scorecardresearch

धूमकेतू

तेजसचा आज शेवटचा दिवस घरात सक्तीने एकटं बसण्याचा.

धूमकेतू
पहिला लॉकडाऊन उठला तेव्हा कंपनीने हळूहळू काही जणांना ऑफिसमध्ये पाचारण केलं.

डॉ. आशुतोष जावडेकर – ashuwriter23@gmail.com

तेजसचा आज शेवटचा दिवस घरात सक्तीने एकटं बसण्याचा. आणि नाही आजारी पडला तो. पहिला लॉकडाऊन उठला तेव्हा कंपनीने हळूहळू काही जणांना ऑफिसमध्ये पाचारण केलं. खरं तर घरातूनही काम करता आलं असतं; पण बॉसपुढे आपली कमिटमेंट मिरवण्यासाठी हौसेने, अहमहमिकेने लोक ऑफिसमध्ये यायला बघत होते. कारण नोकरी टिकवणे.. आहे त्या पगारात- हेही आव्हान असणार आहे याची जाणीव अनेकांना झालेली तोवर. तेजसला खरं तर जायचं नव्हतंच, पण एकूण रेटा पाहून तो गेला. नेमकं दोन-तीन दिवसांत त्याच्या शेजारी बसणारा पंटर आजारी पडला आणि करोना रुग्ण म्हणून घोषितही झाला. तेजसची ती बातमी ऐकल्यावर भीतीने गाळण उडाली. म्हणजे त्याला थिअरी सगळी माहीत होती, की करोना झाला तर लगेच कुणी मरत नाही.. सगळे मरतात असंही नाही, वगैरे; पण तरी त्याची अरिनच्या भाषेत सांगायचं तर विशुद्ध तंतरली. मग त्याचाही घशातून स्वाब घेतला गेला. आणि सुदैवाने तो निगेटिव्ह आला. पण तरी चार-पाच दिवसांनी पुन्हा टेस्ट केल्यावर चित्र वेगळं असू शकतं हे माहीत असल्याने त्याची रवानगी घरी खोलीत झाली. बायको आणि मुलगा त्याच्या सासुरवाडीच्या गावी आधीच गेलेले होते. तिचं ऑफिस आणि पोराची ‘झूम-शाळा’ तिथून सुरळीत चालू होतीच. त्यामुळे बातमी ऐकल्यावर ते दोघं होते तिथेच थांबले. तिला परत एकटीला यावंसं मनातून वाटलं; पण तेजस त्यांना येऊ देणार नव्हताच. सुदैवाने काही झालं नाही त्याला. दहा-पंधरा दिवस घरातून काम करण्यात आणि रात्री वेबसीरिज बघण्यात गेले. आणि रोज माहीचे आणि अरिनचे त्यांच्या ‘विशी-तिशी-चाळिशी’ ग्रुपवर धीर देणारे मेसेज पडत होतेच. आज सुटकेचा आनंद व्यक्त करायला तिघे रात्री झूमवर भेटणार होते. त्यांनी चायनीज नको म्हणून दोन-तीन नव्या भारतीय साइट्स ट्राय केलेल्या.. पण अखेर झूम त्यांना सोयीचं- किंवा खरं तर सवयीचं वाटल्याने तिथेच भेट ठरली होती. आणि बऱ्याच काळाने. माही लग्न करून हनिमूनला धीरजसोबत स्पेनला गेलेली आणि मग आल्यावर नव्या संसारात अडकली. मधे तेजस आणि अरिनचा काहीतरी खटका उडाला आणि दोनेक महिने त्यांचं संभाषण मंदावलं. आणि मग बघता बघता करोनापर्व अवतरलं! भेटीगाठींची शक्यता दुरापास्त झाली. घरी बसून काहींची वजनं कमी, तर काहींची अधिक झाली. सृष्टीमध्ये सूर्य आणि चंद्र, आकाश आणि तारे नित्यनेमाने उगवत, चमकत राहिले तरी माणसांची मनं ध्रुवताऱ्यासारखी अविचल राहिली नाहीत. कुणाचं घरचं माणूस करोनाने हिरावून घेतलं.. कुणाचं स्थैर्य, कुणाचे स्पर्श, अनेकांचं वित्त! एक उद्वेग माणसांच्या मनात भरून राहिला. झूमवरच्या हौजी आणि अंताक्षरीचा कंटाळा आला. घरकामाने पिट्टय़ा पडायची वेळ आली. या सगळ्याची चिडचिड नकळत सुरांमध्ये डोकावली. मास्कचा नुसता कंटाळा कंटाळा आला. साबण फेकून द्यावा दूर असं बाराव्यांदा हात धुताना वाटलं. आणि मग वेबिनारचाही वीट येऊ लागला. सेल्फ-हेल्पची प्रवचनं एका कानावर पडून दुसऱ्या कानानं हवेत जाऊन विरू लागली. एक छोटा व्हायरस- डोळ्यांना न दिसणारा, हात-पाय-तोंड नसलेला, माणसाइतकं भलंमोठ्ठं डोकं नसलेला- सगळ्या जगावर राज्य करू लागला आणि मनुष्यजात गोंधळली, भांबावली.

‘‘तेजस, तुझा ऑडिओ ऐकू येत नाहीये.’’ अरिनने जरा वरच्या पट्टीत बजावलं. तेजसने पुन्हा सेटिंग हलवली आणि अखेर तिघे दोस्त संवाद साधू लागले.

‘‘अगं माही, काय मस्त टॉप आहे हा!’’अरिन म्हणाला.

‘‘मग? आज आपण इथे भेटणार म्हणून मुद्दाम घातला. नवा आहे. खाली काय घातलंय विचारू नकोस.’’ माही म्हणाली आणि सगळे हसायला लागले. ऑनलाइन मीटिंगचा ड्रेसकोड हा शरीराच्या फक्त वरच्या भागात असतो तसाही.

‘‘आणि तुम्ही दोघे सँडोमध्ये काय बसला आहात? निदान टी-शर्ट तरी बरा घालायचा.’’ माही पुढे दोघं पुरुषांना म्हणाली.

‘‘अगं, काय साला उकडतंय. पाऊसही गायब आहे यार.  तू आहेस म्हणून आम्ही सँडो घातलेत. दोघेच असतो तर तेही एव्हाना काढले असते.’’ तेजस हसत म्हणाला. त्याचा आवाज आनंदी होता. सुटकेचा आनंद. आपण करोनातून बालंबाल वाचलो याचा आनंद. ते तिघे भेटत-बोलत आहेत याचा आनंद..

मग सगळ्यांनी आधी काय काय टाइमपास गप्पा मारल्या. सगळ्या चौकशा झाल्या. गीतामावशी तिकडे कोकणात तिच्या गावी होती आणि सुरक्षित होती. धीरज स्पेनलाच कामासाठी गेलेला- तो अडकला होता तिथे; पण परत आलेला सुखरूप. माहीचे आई-बाबा घरात सांभाळून होते. मुळात अरिनचा असलेला आणि नंतर तिघांचा मित्र झालेला अस्मित नगरला शेतात अडकला होता. रेळेकाका अमेरिकेतून भारतात परत आले होते.

‘‘कसं  वाटलं तुला एकटं एकटं राहताना तेजस?’’ माहीने विचारलं.

‘‘खूप काळाने असा राहिलो. एकदा चेन्नईला  कन्साइन्मेंटसाठी गेलेलो आणि दंगे झालेले तिथे, त्यामुळे हॉटेलवर अडकलेलो. पाच दिवस. पण ते वेगळं होतं. खरं सांगू, पहिल्यांदा भय वाटलं, मग कंटाळा आला आणि मग नकळत मन विचारांत हरवायला लागलं. किती निर्थक गोष्टींमध्ये आपण जीव जडवलेला असतो याची जाणीव झाली.’’

अरिनने पटकन् तिरकसपणे विचारलं, ‘‘त्या यादीत आमचा नंबर नाही ना लागला?’’

माहीने त्याला दाटलं. पण तेजस त्याच्याच विचारांच्या लयीत बोलत राहिला. म्हणाला, ‘‘अर्थात तुम्ही तिघं नाही. माझी बायको आणि मुलगा नाही. अजून साधारण दहाएक लोक नाहीत. पण बाकी गोतावळा मला आपण का बाळगतो, बाळगला याचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. त्याच्यात शक्ती खर्च करू नये असंही वाटलं. समजा, मी मेलो-’’

‘‘गप रे! काय बोलतोस..?’’ माहीने अडवलं. पण तेजस बोलत गेला.. ‘‘तर मेलो तर मला कोण आठवेल याचा विचार केला. त्या संध्याकाळी गच्चीत बसून एकटा श्लोक म्हणत होतो. ‘गीताई’मधल्या त्या मला आवडणाऱ्या ओवी आल्या. ‘न भंग पावे भरता ही नित्य / समुद्र घेतो जिरवूनि पाणी..’ मग एकदम वाटलं की, आपण अनेकांना जिरवून घेतलं खरं; पण समुद्रासारखे आपण थोडेच होतो? भंग पावत गेलो. प्रत्येक नात्यासोबत जोडत आणि तुटतही गेलो. आता पुरे असं वाटलं. मोजके माझे लोक सोडून फार कुणी नसावं आसपास असं वाटलं. मग मी माही खरं सांगतो, त्या दिवशी करोनाचे आभार मानले हात जोडून! म्हटलं, लेका, तू आलास म्हणून आम्हाला हा असा विचार करायची मुभा मिळाली.’’

अरिन एकदम म्हणाला, ‘‘दा, सॉरी, तुला उगीच डिवचलं मी. तू स्टेबल राहा. आणि आम्ही असणार आहोत ना रे सोबत.’’ माही सुंदर हसली. प्रसन्नपणे. तिघं एक क्षण थांबले. मग माही म्हणाली, ‘‘आता या महिन्यापासून माझा आणि धीरजचाही पगार निम्मा होणार आहे. नुकताच हा नवा फ्लॅट बुक केला, त्याचे हप्ते सुरूझालेत. बघू या.’’ तिने सुस्कारा सोडला आणि मग जणू स्वत:ला समजावत म्हणाली, ‘‘पण निदान आपण मरणार नाही भुकेने. अनेक जण असंच  चालू राहिलं तर मरणार आहेत, हे नक्की.’’

अरिन मग बोलला, ‘‘आमची तर बॅच संपलीच आहे. नव्या नोकऱ्या वगैरे नाहीत, पीजीच्या अ‍ॅडमिशनचं नक्की नाही; पण मी सगळ्यात काय मिस करतोय सांगू? आणि हसू नका- आय मीन इट- मी मुलीचा स्पर्श मिस करतोय! मला सवय नाहीये असं व्हर्जिन मुलासारखं घरी एकटं नुसतं पॉर्न बघत बसायची.’’

माही म्हणाली, ‘‘बरंच आहे जरा. तेजससारखा तुझाही विचार होईल. नाही तरी जास्तच मग्न असतोस तू या कामामध्ये.’’ ‘काम’ शब्दावरचा श्लेष जाणून तिघं हसले आणि शांत राहिले. सगळे प्रश्नच जिथे संदिग्ध होते, तिथे उत्तरं काय ठाशीव मिळणार होती!

मग माही म्हणाली, ‘‘ऐका.. ठरवून तिघं निदान अर्धा तास रविवारी असे भेटत जाऊ. आपण नुसते समोर दिसतोय ना, त्यानंही चांगलं वाटतंय.’’

अरिन म्हणाला, ‘‘सवाल! भेटायचंच.’’

तेजस म्हणाला, ‘‘त्या ‘गीताई’मधला स्थितप्रज्ञ मी केवळ तुमच्या दोघांच्या प्लॅनमुळे आता होणार नाही. नाही तर अल्मोस्ट झालोच होतो. आता गुंतणं आलं पुन्हा.’’ तिघं जोरात हसले. मीटिंग एन्डचं बटण दाबतानाही जेव्हा तेजसचा हात थरथरला तेव्हाच त्याला जाणवलं, की स्थितप्रज्ञ तर खरा तो निर्मम करोना व्हायरसच! पण मग त्याला जाणवलं की, त्या व्हायरसला प्रसन्नता नावाची गोष्ट अवगत नाही! ‘प्रसन्नतेपुढे सर्व दु:खे जाती झाडूनिया/ प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे..’ त्याने दोन ओळी मनात घोकल्या आणि हसत खुर्चीतून उठून बाहेरच्या गच्चीत जाऊन त्याने दूरवरचं चमकणारं  क्षितीज बघितलं. सध्या आकाशात दिसणारा निओवाईज धूमकेतू त्याला काही दिसला नाही; पण धूमकेतूसारखी शांत प्रसन्नता मात्र त्याला एकाएकी भेटून गेली!

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-08-2020 at 00:14 IST