पण तिची धोरणं काय आहेत हे मला माहीत नाही,’’ असं कमला हॅरिसबद्दल मला एक भारतीय-अमेरिकी शेजारीण म्हणाली होती. बरोब्बर २०२४ च्या अमेरिकी निवडणुकीमध्ये ट्रम्प निवडून येण्याआधी. सहा वेळा दिवाळखोरी जाहीर करणं, बलात्कार करणं, ३४ स्वतंत्र गुन्हे सिद्ध होण्याएवढे पुरावे सोडणं, ही तिची धोरणं नसावीत, असं मला म्हणायचं होतं, पण म्हणाले नाही ते बरं झालं.

हल्लीच एक व्हिएतनामी मैत्रीण म्हणत होती, ‘‘ट्रम्पसारखा इसम शेजारी म्हणूनही मला नको आहे. माझ्या परिसरात कुठेही असला माणूस असलेला मला आवडणार नाही. अशा माणसाला लोक मत देऊन राष्ट्राध्यक्ष कसा काय बनवतात हे मला समजत नाही.’’ ती एवढ्या पोटतिडकीनं बोलत होती की मी तेव्हा गाडी चालवत नसते तर तिचा हात हातात घेऊन तिच्या संतापात सहभागी झाले असते.

भारतीय शेजारणीबरोबरचा संवाद झाल्यानंतर काही महिन्यांनी ट्रम्प निवडोनि आले. आणि या सगळ्याशी संपूर्ण असंबद्ध संवादामध्ये या शेजारणीच्या नवऱ्यानं आम्हा दोघांना इतर काही भारतीय शेजाऱ्यांच्या बरोबर घरी चहापाण्यासाठी बोलावलं. ‘‘तोंड बंद ठेवणं फायद्याचं असतं; नैतिकता वगैरे काही नसतं.’’ त्या शेजाऱ्यांकडे जाताजाता ही गोष्ट मी बऱ्या अर्ध्याला सांगितली आणि वर ही मल्लिनाथीही केली. ‘‘तुलाच फेसबुक आणि कुठेकुठे लिहीत सुटण्याची खाज असते,’’ असं तोही म्हणाला नाही. (बरा अर्धा म्हणजे better half. अर्धांग.)

‘‘सोमवारी संध्याकाळी बोलावलंय त्यांनी. एरवी लोक विकेण्डला भेटतात.’’ बरा अर्धा म्हणाला. त्यावर मी म्हणाले, ‘‘आपल्याला स्वयंपाक न करता जेवण मिळणार आहे, नंतर भांडी घासायला लागणार नाहीयेत. सोमवार काय आणि शनिवार काय!’’ आम्ही तिकडे पोहोचलो तर इतर पाहुणे आले नव्हते.

तेव्हा ट्रम्प यांनी नुकतंच अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना ( illegal immigrants) सैन्याच्या विमानांमधून त्यांच्या मूळ देशात पाठवायला सुरुवात केली होती. काही दिवस आधीच काही भारतीयांचा नंबर लागला होता. इलॉन मस्कनं सरकारी कर्मचारी कमी करण्याचं नाजूक काम कोरीवकामाच्या सुरीनं करण्याजागी ‘चेनसॉ’ चालवायला घेतली होती. आम्ही दोघं दिवाणखान्यात बसलो. तिथे तिचे आई-वडील आणि ते दोघंही बसले. थोड्या वेळात आणखी एक जोडपं आलं आणि त्या तिघी स्वयंपाकघरात गेल्या. मी खूप तन्मयतेनं तिच्या वडिलांचं म्हणणं ऐकत होते. ‘‘अमेरिकेनं किती पैसा खर्च केला चंद्रावर जायला, आणि भारतानं किती स्वस्तात चंद्रयान पाठवलं,’’ असं काका म्हणत होते. १९६९ साली जेव्हा चंद्रावर दोन माणसं उतरली तेव्हा कम्प्युटर किती महाग असतील आणि त्यांची क्षमता माझ्या तीन वर्षं जुन्या फोनएवढीही नसेल; किंमत वगैरे सोडूनच द्या, असा विचार मी केला. आजी-आजोबा वयाच्या, व्हॉट्सअॅपी साहित्य वाचणाऱ्या पिढीशी वाद घालण्याची हिंमत माझ्याकडे नाही.

मला स्वयंपाकघरातून बोलावणं आलं. ‘‘कुठे त्या बाप्यांमध्ये बसतेस? ये इथे!’’ एका पाहुणीच्या चेहऱ्यावर माझी सुटका केल्याचा सात्त्विक आनंद सहज दिसत होता. तीही चांगला स्वयंपाक करते, तिला नकार कसा द्यायचा!

चहापाण्याच्या नावाखाली जेवण झाल्यानंतर मात्र सगळ्यांनी एकत्र बसायला कुणाचाही विरोध नव्हता. मघाशी माझी सुटका करणारणीनंच विषय काढला. ‘‘मला ट्रम्पची सगळी मतं पटली नाहीत तरी काही धोरणं पटतात.’’ ‘‘कुठलं धोरण?’’ हे विचारावं लागलं नाहीच. ‘‘ट्रम्पनं बेकायदेशीरपणे देशात आलेल्या लोकांना परत पाठवलं हे बरंच केलं. आपण इथे एवढे कष्ट करून आलो आहोत, किती मेहनत केली तेव्हा आम्हाला ग्रीन कार्ड मिळालं, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. आणि हे लोक असेच चोरीमारी करून इथे येतात. यातून आपलीही किंमत कमी नाही का होत? आपल्या कष्टांना काही किंमतच नाही का? सगळे अमेरिकी लोक आपल्याकडे अशा संशयित नजरेनं बघतील, असं कसं चालेल?’’

‘‘तुला ऑफिसात किंवा आणखी कुठे कुणी काही म्हणालं का?’’

‘‘नाही गं. पण आपलेच देशबांधव ना हे! सगळीकडे लाज काढतात!’’

‘‘फेसबुकवर कुणाशी तरी वाद घालत होते म्हणून बातमी चांगली लक्षात राहिली. ट्रम्प यांनी सुरुवातीच्या दिवसांत जितके बेकायदेशीर स्थलांतरित देशाबाहेर पाठवले आहेत, त्यापेक्षा जास्त बायडेन यांनी पाठवले होते. पण बायडेननं त्याचा तमाशा केला नाही. मुख्य म्हणजे हे जे लोक अपमानास्पद पद्धतीनं देशाबाहेर काढले आहेत त्यांना प्यादी म्हणून फक्त वापरले आहेत. अमेरिकेत किती भारतीय नागरिक बेकायदेशीर पद्धतीनं आले असतील? ते काय फक्त एक विमानभर एवढेच असणार आहेत का? या लोकांची चूक आहे का नाही, हा मुद्दा निराळा आहे. हे लोक आपल्यासारखेच आहेत. ना त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची सत्ता आहे, ना आपल्याकडे. तूच म्हणालीस ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी तुला किती कष्ट पडले. तेव्हा आणि आताही तुझ्याकडे कुठल्या प्रकारची मुखत्यारी आहे, एजन्सी आहे? कर भरावा लागतो, पण मताधिकार नाही; म्हणजे आपल्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाहीये.’’

‘‘हो, पण म्हणून बेकायदेशीरपणे कुठल्याही देशात घुसण्याचं समर्थन करता येणार नाही.’’

‘‘ते कुणीही करत नाहीच आहे! प्रश्न असा आहे की या लोकांना असं वागवावं का? भारतात आणि इथेही गुन्हेगारांनाही किमान माणुसकी दाखवावी, असे कायदे आहेत, रीती आहेत. एरवी ‘वॉर रुकवा दी’ याची जाहिरात करणाऱ्यांना या भारतीय नागरिकांना अपमानास्पद पद्धतीनं बेड्या वगैरे घालून भारतात पाठवलंत तर खबरदार, असं म्हणता येत नाही? घरच्यांशी पटत नाही किंवा भांडण झालं म्हणून बाहेरच्यांनी त्यांना कसंही वागवलेलं चालेल का? दोन्ही बाजूंच्या सत्ताधाऱ्यांना या माणसांबद्दल काही पडलेली आहे, असं मला वाटत नाही. मला राग या दुष्टपणाचा आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्यामागे दुष्टपणा बाळगणं ही काही भारतीय संस्कृती नाही. धार्मिक वाङ्मय तर तुम्ही लोकच माझ्यापेक्षा जास्त वाचत असणार. आतासुद्धा तुम्ही सगळ्या भारतीय कपडे घालून आल्या आहात. मी टीशर्ट-शॉर्ट्स घालून आल्ये. रीतभात मला जरा कमीच समजते, नाही का?’’

हे जे सगळे लोक ट्रम्पनं गाजावाजा करून अमेरिकेबाहेर हाकलले त्यांत कुणीही गोरे नव्हते. सगळे लॅटिन अमेरिकी किंवा भारतीय. म्हणजे ब्राऊन कातडीचे. हा वंशवाद आहे, वगैरे म्हणायची संधीही मला मिळाली नाही. जेवढे बेकायदेशीर भारतीय अमेरिकेत आहेत, साधारण तितकेच चिनीही आहेत; पण त्यांना चीनमध्ये परत पाठवण्याचा तमाशा ट्रम्प यांनी केला नाही. चीनची अर्थव्यवस्था मोठी का भारताची?

मध्यंतरी एक बातमी होती- ग्रीन कार्डावर असणाऱ्या वयस्कर भारतीयांना ग्रीन कार्ड परत देण्याची सक्ती केली गेली. ही बातमी जबाबदार वर्तमानपत्रांमध्ये होती. आता अमेरिकेचा नागरिक असणाऱ्या एका पुणेरी इसमानं ‘‘ही बातमी काही खरी वाटत नाही,’’ अशी टिप्पणी केली होती. त्याचे आई-वडील आता जिवंत नाहीत.

विषय बदलला. आजच्या पिढीतल्या मुलांना काही कष्ट न करताच सगळं हवं असतं का नाही; हा विषय सुरू झाला. पंचविशीच्या चार मुलांबरोबर मी काम करते. त्यावरून संपूर्ण पिढीबद्दल मत बनवणं मला जमत नाही.

आणखी एक शेजारीण ट्रम्प निवडून आल्यानंतर हताश झाली होती. ‘‘तुला याचा त्रास का होतो, हे मला समजतंय. पण त्रास करून घेऊन काय फायदा? त्यातून काय मिळणार आहे? मला निकाल लागले त्या दिवशी सकाळी त्रास झाला थोडा. मग मी विचार केला, ट्रम्प करून करून काय वाकडं करू शकणार माझं? मला भारतात परत जावं लागेल. ठीक आहे. मी जाम शिकल्ये. सध्याचा हॉट टॉपिक ‘एआय’ या विषयात मला आता काही वर्षांचा अनुभव आहे. भारतातही या कौशल्याला मागणी आहे. शिवाय मी शहरात वाढले. माझ्याकडे पैसा आहे. थोडी गैरसोय होईल, पण माझी काही अन्नान्नदशा होणार नाहीये. मग मी कशाला त्याचा त्रास करून घेऊ?’’

‘‘ज्या लोकांना ट्रम्पच्या धोरणांचा खरा फटका बसणार आहे, ते लोक आधीच एवढे सुस्थित नाहीत. ते लोक आपल्यासारखे प्रिव्हिलेज्ड, लब्धप्रतिष्ठित नाहीत. भारतात एल साल्व्हाडोरसारख्या गँगची सत्ता नाही. भारतात गाझासारखी युद्धपरिस्थिती नाही. व्हेनेझुएलासारखी यादवी नाही. मला वाईट वाटतं ते या देशांमधून ज्यांना पळून यावं लागतं त्यांच्यासाठी. ज्या गरीब अमेरिकी लोकांचं आयुष्य याच्या मनमानीमुळे कायमचं आणि खूप बदलून जाणार आहे, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं… त्या हिशेबात मला भारतात जावं लागणं हा फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम झाला. उॅंचे लोग उॅंचे प्रॉब्लेम!’’ माझी पोटतिडीक जरा जास्तच झाली बहुतेक.

ती गांभीर्यानं म्हणाली, ‘‘तसं तर काय, उद्या काहीही होऊ शकतं. आपला अपघातही होऊ शकतो!’’

मी दीर्घ श्वास घेतला. मला अमेरिकेत राजकीय पक्षांना, उमेदवारांना देणगी देता येत नाही; कारण मी अजूनही भारतीय नागरिकच आहे. अमेरिकी झाले तरीही मी निवडणुकांसाठी पैसे देईन का, याबद्दल मला शंकाच वाटते. मी तिला म्हणाले, ‘‘तू ‘द अनियन’ वाचतेस का? कधी तरी उघड त्यांची वेबसाइट. मी त्यांना पैसे दिले आहेत. सध्याच्या दिवसांत मला चक्रम विनोदांचाच आसरा वाटतो. म्हणून मी त्यांना पैसे दिले. ते सगळ्यांची टिंगल करतात.’’

‘द अनियन’ला मी पैसे दिले तेव्हा त्यांनी मला जे पान दाखवलं ते मी माझ्या मित्रमैत्रिणींना दाखवलं. त्यावर त्यांनी माझ्यावर स्तुतिसुमनं उधळली. त्यांत एक होतं- तुमचं क्रेडिट कार्ड सुरू आहे!

या गटातल्या लोकांशी राजकारणाबद्दल चर्चा कमीच होते. सगळ्यांची मतं थोड्याफार फरकानं एकसारखीच आहेत. ही चार वर्षं आम्ही एकमेकांना फार तर बातम्यांच्या लिंका पाठवू. आणि बाकीचा वेळ जोक, मीम, बागकाम, स्वयंपाक, व्यक्तिगत आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी वगैरे एकमेकांना सांगू. आम्ही अमेरिकेत, भारतात, युरोपात आहोत. काही अमेरिकी नागरिक आहेत काही नाहीत. अमेरिकेत यायचं असेल तर आता फोनमध्ये, लॅपटॉपवर काय आहे याची तपासणी होऊ शकते. जे अमेरिकी नागरिक नाहीत त्यांनी फोनचा पासवर्ड द्यायला नकार दिला तर त्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तर त्यासंदर्भात काय खबरदारी घेता येईल, याची आम्ही चर्चा केली.

अमेरिकेतल्या जॉर्जिया नावाच्या राज्यातून फ्लोरिडा राज्यात जाणाऱ्या हुआन कार्लोस लोपेझ-गोमेझ या अमेरिकी नागरिकाला एरवी बेकायदा स्थलांतरितांवर कारवाई करणाऱ्या ‘कस्टम एन्फोर्समेंट एजन्सी’नं अटक केली. हुआन हिस्पॅनिक – ब्राऊन वर्णाचा आहे. आणि अशा किती तरी अमेरिकी नागरिकांना गुन्हेगार किंवा बेकायदेशीर स्थलांतरित असल्यासारखं वागवल्याच्या बातम्या आता वर्तमानपत्रांमधून येत आहेत. अमेरिकेतल्या भारतीयांमध्ये आता भारतातून येणाऱ्या डाळी आणि कडधान्यं ट्रम्पच्या ‘टॅरिफ’मुळे महाग होणार यापलीकडे चर्चा कानांवर येत नाहीत.

गाझातलं युद्ध थांबावं, अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या आणि अमेरिकेत व्हिजावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिजा रद्द केल्याच्या बातम्या येत आहेत. माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या भारतीयांनी या विषयावर कधीही मतप्रदर्शन केल्याचं मी बघितलेलं नाही. अगदी अमेरिकी नागरिक असणाऱ्यांनीही. मित्रमैत्रिणींची मतं मला माहीत आहेत. हजारभर शब्द लिहूनही मी अजूनही स्पष्टपणे या विषयाबद्दल माझी मतं व्यक्त केलेली नाहीत.

‘‘हे विद्यार्थी शिकायला येतात. शिक्षण सोडून बाकीचे उद्याोग करायला का जातात? शिक्षण किती महाग आहे इथे!’’अशी वाक्यं मी भारतीयांच्या तोंडी ऐकली आहेत. पहिली दोन वाक्यं ट्रम्पची गृहसुरक्षामंत्री क्रिस्ती नोमसुद्धा म्हणते आणि त्याची जाहिरातही टीव्हीवर दिसते.

तोंड बंद ठेवणं फायद्याचं असतं. जेव्हा अंगाशी येतं तेव्हा नैतिकता त्यातून वाचवू शकत नाही. मध्यमवयीन, सुस्थित, चांगल्या घरातले, अमेरिकेत राहणारे भारतीय जेव्हा बेकायदेशीररीत्या अमेरिकेत आलेल्या लोकांना परत पाठवलं तेव्हा त्याबद्दल आनंद व्यक्त करत होते. आता या ‘व्हिजा’ रद्द झालेल्या भारतीयांबद्दल त्यांना ज्या दुष्टपणानं वागवलं जात आहे, त्याबद्दल काही म्हणत नाहीयेत. गाझा वगैरे विषय लोणचं-मिरचीइतपतही तोंडी लावायला नसतात. कधीच नसतात.

314 aditi@gmail. Com