नेत्यांचे ‘खाणे’ म्हटले की पहिला ‘ख.. खाबूगिरी’मधलाच आठवतो. मात्र, नेत्यांच्या खऱ्याखुऱ्या खाण्यापिण्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. शेफ विष्णू मनोहर यांना या ना त्या निमित्ताने राजकीय नेतेमंडळींच्या मुदपाकखान्यात डोकावण्याची संधी मिळाली. त्या अनुभवांतून ते सांगताहेत नेत्यांच्या खवय्येगिरीबद्दल..
ध्या निवडणुकीच्या प्रचाराच्या धावपळीच्या वेळापत्रकात सोयीनुसार आणि आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोटाची सोय ल़्ाावण्याचा नेतेमंडळींचा दिनक्रम असला तरी त्यांतले काहीजण अस्सल खवय्ये आहेत. ते मनापासून खाण्यावर प्रेम करतात. या नेतेमंडळींपैकी माझ्या संपर्कात आलेली मंडळी म्हणजे नितीन गडकरी, सोनिया गांधी, लालूप्रसाद यादव, रामदास आठवले, प्रवीण तोगडिया, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रामविलास पासवान आणि मायावती.
सर्वप्रथम खाण्याची प्रचंड आवड असलेलेल्या राजकीय नेत्यांविषयी बोलू. नितीन गडकरी यांचे नाव राज्याच्याच नाही, तर देशपातळीवरील खवय्यांच्या यादीत वरच्या स्थानी आहे. ते ज्या शहरात जातील तिथला प्रसिद्ध पदार्थ चाखण्याची त्यांची आवड पूर्वीपासूनच सर्वाना माहीत आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर दिल्लीत गेल्यावर तिथल्या बंगल्यात नागपूरहून त्यांचे नेहमीचे तेलंगी पद्धतीचे आचारी त्यांनी बरोबर नेले होते. अधिवेशनाच्या काळात त्यांच्या घरी दीड-दोनशे लोकांचा स्वयंपाक होत असे. आणि मी तर असेही ऐकले आहे की, दुसऱ्या पक्षांतील खाण्याची शौकीन मंडळीसुद्धा कधी कधी त्यांच्याकडे येत असत. ही परंपरा त्यांच्या नागपुरातील गडकरीवाडय़ात पूर्वी होणाऱ्या भोजनावळींपासून चालत आलेली आहे. नागपुरातील जुन्या शहरात असलेल्या त्यांच्या या भव्य पारंपरिक वाडय़ात पूर्वी सणासुदीला शेकडो लोकांच्या पंगती उठायच्या, असे लोक सांगतात. त्याची साक्ष आजही वाडय़ात असलेल्या मोठमोठय़ा स्वयंपाकाच्या भांडय़ांवरून पटते. गडकरींना मनापासून आवडणारे पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि सामोसे. झणझणीत भाज्या त्यांना विशेष आवडतात. भारतीय पदार्थाव्यतिरिक्त अन्य देशांतील पदार्थसुद्धा त्यांना आवर्जून खायला आवडतात. अलीकडेच त्यांना एकदा थाई पदार्थ खाण्याची इच्छा झाली. तशातच नागपुरातील एक कार्यक्रम रद्द झाल्यामुळे त्यांना सवडही मिळाली. त्यांनी नागपुरातील एक प्रसिद्ध थाई रेस्टॉरंट शोधून काढले आणि तिथे थाई करीवर ताव मारला.
त्यांच्या खाण्यावरील प्रेमाचा आणखीन एक अनुभव नुकताच आला. नागपुरात मक्यापासून तयार केलेल्या पदार्थाचा महोत्सव होता. त्यांनाही आमंत्रण होतं. मलासुद्धा मनापासून वाटत होतं, की त्यांनी या महोत्सवाला हजेरी लावावी. पण पूर्वनियोजित दौऱ्यामुळे ते येणार नाहीत, हे स्पष्ट होतं. याचदरम्यान त्यांना गडचिरोलीला नेणारे हेलिकॉप्टर नादुरुस्त झाल्यामुळे त्यांचा दौरा रद्द झाला आणि ते घरी न जाता तडक मका महोत्सवाला आले.
दुसऱ्या क्रमांकावरील खाण्याचे दर्दी म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव. या यादवांना दह्य़ा-दुधाचे पदार्थ तर आवडतातच; त्याचबरोबर देशी पद्धतीने बनवलेल्या ग्रामीण पदार्थावर त्यांचे विशेष प्रेम आहे. त्यांना स्वत: स्वयंपाकघरात रमायला आवडतं. याचा प्रत्यय मला पाटण्याला त्यांच्या स्वयंपाकघरात शिरायची संधी मिळाली तेव्हा आला. लालूंच्या गावी राबडीदेवींच्या महिला संघटनेकरिता कुकरी शो करायला गेलो असताना त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. लालूप्रसाद- राबडीदेवींचे स्वयंपाकघर आधुनिक पद्धतीचे आहे. घराच्या मागच्या बाजूला खेळती हवा असलेल्या या स्वयंपाकघरात सूर्यचूल, गोबरगॅस इत्यादी वेगवेगळ्या इंधनांचा वापर होतो. लालूंना मी बनवलेले पदार्थ खायचे असल्यामुळे आणि त्यांची ग्रामीण आवड लक्षात आल्यामुळे मी माझा पदार्थ खास चुलीवर बनवत होतो. तेव्हा लालूजींची स्वारी स्वयंपाकघरात अवतरली. ते नेहमीच्या लालूशैलीत म्हणाले, ‘‘अरे! ये बिष्नूजी से हम भी कुछ कम नहीं. हमारे हात की सत्तू की लिट्टी-चोखा खाओगे तो बाकी खाना भूल जाओगे!’’ लालू नुसतेच बोलून थांबले नाहीत, तर स्वत: स्वयंपाकघरात मांडी ठोकून त्यांनी लिट्टी-चोखा बनवून घेतला. खरंच, त्यांच्या हाताला चव होती. स्वयंपाकातल्या बारीकसारीक गोष्टी त्यांना ठाऊक होत्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे तसे रसिक म्हणून ओळखले जातात. खाण्याच्या बाबतीतही अतिशय दर्दी माणूस! भारतातल्या कुठल्या भागात खाण्यासाठी काय चांगले मिळते, हे त्यांना पक्के ठाऊक असते आणि त्याबद्दल ते इतरांनाही माहिती देत असतात. एखादा मित्र नव्या शहरात गेला असेल तर त्या शहरात कुठे काय छान मिळेल, याची खडान्खडा माहिती विचारायची त्यांची सवय आहे. खाण्याची आवड असली तरी त्यांचे दोन वेळचे जेवण मात्र आटोपशीर असते. दौऱ्यात कितीही व्यस्त असले तरी ते नियमित व्यायाम करतात. भरपूर खा, पण ते व्यायाम करून पचवा; जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्हाला काहीतरी छान चाखता येईल, असे राज यांचे म्हणणे असते. नागपूरचे सावजी मटण आणि चिकन हे त्यांचे अतिशय आवडते पदार्थ.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या खाण्याच्या बाबतीतील सवयींची कल्पना मला दिल्लीच्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या वेळी आली. मी या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त दिल्लीला डायनिंग कमिटीमध्ये असताना सोनिया गांधींना जवळून पाहिले. या सर्व मोठय़ा मंडळींची खाण्याच्या सवयींची यादी माझ्यासमोर आली होती. ज्याच्या त्याच्या आवडीनुसारच मेन्यू डिझाइन करावा लागे. त्यावेळी असे लक्षात आले की, सोनिया यांच्या खाण्याच्या सवयी अगदी साध्या आहेत. जंक फूड त्यांना आवडत नाही आणि इतरांनासुद्धा त्या जंक फूड न खाण्याचा सल्ला देतात. सोनिया गांधी दोन वेळा भरपेट जेवण्याऐवजी दिवसातून चार वेळा थोडे थोडे खातात.
सोनिया यांच्याप्रमाणेच बहुजन समाज पक्षाच्या मायावती आपल्या खाण्याविषयी काटेकोर आहेत. त्यांना मांसाहार अधिक आवडतो. पण दररोज त्या साधेच जेवण पसंत करतात. निवडणुकांच्या काळात प्रचारसभांनी दैनंदिनी भरलेली असते, तेव्हा मात्र त्या अजिबात जड पदार्थ खात नाहीत. बाहेर काही खाण्याऐवजी मायावती संपूर्ण दिवस ताकावर असतात.
ताक मनापासून आवडणारे दुसरे एक नेते म्हणजे रामविलास पासवान. रामविलास पासवास यांना खरे तर मटणाचे जेवण प्रिय; पण निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असताना ते कटाक्षाने साधे जेवण घेतात. वरण-भात आणि वरण-पोळीसुद्धा त्यांना आवडते. उत्तर भारतात कणकेची भाकरी करण्याची पद्धत आहे. तिला ‘हारोळी’ म्हणतात. ती हारोळी आणि वरण हा त्यांचा आवडीचा आहार. ते एका राजकीय कार्यक्रमासाठी नागपूरला आले असताना डाल-रोटी बनवण्याची त्यांनी माझ्याकडे फर्माईश केली. पण डाळ मात्र अगदी साधी- तिखट व मसाल्याशिवाय बनवायला सांगितली. ‘सकाळी पराठा आणि ताक घेऊन निघालो की दिवस चांगला जातो,’ असे त्यांनी सांगितले.
अजितदादांना तसं साधं जेवण आवडतं. पूर्वी नॉनव्हेज फार आवडायचं. पण आता त्यांनी ते कमी केलं आहे. रोजच्या जेवणात सकाळी शक्यतो वरण-भात. दोन भाज्यांमध्ये पालेभाजी असते. पालेभाजी मात्र वेळेवर तयार केलेली असावी आणि त्यावर साजूक तूप. दौऱ्यावर असताना सकाळची न्याहारी जड असते. त्यामध्ये एग व्हाइट, दूध, फळं, इडली किंवा पोहे. रात्री घरी असताना मात्र खास सुनेत्रावहिनींच्या देखरेखीखाली तयार झालेली भाजी-भाकरी खायला त्यांना आवडते.
सरसंघचालक मोहन भागवत मूळ विदर्भातले. चंद्रपूर आणि अकोला हे त्यांचे कार्यक्षेत्र! पण सरसंघचालक या नात्याने ते जास्तीत जास्त वेळा नागपुरातच वास्तव्याला असतात. वैदर्भीय भाषेत सांगायचे झाले तर त्यांना ‘रच-मच’ जेवण आवडते. रच-मच याचा अर्थ बऱ्यापकी तेल, तिखट, मसाला असलेले जेवण. त्याचबरोबर त्यांना गोड पदार्थसुद्धा आवडतात. पण सध्या त्यांचे गोड खाणे जवळपास बंदच झाले आहे. त्यांना आवडणारा खास पदार्थ म्हणजे चंद्रपुरी वडा. शिवाय कोिथबीरवडी म्हणजेच पुडाची वडीही त्यांना प्रिय आहे. पण या पुडाच्या वडीवर कढी व तऱ्हीचा मुक्तहस्ताने वापर केलेला असला पाहिजे! सध्याच्या धकाधकीच्या दौऱ्यांच्या काळात आणि वयोमानाप्रमाणे मोहन भागवत माफक आहारच घेतात. प्रचारदौऱ्यात तर शक्यतो लिक्विड डाएटवर राहणेच पसंत करतात.
शेफ असल्याने मला या नेतेमंडळींच्या खाण्याच्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी जवळून अनुभवता आल्या आणि त्यांना खिलवण्याचा आनंदही घेता आला. त्यातून त्यांच्यातील राजकारण्यापलीकडचे वेगळे गुणही टिपता आले.