|| डॉ. आशुतोष जावडेकर

तेजस :

वर आकाशात ढग आलेत. पावसाची एक छोटी सर परवा पडून गेली. आताही येईल कदाचित. कदाचित धो धो येईल पाऊस वेधशाळेचा अंदाज चुकवून आणि मग उद्या बातम्या येतील, की वाऱ्याच्या अमुकतमुक दिशांमुळे मान्सून लवकर आला. अंदाज चुकवणं ही पावसाची खासियत आहे. आधी उन्हाळा असतो, चटका देणारा.. आणि मग क्षणात सगळं गार होतं, ओलं होतं. पावसाची स्वप्नंही पावसाइतकीच उन्मनी असतात. आणि मग गाणी ऐकण्याखेरीज पर्याय नसतो. आत्ताही उकडतं आहे, पण मर्यादेत. हलका पंखा लावून सँडो आणि शॉर्ट्सवर मी यूटय़ूबवर गाणी ऐकतो-बघतो आहे. ‘भीगी भीगी रातों में..’ – ही झीनत अमान काय कमाल दिसते! आज घरात कुणी नाहीये. सगळे बाहेर गेले आहेत. रेळेकाकाही तेरवाच अमेरिकेला त्यांच्या नातवाला बघायला निघून गेले आहेत.. त्यांच्या घराची किल्ली आमच्याकडे ठेवून, त्यांचं थोडं मनही आमच्याकडे ठेवून. ते काही रमत नाहीत अमेरिकेत. रेळेकाका पाऊस मिस करणार या खेपेस. माही म्हणते तसं, या गावातला पाऊस सुंदर असतो. त्या अरिनच्या मुंबईतल्या कधीच न थांबणाऱ्या पावसासारखा वेडा नसतो इथला पाऊस. मला वाटतं, इथला हा पाऊस मधे मधे थांबत पडतो आणि आठवणींना फुरसत देतो. पाऊस म्हटलं, की पावसाळ्यात तुडुंब भरलेली नांदेडची गोदावरीच मला आठवते. आम्ही मित्र पावसाळ्यात चुकूनही प्रवाहात पोहायला उतरायचं धाडस करत नसू. आपण धाडसी नव्हतोच बहुदा. जे संघर्ष केले ते अस्तित्वासाठी अपरिहार्य होते म्हणूनच; धाडसाची हौस म्हणून नव्हेत. जाऊ द्या.. आपण काय अरिन नाहीच- बेदरकारपणे समुद्रात झोकून देणारे. आपण नदीकिनारी पाऊस बघत थांबलेले आहोत कधीचे. ‘ऐसा लगता है तुम बनके बादल..’ – ही झीनत.. हा राजेश खन्ना.. या अफाट लताबाई व हा मस्ती करणारा किशोर कुमार! ..आणि हे आपण, पंख्याखाली हे गाणं ऐकतानाही सँडो फेकून लाटेसारखे उठून-फुटून येण्याऐवजी हा समग्र विचार करत नुसते बसलेले. मिस्टर तेजस, बदलायला हवं यार! बदल घडवणं या पावसाची खासियत आहे!

अस्मित :

आयला! हा पाऊस पण ना! वरती गच्चीत वाळत घातलेल्या जीन्स आणि अंडरपँट्सही भिजल्या परवा! आत्ताही पाच मिनिटांत पाऊस येईल पुन्हा साला! आधी गच्चीत जाऊन कपडे खाली आणायला हवेत. अऱ्या फालतूमधे टॉयलेटमध्ये जाऊन चॅट करत बसतो, तसाच आत्ता बसलाय. वर जाऊन दोघांचे कपडे मी आत्ता आणेन; पण टॉयलेटमधून बाहेर आला, की याला भुर्जी करायला लावणार आणि मस्त खाणार! काय ऊन आहे हे गच्चीत.. आत्ता खाली होतो तेव्हा ढग होते! फालतुगिरी करतात ढग या शहरी पोरींसारखी. च्यायला, आपण मनात हे बोलायला आणि कानातल्या बोसच्या इअरफोनवर ‘अप्सरा आली..’ सुरू व्हायला एकच मुहूर्त लागला की! टाइमिंग! बाकी, ते अरिनला साधतं. तो स्मार्ट आहेच. मलाही सगळं जमतंच, पण काहीतरी कमी पडतं. जरा चेंज करायला पाहिज्येत ह्यबिट्स! असं काय असतं या पाल्र्याच्या पोरांकडे, जे नगरमध्ये आपल्याला भेटत नाही, शिकता येत नाही? काही म्हणा, असतो ना स्मार्टनेस यार त्यांच्याकडे. आणि त्यांची ती बिनधास्त घरं.. म्हातारा, म्हातारी यांची कटकट नाही. कसा अऱ्या त्याच्या आईशी गप्पा मारतो फोनवर, त्याला भेटलेल्या पोरींचे किस्से त्याच्या आईला सांगतो. आमच्या आईंना असला फोन केला, तर याच पावसाळ्यातलं आमच्याच लग्नाचं निमंत्रण आम्हालाच पोचायचं! पण आपणही बदलून कशाला या पोरांसारखं व्हायचं? पाल्र्याला पडतो तसा पाऊस नगरमध्ये थोडीच पडणारेय? पण राव, अऱ्या पुढच्या टर्मला रूम सोडून गेला, की मी त्याला मिस करणार. तो म्हातारा तेजस त्याचा बेस्टी आहे, पण माझा बेस्ट दोस्त साला अरिनच आहे. ते अऱ्याला माहीत नाहीए एवढंच! हेऽ डोळ्यांत पाणी आलं का काय राव! नाही, हा आला इथला पाऊस.. ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’वाला.. एवढा एवढासा! दादा कोंडके जिंदाबाद! पावसाचं बेस्ट गाणं कुठलं असेल, तर हेच आहे!

माही :

गीतामावशी आमच्या घरी दोन-तीन महिने राहायला येणार आहे, म्हणून मी तिला घ्यायला इथं कोकणात पोमेंडीला आली आहे. उद्या तिला माझ्या गाडीत घालून मी घरी परतेन. इथं ढग आलेत दाटून. मला ढग आवडत नाहीत, पाऊस आवडतो. पाऊस उत्तरं देतो. ढग म्हणजे नुसते कासावीस करणारे प्रश्न असतात. आणि मला छत्र्या आवडतात.. मोठय़ा, वेगवेगळ्या डिझाइन्सच्या! अमेरिकेत असताना मी रिकीनं गिफ्ट दिलेली अर्मानीची छत्री वापरत असे. अरिनला मधे मी माझ्या लग्नाविषयी पत्र पाठवलं, तेव्हा ती छत्रीही मला आठवलेली. अरिननं उत्तर दिलं मला छान. गोंडुला आहे तो. पण मी मुळात पत्र लिहून पाठवलं होतं, तेव्हाच अनेक उत्तरं मला मिळाली होती. पडूच लागला हा कोकणातला दमदार पाऊस..!

इथं सोमेश्वराच्या देवळात मी एकटी आहे आत्ता. आणि बरोबर हे तेजसनं नेमकं मला गुलजारांचं ‘ब्लू अम्ब्रेला’मधलं गाणं जस्ट व्हॉट्सअप केलंय! गाणी ऐकत लोळत पडला असणार हा आत्ता घरात कुणी नाही म्हटल्यावर. हे गाणं छान आहे पण तेजसनं पाठवलेलं.. छत्रीचं गाणं.. ‘अम्बर का टुकडम तोडम, लकडम्ी का हत्था जोडम’! आऽहाऽ! गीतामावशी समोरून हाक मारते आहे. तिनं माझ्यासाठी खास सांदण बनवलं आहे. जाते आता सरळ भिजत समोर घरी. छत्री नेहमी हवीच का? थेट भिजण्याची सवय करायला हवी. बदलायला हवंच थोडं.. ‘शायद फिर उडम् ना जाए, अम्बर से जुडम्ना चाहें..’! देवळाच्या पडवीतून दिसणारा हा बाहेरचा अखंड निळा आसमंत हीच भलीमोठी छत्री का मानू नये?

रेळेकाका :

आत्ता हा पाऊस येतोय अखेर! सोसायटीतल्या सगळ्या झाडांवर कोसळतोय. तेजसनं लगेच व्हॉट्सअप केलंय ना मला सगळं दृश्य! आणि मी इथं अमेरिकेत मध्यरात्री जागाच आहे. आमचा जेटलॅग कधी जाणार आहे देवच जाणे! आत्ता आमची हीदेखील जागीच आहे आणि पाऊस या वर्षी चुकवल्यानं आम्ही हळहळत आहोत. अशी खंत वाटेल असं मात्र मला कधी वाटलंही नव्हतं. आपल्याजवळ जे मोलाचं असतं, ते सोबत असताना मोलाचं का वाटत नाही? दूर गेल्यावर का वाटतं? आता साठीत सगळं मागचं आठवून अनेकदा हा प्रश्न पडतो. तेजस, अरिन आणि माही यांच्यासोबत चालताना एकदा मी हे म्हटलेलं. त्यांनी ऐकून घेतलं खरं. पण त्या प्रश्नाची बोच त्यांना कशी कळावी? ‘अनेक पावसाळे जास्त पाहिले आहेत’ असं म्हणणं ही केवळ भाषिक शब्दकळा नसून मनातली सारी सारी अस्वस्थता आहे, हे या विशी-तिशी-चाळिशीला कसं कळावं? त्या प्रत्येक पावसाळ्यातले बदल टिपत निष्ठेनं जगत राहणं हे असिधाराव्रत आहे, हेही यांना कसं कळावं?

बाकी, सौभाग्यवती तो पावसाचा व्हिडीओ बघून आकाशवाणीच्या एका मालिकेचं शीर्षकगीत गात आहेत. आमची ही गायला लागल्यामुळे मला कानांचं संरक्षण करायला आता जरा बेसमेंटमध्ये जायला हवं! तिथं मुलाचा बारदेखील आहेच. पण ती गाते आहे ते सुधीर मोघेचं गाणं मात्र छान आहे. छान लिहायचा तो.. ‘हे निळे निळे आकाश, ही हिरवी हिरवी धरती, कोसळती पाऊसधारा अन् दरवळणारी माती’! मीच मला म्हणतोय, चला, तयारी करा मनाची, हळूहळू या सगळ्या पंचमहाभूतांकडे परत जायची तुमचीही वेळ आलीच रेळे..

अरिन :

का वाटतं माहीला, की मी लहान आहे? का वाटतं तेजसदाला, की मी अजून बच्चा आहे? दोनदा प्रेमात पडलेलो आहे. दोन ब्रेकअप्स झाले आहेत. रात्री पोरींसोबत धमाल केली आहे. परीक्षांमध्ये जबराट मार्क्‍स मिळवले आहेत. रॅगिंगला नीट धाडसानं तोंड दिलं आहे. घराबाहेर राहतो आहेच सगळं सांभाळून. मस्त फुटबॉल खेळलो आहे. रात्रीबेरात्री मित्रांसोबत भटकलो आहे. अंगावर उभा पाऊस घेत भिजलो आहे, जसा आत्ता उभा आहे गच्चीत अस्मितसोबत. तो कपडे घेऊन थांबला आहे कोपऱ्यात शेडखाली आणि मी हात उंच करून ‘वेक अप सिड’मधल्या रणबीरसारखा पावसात भिजत उभा आहे. हा तेजस, ही माही, ते रेळेकाका मघापासून व्हॉट्सअप करत बसलेत. पाऊस जसं सगळं चेंज करतो, तसं त्यांना म्हणे सगळं बदलायचं आहे.. स्वत:ला.. जगाला. का? कशासाठी? आला पाऊस हे एन्जॉय का करू शकत नाहीत? ‘रुत है ये दो पल की, या रहेगी सदा..’ याचं उत्तर आहे कोणाकडे? मग जस्ट चिल यार! आत्ता हा ऋतू समोर आहे, भिजा ना! सर्दी झाली तर होऊ दे, ताप आला तर येऊ दे. तसंही न भिजताही अनेकदा सर्दी होतेच ना, ताप येतोच ना? अस्मितला मागून मी मस्त रॉक गाणं मोबाइलवर वाजवायला सांगितलं आहे.. ‘नोव्हेंबर रेन’.. ही मस्त गिटार दणकट वाजतेय आणि मी भिजतोय.. गच्च भिजतोय.. एकटा! मी पावसाळे कमी पाहिले आहेत, पण प्रत्येक पावसात न चुकता इंटेन्स भिजलोय यार! मला भिजू दे.. बस्स, फक्त भिजू दे..

ashudentist@gmail.com