गोविंदरावांचा कथित तुटकेपणा… ज्याला त्यांच्या बैठकांत निमंत्रण नसलेले तुसडेपणा म्हणत… हा नाही म्हटलं तरी दंतकथेचा विषय होता. त्यांचे अग्रलेख, त्यातली सडेतोड भाषा, कोणाचीही भीडमुर्वत न ठेवण्याची वृत्ती वगैरे वगैरे गुण अनेकांना न झेपणारे होते. त्यामुळे मराठीत असूनही मराठी सांस्कृतिक विश्वापासनं चार हात दूर राहिलेला संपादक असंच गोविंदरावांचं वास्तव. आपल्याला हवं तितकंच समाजाशी लिप्तून पुन्हा अलिप्त कसं व्हायचं याचा धडा शिकवू शकणारं…

‘लोकसत्ता’चा एक घट्ट परदेशी वाचक गेल्या आठवड्यात कार्यालयात भेटायला आला. त्याचं वाचनप्रेम माहीत असल्यानं काही पुस्तकं आणून ठेवलेली त्याला द्यायला. तर त्यानं दिवाळी अंक मागितले. गेल्या तीन-चार वर्षांचे. दिल्यावर आत काय आहे हे पाहायच्या आधी म्हणाला, ‘‘मुखपृष्ठांवर नट्याबिट्यांचे फोटो नसतात तुमच्या अंकाच्या ते बेस्ट!’’ त्याचं हे विधान ऐकलं आणि गोविंदरावांचा (तळवलकर) अनुभवलेला एक प्रसंग आठवला.

सावंतवाडीत ‘संपादक तुमच्या भेटीला’ असा काहीसा कार्यक्रम होता. गोविंदराव येणार होते. तिथले मोठे वितरक पेडणेकर आणि मंडळींनी पुढाकार घेतलेला. तळवलकर येणार म्हणून स्थानिक बुद्धिजीवी वर्गात भलताच उत्साह. गोविंदराव ‘दिसतात कसे आननी’ हे पाहण्यात अनेकांना रस. त्या काळात गोविंदरावांचा तो कथित तुटकेपणा – ज्याला त्यांच्या बैठकांत निमंत्रण नसलेले तुसडेपणा म्हणत- हा नाही म्हटलं तरी दंतकथेचा विषय होता. त्यांचे अग्रलेख, त्यातली सडेतोड भाषा, कोणाचीही भीडमुर्वत न ठेवण्याची वृत्ती वगैरे वगैरे गुण अनेकांना न झेपणारे होते. त्यामुळे मराठीत असूनही मराठी सांस्कृतिक विश्वापासनं चार हात दूर राहिलेला संपादक असंच गोविंदरावांचं वास्तव. बरं, जे त्यांच्या बैठकांतले होते आणि ज्यांच्या बैठकांत गोविंदराव असत ते फारच उंच. म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पुलं, कुसुमाग्रज, गोविंदराव पारीख, मिनू मसानी, बॅरिस्टर तारकुंडे, वि. म. दांडेकर, सांगलीचे आबासाहेब कुलकर्णी, नाशकातले विनायकदादा पाटील असे सगळे. त्यामुळे मीडिऑकर मंडळींची फारच कुचंबणा व्हायची. एकतर तितकी आपली उंची नाही हे कबूल कसं करणार? आणि परत गोविंदरावांच्या नावे उघड बोटं मोडायची तरी पंचाईत. आहे ते स्थानही पुसलं जाण्याची भीती. तेव्हा हा वर्ग मग ते ‘किती शिष्ट आहेत’, ‘तुसडे आहेत’, ‘त्यांना फारच अहं आहे’… वगैरे वदंतांत आपापला मसाला घालून त्या पुढे पाठवायचे. समाजमाध्यमं नव्हती त्या वेळेस, पण जळके जल्पक तेव्हाही होतेच.

तर सावंतवाडीतल्या त्या कार्यक्रमासाठी गोविंदराव येणार त्याची फारच हवा तयार झालेली. ‘टाइम्स’ समूहाचे वितरण विभागाचे ज्येष्ठ सुधाकर श्रोत्री (अभिनेता पुष्करचे वडील), मंगेश ठाकूर आणि मी असे सगळे गोव्यातून दोन गाड्यांतून निघालो. उन्हाळ्याचे दिवस. वातावरणात एक चिकटा किरकिरेपणा. सावंतवाडीत पोचलो तर हॉल गच्च भरलेला. माझ्यासारख्याला संपूर्ण कार्यक्रमापेक्षा त्यातल्या उत्तरार्धाचं दडपण होतं. कारण त्यात गोविंदरावांशी प्रश्नोत्तरं होणार होती. कोण काय विचारेल याचा नेम नाही. काहीतरी भलताच प्रश्न कोणी विचारला आणि हे रागावले तर काय, ही चिंता. त्या कार्यक्रमाला कोकणातले वितरकही मोठ्या संख्येने होते. मुळात गोविंदरावांना सभा-संमेलनांचा कंटाळा. फड मारण्यात त्यांना सुतराम रस नव्हता. गर्दीच्या सरासरी बौद्धिक पातळीविषयी ते कमालीचे साशंक. या अशा कारणांमुळे ते कोणा समारंभात असले तर आयोजकांवरच दडपण यायचं. सावंतवाडीत तसंच होतं. कार्यक्रमाचा पूर्वार्ध व्यवस्थित पार पडला. प्रश्नोत्तरं सुरू झाली. वाचन वगैरेवर पहिले काही प्रश्न. नंतर वितरकांनी काही अडचणी मांडल्या. त्यात संबंधितांना लक्ष घालायला गोविंदरावांनी सांगितलं. एकंदर तसं सगळं सुरळीत चाललेलं. पण मध्येच हा प्रसंग घडला…

एक वितरक उभा राहिला. घाऱ्या डोळ्यांचा नव्हता, पण गोरा. गोविंदरावांना म्हणाला, ‘‘यंदाचा तुमचा दिवाळी अंक काही उठला नाही.’’

गोविंदरावांनी विचारलं, ‘‘ काय झालं?’’ त्या वितरकाचा मुखपृष्ठावर आक्षेप होता. मजकुराशी काही फारसं घेणंदेणं त्याला नसावं. ‘‘इतर अंकांवर पाहा कशा नट्या आहेत… नाहीतर तुमचा अंक…’’ हे त्यानं म्हटल्यावर पुढे काय वाढून ठेवलंय याच्या अंदाजानं पोटात गोळा आकार घेऊ लागला. त्याच्या या वाक्यावरही गोविंदराव शांत. म्हणाले, ‘‘गोपाळराव देऊस्करांचं अभिजात चित्र आहे मुखपृष्ठावर.’’ पण त्यांना वाक्यही पूर्ण करू न देता भीड चेपलेला तो वितरक विचारता झाला, ‘‘कोण हे देऊस्कर? नट्यांपेक्षा लोकप्रिय आहेत काय ते?’’

गोविंदरावांनी विचारलं, ‘‘तुम्हाला देऊस्कर माहिती नाहीत…? अंकात दिलंय त्यांच्यावर.’’ आता खरं तर यावर त्यानं गप्प बसायचं, पण नाही. तो आणखीन काही बोलायला गेला. मग तो क्षण आला. गोविंदराव श्रोत्रींकडे वळून म्हणाले, ‘‘वितरक म्हणून काढून टाका यांना… गोपाळराव देऊस्कर माहीत नसतील, कोण ते जाणून घ्यायचं नसेल तर आपला अंक विकण्याची यांची पात्रता नाही.’’

संपूर्ण सभागृहात एक सन्नाटा. जे झालं ते इतकं पटकन झालं की प्रसंग सावरायची संधीच मिळाली नाही कोणाला. चारचौघांत लाज निघाल्यानं तो वितरकही चपापला आणि हे असं काही होईल याचा अंदाज न आल्यानं आम्हालाही सुधरेना. कसा बसा तो कार्यक्रम आटोपून परत पणजीकडे निघालो. मोटारीत बसले आणि गोविंदरावांनी पुस्तकात डोकं घातलं ते एकदम पणजीत फेरी बोटीत मान वर केली. मोटारीतनं बाहेर येऊन मांडवीवरचा ताजा वारा त्यांना प्रसन्न करून गेला असणार. जे काही झालं त्याचा विषयही त्यांच्या तोंडून निघाला नाही.

गोव्यातल्या पाच-सहा वर्षांच्या वास्तव्यात ज्या काही अमूल्य गोष्टी अनुभवता आल्या, त्याचा उगम गोविंदराव होते. गोवा हा त्यांचा आवडता. पण त्याला तिथलं निसर्गसौंदर्य, चर्चेस, देवस्थानं ही कारणं अजिबात नाहीत. तर पाश्चात्त्य सभ्यतेशी जवळ जाणारी संस्कृती, स्वच्छता आणि साध्या जगण्यातली कलासक्तता ही त्यांची गोव्याच्या प्रेमावरची कारणं. त्यात वसंतराव जोशी, सीताकांत लाड, प्रभाकर आंगले, रामकृष्ण नायक इत्यादी प्रेमळ गोतावळा होता त्यांचा गोव्यात. गोविंदरावांच्या गोवा फेरीनुसार हे सगळे आपापले कार्यक्रम आखायचे. कधी श्री. पु. भागवत असायचे तर कधी शिरवाडकर तर कधी पुलं आणि सुनीताबाई. या सगळ्यांच्या काव्यशास्त्र-विनोदाच्या इतक्या भरजरी आठवणी आहेत की स्मृतिकोष अपुरा पडावा. या सगळ्यांना पाहणं- ऐकणं हे शिक्षण होतं. एकदा असं झालं…

गोविंदरावांनी आपल्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी इच्छा बाळगणारे गोव्यातही खूप होते. त्यातले काही मला विनंती करायचे. गोविंदरावांच्या वतीने निर्णय घेणारा मी कोण? त्यामुळे त्या अर्जविनंत्या मी त्यांच्याकडे पाठवून द्यायचो. त्यातल्या कोणाविषयी त्यांनी मत विचारलं तरच द्यायचं हा नियम. तर एकदा अशा एका संस्थेविषयी त्यांनी विचारलं. दोन-चार वर्षं ही संस्था गोविंदरावांनी त्यांच्या कार्यक्रमाला यावं म्हणून प्रयत्नात होती. विचारल्यावर मी सांगितलं, जायला हरकत नाही, वगैरे. गोविंदरावांनी तो कार्यक्रम स्वीकारला. पण आयोजकांना काय बुद्धी झाली कळलं नाही. त्यांनी आणखी एकाला त्या कार्यक्रमात घ्यायचं ठरवलं. तेही संपादक. पुण्यातले. कर्मधर्मसंयोगाने गोव्यात होते. आयोजकांनी त्यांना विचारलं, ‘‘याल का कार्यक्रमाला?’’ गोविंदरावांच्या बरोबर व्यासपीठावर बसायला मिळणार त्यामुळे असेल कदाचित- ते ‘हो’ म्हणाले. मला हे कळल्यावर काळजी वाटली. आयोजकांतला एक चांगला मित्र होता. त्याच्या कानावर ती चिंता घातली. तोही चिंतेत. त्याला वाटलं नव्हतं की हे दुसरे संपादक ‘हो’ म्हणतील. इतक्या ऐनवेळेला सांगून त्यांनी होकार दिल्याने आयोजकांचीही पंचाईत झाली. पण आता इलाज नव्हता. त्यांना तरी कसं सांगणार आता तुम्ही येऊ नका ते…

तर ठरल्याप्रमाणे गोविंदराव आले आदल्या दिवशी. संध्याकाळी ‘मांडवी’त नेहमीचे सगळे जमणार होते. मी काळजीत. गोविंदरावांना कार्यक्रमातला बदल कोणत्या तोंडानं सांगायचा ही काळजी. संध्याकाळी सगळे जमायच्या आत गोविंदरावांना काय झालं ते सांगून टाकलं. चेहऱ्यावर काहीही भाव नाहीत. ते म्हणाले, ‘‘आयोजकांना सांगून टाका ‘त्याच्या’बरोबर मी नाही बसू शकत व्यासपीठावर.’’ इतकंच. ‘मांडवी’तल्या रूममधनंच आयोजकांना फोन केला आणि सांगून टाकलं. त्यांनी इच्छा व्यक्त केली, गोविंदरावांशी बोलण्याची. मी म्हटलं विचारतो. गोविंदरावांनी फोन हातात घेतला. दोन-तीन मिनिटं ऐकत होते. चेहऱ्यावर काहीही वेगळे भाव नाहीत. एकच वाक्य म्हणाले आणि संभाषण संपल ं: ‘‘हे बघा, आयोजक म्हणून कोणाला बोलवायचं हा अधिकार तुमचा. मला त्यावर बोलायचं नाही. पण कोणाच्या शेजारी स्टेजवर बसायचं- नाही बसायचं हा अधिकार माझा!’’ फोन कट.

त्यानंतर त्या विषयावर एक शब्द नाही. ना नाराजी ना कोणाचा उद्धार. हे झालं आणि गोविंदराव म्हणाले, ‘‘लाडांना विचारा, आहेत का ते.’’ विचारलं. ते होते. मग आम्ही दोघे लाडांकडे. तिथून त्यांनी वसंतरावांना (जोशी) फोन केला. गोविंदरावांची उघड गंमत करण्याचा अधिकार फक्त त्यांना होता. फोनवर त्यांनी गंभीर चेहऱ्यानं कोंकणी सुरात गोविंदरावांना विचारलं, ‘‘गोविंदराव प्रकृती बरी असा मु?’’ गोविंदरावांना कळेना. ते म्हणाले, ‘‘हो. काय झालं?’’ वसंतरावांचं उत्तर – ‘‘नाही, त्या अमुक-तमुकबरोबर कार्यक्रम घेतलात म्हणून शंका आली.’’ गोविंदराव मोकळे हसले. नंतर त्यांनीच वसंतराव फोनवर काय म्हणाले ते सांगितलं. सगळ्यांना हसायला आलं. वसंतरावांप्रमाणे लाड पती-पत्नीही म्हणाले, ‘‘ तुम्ही ‘त्यांच्या’ बरोबर कार्यक्रम घेतलात त्याचं आम्हालाही आश्चर्य वाटलं.’’ त्या दिवशी वसंतरावांना यायला जमणार नव्हतं. मग गोविंदराव आणि सीताकांत लाड बालगंधर्वांच्या तबकड्या ऐकण्यात हरवून गेले.

आपण त्या कार्यक्रमाला गेलो नाही… पत्रिका छापून झालेल्या आहेत. घोषणा झालेली आहे. आयोजकांची अडचण झाली असणार… गोविंदरावांनी त्या सगळ्याविषयी एक चकार शब्द काढला नाही.

आणखी एक संध्याकाळ अशीच धडा देणारी ठरली. त्या वेळी गोविंदराव ‘ताज आग्वाद’मध्ये उतरणार होते. हा बदल आश्चर्यकारक वाटला. कारण ताज जरा आडवाटेला आहे. आणि आश्चर्याचं दुसरं कारण म्हणजे नेहमीची संध्याकाळची बैठक होणार नव्हती. लगेच दुसऱ्या दिवशी ते मुंबईला परतणार होते. इतकंच काय, त्यांच्या नेहमीच्या सुहृदांना या भेटीची माहितीही नव्हती. तर आल्यावर ‘ताज’मध्ये त्यांना भेटायला गेलो. तिथल्या अत्यंत उंची अशा स्वीटमध्ये तळवलकरांचा मुक्काम होता. खोलीच्या वऱ्हांड्यातून समोर फेसाळता समुद्र दिसत होता. इथले गोविंदराव वेगळे होते. आणि मुख्य म्हणजे गप्पा मारणारी व्यक्तीही वेगळी होती.

गप्पा इंग्रजीत होत्या. विषयांत देशाचं अर्थकारण, सरकारची धोरणं वगैरे वगैरेंवर आपली मतं मांडत होते आणि समोरची ती व्यक्ती एखाद्या तटस्थ प्राध्यापकाला ऐकावं अशा पद्धतीनं त्यांचं ऐकत होती. त्या व्यक्तीच्या वागण्यातलं मार्दव पाश्चात्त्य सभ्यतेचं निदर्शक. ती व्यक्ती माझ्याही आदरणीय व्यक्तीतील एक. रतन टाटा.

टाटा आणि गोविंदराव यांना एकत्र बघणं आणि ऐकणं हा विलक्षण अनुभव होता. टाटा समूहातर्फे त्यांच्या समूहातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या संचालकांसाठी दरवर्षी मान्यवरांशी संवाद, व्याख्यानं आयोजित केली जातात. ‘लेस्ली सॉहनी’ प्रोग्राम असं त्याचं नाव. लेस्ली सॉहनी कर्नल होते लष्करात. जेआरडींचे मेहुणे. त्यांची लाडकी धाकटी बहीण रोदाब ही कर्नल लेस्लींची बायको. हे कर्नल लेस्ली १९६६ साली अचानक गेले. त्यांचं मरण हा जेआरडींना मोठा धक्का होता. एकतर रोदाब जवळची आणि तिचा नवरा विश्वासू सल्लागार. तो गेल्यानंतर (नंतर बहीण रोदाब हिलाही अल्झायमरने ग्रासलं, हेही दु:ख होतं त्यांना.) जेआरडींनी हा ‘लेस्ली सॉहनी’ प्रोग्राम सुरू केला. आसपासच्या घटनांविषयी वेगवेगळ्या लोकांकडून भाष्य घडवून आणायचं आणि आपल्या सहकाऱ्यांना वेगवेगळे कोन दाखवायचे हा त्याचा उद्देश. त्या वर्षीचं ‘लेस्ली सॉहनी’ सत्र गोव्यात होतं. गोविंदराव बोलणार होते. मी भीत भीत विचारलं… ‘‘मला ऐकायला मिळेल का?’’ गोविंदरावांच्या आधी रतन टाटांनी उत्तर दिलं… ‘‘वेलकम… बट धिस इज नॉट फॉर रिपोर्टिंग… एव्हरीथिंग ऑफ रेकॉर्ड…’’ नंतर रतन टाटा गेल्यावर गोविंदरावांनी विविध राजकारणी, उच्चपदस्थ, खासगी उद्याोजक… वगैरेंच्या बैठकांतले आणखी काही किस्से सांगितले. ‘‘पण हे कधीही माझ्याकडून बाहेर येणार नाही.’’ त्यांचं स्पष्टीकरण.

नंतर ९६ साली मी मुंबईत परतलो आणि काही वर्षांनी गोविंदराव अमेरिकेला गेले. ई-मेलवर संपर्क असायचा. पण त्यांचा काही मेल आला तर मी त्यांना उत्तर द्यायचो, असा शिरस्ता. स्वत:हून त्यांना सांगावं असं काही घडत नव्हतं. मला मग ९८ साली इंग्लंड सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यानं सहा महिने लंडनला राहता येणार होतं. हे गोविंदरावांना कळवायची इच्छा होती, पण धीर होत नव्हता. मग अशोक जैनांनी उत्साहानं परस्पर काम करून टाकलं. जैनांनी कळवलं. त्यावर गोविंदरावांचं पत्र आलं. तीन पानी. आजही ते माझं ‘लंडन गाइड’ आहे.

लंडनमध्ये मी काय काय पाहावं- खावं आणि अर्थातच प्यावं याची ती साद्यांत यादी आहे. मी ती शिरसावंद्या मानली आणि प्रत्येक गोष्ट त्यानुसार केली. अजूनही करतो. अलीकडेच मे महिन्यात तिकडे होतो तर त्यातल्या काही गोष्टी पुन्हा अनुभवल्या. गोविंदरावांच्या त्या पत्राचं शेवटचं वाक्य आहे: ‘ Give My Love To London.’

त्यांच्याशी जवळपास अखेरपर्यंत ई-मेल संवाद सुरू होता. त्यांच्याकडून कौतुकाचे चार शब्द ऐकले ते फक्त एकदा. माझ्या तेलावरच्या पुस्तकावर. ‘‘विषय आणि मांडणी चांगली. प्रत्येक नव्यास विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांसारखी तुमची भूमिका नाही. ते योग्य. पं. नेहरूंविषयी अधिक वाचायला आवडले असते.’’ इतकंच. तेही मला चांगलं म्हणण्यापेक्षा अतिरेकी पर्यावरणवाद्यांना सुनावणं त्यांना अगत्याचं वाटलं. टिपिकल गोविंदराव. मुंबईत यायचे तेव्हा निवांत भेटी व्हायच्या. इथे आले की त्यांना मेल अॅक्सेस नसायचा. मला मग हातानं लिहून द्यायचे आणि मग मी ऑफिसातनं किंवा घरी जाताना भेटलो असलो तर घरी पोचल्यावर मेल करायचो. मजा यायची. पुढे ‘लोकसत्ता’चा संपादक झाल्यावर गोविंदरावांशी बोलताना, त्यांना लिहिताना जरा अवघडल्यासारखं झालं सुरुवातीला. ते कुठे… वगैरे अशीच भावना. नंतर नंतर भीड चेपली. मोकळेपणानं त्यांना काय काय विचारायला लागलो. एकदा त्यांना विचारलं ते त्यांच्याच विषयी होतं. त्यांच्या काही जुन्या सहकाऱ्यांनी गोविंदरावांवर टीका करणारा लेख कुठल्याशा दिवाळी अंकात लिहिलेला. त्यावर त्यांना विचारलं. गोविंदराव म्हणाले. ‘‘एक लक्षात ठेवायचं. कधीही स्पष्टीकरण द्यायच्या फंदात पडायचं नाही. ज्यांना तुम्ही माहिती आहात, जे तुम्हाला ओळखतात, ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांना त्याची गरज नाही. आणि ज्यांचा विश्वास नाही, टीकाच करायची आहे तुमच्यावर त्यांना तुमच्या स्पष्टीकरणानं काहीही फरक पडणार नाही. मग या स्पष्टीकरणाची गरजच काय?’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सल्ल्याचं मोल आता कळतंय! हयात असते ते तर याच आठवड्यात गोविंदराव शंभरावा वाढदिवस साजरा करते. समाजमाध्यमांच्या उच्छादी काळातही आपल्याला हवं तितकंच समाजाशी लिप्तून घ्यायचं आणि एरवी पुन्हा अलिप्त कसं व्हायचं याचा धडा घालून दिला असता त्यांनी.