scorecardresearch

ओळख.. ‘साजिऱ्या’ शब्दांशी !

या ओळी माझ्या रहिमतपूरच्या आजीनं म्हणजे आईच्या आईनं माझ्या आईला भेट दिलेल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर आजीच्या हस्ताक्षरात होत्या.

अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या ‘एक उलट.. एक सुलट’ या पुस्तकाचे प्रकाशन आज, १६ नोव्हेंबर रोजी पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इथे डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते होत आहे. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाच्या मनोगताचा संपादित अंश..
‘कविरायांची अमृतवाणी शब्द किती साजिरा
राजहंसी तू तुला दिला हा मोत्यांचा चारा’
या ओळी माझ्या रहिमतपूरच्या आजीनं म्हणजे आईच्या आईनं माझ्या आईला भेट दिलेल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर आजीच्या हस्ताक्षरात होत्या. ‘शब्द’ माझ्या या आजीचे फार जवळचे मित्र. बी.ए.ला तिचा विषय मराठी होता. वाचन अफाट होतं आणि ती लिहायची पण सुंदर, पण तिनं हे सगळं स्वत:पुरतं, स्वत:साठी केलं. मग तिच्या मुला-नातवंडांसाठी केलं. ती तेवढय़ावरच समाधानी होती. पहाटे उठून, सुंदर रंगाची साडी नेसून, भरघोस पांढऱ्याशुभ्र केसांचा मोठा सैल अंबाडा मानेवर बांधून, कपाळावर सुंदर चंद्रकोर लेवून ती लोण्यासारख्या मऊ  आवाजात मला उठवायची आणि आजोळी रहितमपूरला गावाबाहेरच्या शेतावर नेऊन उगवत्या सूर्याच्या साक्षीनं अनेक मराठी आणि संस्कृत श्लोक शिकवायची, त्यांचे अर्थ सांगायची. ही शब्दाच्या ‘साजिऱ्याशी’ माझी तोंडओळख होती.
आजीच्या शब्दांवरच्या प्रेमाला तिच्या माहेरची मोठी परंपरा होती. नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे तिच्या वडिलांचे काका. ती लग्न होऊन सांगलीहून रहिमतपूरला आल्यावर तिनं ‘हिंद वाचनालय’ नावाचं वाचनालय गावात सुरू केलं. माझ्या कित्येक सुट्टय़ा त्या वाचनालयातल्या पुस्तकांचा फडशा पाडण्यात गेल्यात. मला वाचनाचं वेड लागण्याचं आणखीही एक कारण होतं. माझं बालपण माझा मामा नाटककार गो. पु. देशपांडे याच्या वाचनवेडाच्या गोष्टी ऐकण्यात गेलं. गोविंदमामा लहानपणापासूनच तासन्तास वाचायचा. एकदा घरी कुणीच नव्हतं. त्याचं जेवणाचं ताट वाढून, झाकून ठेवून गोविंदमामाला ‘जेवून घे’ असं सांगून आजोबा कुठेसे गेले. मामा वाचत होता. ‘हो’ म्हणाला. आजोबा रात्री परत आले तर ताट तसंच झाकलेलं, मामा तसाच वाचत असलेला! ते म्हणाले, ‘गोविंदा, अरे, जेवायचं नाहीस?’ तो वाचता वाचता म्हणाला, ‘जेवलो की!’ आजोबा त्या भरलेल्या ताटाकडे दिङ्मूढ होऊन पाहत राहिले होते. मी पाहिल, गोविंदमामा काहीही वाचायचा. एखादं गाजलेलं वैचारिक पुस्तक ते इस्त्रीचे कपडे ज्यात बांधून आले असतील तो वर्तमानपत्राचा तुकडा, काहीही! तो सतत लिहीतही असायचा. लिहिण्यासाठी इतरांना कागद, लेखणी, संगणक लागत असेल, त्याला नाही. त्याला मी किती तरी वेळा हवेतल्या हवेत बोटानं लिहिताना पाहिलं आहे. या हवेतल्या लिहिण्यातही त्याला शब्दांवर रेघा देताना पाहिलं आहे. जेवण झाल्यावर ताटाची वाटी करून त्यावर बोटानं काही तरी लिहिताना पाहिलं आहे. मला या सगळ्याचं फार अप्रुप वाटायचं. आता जाणवतं, त्याच्या किती तरी सवयी मी कळत नकळत किंवा जाणूनबुजून उचलल्या होत्या, आहेत. एखाद्या माणसासारखं व्हावंसं वाटलं की मुद्दाम त्याचं अनुकरण करावं तसं! मीही ताटात लिहू पाहायचे. लहानपणी वाटायचं, गोविंदमामाच्या जगात त्याच्या आसपास शब्दच शब्द तरंगत असतील! जग कसं दिसत असेल, या कुतूहलानं असेल मी त्याच्यासारखं एक डोळा समोर करून ‘तिरकं’ बघण्याची त्याची लकब तंतोतंत उचलली आहे. पण त्याच्या लकबी उचलून ‘तो’ होता येणार नाही, हे मोठं होता होता कळलं. त्याच्या नाटकांचे, वैचारिक लेखांचे अजिबात अर्थ लागेनात. मग ‘तो खूपच मोठा आहे’ हे जाणवून त्याची छान भीती वाटायला लागली. त्यानं समग्र तुकाराम, एकनाथ वाचायला दिले. तेही त्या लहान वयात डोक्यावरनं गेले. अजून थोडं मोठं होताना माझी मीच समजूत घातली आणि ‘तो’ होण्याचं स्वप्नं सोडून त्याचं ‘शब्दावरचं प्रेम असणं’ आणि ‘लिहिणं’ यातलं अंतर समजत होतं. संपूर्ण बालपण मी वाचलं. पण एक अक्षरही लिहिण्याची हिंमत केली नाही. मी पहिल्यांदा लिहिलं ते विजय तेंडुलकरांच्या सांगण्यावरून. ‘तू लिही’ असं ते मला का म्हणाले असतील, याचं उत्तर मी अजूनही शोधते आहे. गेली दोन र्वष लोकसत्ताच्या ‘चतुरंग’ पुरवणीनं मला ते उत्तर सक्तीनं शोधत राहायला लावलं आहे. मला नेहमी वाटतं, दोन कला एकमेकींबरोबर येतात तेव्हा त्या खूप वेगवेगळ्याही दिसू नयेत आणि खूप मिसळूनही जाऊ  नयेत. माझं लिखाण आणि निलेश (जाधव)ची चित्रं यांचं हेच नातं आहे. ती एकमेकांसाठीही आहेत आणि त्यांची त्यांचीही. एका चांगल्या नात्यासारखी..
माझ्या प्रत्येक लेखाचे पहिले दोन वाचक – माझी आई ज्योती सुभाष आणि नवरा संदेश कुलकर्णी. या दोघांविषयी शब्दांत काहीही लिहिलं तरी कृतक होईल, इतकी ती नाती खोल आहेत. त्यांनी माझ्या लिखाणाला काय दिलं? खूप मोठय़ा कशाचा तरी एक छोटा तुकडा काढून सांगायचं तर आईला मी ‘नावबहाद्दर’ म्हणते. मला ज्या लेखांची नावं सुचत नाहीत ती तिला चटकन सुचतात. नाव म्हणजे काय, तर लेखाचं सार. माझ्यातलं मला न सापडणारं माझंच ‘सार’ ती मला शोधून देत असते. संदेश स्वत: एक लेखक आहे. इंजिनीअरही आहे. तो पूर्वी एका इंजिनीअिरग महाविद्यालयात ‘इंजिनीअिरग ड्रॉइंग’ हा विषय शिकवायचा. त्याच्या प्रेमात पडल्यावर मी एकदा चोरून त्याच्या एका लेक्चरला बसले होते. तेव्हा त्यानं ‘बर्ड्स आय व्ह्य़ू’ नावाची संकल्पना त्या वर्गात शिकवली होती. कुठलंही चित्रं किंवा वस्तू एका पक्ष्यानं आभाळातनं पाहिली तर कशी दिसेल, तशी पाहायची. ही संकल्पना त्याच्याकडून अजूनही मी शिकतेच आहे. आयुष्यासाठी आणि प्रत्येक लेखासाठी. माझ्या काही जरुरीपेक्षा जास्त आत्ममग्न विषयांसारखे मी रुतत झाकोळून जाते का काय असं वाटत असताना संदेशनं नेहमीच हात देऊन झपकन् मला त्या आकाशातल्या पक्ष्याच्या नजरेतनं पाहायला लावलेलं आहे.
हे पुस्तक ‘राजहंस’ प्रकाशनाकडून प्रकाशित होणं हा माझ्यासाठी अपूर्व योगायोग आहे. माझे वडील गेल्यावर माझ्या आईनं बाबांवर एक लेख लिहिला. त्या लेखाशेजारी आई-बाबांचा खूप जुना फोटो छापला होता. मी आईच्या पोटात होते तेव्हाचा. त्या फोटोतले माझे उमदे, तरुण बाबा पाहून ‘राजहंस’चे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर यांनी आईला फोन लावला, विचारलं, ‘‘हा सुभाष लग्नाआधी कधी हवाई दलाच्या सैन्यभरती परीक्षेसाठी डेहराडूनला गेला होता का?’’ आईनं होकार देताच त्यांना साक्षात्कार झाला, त्यावेळी डेहराडूनला बाबांबरोबर माजगावकरसुद्धा होते. दोन-तीन दिवसांपुरती का होईना, त्यांची घट्ट मैत्री झाली. पुढे दोघंही आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवर गेल्यानं त्यांची परत भेट कधीच झाली नाही. आज या पहिल्या पुस्तकाची पहिली प्रत बाबांनी हातात घ्यावी असं वाटत असताना आणि ते या जगात नसताना त्यांच्या या मित्रानं ती प्रत हातात घ्यावी, इतकंच नव्हे तर ती  तुमच्यापर्यंत पोचवावी, यापेक्षा अजून मला काय हवं असेल?
शिवाय अर्थातच तुम्ही सगळे माझे वाचक. तुम्ही तुमची असंख्य मेलरूपी पत्रं हे माझं इंधन आहे. ते इंधन असंच पुरवत राहा. सरतेशेवटी आभार माझ्या लिखाणाचेच.. दोन र्वष त्याच्याबरोबर काढल्यानंतर आता मी त्याच्यावर विसंबायला लागली आहे. माझ्यातलं किती काही वेडंवाकडं असं आकारात बसवण्याचा एक चाळा लागत चालला होता. त्या चाळ्याची आता निकड झाली आहे. मला लिखाणानं एक उत्तम मित्र दिला आहे. ज्याच्याशी फक्त खरंच बोलावं लागतं. कधी घाबरून खोटं बोललंच तर त्याच्या डोळ्यांत बघता येत नाही. जो, मला अनेक अनवट प्रश्नांसमोर हात धरून उभं करतो. काही उत्तरं आणि अनेक प्रश्नचिन्हं यांच्यासकट शांतपणे पुढे चालत राहण्याचं बळ देतो. नवे रस्ते दाखवतो. फार मजा आणतो. खूप आनंद देतो. अजून आमचं नातं नवं असलं तरी मला लख्ख दिसतं आहे- हा माझा कायमचा जोडीदार असणार आहे!

मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-11-2014 at 06:09 IST

संबंधित बातम्या