जसजसा  काळ पुढे सरकतो आहे, तसतसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या युगप्रवर्तक विचारधारेचे अनेक पैलू पुढे येत आहेत. त्यामुळेच त्यांच्याशी कार्ल मार्क्स, महात्मा गांधी आदी जागतिक सामाजिक आणि lokराजकीय जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या, तेवढय़ाच तोलामोलाच्या महान व्यक्तींची तुलना केली जात आहे. आंबेडकर-मार्क्स, आंबेडकर-गांधी, आंबेडकर-सावरकर यांची तुलना करणारी पुस्तके अनेक मान्यवर लेखकांनी लिहिलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केंद्रस्थानी आहेत आणि इतरांशी त्यांना जोडून व ताडून पाहण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंबेडकर-हेडगेवार अशीही तुलना करण्याचा हेतुत: प्रयत्न होत आहे. अशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची तुलना करणारे एक पुस्तक लिहिले गेले आहे. प्राचार्य श्याम अत्रे हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुस्तक अभ्यासपूर्ण लेखनाचा उत्तम नमुना आहे. आंबेडकर आणि विवेकानंद यांची विचारधारा समोर ठेवताना त्यात कुठेही लपवाछपवी केलेली नाही. ज्याचे-त्याचे कर्तृत्व जसे आहे तसे स्पष्टपणाने मांडले आहे. लेखनशैली उच्च दर्जाची आहे. त्यास व्यासंगाची डूब आहे. लेखनामागची मेहनतही दिसते.  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची मुळात तुलना होऊ शकते का? त्यामागे काही हेतू, उद्देश, अजेंडा आहे का? तर त्याचे उत्तर ‘होय’ असे देण्यास वाव आहे. लेखकाने या दोन व्यक्तिमत्त्वांची स्वतंत्रपणे मांडणी करत असताना त्यावर लेखकाने केलेले भाष्य हे या पुस्तकाच्या लेखनामागील हेतू स्पष्ट करते.
भारतातील हिंदुत्ववादी विचारधारा मानणाऱ्या वर्गाला स्वामी विवेकानंद हे आदर्श वाटतात. स्वामी विवेकानंद हिंदूुत्वाचे प्रतीक आहेत असे ते मानतात. मग प्रश्न असा पडतो, की हिंदुत्वच नव्हे, तर एकूणच धर्मव्यवस्था नाकारणाऱ्या आंबेडकरांशी हिंदुत्ववादी विवेकानंदांची तुलना करण्याचा मोह लेखकाला का झाला? तर- काहीही झाले तरी आंबेडकरांना हिंदुत्ववादी विचारधारेशी जखडून ठेवणे, हा त्यामागील हेतू आहे. म्हणजे हे पुस्तक हेतुत: प्रचारासाठी लिहिले आहे आणि हिंदुत्ववादी अजेंडय़ाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे असे वाटते.
लेखकाने पुस्तकाचा आवाका मोठा घेतला आहे. डॉ.आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांची तुलना करताना त्यांच्या गुरूंच्या जीवनचरित्राचा थोडक्यात, परंतु त्यांच्या स्वतंत्र विचारसरणींचा परिचय करून दिला आहे. आंबेडकरांचे गुरू जोतिबा फुले आणि विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस ही तुलनासुद्धा अतात्त्विक आहे. परमहंस हे आध्यात्मिक पुरुष होते, तर फुले हे समाजक्रांतिकारी. माणसांची पिळवणूक, फसवणूक करणाऱ्या, माणसाला हीन लेखणाऱ्या धर्मव्यवस्थेवर फुले हल्ला चढवतात. ते हिंदू धर्माचे अजिबात रक्षक वा संरक्षक नाहीत. त्यांनी बाबासाहेबांप्रमाणे हिंदू धर्माचा त्याग केला नसला तरी त्यांनी नव्या शोषणमुक्त धर्मरचनेची, समाजरचनेची मांडणी केली. त्यांनी केलेली सत्यशोधक समाज किंवा सार्वजनिक सत्यधर्माची lr20स्थापना हे कशाचे द्योतक आहे? अंधश्रद्धेचे दुसरे नाव म्हणजे दैवीशक्ती, चमत्कार, कालिमातेचा साक्षात्कार वगैरे अशा भ्रामक कल्पनांवर विश्वास ठेवणारे रामकृष्ण परमहंस होय. फुले मात्र ‘शूद्र-अतिशूद्रांच्या जीवनात इतके अनर्थ का घडले, तर अविद्येमुळे!’ असे रोखठोकपणे बजावतात. समाजाला अंधश्रद्धा, दैववाद व कर्मकांडांच्या गर्तेतून बाहेर काढून त्याला शहाणे बनवण्याचा प्रयत्न फुले करतात. सामाजिक विषमतेच्या मुळाशी असलेल्या धर्मव्यवस्थेशी फुले भिडतात. याउलट, परमहंसांच्या चिंतनात समाज कुठे दिसत नाही. समाजाच्या उत्थानासाठी ते काय करणार, हे सांगत नाहीत. केवळ आध्यात्मिक वा भूतदयावादी असून समाजाचे कल्याण होत नाही, त्यासाठी समाजक्रांतीचे विचार घेऊन रणात उतरावे लागते. फुले उतरले आणि आंबेडकरही उतरले. परमहंस व विवेकानंद समाजपरिवर्तनाच्या मैदानात कुठे दिसतात?
डॉ. आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांचे राष्ट्रचिंतन, समाजचिंतन, धर्मचिंतन, अर्थचिंतन, शिक्षणचिंतन, स्त्रीविषयक दृष्टिकोन, गौतम बुद्ध व बौद्ध धर्म, डॉ. आंबेडकरांचे धर्मातर : अन्वयार्थ अशा विविध विषयांभोवती या पुस्तकाची गुंफण केली गेली आहे. त्यात हिंदू धर्म किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीला केंद्रबिंदू मानून तुलनात्मकदृष्टय़ा विषयाची मांडणी केलेली आहे. खरे म्हणजे आंबेडकर व विवेकानंद यांची मुळात तुलनाच होऊ शकत नाही. ही दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे आहेत. विवेकानंदांना अध्यात्म, हिंदू धर्म-संस्कृती सोयीची वाटते. डॉ. आंबेडकरांचे विचार हिंदू धर्म-संस्कृतीला सुरुंग लावणारे आहेत. मुळात विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व हे आध्यात्मिक असले तरी ते गोंधळलेले आहे. ते कधी हिंदू धर्माची महती गातात, तर कधी बौद्ध धर्म किती श्रेष्ठ होता, याच्या आख्यायिका ऐकवतात. वंचितांसाठी ते चिंतित असतात असे लेखकाने म्हटले आहे. परंतु नुसती चिंता करून वंचितांना न्याय मिळणार आहे का? केवळ हिंदू धर्माचे गोडवे गाणारे म्हणून ते राष्ट्रपुरुष असतील तर त्याबद्दल कुणाचा काही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु त्यांच्याशी डॉ. आंबेडकरांची तुलना करणे म्हणजे एका समाजक्रांतिकारकावर अन्याय करण्यासारखे आहे.
डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व सामाजिक आहे. समाजबदलाची ताकद त्यांच्या विचारांत आहे. त्यांची समाजपरिवर्तनाबद्दलची मांडणी सुस्पष्ट आहे. शोषणाधिष्ठित धर्मव्यवस्था मुळासकट उखडून टाकण्याची भूमिका ते मांडतात. सेक्युलर समाजाच्या निर्मितीचा ते आग्रह धरतात. तरीही लेखक त्यांना ‘कर्ते हिंदूू धर्मसुधारक’ मानतात, हा एक जाणीवपूर्वक केलेल्या प्रचाराचा भाग आहे. आंबेडकर कर्ते हिंदू धर्मसुधारक नव्हते, त्यांचे गुरू फुलेही नव्हते आणि गौतम बुद्धही नव्हते. या पुस्तकात आंबेडकर मुस्लीमविरोधी होते असा समज निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खरे म्हणजे आंबेडकर माणसाला गुलाम करणाऱ्या सर्वच धर्माच्या विरोधात होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या संदर्भात बाबासाहेबांनी आपली परखड भूमिका मांडली होती. मात्र, १९४७ सालीच फाळणीबरोबर तो विषय संपला. आणि १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मातरानंतर हिंदू धर्माशीही त्यांचा संबंध संपुष्टात आला. इतकेच नव्हे, तर ‘धर्म’ या संकल्पनेच्याच ते विरोधात होते. म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माला ‘धर्म’ या संकल्पनेपासून वेगळे काढले. लेखक एके ठिकाणी ‘हिंदुहितातच राष्ट्रहित सामावलेले आहे,’ असे म्हणतात. मग हिंदू धर्म नाकारून आंबेडकरांनी राष्ट्रहित अव्हेरले काय?
डॉ. आंबेडकर हे चातुर्वण्र्य व्यवस्थेच्या विरोधात होते. नव्हे, त्याविरुद्धच त्यांचा निकराचा लढा सुरू होता. विवेकानंद मात्र चातुर्वण्र्य व्यवस्थेची भलामण करतात. ‘चातुर्वण्र्य व्यवस्था म्हणजे श्रमविभागणी आहे,’ असे सांगून ते वर्णवर्चस्ववादाचे समर्थन करतात. बाबासाहेब आंबेडकर मात्र ‘भारतातील वर्णव्यवस्था किंवा जातीव्यवस्था ही केवळ श्रमांचीच नव्हे, तर श्रमिकांचीही विभागणी करते,’ अशी मांडणी करतात आणि ती मोडून काढण्यासाठी सज्ज होतात. विवेकानंद कुठे कुठे जातिभेदावर रोष प्रकट करतात, परंतु त्याचा आधार असलेल्या धर्मव्यवस्थेला ते हात लावत नाहीत. आंबेडकर जातीव्यवस्थेचा आधार असलेल्या केवळ धर्मावरच नव्हे, तर त्यावरील श्रद्धा आणि पावित्र्यावरही हल्ला चढवतात. लेखक स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील त्या कथित जगप्रसिद्ध भाषणाची आणि डॉ. आंबेडकरांच्या घटना समितीतील राजकीय-सामाजिक प्रश्नांवरील चिंतनाचा उत्तम नमुना असलेल्या भाषणाची तुलना करतात. काय म्हणतात विवेकानंद पाहा- ‘‘हे बौद्ध बंधूंनो, तुमचा त्याग करून आम्ही उन्नत होऊ शकणार नाही. आणि आम्हाला सोडून तुमच्याही उन्नत्तीची आशा नाही. आपल्यातील विभक्तपणाच्या परिणामावरून आपण हाच धडा घेतला पाहिजे, की ब्राह्मणाच्या बुद्धीच्या नि तत्त्वज्ञानाच्या साहाय्याखेरीज तुम्ही लोक टिकू शकणार नाही. आम्हीही बौद्धांच्या विशाल हृदयाविना तगू शकणार नाही. बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यातील विभक्तपणाच भारताच्या अवनतीचे कारण होय. याच कारणास्तव भारत आज तीस कोटी भिकाऱ्यांचे निवासस्थान होऊन बसला आहे. म्हणून तो परकीयांच्या गुलामगिरीत पिचत पडला आहे. या- आपण ब्राह्मणांची अपूर्व बुद्धिमता आणि बुद्धदेवाचे विशाल हृदय व त्यांची असाधारण लोककल्याणकारी शक्ती यांचा मिलाफ घडवून आणू या.’’ म्हणजे जन्माधिष्ठित वर्चस्ववादाचे समर्थन करणारे विवेकानंद कुठे आणि जन्माधिष्ठित उच्च-नीचता ठरवणाऱ्या वर्णव्यवस्थेलाच सुरुंग लावणारे आंबेडकर कुठे? या अर्थाने लेखकाने आंबेडकर आणि विवेकानंद यांचा जो मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे तो अतात्त्विक आणि अतार्किक या कोटीतलाच आहे असे खेदाने म्हणावे लागते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद’- प्राचार्य श्याम अत्रे, विवेकानंद केंद्र प्रकाशन विभाग, पुणे, पृष्ठे- २८०, किंमत- ३०० रुपये.  
मधु कांबळे – madhukar.kamble@expressindia.com  

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?