दुर्गा भागवत
ग्रँट रोडच्या रस्त्याने चालले होते. फुटपाथवरच एक प्रचंड पुराणा पिंपळ वर्षानुवर्षे तसाच मी पाहत होते. पण आज हे काय? पिंपळपाने निस्तेज झाली होती. विरळ तर किती म्हणून सांगावी? तसे दिवस पावसाचेच. पण हे झाड केविलवाणे दिसत होते. गजबज तर त्यावर खूप होती. पण पानांची सळसळ, नखरा कुठेच नव्हता. ते झाड इंच न् इंच कबुतरांनी व्यापले होते. इतकी कबुतरे त्या झाडावर मी गेल्या पन्नास वर्षांत पाहिली नव्हती. त्यांच्या प्रखर उन्हातल्या त्या काळसर आकृतीची दाट छाया पाहून माझ्या मनात अशुभच दाटले. हा प्रचंड थवा काही सुलक्षणी नाही. मुंबईचे दुर्लक्षणच आहे ते. नंतर लक्षात आले की एक चणेवाला पोते घेऊन बसला होता. चवली-चवली येणारा-जाणारा टाकीत होता. चणेवाला जमिनीवर चणे फेकीत होता. कबुतरे त्यांच्यावर झडप घालून ते गडप करीत होती.
गिरगावातली खेतवाडी काही पूर्वी कबुतरांचे ठाणे नव्हती. पण आता वस्ती बदलली. त्यात जैनांची संख्या अधिक वाढली. मग कबुतरे वाढली. कारण चणे, जोंधळे, फरसाण यांचा खुराक त्यांना मुबलक मिळतो. मरिन ड्राइव्हवरसुद्धा भल्या सकाळी कबुतरांना फुटाणे नि फरसाण भरपूर घातले जाते. ही सारी कबुतरे गुटगुटीत झाली आहेत. धीट झाली आहेत. पण त्यांचा तरतरीत डौल मात्र निघून गेला आहे.

पूर्वी कबुतरे मलाही फार आवडायची. पोपट, चिमण्या आवडतात तशीच. पण गेल्या दोन वर्षांत कबुतरांची बेसुमार वाढ झाल्याने ती आमच्या घरात ‘हूं हूं’चा नकोसा सूर धरीत असतात. त्यात त्यांचा सदा नि सर्वत्र प्रणय चाललेला. ‘गटर गुम् गटर गुम’ने डोके उठते. घरात ती हवी तेव्हा, हवी तशी उडतात. सर्वत्र घाण करतात. किती हाकलली तरी जात नाहीत. घरात एकही वस्तू स्वच्छ अशी राहूच शकत नाही.

सर्वांत राग येतो तो अशासाठी की :

माझे सुरेख टेबल आहे. कागद पुढे ओढून लिहायला बसले तर ती गोंगाट नि फडफड करून दोन अक्षरेही निवांत लिहू देत नाहीत. ना ती दोन मिनिटेही वाचू देत की निवांत निजू, बसूही. ‘कादंबरी’तल्या रंगलाघवावर मी विचार करीत होते. वाचताना असे आढळले की, भारतीय साहित्यशास्त्रात कबुतरी रंग मरणाचा रंग आहे. जणू काही माझ्या चिडीला बाहेरून आश्वासनच मिळाले. आता त्यांच्या रंगात मला मरणाची अवकळाच दिसते. म्हणूनच पिंपळाच्या झाडावरची त्यांची ती प्रचंड वसाहत मला मरणकळेचीच सूचना देत राहिली. पण ते मरणही माझे स्वत:चे नव्हे, तर कबुतरांमुळे ओढवलेल्या मानवाच्या संपत्या जीवनकळेचे.

हे कसे मनात आले? सांगते.

आमची गॅलरी कबुतरांचा संडासच झाला आहे. ती साफ करता करता कमरेचे काटे ढिले होतात. कुठे सांदीकोपऱ्यात त्यांची खाली पडून फुटलेली अंडी दुर्गंधीत भर घालतात. अधूनमधून तर त्यांची उडू न शकणारी पिले अशीच गॅलरीतल्या अडगळीच्या कठीण जागी मरून पडतात. मग तर घाणीने डोके उठते. परवा असेच झाले. ती घाण उपसताना, मागे मी रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलेले आठवले. न्यू यॉर्कमध्ये व्हायरसमुळे रोग फैलावले. शोध करता ते कबुतरांच्या शिटीमुळे उद्भवले असे आढळून आले. अर्ध्या तासात, निदान आठ-दहा वेळा कपाटावरच्या कबुतरांना काठी घेऊन ओरडून ओरडून हाकवताना हात थकतात; घसा कोरडा पडतो. राग अनावर होतो. ‘मष्ण्या, मेल्या’ अशा बायकी शिव्या तोंडातून सतत सटकतात.

ही कबुतरे तर मला माणसाची शत्रूच वाटतात. डोळ्यांपुढे माणूस नि कबुतर यांचे साहित्यात कुठे न वाचलेले कल्पनाचित्र तरळू लागते. असेच हे चित्र तरळत असताना नुकताच श्री. दा. पानवलकरांचा कबुतरांचे उदंड कौतुक करणारा ‘गुटुर्रघुम्म’ लेख वाचनात आला. कबुतरांचे सौंदर्य, त्यांचे नाचणे, त्यांचा डौल, त्यांचे डोळे, लाल पाय यांच्यावर पानवलकरांनी भारावून जाऊन केवढा मोठा लेख लिहिला होता. संपादकांनी तो सुंदर म्हणूनच छापला होता. मीही चार वर्षांपूर्वी त्या लेखावर जीव टाकला असता. पण आता माझ्यातले माणूस नि कबुतर यांच्यात युद्ध पुकारले गेल्यामुळे तो लेख वाचून माझ्या कपाळात तिडीक गेली.

पानवलकरांना काय होते सांगायला?

लांब अंतरावरून कबुतराच्या रंगक्रीडा पाहाव्या. त्यांच्या मानेवरचे मोरपिशी रंग पाहावे. सारे कसे छुम छुम नाचासारखे भुरळ घालणारे वाटते. तीच भुरळ पानवलकरांना पडली. स्वर्गस्थ पानवलकरांना मी म्हणाले, ‘‘अहो पानवलकर, खेतवाडीत आमच्या घरात जरा डोकवा नि कबुतरांचा वैताग आणणारा शारीर आविष्कार बघा तरी.’’ पानवलकर खवचटपणे बारीक डोळे करून हसताहेतसे वाटले. मीच भानावर आले.

दारे, खिडक्या कबुतरांच्या कटकटीमुळे बंद केल्या होत्या. जीव घुसमटला होता. वाचणे बंद केले.

लिहिते कागद बाजूला सारून टेबलावर जुन्या वर्तमानपत्राचे कागद पसरून ठेवले. कबुतरांची घाण पुस्तकांवर पडायला नको म्हणून उठले नि कबुतराचा विटाळ धुण्यासाठी हातपाय धुऊन दुसऱ्या खोलीत गेले.

पण भोग असा सुटतो काय?

पानवलकरांच्या धक्क्यातून सावरणे शक्य नाहीच म्हणा; पण नव्याच साहित्यसंकटाच्या भोवऱ्यात गरगरत राहिले. हताश होऊन. तो भोवरा फार जुना विसाव्या शतकाच्या उदयापूर्वीचा आणि गुर्जर कवी कलापी यांनी निर्माण केलेला, मानवापोटी असलेल्या आर्त करुणेतून तो उद्भवलेला.

वेदनेतून निर्माण झालेले काव्य किती दारुण असते ते मात्र मला कलापीची ‘म्हासे कबुतर’ ही ‘बिल्वमंगला’तली कविता नुकतीच वाचून जाणवले. कलापी म्हणतात,

‘‘हतु मे पाल्युं ने कबुतर रह्यू तु घधवतु

उधेर्युते प्रेमे कनकमय आ पिजर पुर्यु ’’

घुमणारे कबुतर पाहून कवीने त्याला सोन्याच्या पिंजऱ्यात पाळले. कौतुके केली. पण कबुतरांची जोडी फुटली. प्रियेच्या वियोगाने कबुतराने प्राण सोडला. असा कवितेचा आशय आहे. करुण, विदारक.

पण माझ्या मनाला ते कारुण्य भिडेना! सोन्याच्या पिंजऱ्याऐवजी मला आताच्या विध्वंसक कबुतरांना कोंडून घालणारा राक्षसी लोखंडी पिंजरा दिसू लागला. हवाच हा पिंजरा असा ध्यास लागला.

कारण या कबुतरी पीडेने शंभरी ओलांडली आहे. तिने आमच्यात व निसर्गाच्या सहज जिव्हाळ्यात विष कालवायला सुरुवात केली आहे. माणसे माणसे राहत नाहीत, पशुपक्षी परिचित राहत नाहीत तेव्हा निसर्गही निसर्ग राहत नाही. आम्हाला निसर्गाशी सनातन नाते तोडायचे नाही. जोडायचे आहे.

आमच्या करुणेचे विडंबन वाटेल अशी करुणाघन काव्येच आमच्यावर आता आक्रमण करू लागली तर आम्ही कुणाला शरण जावे?

(‘दुपानी’मधून साभार)

दुर्गा भागवत / lokrang@expressindia.com