|| पराग कुलकर्णी
मे महिना संपत आला की आपल्या सगळ्यांनाच पावसाचे वेध लागतात. पाऊस कधी सुरू होईल, किती दिवस राहील, किती पाऊस पडेल याचे अंदाज याच दरम्यान हवामान खात्याकडूनही जाहीर होतात. भारतासारख्या देशात पावसाचे किती महत्त्व आहे हे वेगळे सांगायला नको. येणाऱ्या वर्षांतील पाणीपुरवठा, शेतीचे उत्पादन आणि अर्थव्यवस्था सगळंच या पावसावर अवलंबून असतं. म्हणूनच कदाचित आपल्या कथा, कविता आणि इतर कलांमधून पाऊस आपल्याला सतत भेटत असतो. पण हा सर्वाना आनंद देणारा पाऊस येतो कुठून? पावसाचे गाव कुठले आणि त्याची स्वत:ची गोष्ट काय? चला.. शोधू या.
जून ते सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसाला मान्सून किंवा नर्ऋत्य मान्सून असे आपण म्हणतो. पण नर्ऋत्य मोसमी वारे आणि नर्ऋत्य मान्सून आपण म्हणतो तेव्हा नर्ऋत्य (पश्चिम आणि दक्षिण यामधली दिशा) आणि पावसाचा काय संबंध? तर या नर्ऋत्येलाच मास्केरेनच्या बेटांत पावसाचं गाव आहे. भारतापासून ४००० कि.मी.वर हिंदी महासागरात मॉरिशसजवळ असलेली मास्केरेन बेटं भारतात येणाऱ्या मान्सूनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. एप्रिलच्या मध्यापर्यंत या प्रदेशात हवेचा जास्त दाबाचा एक पट्टा तयार होतो. हा जास्त दाबाचा पट्टा- ज्याला ‘मास्केरेन हाय’ म्हणतात- म्हणजेच मान्सूनचे उगमस्थान. जेवढी मास्केरेन हायची तीव्रता जास्त, तेवढी मान्सूनच्या वाऱ्याची तीव्रता जास्त असते.
इथून या वाऱ्यांचा प्रवास सुरू होतो. सर्वप्रथम ते आफ्रिकेच्या दिशेने वर वायव्य (उत्तर आणि पश्चिमच्या मधली दिशा) दिशेला सरकतात. आफ्रिकेतल्या सोमालियाजवळ विषुववृत्त ओलांडलं की हे वारे पूर्वेकडे वाहायला लागतात. वाऱ्याच्या या दिशाबदलाचं कारण आहे- ‘कोरिऑलिस इफेक्ट’ (Coriolis Effect)! पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि विषुववृत्ताच्या फिरण्याचा वेग हा इतर ठिकाणांच्या (उदा. उत्तर आणि दक्षिण ध्रुव) वेगापेक्षा जास्त असतो. यामुळे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे वाहणारे वारे उजवीकडे वळतात आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे जाणारे वारे डावीकडे वळतात. तर या ‘कोरिऑलिस इफेक्ट’मुळे मान्सूनचे वारे आता उजव्या दिशेला- म्हणजेच भारताच्या दिशेने वाहण्यास सुरुवात होते. वाऱ्यांच्या वाहण्याच्या दिशेचे एक सोपे तत्त्व आहे : वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाब असलेल्या ठिकाणांकडे वाहतात. याचे आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे टायरला छिद्र पडले (पंक्चर झाले) की टायरच्या आतील हवा बाहेर येते. कारण टायरच्या आतील दाब हा बाहेरील दाबापेक्षा जास्त असतो.
आता इकडे भारतात याच वेळेस उन्हाळा चालू असतो. उन्हामुळे जमीन तापते आणि हवेचंही तापमान वाढून हवा विरळ होते. हिमालयामुळेही उत्तरेकडून येणारे थंड वारे भारताच्या मुख्य प्रदेशात पोहोचू शकत नाहीत. या सर्वाचा परिणाम म्हणजे भारतात राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हाच कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या जास्त दाबाच्या वाऱ्यांना आकर्षति करतो. भारताच्या दिशेने निघालेले वारे अशा रीतीने बरोबर भारतापर्यंत पोहोचतात. इथून त्यांची दोन शाखांमध्ये विभागणी होते. एक- अरबी समुद्रातली शाखा केरळ, गोवा, कोकण अशी पश्चिम घाटाने उत्तरेकडे आणि घाट ओलांडून पूर्वेकडे भारतभर पसरत जाते, तर दुसरी बंगालच्या उपसागराची शाखा बंगालचा उपसागर, बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांकडे पाऊस घेऊन जाते.
मान्सूनवर अनेक गोष्टींचा परिणाम होण्याची शक्यता असते. तापमान, हवेचा दाब आणि त्यामुळे वाऱ्यांची बदलणारी दिशा आणि शक्ती या सर्वामुळे मान्सूनला एक तर मदत होते किंवा त्याचा मान्सूनवर नकारात्मक परिणाम तरी होतो. इंडियन ओशन डायपोल (Indian Ocean Dipole – IOD) ही अशीच मान्सूनवर परिणाम करणारी एक गोष्ट. हिंदी महासागरातील पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील तापमानातील तफावतीमुळे हा परिणाम होतो. जेव्हा पश्चिमेकडील सागराचे तापमान जास्त असते आणि पूर्वेकडे कमी असते, तेव्हा पश्चिमेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. याला ‘पॉझिटिव्ह डायपोल’ असे म्हणतात. या कमी दाबाच्या पश्चिमी पट्टय़ांमुळे नर्ऋत्येकडून येत असलेल्या मान्सूनला मदतच होते. पण याचा परिणाम पूर्वेकडील जास्त दाबाच्या पट्टय़ांवर होतो आणि इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या देशांत पावसाचे प्रमाण कमी होऊन तिकडे दुष्काळ पडण्याचा धोका निर्माण होतो. निगेटिव्ह डायपोलमध्ये याच्या उलट स्थिती निर्माण होते. पूर्वेकडे जास्त तापमान (कमी दाब), तर पश्चिमेकडे कमी तापमान (जास्त दाब) निर्माण होऊन त्याचा दुष्परिणाम मान्सूनवर होतो. अर्थातच या परिस्थितीचा फायदा इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांना जास्त पावसाच्या स्वरूपात मिळतो. न्यूट्रल डायपोलमध्ये तापमान जवळपास सारखं राहून त्याची परिणाम करण्याची शक्ती कमी होते. इंडियन ओशन डायपोल २० वर्षांपूर्वी शोधण्यात आलेला तसा नवीनच घटक असल्याने त्याच्या पूर्ण परिणामांचा अजूनही अभ्यास चाललेला आहे.
मान्सूनचा अंदाज व्यक्त करताना एल निनोची (El Niño) चर्चा होतेच. एल निनोचा परिणाम फक्त मान्सूनवरच नाही, तर जगाच्या हवामानावर पण होतो. ‘एल निनो’ म्हणजे स्पॅनिशमध्ये ‘लहान मुलगा’! तर या लहान मुलाचं आणि आपल्या मान्सूनचं नातं काय, आणि हा एल निनो आपल्या तोंडचं पाणी का पळवू शकतो, हे आपण पुढच्या रविवारी बघू.
parag2211@gmail.com