आनंदाचे ठायी रंगरेषांचे तरंग..

‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या मासिकांचे संपादक आनंद अंतरकर यांचे नुकतेच निधन झाले.

‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या मासिकांचे संपादक आनंद अंतरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या प्रदीर्घ संपादकीय कारकीर्दीचा तसेच त्यांच्या चौफेर व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या भगिनीने घेतलेला वेध..

अरुणा अन्तरकर

इतिहासाची पुनरावृत्ती सुखद असते तेव्हा ती बहुतेकदा एकरंगी असते. कारण आनंदाचा रंग सदैव एकसारखाच असतो. ती दु:खद असते तेव्हा बहुरंगी असते. दु:खाबरोबर भीती, गोठून जाणं, सुन्न होणं इतकं सारं तुमच्यावर चाल करून येतं. याचा अनुभव नुकताच घेतला.

पन्नास वर्षांपूर्वी ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या मासिकांचे संस्थापक आणि तत्कालीन संपादक (व माझे वडील) अनंत अंतरकर निधन पावले तेव्हा या मासिकांचे दिवाळी अंक हाकेच्या अंतरावर होते. पन्नास वर्षांनंतर याच मासिकांचे अलीकडचे संपादक (आणि माझे बंधू) आनंद अंतरकर यांचं निधन झालं तेव्हाही या मासिकांचे दिवाळी अंक उंबरठय़ापाशी आले आहेत.

वडिलांना फक्त पंचावन्न वर्षांचं आयुष्य मिळालं, तर आनंदला सलग पंचावन्न वर्ष संपादनाचा आनंद मिळाला. १९६१ पासून ६६ पर्यंत त्यानं ‘हंस’मध्ये केलेली उमेदवारी लक्षात घेतली तर ऐंशी वर्षांच्या आयुष्यात तब्बल साठ सलग वषर्ं त्याने या क्षेत्रात काम केलं. एकाच वेळी तीन भिन्न प्रकृतीच्या मासिकांच्या संपादनाची जबाबदारी त्याने पार पाडली, हीदेखील एक ऐतिहासिक घटनाच.

या प्रदीर्घ कारकीर्दीतली आनंदची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे गेल्या वर्षांवर करोनाचं विक्राळ सावट होतं तरी त्यानं त्यावर्षीचे दिवाळी अंक काढले. गेल्या वर्षी ‘हंस’चा ७५ वा दिवाळी अंक होता. तो तेवढा काढावा आणि ‘मोहिनी’ व ‘नवल’ मागे ठेवावेत असा सल्ला त्याला एका मित्रानं दिला. तो निर्विवादपणे व्यावहारिक शहाणपणाचा होता. पण शब्दांचा लढा अन् संपादनावरची निष्ठा रक्तात असणाऱ्या आनंदला तो पटला नाही. त्याचं म्हणणं होतं, ‘काढायचे तर तिन्ही अंक काढायचे, नाहीतर एकही नाही. कुणावर अन्याय होता कामा नये.’ या निर्णयाशी ठाम राहून आनंदनं तिन्ही अंक काढले आणि ते दरवर्षीइतकेच उत्तम खपले. याइतकीच त्याची दुसरी क्रांतिकारी कामगिरी म्हणजे अंकांची किंमत प्रत्येकी ४०० रुपये करणं. आमच्या या तिन्ही मासिकांमध्ये जाहिराती नसायच्या. जाहिरातींचं उत्पन्न भरपूर व हुकमी असतं. त्याकडे पाठ फिरवण्याइतकी कडवी भूमिका घेण्याची गरज नाही असं मलाही वाटे. ‘मी त्यांना सज्जड तीन-साडेतीनशे पानांचं साहित्य देतो. ते माझा अंक आनंदात विकत घेतील,’ हा त्याचा विश्वास वाचकांनी सार्थ ठरवला. वाचकांऐवजी काही समव्यावसायिकांनीच या निर्णयाला विरोध केला. अंकाची एवढी किमत ठेवणं म्हणजे आपल्या हातानं आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे असं त्यांचं म्हणणं होतं.

हे दोन भलतेच धाडसी निर्णय घेताना आनंदकडे अनेक वर्षांचा अनुभव जमा होता. पण असे अनेक निर्णय त्याला या क्षेत्रात पाऊल टाकल्यापासून घ्यावे लागले होते. पावलोपावली आव्हानांना सामोरं जावं लागत होतं. अगदी तरुण वयात संपादकपदाचा मुकुट डोक्यावर आला होता. पण तो काटेरी होता. पितृशोकाचा घाव ताजा होता. पण पोटभर रडण्याचीही मुभा नव्हती. तीन आठवडय़ांत तीन अंक काढायचे होते. ते इतर महिन्यांचे असते तर दडपण थोडं कमी झालं असतं. पण इथे एकदम आकाशाला गवसणी घालायचीच वेळ आली होती. कर्तबगार पित्याच्या नावलौकिकाबरोबरच घराण्याची इभ्रत सांभाळायची होती. त्याला हे काम झेपणार नाही असं वाटल्यामुळे काही हितचिंतक मंडळी दिवाळी अंकांचं काम स्वत:च्या खांद्यावर घ्यायला पुढे झाली होती. त्यांच्या सद्भावनेबद्दल शंका नव्हती. शिवाय नुसती मासिकं चालू राहून भागणार नव्हतं. अंतरकरांचं घरही सुरळीत चालायला हवं होतं. क्षणभर आमची आई विचलित झाली. पण काही क्षणच. तिचा आनंदवर विश्वास होता. आईची जागा अनंत अंतरकरांच्या पत्नीनं घेतली आणि तिनं ठामपणे सांगितलं, ‘नाही, संपादक अंतरकरांच्या घरातलाच असू दे. त्याला नाही जमलं तर तुम्ही आहातच.’

सुदैवाने अशी परिस्थिती उद्भवलीच नाही. दिवाळी अंकांचं शिवधनुष्य आनंदनं पेलून दाखवलं.  इथं आणखीही एक गोष्ट सांगायला हवी : अनंत अंतरकर गेल्यानंतर चौथ्याच दिवशी आईनं ‘हंस’चं ऑफिस उघडून काम सुरू करायला लावलं होतं. दिवाळी अंकांचं काम फत्ते झालं होतं. पण तेवढय़ानं निभावणार नव्हतं. हे सातत्य पुढच्या बारा महिन्यांच्या अंकांमध्ये दिसायला हवं होतं. तिथे आधीच्या संपादकानं निर्माण केलेली परंपरा टिकवायची होती. स्वत:च्या निर्मितीपेक्षाही पूर्वजांची कामगिरी त्यांचा ठसा कायम ठेवून करणं अवघड असतं. ते काम साध्य करायचं होतंच, शिवाय स्वत:चं स्वतंत्र व्यक्तिमत्त्वही कामामध्ये दिसायला हवं होतं. संपादनाबरोबरच व्यवस्थापन आणि आर्थिक बाजूही सांभाळायची होती. संपादन हा ‘रोमान्स’ असतो. व्यवस्थापन म्हणजे ‘संसार’ असतो. ‘हंस’मध्ये अकरा वर्षे आनंदच्या हाताखाली काम करताना हे वास्तव सामोरं आलं आणि माझ्या भावाची नाही, तर माझ्या बॉसची मला नव्यानं ओळख झाली. इथे मी त्याची बहीण नाही, हे अंगवळणी पडायला जरा वेळ लागला; पण जड गेलं नाही. घरात सतत मोठय़ानं बोलणारा अन् हसणारा आनंद ऑफिसमध्ये अगदी धीरगंभीर, पण खंबीर होता. चांगलं साहित्य मिळवून ते उत्तमरीत्या प्रसिद्ध करून संपादकाची जबाबदारी संपत नव्हती. आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यायचं होतं. प्रकाशनाशी संबंधित सर्वाशी देण्याघेण्याचा व्यवहार होता. संपादक आणि संस्थाचालक सर्जक आणि असर्जक अशा दुहेरी भूमिका तो एवढय़ा सफाईनं आणि जराही न कंटाळता कसा करायचा याचा तेव्हा अचंबा वाटायचा. उलगडा आता होतो आहे.

त्याच्यापाशी जन्मजात नेतृत्वगुण होते. अनेक गोष्टी त्याला अवगत होत्या. कोणतीही गोष्ट तो फार लवकर शिकून घ्यायचा. चित्रकला, फोटोग्राफी, माऊथ ऑर्गन वाजवणं या कला तो स्वत:च्या स्वत: शिकला.

आनंद हे नाव त्याच्याचसाठी जन्माला आलं आहे असं वाटावं इतकी देखणी प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर होती आणि तोच आनंद अन् उल्हास त्याच्या स्वभावात होता. त्याच्यातल्या कलावंताला कोणतीही गोष्ट वज्र्य नव्हती. आणि कोणतीही गोष्ट करताना त्याला वय, काळ, वेळ याच्या मर्यादा नसायच्या. वयाच्या पन्नासाव्या वर्षी तो क्लबतर्फे क्रिकेट खेळायला लागला. क्रिकेटचा पूर्ण जामानिमा करून स्वारी दर रविवारी पीवायसी मैदानावर जायची. त्याच्या क्लबनं मॅच जिंकली तर पीवायसीच्या जगप्रसिद्ध अप्पाची साबुदाणा खिचडी सर्वासाठी घरी यायची. खाण्याचा आणि इतरांना खिलवण्याचा जबरदस्त षौक! त्यात व्हेज-नॉनव्हेज, घरचं-बाहेरचं, पॉश हॉटेल अन् टपरी असा भेदभाव नसायचा.

रविवारची सुटी साजरी करण्याकरिता दर शनिवारी रात्री सिनेमा पाहायचाच. १९६७ ते ८० या कालखंडातला प्रत्येक हिंदी आणि इंग्रजी सिनेमा- मग तो बरा असो की वाईट- आम्ही पाहिला. सिनेमाहून परतताना कर्वे रोडवरच्या ‘पॅराडाईज’ या इराणी हॉटेलपाशी थांबून कोक आणि सामोसे हा मेनूही ठरलेला. सामोसे पट्टीचे आणि आनंद अंतरकरही पट्टीचे खाणारे!

शनिवारी पाहिलेल्या सिनेमाची रविवारी सामूहिक समीक्षा आणि त्याचबरोबर आनंद अंतरकरांचा नकलांचा कार्यक्रम. दिलीपकुमारपासून जॉनी वॉकपर्यंत आणि इराणी हॉटेल मालकापासून मच्छीवाल्या बाईपर्यंत कुणाचीही हुबेहूब नक्कल करणं हा तर त्याच्या डाव्या हातचा मळ होता. ‘सफाई की बीमारी’ म्हणावी इतका कमालीचा स्वच्छतेचा भोक्ता. त्यापायी स्वत:चे कपडे स्वत: धुण्यापासून ते आमच्या पर्सेस पॉलिशनं लखलखीत करण्यापर्यंत कोणतंही काम करायला त्याला कमीपणा वाटत नसे. ससे, मांजरं वगैरे प्राणी त्यानं हौसेनं पाळले. रफी, लता, प्रभा अत्रे, फ्रँक सिनात्रा आणि क्लिफ रिचर्ड्स या सर्वाना त्याच्या कानात आणि मनात जागा होती.

या सर्वस्पर्शी रसिकतेच्या बळावर आनंदनं व्यवसायातल्या दैनंदिन कटकटी, अडचणी आणि संकटं यांना तोंड दिलं. कारकीर्दीची पहिली पाच-सात वर्षे सोडली तर या सर्वात सतत भरच पडत राहिली.

टीव्ही आणि व्हिडीओ संस्कृती(!)चा तडाखा सगळ्याच शब्दसृष्टीसाठी जीवघेणा होता. त्यातून सावरण्यासाठी वृत्तपत्रांच्या शनिवार, रविवारच्या पुरवण्या ललित साहित्य देऊ लागल्या. तत्पूर्वी मासिकांमधून जे मिळत होतं, ते या पुरवण्यांमध्ये अगदी माफक किमतीत मिळू लागलं आणि मासिकांचा खप झपाटय़ानं कमी झाला. वर्गणीदार पद्धत बंद झालीच, शिवाय छपाईचं तंत्रही बदललं. त्यासाठी तयार झालेली यंत्रं मासिकांना परवडणारी नव्हती.

यापुढे जाऊन तंत्रज्ञानाच्या नव्या जमान्यामुळे वाचकांची आवड बदलत गेली. कादंबऱ्या वाचण्यासाठी नव्या वाचकापाशी वेळ नव्हता. कथा, कविता छोटय़ा होत्या; पण इंग्रजी माध्यमाची चलती सुरू झाली आणि मायमराठीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. ललित साहित्याऐवजी चित्रपट आणि क्रीडा यांच्या बरोबरीनं आरोग्य आणि आर्थिक विषयांवरच्या उपयुक्ततावादी लेखनाला पसंती मिळू लागली आणि मग वाङ्मयीन मराठी मासिकांनी अंथरूण धरलं. या त्सुनामीला तोंड देत आनंद ‘हंस- मोहिनी- नवल’ पुढे नेत राहिला. नव्या तंत्रज्ञानानं त्याच्या सजावटीतल्या कल्पकतेला नवी भरारी दिली. पंचावन्न वर्षांत लेखक, चित्रकार व हास्यचित्रकार यांच्या चार पिढय़ा सामावून घेण्याचं महान कार्य त्याच्या हातून झालं.

असाध्य आजाराची चाहूल लागताच सर्वप्रथम त्यानं दिवाळी अंकांचं काम पूर्ण केलं. आता त्याचं फक्त छपाईचं काम शिल्लक आहे. सुरुवातीला उल्लेख केला त्या नियतीच्या नाटय़ाचा पहिला अंक संपला तेव्हा वडिलांचं राहिलेलं काम करायला मुलगा पुढे आला. आनंदच्या जाण्याबरोबर नाटकाचा दुसरा अंक संपला तेव्हा पित्याचं काम मुलानं पूर्ण करावं, या योगाचीही पुनरावृत्ती होत आहे. पहिल्या वेळी सुरू झालेलं काम ५५ वर्ष चालू राहिलं. अंतरकरांच्या तिसऱ्या संपादकीय पिढीकडून अशीच कामगिरी व्हावी, अशी आशा आणि प्रार्थनाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Editor anand atarkar aruna antarkar history ssh

ताज्या बातम्या