आसिफ बागवान

गुगल आणि ॲपल या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील दोन बडय़ा कंपन्या. त्यांच्यात वर्चस्वासाठी चढाओढ सुरू असली तरी त्यांच्या कार्यकक्षा प्रत्यक्षात वेगवेगळ्या आहेत. मात्र, त्या परस्परपूरक आहेत, हेही तेवढंच खरं. यापैकी एक कंपनी आहे हार्डवेअरची, तर दुसरी सॉफ्टवेअर! तथापि स्मार्टफोनचं जगड्व्याळ विश्व पादाक्रांत करण्याची जबरदस्त ईष्र्या दोघांमध्ये आहे. आणि त्यातूनच ही टोकाची स्पर्धा सुरू आहे. परंतु शेवटी यातून काय निष्पन्न होणार आहे?

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

मार्च २०१७ ची घटना. ॲपलचे सीईओ टिम कूक आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं सिलिकॉन व्हॅलीतील एका व्हिएतनामी रेस्टॉरंटमधलं एकत्र भोजन घेतानाचं छायाचित्र अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालं आणि जगभर चर्चेला तोंड फुटलं. दोन दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखांचं वृत्तपत्रांच्या पानांत झळकणं यात विशेष काहीच नाही. पण अॅपल आणि गुगल या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या कंपन्यांच्या प्रमुखांमध्ये झालेली ‘गुफ्तगू’ त्यानंतर अनेक दिवस चर्चेत राहिली. त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली याबद्दल वृत्तपत्रं, विश्लेषकांनी आपापले अंदाज लढवले खरे; पण दोन्ही कंपन्यांनी एक शब्दही काढला नाही. त्या भेटीत नेमकं काय बोलणी झाली याचा उलगडा जवळपास तीन वर्षांनंतर झाला. ती भेट होती- ॲपल आणि गुगलमधल्या एका समझोत्याची. ॲपलच्या आयफोनवर गुगलचं ‘सर्च’ सुरू करू देण्यासाठीची. त्यासाठी गुगल दरवर्षी ॲपलला १५ अब्ज डॉलर मोजत असल्याचं उजेडात आलं. तेही अमेरिकेच्या न्यायालयात या दोन्ही कंपन्यांनी मक्तेदारी प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी खटला दाखल झाल्यानंतर. चालू महिन्यातच या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. यासोबतच चर्चा सुरू झालीय.. ॲपल आणि गुगल स्पर्धक की मित्र, ही?

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या दोन बडय़ा कंपन्या. इतक्या मोठय़ा, की स्मार्टफोन या निकषावर दोन कंपन्यांत जगाची उभी विभागणी व्हावी! मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, ॲमेझॉन आहेतच; पण अॅपल आणि गुगल यांनी या जगाला जितकं व्यापलं आहे तितकं अन्य कुणी क्वचितच भारलं असेल. दोन्ही कंपन्यांचा इतिहास जितका रंजक, तितकीच रोमांचक त्यांच्यातली स्पर्धा! गेल्या दीड दशकांपासून एकमेकांना धडका देत सर्वोच्च तंत्रज्ञान कंपनी बनण्यासाठी या दोन कंपन्या झगडत आहेत. आपल्या बाजारपेठेतील इंचभर जागाही प्रतिस्पध्र्याच्या वाटय़ाला जाऊ नये म्हणून जंग जंग पछाडत आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी या कंपन्या दवडताना दिसत नाहीत. त्यांच्यातल्या रणमंथनाचं केंद्र एकच.. स्मार्टफोन!

तसं तर स्मार्टफोन हे एक उपकरण. ‘गॅजेट’ म्हणू हवं तर! संगणक, टीव्ही किंवा अन्य गॅजेटसारखंच. पण या उपकरणानं मानवी विश्व पूर्णपणे बदलून टाकलंय. माणसांमधील संवादाची प्रक्रिया, माहितीचं विश्लेषण करणारी बुद्धिमत्ता, कामे साध्य करण्याचं कौशल्य यावर स्मार्टफोनने अमिट छाप सोडली आहे. ते संवादाचं माध्यम तर आहेच; पण सोबतच ते वृत्तपत्र आहे, टीव्ही आहे, कॅमेरा आहे, संगणकही आहे. ते केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर ज्ञानवर्धनाचं (आणि ज्ञानभंजनाचंही!) विद्यापीठ आहे, अभिव्यक्तीचं व्यासपीठ आहे, व्यवहाराचं माध्यमही आहे. आजघडीला जगातील सर्वात मोठं अस्त्र ठरावं इतका स्मार्टफोनचा आपल्या सर्वावर प्रभाव आहे. आणि या अस्त्राचं नियंत्रण कोणाकडे, यावरून ॲपल आणि गुगल यांच्यात चढाओढ लागली आहे.

कोणत्याही उद्योग क्षेत्रातील दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू असते, केवळ तशीच ही चढाओढ नाही. खरं तर या दोन्ही कंपन्या वेगळ्या धाटणीच्या. एक हार्डवेअर निर्मिती क्षेत्रातली, तर दुसरी सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातली. एक आपल्या उत्पादनांचं वेगळेपण अट्टहासाने जपणारी, तर दुसरी आपली उत्पादनं सर्वव्यापी ठरावीत यासाठी प्रयत्न करणारी. उत्पादनांची अधिकाधिक विक्री हे ॲपलच्या व्यवसायाचं सूत्र. तर उत्पादन मोफत देऊन वापरकर्त्यांच्या माहितीच्या विक्रीवर गुगलचा डोलारा उभा आहे. एकमेकांच्या प्रतिस्पर्धी ठराव्यात याकरता दोन्ही कंपन्यांत सामायिक काहीच नाही. अगदी स्मार्टफोनच्या बाबतीत बोलायचं झालं तरी ॲपलचा आयफोन म्हणजे हार्डवेअरचं कौशल्य; तर गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे सॉफ्टवेअरची कमाल. त्यामुळे एकमेकांच्या प्रतिस्पर्धी ठरण्यापेक्षा या दोन कंपन्या परस्परपूरकच अधिक आहेत. स्टीव्ह जॉब्सनंही हे ताडलं होतंच.

या घडामोडी आयफोनच्या निर्मितीकाळातल्या. सुमारे १५ वर्षांपूर्वीच्या. टेबलावरच्या संगणकाची जागा खिशात मावणारा मोबाइल घेऊ शकतो, हे जॉब्सच्या दूरदृष्टीला पटलं होतं. त्यातूनच आयफोनची संकल्पना अस्तित्वात आली. त्यावेळी नोकियाची सिम्बियन ऑपरेटिंग प्रणाली हेच मोबाइलचं विश्व होतं. मायक्रोसॉफ्टनं प्रयत्न करूनही विंडोजची प्रणाली मोबाइलच्या चौकटीत बसणं कठीण होतं. अशा वेळी ॲपल आणि गुगल या दोन कंपन्यांतली काही डोकी एकत्रितपणे नव्या मोबाइलच्या निर्मितीवर काम करत होती. स्टीव्ह जॉब्सच्या नेतृत्वाखाली ॲपलची अख्खी टीम आयफोन बनवण्यात व्यग्र होती. त्याचवेळी गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांचं लक्षही आयफोनमधल्या गुगल सेवांच्या निर्मितीवर होतं. पेज आणि ब्रिन हे दोघंही जॉब्सचे चाहते. जॉब्स बनवत असलेला मोबाइल मायक्रोसॉफ्टच्या विंडोज संगणकांनाही पाणी पाजेल यावर त्यांचा विश्वास होता. त्या आयफोनवर गुगलच्या सर्च, मेल, मॅप्स या सेवा उत्तमरीतीने कशा काम करतील, हे पाहण्यासाठी गुगलच्या कॅलिफोर्नियातील कार्यालयातील एक पथक थेट ॲपलसाठी काम करत होतं. हे काम चोख पार पडावं यासाठी गुगलनं विक गुंडोत्रा या अमेरिकी भारतीयाची नेमणूक केली होती. हे विक गुंडोत्रा पूर्वाश्रमीचे मायक्रोसॉफ्टमधील कार्यक्षम व्यवस्थापक. मोबाइल हे भविष्यातलं संगणकापेक्षाही महत्त्वाचं उपकरण आहे हे त्यांनी ओळखलं होतं. पण मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांच्या या दृष्टिकोनाला कुणी फारसं महत्त्व दिलं नाही. गुगलने मात्र विक यांना हेरलं आणि एक वर्षांच्या फुकट पगारानिशी त्यांना आपल्या पदरी घेतलं. काम काय? तर अॅपल बनवत असलेल्या फोनमध्ये गुगलच्या सेवा व्यवस्थित सामावल्या जातील, हे पाहणं. त्यावेळी गुगल आणि अॅपलची मैत्री इतकी घट्ट होती की गुगलचे सीईओ एरिक श्मिद यांना जॉब्सनं ॲपलच्या संचालक मंडळातही स्थान दिलं होतं. इतकंच काय, जानेवारी २००७ मध्ये स्टीव्ह जॉब्सनं जेव्हा पहिला आयफोन सादर केला तेव्हा त्या पत्रकार परिषदेत श्मिद यांना व्यासपीठावरही बोलावलं होतं. श्मिद यांनीही आयफोनची स्तुती करताना दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित भवितव्याबाबत भाष्य केलं होतं.

आयफोनसाठी गुगल राबत असताना त्याबद्दल गुगलच्या वर्तुळात नाराजीही होतीच. आयफोन तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘गेमचेंजर’ ठरणार, हे निश्चित होतं. पण यातून गुगल ॲपलच्या दावणीला कायमची बांधली जाईल अशी भीतीही व्यक्त होत होती. खरं तर मोबाइल हा स्मार्टफोन बनू शकतो यादृष्टीने गुगलमध्येही २००५ पासून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी गुगलनं पाच कोटी डॉलर मोजून ॲण्डी रूबेन याच्यासह तो विकसित करत असलेल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचं मालकत्व घेतलं होतं. रूबेन आणि त्याचा चमू गुगलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमच्या निर्मितीवर काम करत होता. ही ऑपरेटिंग प्रणाली मोबाइल हँडसेट बनवणाऱ्या कंपन्यांना पुरवून त्याद्वारे स्मार्टफोन तंत्रज्ञानाला आपलंसं करण्याचा गुगलचा प्रयत्न होता. पण जानेवारी २००७ मध्ये जॉब्सने पहिला आयफोन सादर केला आणि सगळं चित्रच पालटलं. रूबेनचं पथक काम करत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ‘टच् स्क्रीन’ या संकल्पनेचा विचारच नव्हता. स्क्रीनवरील बोटांच्या स्पर्शाने हाताळता येणाऱ्या आयफोनकडे पाहिल्यानंतर आपण खूपच मागे आहोत याचा गुगलला अंदाज आला. त्याची भरपाई करण्यासाठी गुगलचं अवघं पथक कामाला लागलं आणि अँड्रॉइडची फेरबांधणी करण्यात आली. हे करतानाही पेज आणि ब्रिननं स्टीव्ह जॉब्सचं मार्गदर्शन घेतलं होतं. पण जसजशी नवीन अँड्रॉइड प्रणाली आकार घेऊ लागली, तसतशी ती आयफोनच्या प्रणालीशी मिळतीजुळती असल्याचं जॉब्सला वाटू लागलं. त्यानं अनेकदा अँड्रॉइडमध्ये बदल करण्यासाठी आग्रहही धरला. मात्र, तो काही यशस्वी होऊ शकला नाही. तेव्हापासून ‘गुगलनं आयफोनची थेट नक्कल केली..’ असं जाहीर करत जॉब्सनं गुगलशी असलेले संबंधच तोडून टाकले.


ॲपल आणि गुगल या दोन परस्परपूरक ठरू शकणाऱ्या कंपन्यांतील संघर्षांची ती सुरुवात होती. तेव्हापासून दोन्ही कंपन्या एकमेकांना अतिशय कट्टरपणे टक्कर देत आहेत. विशेष म्हणजे दीड दशकानंतरही या स्पर्धेतील रंगत कायम आहे. आयफोन हा सातत्याने जगातील सर्वोत्तम स्मार्टफोन म्हणून नावाजला जात आहे. गेल्या वर्षीचे आकडे पाहिले तर ॲपलने जवळपास २४ कोटी आयफोनची विक्री केली. इतकी विक्री होणारा अन्य कोणताही स्मार्टफोन बाजारात नाही. पण वापरकर्त्यांच्या बाबतीत आयफोन अँड्रॉइडपेक्षा कितीतरी मागे आहे. २०२१ मध्ये अँड्रॉइड फोनच्या वापरकर्त्यांची संख्या एकत्रितपणे ४.३ अब्ज होती. ॲपलकडे मात्र १.६५ अब्ज वापरकर्तेच आहेत. जगाच्या एकूण स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये आयफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण २५ टक्के आहे. उरलेली बाजारपेठ अँड्रॉइडच्या ताब्यात आहे. असे असले तरी आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत अॅपल गुगलपेक्षा नेहमीच सरस राहिली आहे.

हा संघर्ष घडलाच नसता तर..? जॉब्सच्या आग्रहापुढं झुकून पेज, ब्रिन, श्मिद यांनी अँड्रॉइडचा विचारच सोडून दिला असता तर..? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानातील या दोन ‘बाप’ कंपन्यांनी हातमिळवणी करून जन्माला घातलेला स्मार्टफोन अद्भुत ठरला असता कदाचित. पण त्या अद्भुत स्मार्टफोनचं अस्तित्व जगातल्या एका विशिष्ट ग्राहकवर्गापुरतंच मर्यादित राहिलं असतं. ॲपलनं नेहमीच आपली सर्व उत्पादने एका विशिष्ट ग्राहकवर्गाच्या चौकटीत राहतील याची दक्षता घेतली. किंमत हा त्यातला एक मुद्दा. ॲपलनं आपल्या उत्पादनांचं सोवळेपण जपण्याची खबरदारी नेहमीच घेतली. उत्पादन हाच ॲपलच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू राहिला आहे. ते ग्राहकाला कसं हवं, हेदेखील ॲपलच ठरवत आला आहे. किंबहुना, ग्राहकांनी कोणतं उत्पादन वापरलं पाहिजे, हे ॲपलच आजवर ठरवत आला आहे. पहिला आयफोन सादर झाला त्या पत्रपरिषदेत ‘टच् स्क्रीनच्या सततच्या वापरातून लोकांच्या हातांचे अंगठे दुखतील’ अशी शंका एका पत्रकारानं व्यक्त केली होती. त्यावर जॉब्सनं ‘काळजी करू नका.. तुमच्या अंगठय़ांना याची आपोआप सवय होईल,’ असं उत्तर दिलं होतं.

ही मिजास गुगलसोबत असताना ॲपलला जपता आली असती? गुगलनं तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केला तो एक सर्च इंजिन कंपनी म्हणून. इंटरनेटच्या महाजालातून काहीही शोधता यावं, हा या सर्च इंजिनचा हेतू. पण गुगलनं यातील जाहिरात उत्पन्नाची संधी शोधली. वापरकर्ते कशाचा शोध घेत आहेत, या माहितीचे पृथक्करण करून तो तपशील जाहिराती मिळवण्यासाठी गुगलने वापरला. वापरकर्त्यांची माहिती गोळा करण्याची कंपनीची भूक हळूहळू इतकी वाढत गेली की मॅप्स, मेल, यु-टय़ुब या सगळ्यांतूनच ही माहिती गुगल अधाशासारखी शोषत आला आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचा पायाच या तत्त्वावर बेतला आहे. अशावेळी अॅपलचं सोवळेपण गुगलला झेपलं असतं?

या दोन्ही कंपन्यांचं त्यावेळी वेगळं होणं त्यांच्या वापरकर्त्यांच्या आणि एकूणच तंत्रज्ञान क्षेत्राच्या पथ्यावर पडलं. स्मार्टफोनच्या बाजारावर वर्चस्व निर्माण करणं हा दोन्ही कंपन्यांचा हेतू आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग निवडले. ॲपलने हार्डवेअर हीच आपली जमेची बाजू आहे हे ओळखून न चुकता दरवर्षी नवीन आयफोन बाजारात आणले. वापरकर्त्यांना काय हवं, यापेक्षा त्यांना काय द्यायला हवं, याचं भान ॲपलने पुरेपूर जोपासलं. त्यामुळे आयफोनचा स्वत:चा असा निष्ठावंत ग्राहकवर्ग निर्माण झाला. या ग्राहकवर्गाला आयफोनचा बंदिस्तपणा जाचक वाटत नाही.

याउलट गुगलचं. वापरकर्त्यांना काय हवं आहे, हे ओळखून गुगलने सातत्याने अँड्रॉइड प्रणालीत बदल घडवले. हे बदल सामावून घेण्यात अन्य मोबाइल निर्मात्या कंपन्या कमी पडू लागल्या तेव्हा गुगलने २०१६ पासून स्वत:च ‘पिक्सेल’ स्मार्टफोन विकसित करण्यास सुरुवात केली. येत्या सहा ऑक्टोबरला त्यातल्या अद्ययावत अशा ‘पिक्सेल ७’ची घोषणा होण्याची शक्यता आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच ॲपलने आयफोन श्रेणीतील अद्ययावत अशा ‘आयफोन १४ प्रो’ची घोषणा केलेली असतानाच गुगल ‘पिक्सेल ७ प्रो’द्वारे त्याला आव्हान देणार आहे. त्यातून दोघांत नवी स्पर्धा सुरू होणार आहे.
हे सर्व सुरू असताना दोन्ही कंपन्यांना परस्परांच्या शक्तीचीही जाणीव आहे. जॉब्सने गुगलशी संबंध तोडल्यानंतर आयफोनवरून गुगलच्या सेवा हद्दपार केल्या होत्या. त्याने ॲपल मॅप्सची निर्मिती केली. पण ‘सर्च’ इंजिनला तो पर्याय शोधू शकला नाही. आयफोनवरील ‘सर्च’साठी मायक्रोसॉफ्टच्या ‘बिंग’शी हातमिळवणी करूनही त्याचा प्रभाव पडत नाही हे ॲपलच्या लक्षात आलं आणि त्याच क्षणी त्यांनी गुगलशी बोलणी सुरू केली. आयफोनवर झळकणं हे गुगलसाठीही आवश्यक होतंच. यानिमित्ताने आयफोनच्या करोडो वापरकर्त्यांची माहिती गुगलकडे आयती जमा होणार होती. २०१७ मध्ये टिम कूक आणि सुंदर पिचाई यांच्या भेटीत हेच तर ठरलं होतं!

asif.bagwan@expressindia.com