मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com
कोण निर्माण करतं नातीगोती? या जगात स्त्री आणि पुरुष याच आदिम काळापासून चालत आलेल्या जाती आहेत, बाकी सगळे मुलामे आहेत? खोटे मुखवटे आहेत? की ‘संस्कृती’ नामक गोष्टीमुळे आपण नात्यांना नाव द्यायला लागलो? आपण आपल्या सोयीनुसार नाती तयार केली, निभावली. कारण आपल्या एका सुरक्षित कवचाच्या आड ते सहज शक्य होतं. परंतु आयुष्यात काही फासे असे पडतात की नात्यांच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह उभं राहतं. ‘मौसम’ ही संकल्पनाच अशी आहे की यात एकसारखेपण अभिप्रेतच नाही. मौसम म्हणजे काही काळ असणारा माहोल. मग तो सुखाचा, दु:खाचा, संघर्षांचा, प्रणयाचा, विरहाचा, प्रतारणेचा आणि पश्चात्तापाचासुद्धा! आयुष्य एकसारखं नसतंच कधी. त्या- त्या वेळी ते अनुभव स्वीकारण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. आणि एकाच्या आयुष्यातला सुंदर ऋतू हा दुसऱ्याच्या आयुष्यातला वैराण ऋतू असू शकतो. मौसम आपल्याला पकडून ठेवता येत नाही; गोठवून ठेवता येत नाही. पुन्हा त्याची यायची वेळ आल्यावरच तो येणार असतो. आणि आपल्याला तो मुद्दाम आणतासुद्धा येत नाही. स्त्री-पुरुष नातं.. बदललेले संदर्भ.. त्यातून बदललेल्या भूमिका.. नात्यांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन.. त्यातून निर्माण झालेली गुंतागुंत यांचं मनोज्ञ चित्रण म्हणजे १९७५ साली आलेला गुलजार दिग्दर्शित, संजीवकुमार आणि शर्मिला टागोर यांच्या अभिनयाचा उत्तुंग आविष्कार असणारा ‘मौसम’! गुलजारजी ज्या उत्कटतेने या सगळ्या भूमिकांमध्ये, त्यांच्या भावनिक आंदोलनांमध्ये गुंतले, तेवढय़ाच तीव्रतेने संगीतकार मदनमोहनजींनी त्यात पूर्णपणे सर्वस्व पणाला लावल्याचं जाणवतं. स्वत:ची शैलीसुद्धा त्यांनी जणू ‘थोडासा मोड दे दो’ म्हणत किंचित बदलली. त्यांच्या गझलचा रंग आणि या गाण्यांचा टोन यात किती फरक आहे? ‘दिल ढूंढता है..’सारख्या गाण्याची दोन रूपं आणि काळ कितीही क्रूर वागला तरी जे गाणं कधीच विस्मृतीत जाणार नाही असं ‘रुके रुके से कदम..’! अंतर्मनाचा तळ ढवळून काढण्याचं सामथ्र्य या गाण्यांत आहे. हा चित्रपट खरं तर एका फसव्या चित्रासारखा आहे. आपण ज्या कोनातून बघतो त्याप्रमाणे दिसणारा. म्हणजे ही गोष्ट चंदाची, डॉक्टरची की कजलीची? याला उत्तर नाही. यात प्रमुख भूमिका ‘परिस्थिती’ या एका विलक्षण घटकाची आहे. आयुष्यात सरळ काही घडतं, तर काय हवं होतं? अमरनाथ हा मेडिकलचा विद्यार्थी शेवटच्या परीक्षेच्या अभ्यासाला म्हणून दार्जिलिंगला जातो काय, तिथे चंदा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडून तिला लग्नाचं वचन देऊन परत जातो काय! आणि नंतर अशा काही घटना घडतात, की तो पुन्हा कधीच परत येत नाही. हातून एक रुग्ण मृत्यू पावल्याच्या प्रकरणी त्याला शिक्षा होते आणि त्या शरमेनं तो कधीच चंदाला भेटत नाही.. चंदा डोळे विझेपर्यंत त्याची वाट बघते. वेडी होते. एका वयाने मोठय़ा, अधू माणसाबरोबर तिचं लग्न होतं. तिला मुलगी होते. हुबेहूब तिच्यासारखीच दिसणारी. पण विधवा आणि वेडय़ा स्त्रीच्या सुंदर मुलीची व्हायची तीच तिची विटंबना होते. कजली तिच्या काकाच्या वासनेची शिकार होते. वेश्या व्यवसायात ढकलली जाते. स्त्री-पुरुष नात्याचे ‘कोमल’, ‘पवित्र’, ‘वत्सल’ वगैरे संदर्भ तिच्या कोशातून कधीच हद्दपार होतात. अशा एका वळणावर तिच्यासमोर एक पुरुष उभा राहतो- जो तिला फार वेगळ्या जगात घेऊन जाऊ इच्छितो. कारण तो तिच्याकडे बाजारातली स्त्री म्हणून बघतच नाही. पण परिस्थिती अशा पेचात पकडते की डॉक्टर आणि कजली हे एकमेकांकडे सर्वस्वी विरोधीभावाने बघतात. हा विरोधाभास भयंकर आहे.. न पचणारा आहे.. न झेपणारा आहे. कारण आपण अशा काही पेचाची आपल्या सरळसोट, धोपटमार्गी आयुष्यात कल्पनाच केलेली नसते.
ही कहाणी सुरू होते ती एका प्रवासापासून आणि संपतेसुद्धा एका प्रवासानेच. २५ वर्षांनंतर डॉक्टर पुन्हा दार्जिलिंगला निघालाय. सुट्टी घालवण्याचं निमित्त करून. पण खरं तर चंदा कुठे असेल? कशी असेल? हे शोधायला. त्याची मर्सिडिझ घाटातला रस्ता कापत निघालीय. त्यात ओढ आहे ‘ते’ दिवस पुन्हा शोधायची. ‘तो’ मौसम पुन्हा भेटतो का, ते बघण्याची. पाश्र्वभूमीवर भूपेंद्रसिंगचा आवाज फार हळवा, कातर झालेला. डॉक्टरच्या मनातला प्रचंड कल्लोळ कसाबसा थोपवून व्यक्त होणारा.
‘दिल ढूंढता है..’ (भूपेंद्रसिंग)
आयुष्यातले ‘ते’ क्षण का नाही धरून ठेवता आले? आता त्यांना शोधायला निघालोय मी. या दऱ्याखोऱ्यांत, पानाफुलांत. फिर वही ‘फुरसत’ के रात-दिन. ‘ते’ दिवस तसेच हवेत मला. तेव्हा होते तसेच. तो काळ का नाही गोठवून ठेवता आला? ती ‘फुरसत’, तो सुकून, तो ठहराव.. जेव्हा आयुष्यात कुणीतरी असं भेटलं होतं! जिच्यासोबत प्रत्येक क्षण भरीव, टपोरा होता. खूप काही देणारा, फुलवणारा होता. एकमेकांच्या विचारांत,अनेक स्वप्नांत बुडून जात होतो आपण. असं बुडून राहायला फुरसत होती तेव्हा. एकमेकांच्या बारीकसारीक लकबी न्याहाळण्यात फुरसत होती.. वाट पाहण्यात होती.. भांडण्यात होती.. कुठे गेली ती? आता मी असा भकास.. उद्ध्वस्त. कुठे शोधणार ती हवीहवीशी वाटणारी हुरहूर? भूपेंद्रच्या आवाजात ती सल आहे. तो आवाज काळजात कळ उमटवत येतो. कारण आता त्या आठवणींना पश्चात्तापाची किनार आहे. स्वत:हून त्या सुखाला पारखे झाल्याची खंत आहे. स्वत:शीच बोलतोय तो. का झालं माझ्या आयुष्यात असं? हे शब्द तरी माझे कुठे आहेत? त्या वेडीच्याच या कल्पना..
‘जाडों की नरम धूप और आंगन में लेट कर
आंखो पें खिंच कर तेरे दामन के साये को
औंधे पडे रहे कभी करवट लिये हुये..’
..असलंच काहीतरी असायचं तिच्या मनात.. दोघांनी झेललेला तो थरार आठवणीत राहिलाय फक्त आता..
भूपेंद्रचा आवाज थबकत येतो. पहिला ‘दिल’चा पंचम एका अंतराळातून आल्यासारखा. पडद्यावर दिसते ती एक कार. घाटातून वेगानं- निघालेली. त्याच्या खर्जाला साथ देणारे चेलो आणि contrast देणारी व्हायोलिन्स.. पडसादासारखी येणारी बासरी.. भरीव, पण हळवी. अजून अडखळायला होतंय. म्हणून ‘जाडों की नरम धूप और..’ असे थांबतच शब्द येतायत. स्वत:शी पुटपुटल्यासारखे. ‘आंचल के साये को’ला आत्तापर्यंत नसलेला कोमल धैवत चर्रकन् कापत जातो. खूप काही सांगून जातो. जे गमावलंय त्याचं दु:ख काय आहे, ते सगळं तो ‘साये’वरचा कोमल धैवत सांगतो. हे क्रूर वास्तव आहे की हा भूतकाळ होता? मग खरं तर पुढे- पाठीवर उन्हं झेलत मस्त पहुडण्याच्या त्या स्वप्नाला काही अर्थ उरत नाही. ती आता फक्त या स्वप्नांचं अस्तित्व दाखवणारी एक आठवण. जणू फांदीवर एक उदास देठ आहे म्हणून समजायचं, की इथे फूल होतं कधीतरी.. दिसतायत की आत्तासुद्धा तेच डोंगर.. म्हणजे हे नक्की घडून गेलंय की. हे झरे तसेच.. या वाटा तशाच. पण पुन्हा ‘देर’ तक वर तोच कोमल धैवत.. नको नको ते वास्तव! शेवटी, ‘दिल ढूंढता है.. फिर वही.. फुरसत के रात दिन’ हे शब्दसुद्धा त्यांच्या जागा सोडून ऑफ बीट येतात.. अडखळतात.. खरं तर एका अडखळून पडण्यातूनच ही कहाणी घडलीय..
डॉक्टर अमरनाथ गिल मेडिकलच्या अभ्यासासाठी दार्जिलिंगला आलाय. पायऱ्या उतरत असताना पाय घसरून पडण्याचं निमित्त होतं आणि मुरगळलेल्या पायावर इलाज करण्यासाठी रस्त्यात भेटलेली चंदा त्याला स्वत:च्या वडिलांच्या दवाखान्यात जायला सांगते.अतिशय निरागस, पण सडेतोड स्वभावाची.आपले वडील, त्यांचा दवाखाना, त्यांना आणून द्यायच्या जडीबुटी यांच्या पलीकडे विश्व माहीत नसलेली. इंग्रजीचा गंध नसणारी. पण उपजत ग्रामीण व्यवहारी चातुर्य असणारी चंदा. अगदी स्वत:च्या वडिलांची तब्बल ‘तीन’ रुपयांची छडीसुद्धा हा पाहुणा लाटतोय की काय असं वाटून सतत ती छडी हस्तगत करण्याचा प्रयत्न करणारी. पण छडी सांभाळता सांभाळता मन केव्हा देऊन बसते तिचं तिलाच कळत नाही.
‘छडी रे छडी कैसी..’ (लता, रफी )
ते नातं वेगळंच..
नेहमीसारखी नुसती झाडांमागची पळापळ नाहीए इथे. तर छडी हे केवळ निमित्त. दोघांचं त्या झऱ्याच्या निवळशंख पाण्यासारखं जगणंच दिसतं त्यातून. कसलाच आविर्भाव नाही, तर एकमेकांच्या तीक्ष्ण संवेदनांना जपणं आहे फक्त.
‘सीधे सीधे रास्तों को थोडासा मोड दे दो
बेजोड रूहों को हलकासा जोड दे दो
जोड दो न टूट जाये सांस की लडी..’
का चालायचं मळलेल्या वाटेवरून? देऊ या की त्याला हलकासा मोड. एक वेगळं वळण जगण्याचा तो काटा, तो ‘आस’ थोडासा ढळला, तर त्यात ‘मझा’ आहे.. त्यात धडपडणं, वाहणं आहे. किंचित बहकणं आहे. आणि म्हणूनच थरारही.. तुझं-माझं नातं कधीच शिळं होणार नाही, कारण त्यात ‘असे’ मोड, ‘अशी’ वळणं असतील. आपल्या आत्म्यांना जोडणारी ही श्वासांची लड आहे.. ‘बेजोड रूह..’ काय तुफान आहे हा शब्द! कितीतरी आत्म्यांना शेवटपर्यंत जोड मिळतच नाही.
‘लगता है सांसो में टूटा है कांच कोई
चुभती है सीने में धीमी सी आंच कोई
आंचल से बांध ली है आग की लडी..’
काय आहे हा जाळ.. ही धार? एखादी काच श्वासात फुटावी तशी ही चरचरत जाणारी ओढ. आगच बांधलीय पदरात.. तुझ्या प्रेमाची.
‘सीधे सीधे रास्तों को हलकासा मोड दे दो’ आणि ‘लगता है सांसो में टूटा है कांच कोई’ या दोन्ही ओळी ज्या पद्धतीनं खाली येतात तो खास पर्वतराजीतल्या लोकसंगीताचा ‘फील’ घेऊन.. इथे ते गाणं क्षणात ‘तिथलं’ बनतं. तो मंद्रातला पंचम काय सुरेख लागलाय दोघांचा. आणि ‘हथकडी’वरची तान किती सहज यावी? त्या उंचसखल माळावर फिरताना शर्मिला ज्या सहजतेनं फिरते, त्या तिच्या हालचालींना अत्यंत शोभणारी ती तान आहे. त्यात तिचं खटय़ाळ, मिश्कील असणं आणि मुख्य म्हणजे काहीसं ऑफ बीट जगणं दिसतं. प्रचंड उत्कटपणे डोळ्यातून बोलणारी आहे चंदा.. ‘आंचल में बांध ली है आग की लडी’ म्हणताना त्या ‘आग’ शब्दावर एक किंचित जोर आहे. तिचा निर्धार दाखवणारा. हे गाणं इतकं नैसर्गिक का वाटतं? तर त्या मुक्त बागडण्यात, एकमेकांना चिडवण्यात, छडीवरून भांडण्यात एक विलक्षण वेगळा romance आहे.. त्यात झाडाआड लपाछपी, जवळीक साधण्याचा प्रयत्न यातलं काहीच नाहीए..
आठवणींत हरवलेला डॉक्टर अमरनाथ भानावर येतो. सकाळी फिरायला म्हणून निघालेल्या डॉक्टरनं मनानं कितीतरी मोठा पल्ला पार करून भूतकाळात भटकंती केलेली असते. मग सुरू होतो तो चंदाचा शोध.. चंदा कुठेच भेटत नाही. ती या जगात नसेल अशी शंकासुद्धा त्याला सहन होत नाही. ती कुठे असेल? कुठल्या अवस्थेत असेल? आता समोर आली तर..? अनेक कल्लोळ डोक्यात घेऊन अमरनाथ तिला शोधत असतो. तिच्या मुलीला ओळखणार कसं? या प्रश्नावर अमरनाथ अंतर्मुख होतो. त्याला वाटतं, चंदाच्या मुलीला तिच्या आवाजावरून नक्कीच मी ओळखू शकेन. कारण त्यात एक खनक होती.. एक ‘पुकार’ होती.. एखाद्या मुक्त विहरणाऱ्या पक्ष्यासारखी त्यात ढगांना, उंच झाडांना भेदून जाणारी धार होती. हिमाच्छादित पर्वतांमध्ये गुंजणारा तो स्वर होता.. इथं या दऱ्याखोऱ्यांत गुंजणारा तो दिव्य आवाज आपल्याला पुन्हा भूतकाळात नेतो..
‘दिल ढूंढता है..’ (duet).. ‘मेरे इश्क में..’ आणि नितांतसुंदर ‘रुके रुके से कदम..’ या गाण्यांबद्दल उत्तरार्धात..