हा हा म्हणता वर्ष सरते आणि डिसेंबर महिना येतो. आता आता सुरू झाल्यासारखे वाटणारे २०१४ संपतेय. ऋतू कूस बदलतोय. थंडीची चाहूल लागलीय. स्वेटर, मफलर, जॅकेट्सना बरे दिवस आले आहेत. गुळाची पोळी, तेलपोळी खाण्याचे वेध लागले आहेत. मोसम केक्सचा आहे. मोसम लग्नसराईचा आहे, मोसम १४-१५ पकी उरलेल्या सी.एल. संपविण्याचा आहे. वर्षभरात घेतलेल्या कन्सेशन्स आणि ऑफस्चा हिशेब लावून एकही फुकट घालविण्याचे महापाप आपल्या हातून घडू नये म्हणून काळजी घेण्याचा आहे. वर्षांच्या शेवटच्या आठवडय़ाच्या प्लॅिनगचा आहे. २५ डिसेंबर- चौथ्या शनिवारला जोडण्यासाठी एका शुक्रवारच्या अ‍ॅडजस्टमेंटचा आहे. ३१च्या साजरीकरणाचा बेत आखण्याचा आहे. मोसम टी.व्ही.वरील अर्थशून्य नाचाचे कार्यक्रम आणि विवेकरहित मालिकांमधील वर्षांअखेरांच्या सेलिब्रेशन्सचा आहे. मोसम गेल्या वर्षांच्या ‘रीकॅप’चा आहे. गेलेल्या महानुभावांच्या स्मृती जागृत करण्याचा आहे. फसलेल्या योजनांच्या विच्छेदनाचा आणि मिळालेल्या उपलब्धीच्या उदो-उदोचा आहे.
कोणत्याही वर्षांचा हा बारावा महिना मला आजवर नेहमीच वेगळा वाटत आला आहे.  एक तर वातावरण अतिशय आल्हाददायक असते. १०-११ महिने कपाटात किंवा बॅगेत दडून पडलेल्या उबदार कपडय़ांना ऊन दाखविणारा हा महिना. जसे लग्नसमारंभ साजरे होतात, तसेच शाळा-कॉलेजेसच्या स्पोर्टस् आणि गॅदिरग इव्हेंटस्चा प्रारंभ होतो. विद्यापीठाचे आवार तर तरुणाईने फुलून जाते. घरचे लग्न असल्यासारखी मंडळी राबू लागतात आणि मरगळ झटकली जाते.
‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा..’ला अनुसरून रस्त्यावर सकाळी वॉकला जाताना गुरखा मंडळी वाळक्या काडय़ांच्या शेकोटीभोवती ऊब घेताना दिसतात. वॉकला जाणारे पायही मग रेंगाळतात. तेवढय़ात सायकलवरचा अन्ना चाय-कापी घेऊन येतो आणि त्या कॉफीचे घुटके बरिस्ता आणि स्टारबक्सलाही लाजवितात. रस्त्यावरच्या धुक्यातून पहाट उमलत असते आणि हायवेवरून जाणारी एखाद्-दुसरी गाडी फॉगलॅम्पची मिजास मिरवत असते. पाश्चात्त्य देशात तर तुम्ही कामावर जाता तेव्हाही अंधार आणि धुके आणि पाच-सहाला संध्याकाळी परतता तेव्हाही अंधार, या पाश्र्वभूमीवर आपल्याकडे सूर्याची किरणे म्हणजे डिसेंबरातली परमेश्वराची मेहेरनजरच. तोही बापडा आपला नेहमीचा भाजका स्वभाव सोडून उबदार होतो आणि ‘उन्हं खाण्याची’ हुक्की येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्केटमध्ये सेल लागतात आणि वर्षभरात न खपलेला माल खपविण्याच्या नवनव्या शकला लढविल्या जातात. महिना ‘कभी न देखे हुए डिस्काउंटचा’ आहे, महिना ‘एकके उपर एक फ्री’चा आहे, महिना खरेदीचा आहे आणि खरेदी-विक्री या घटना उत्सवामध्ये परावíतत होण्याचा आहे. महिना ख्रिसमसचा आहे, कॅरोल-गाण्यांचा आहे. सिग्नलला विकत घ्यायच्या पांढऱ्या गोंडेदार लाल सान्ताच्या टोप्यांचा आहे. महिना भेटींसाठी दरवाजाला टांगून ठेवायच्या मोज्यांचा आहे. महिना पेस्ट्रीज आणि नॉनव्हेज बिर्याणीचा आहे. महिना चर्चच्या घंटानादाचा आणि प्रभूपित्या येशूच्या आळवणीचा आहे.
महिना हिवाळी अधिवेशनाचा.. रविभवनाच्या डागडुजीचा.. आंदोलन-मोच्रे-धरणांचा.. महिना बंद पडणाऱ्या सभागृहाचा.. महिना कृतिशून्य चर्चाचा आणि महिना शासकीय उधळपट्टीचा आहे.
… गेल्या काही वर्षांत मात्र खूप काही बदललंय. महिना अवकाळी पावसाचा.. महिना गारपिटीचा.. महिना विटांएवढय़ा गारांचा.. झोपलेल्या द्राक्षबागांचा.. कुजलेल्या केळ्यांचा..तुडविलेल्या हाता-तोंडाशी आलेल्या जिराईत-बागाईताचा! महिना तोंडचे पाणी पळालेल्या..ओठातून घास हिसकावून घेतलेल्या शेतकऱ्यांच्या भकास नजरांचा! गळफासलेल्या आत्महत्यांचा..धडधडलेल्या चितांचा ठरतोय. काळी टपोरी मोत्यासारखी अनाबेशाही अदृश्य झाली आहेत. युरोपात पाठवायचे पेटारे भकासपणे आकाशाकडे तोंड लावून पडले आहेत. वाईन रीजचीही धन व्हायचीही सोय नाही.. कापसाची बोंडे कुजली आहेत, केळीच्या बागा उद््ध्वस्त झाल्या आहेत आणि बळीराजा निसर्गाने कान पिळल्यागत उदास बसून आहे.
मला उद्विग्नता येतेय, ती आपल्या नाकत्रेपणाची. ग्लोबल वॉर्मिगवर परिषदा भरविण्यात धन्यता मानणारे आपण, होणाऱ्या मोसमी बदलांची पूर्वसूचना मिळविण्यात आणि उपाय योजण्यात अपयशी ठरत आहोत याची. नियोजनशून्यतेच्या शापातून बाहेर पडण्याचा संदेश डिसेंबर २०१४ आपल्याला देता झाला आहे. बदलणाऱ्या मोसमाबद्दल अधिकाधिक सजग व्हा हेच वारे आता वाहत आहेत, घोंघावत आहेत आणि आपण मात्र कान आणि डोळे झाकून बसलो आहोत.
गरज आहे ते निसर्गाकडून खूप काही शिकण्याची. डिझॉस्टर मॅनेजमेन्टच्या चर्चा खूप झाल्या, अवकाळी पाऊस आणि दुष्काळ या दोन्ही बाबींचा नॅचरल डिझॉस्टर्स म्हणून समावेश करण्याची, योजना आखण्याची आणि साधनबद्धतेची. पुढचा कोणताही डिसेंबर माझ्या लाडक्या शेतकऱ्यांच्या ताटातला घास हिसकावता कामा नये यासाठी खूप काही करण्याची.

मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: December
First published on: 21-12-2014 at 01:01 IST