श्रृती पानसे

‘प्रिय प्रतिमास, रेणूकडून’ हे पुस्तक म्हणजे रेणू दांडेकर यांचा जीवनप्रवास आहे. हा प्रवास त्यांनी पूर्वाश्रमीच्या स्वत:लाच सांगितला आहे. म्हणजे प्रतिमाला.. प्रतिमा केसकर हिला. आणि अर्पण केला आहे- ‘माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वाना.’ अख्खं जग कवेत घेऊ बघणारं माणूस असंच म्हणणार. आठवणींच्या पानांमध्ये मिसळून गेलेल्या मुखपृष्ठापासूनच हा प्रवास आपण सुरू करतो. भरपूर खेळणाऱ्या, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींचा भरभरून आनंद घेणाऱ्या, आई, बाबा, आजी आणि प्रेमाच्या बहिणी यांच्यात विरघळून गेलेल्या प्रतिमा केसकर या विद्यापीठात एम. ए.ला कॉलेजमध्ये पहिल्या आल्या. त्यांनी प्राध्यापिकेची नोकरीही केली. अतिशय प्रतिष्ठेची आणि स्थिर पगार असलेली नोकरी होती ही. हे चालू असतानाच डोळ्यांत जागतं स्वप्न होतं ते खेडय़ात जाऊन शाळा काढण्याचं! ही वाट अजिबातच सोपी नव्हती. उलट, कोकणातल्या वाटांसारखीच वळणवाकणांची होती.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

डॉ. राजा दांडेकर यांच्या रूपाने आयुष्याचा सहप्रवासी त्यांना मिळाला. त्याच्या आगळ्यावेगळय़ा अटींवर सुरू झालेलं हे सहजीवन फक्त त्या दोघांचं कधीच नव्हतं. जवळचे, लांबचे नातेवाईक, दोन्ही मुलं, नातवंडं, शाळेचा शिक्षकवर्ग, संस्थेशी जोडल्या गेलेल्या सर्व जिव्हाळ्याच्या व्यक्ती.. हा तर फक्त जवळचा गोतावळा. याशिवाय असंख्य विद्यार्थी- महाराष्ट्रातले आणि परदेशातली माणसं- असंही त्यांचं मैत्र विस्तारलेलं आहे.बघायला गेलं तर हा प्रवास आहे त्यांच्या जन्मापासूनचा. पण त्यांनीच एके ठिकाणी लिहिलं आहे : ‘मुद्दामच १ ऑगस्ट १९८४ हा दिवस ठरला. चिखलगाव येथे शाळेला परवानगी मिळाली आणि मी लहानग्या कैवल्यला घेऊन शाळेत दाखल झाले. खऱ्या अर्थाने ‘रेणू दांडेकर’ची नवी वाट सुरू झाली.’

आपल्याला परिचित असलेल्या रेणूताईंची खरी ओळख म्हणजे चिखलगावची शाळा- जी त्यांनी अत्यंत मेहनतीने उभारली, तिच्याशी गावालाही जोडून घेतलं. मुलांच्या हृदयात शिरून, त्यांच्या पालकांनाही समजून घेत शिक्षणाचं काम पुढे नेलं. रेणूताईंनी भाषेवर केलेलं काम हे मुद्दाम नोंद घेण्यासारखं आहे. मुलांची भाषा समजून घेऊन शिकवायचं, त्यांची भाषा तर समृद्ध करायचीच; शिवाय गणित, विज्ञान यासारखे विषयही सोपे करायचे, त्यासाठी विविध पद्धतीने प्रयोग करत राहायचे. आधी स्वत: शिकायचं, समजून घ्यायचं, मुलांना कसं समजेल याचा विचार करायचा आणि मग त्यांना शिकवायचं असा हा लांबचा वळसा होता. याशिवाय त्यांना त्या, त्या वेळी जाणवलेले अडथळे दूर करायचे होते. शिकण्या- शिकवण्याविषयी खरी तळमळ असलेला माणूसच मुलांना खऱ्या अर्थाने सर्व ते प्रयत्न करून आकलनापर्यंत नेऊ शकतो.

या संपूर्ण प्रवासात खाचखळगे होते, तशाच मोठय़ा दऱ्याही होत्या. नवीन काम झपाटून पुढे न्यायचं, हे प्रखर झपाटलेपण होतं. या सगळ्यात भावनिक चढउतारही अर्थात असतातच. आपल्या लहानग्या मुलांबद्दल कोवळे, नाजूक भावबंध असतात. अन्य संकटांशी धैर्याने झगडणारा माणूस इथे एका वेगळ्याच समस्येत गुंततो. ते गुंतणं खूप छान असतं. पण अनेकदा परीक्षा बघणारंही असतं. असे अनेक भावनिक चढउतार रेणूताईंनी ‘प्रतिमा’ला- म्हणजेच आपल्याला सांगितले आहेत.

रेणुताईंची भाषा प्रभावी आणि ओघवती आहे. त्यामुळे आपण या प्रवासात त्यांच्याबरोबर आहोत असं सतत वाटत राहतं. एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या आयुष्याचा मोठा पट इथे प्रत्ययाला येतो. जो फक्त समाजशास्त्रज्ञांनी, शिक्षण कार्यकर्त्यांनीच वाचावा असं नाही, तर सर्वानीच वाचावा असाच आहे. एके ठिकाणी रेणूताईंनी एक प्रसंग सांगितला आहे. त्यांना प्रवासात एक न शिकलेली बाई भेटली. ती त्यांना म्हणाली, ‘किती लिव्हशील.. तुझा कागुद राहील कोरा.. माझ्या ग वव्या, जसा खटय़ाळ हा वारा..’ ‘कितीही शिकलीस तरी आधी माणसं वाचायला शिक..’ असं त्या बाईला म्हणायचं होतं.

रेणूताईंनी त्यांच्या आजवरच्या जीवनप्रवासात अनेक वेगवेगळ्या गोष्टी हाती घेतल्या. पुस्तकात त्यांनी घेतलेल्या अनेक शिक्षण-प्रशिक्षणांचा उल्लेख येतो. त्यांच्या अनेक पुस्तकांच्या जन्मकथा वाचायला मिळतात. त्यांनी देशा-परदेशांतल्या खेडय़ांत आणि शहरी भागांत प्रवास तर खूपच केला आहे. या सर्व अनुभवांचं संचित वाचलं की वाटतं, या धडपडय़ा, समाधानी आयुष्याच्या पोतडीत अजून आहे तरी काय काय? कारण त्यांच्याच भाषेत सांगायचं तर- ‘जगण्याच्या प्रत्येक दालनाने त्यांना शिकवलं आहे.’ तेच सर्व आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं.

‘प्रिय प्रतिमास, रेणूकडून’- रेणू दांडेकर, ग्रंथाली,
पाने- ३४२, किंमत-३०० रुपये. ६