमाला ऊर्जितावस्था आली. नव्वदोत्तरीच्या अखेरच्या वर्षांत ग्राफिक नॉव्हेल आपल्याकडच्या मोठाल्या इंग्रजी पुस्तकांच्या दुकानातही तुरळक दिसतं. पुढल्या काळात त्याच्या बाजारपेठेचे गणित बदलले. आधी ग्राफिक नॉव्हेल आले की प्रकाशित होऊन ते ग्रंथदालनांत खितपत पडे. वृत्तपत्रात त्यावर एखादे परीक्षण अथवा परिचयाचा लेख आल्यानंतर त्याबाबत विचारणा होई. आता याबाबत पारंपरिक माध्यमांची जागा समाजमाध्यमांनी घेतली आहे. ग्राफिक नॉव्हेल आल्याचा डंका लेखकाला आणि प्रकाशकाला तेथून करता येणे सुलभ झाले. दुसरे एक प्रमुख कारण म्हणजे तंत्रज्ञानाने कलाकारांच्या कामाला आणलेला वेग. पूर्वी कागदावर चित्रे काढून, ती स्कॅन करून जे काम वर्षभराइतका वेळ घेई, ते आता विविध गॅझेट्सच्या सहाय्याने तीन -चार महिन्यांत सहज पूर्ण होऊ शकते. शिवाय कामाच्या गुणवत्तेतही तंत्रज्ञानाने भर पडली. त्यामुळे तुलनेने आज ग्राफिक नॉव्हेल वाचकांपर्यंत अधिक सहजतेने पोहोचत आहेत. तसेच वाचकही त्यांच्यापर्यंत जात आहेत.

ग्राफिक नॉव्हेल हा बाहेरून इथे रुजलेला प्रकार आहे. त्या अर्थी ही एक ‘कल्चरल स्पेसशिप’ आहे. आपल्याकडे कल्पकतेची कधीही कमतरता नव्हती. इथे चित्रपुस्तकांवर प्रचंड काम झाले आहे. लहान मुलांसाठी पुस्तकांमध्ये सध्या जगभराप्रमाणे भारतातही चित्रप्रयोग होत आहे. काम करणारे चिक्कार आहेत. त्यामुळे ग्राफिक नॉव्हेलच्या जगतात सध्या खूप नवे आणि वेगळे येत आहे. ग्रंथदालनांत त्यांची सन्मानाने उपस्थिती आहे. हळूहळू का होईना, यांचा वाचक वाढत चालला आहे ही सकारात्मक बाब आहे.

आणखी वाचा-भाजप आणि दलित राजकारणाचे ‘तुकडेकरण’

मला नेहमी वाटते की, संगीताबद्दल प्रत्येक भारतीय माणसाचा कान आपसूक तयार होत असतो. एखाद्याने संगीताचे शिक्षण घेतले नसले, तरी एखादा चुकलेला स्वर त्याला लगेच खटकतो. लगेचच कळतो. संगीताच्या दृष्टीने आपण बहुधा सगळेच पक्के कानसेन असलो, तरी दृश्यांच्या जगापासून अद्याप बऱ्यापैकी अनभिज्ञ आहोत. पूर्वी बाल साहित्याचे पारंपरिक स्वरूप म्हणजे भरपूर शब्द आणि कमीत कमी चित्र असे होते. अर्थात त्याला अनेक कारणे होती. त्या काळाच्या छपाईच्या मर्यादा, त्याला लागणारा खर्च इत्यादी. आता त्यात बदल झाला आहे. दृश्यसाक्षरता आपल्याकडे जाणीवपूर्वक राबवायला हवी. लहानपणापासून चित्रांची जाणीव मुलांना करून दिली तर ती त्याबाबत सजग होतील. चित्राला वेळ देतील. चित्रासोबत वेळ घालवता येणे, त्यासोबत खासगी असा संवाद साधता येणे, ही एक अतिशय सुंदर अनुभूती आहे. कदाचित मी चित्रकार असल्यामुळे हा माझा (गैर)समज असेल, पण मला वाटते चित्रांची भाषा येणारे मन अधिक संवेदनशील बनत जाते, चाकोरीबाहेरचा विचार करण्याची क्षमता बाळगते आणि स्वत:ला स्वत:पुरती का होईना जगण्यासाठी एक सुंदर मोकळीक बहाल करते. नवनव्या प्रयोगांमुळे दृश्यसाक्षरता वाढीस खतपाणी मिळत आहे आणि हे पुढल्या पिढीच्या दृश्यश्रीमंती आणि आत्मिक समृद्धीसाठी नक्की महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास वाटतो.

आवडती ग्राफिक नॉव्हेल्स…

हबिबी क्रेग थॉम्पसन
अॅस्टेरीओस पॉलिप डेव्हिड मॅझुचेली
गॅरेज बॅण्ड जिपी
हेलबॉय कॅरेक्टरवर आधारलेल्या चित्रकादंबऱ्या : माईक मिग्नोला
नॉर्वेमधील कलाकार जेसन याची कॉमिक्स.
tejasmodak16@gmail.com