प्रा. राजा होळकुंदे

महात्मा गांधी व त्यांना साथ देत त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून ज्यांनी राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपलं आयुष्य वेचलं अशांचं जीवन-कार्य नव्या पिढीला माहीत असणं खूप महत्त्वाचं ठरू शकतं. हाच विचार करून मनोविकास प्रकाशनाने ‘गांधीजन’ ही चरित्रमाला किशोरवयीन वाचकांच्या हाती सोपवली आहे.

smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande : “संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी झालाय, त्यामुळे त्यांना…”; राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला मनसेचं प्रत्युत्तर!
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
Ajit Pawar gets emotional at the Women Gathering The Security Shield of Sisters Around Me
‘माझ्याभोवती बहिणींच्या राख्यांचे सुरक्षा कवच’; महिला मेळाव्यात अजित पवार भावनिक
loksatta analysis why controversy over 18 percent gst on insurance
विश्लेषण: विम्यावरील १८ टक्क्यांच्या जीएसटीबाबत एवढा वाद का?

भारताला स्वातंत्र्य मिळून आता तीन पिढय़ा उलटून गेल्या आहेत. सुमारे शंभर वर्षांपूर्वी देशाची व जगाची राजकीय-सामाजिक परिस्थिती काय होती, देश राजकीय-आर्थिक-बौद्धिक गुलामीत होता म्हणजे नेमके काय घडत होते, हे नव्या पिढीला फारसं माहीत नाही. त्यांच्यासाठी हा इतिहास काही मार्काचा, पाठांतर करण्यासाठीचा भाग आहे. आज तर देशातील सर्व पातळींवरील विविधता, समस्यांची व्यामिश्रता या बाबी लक्षात न घेता अतिसुलभ, विकृत केलेला इतिहास या पिढीसमोर मांडला जातो. त्यामुळे भारत हे नवे राष्ट्र उभे राहण्यामागील प्रेरणा, त्याच्या उभारणीसाठी करावा लागलेला जमिनीवरचा व मूल्यांचा संघर्ष या बाबी नव्या पिढीसमोर यायला हव्यात. त्यातूनच मग विचारांना एक संदर्भचौकट असणारी, जागरूक पिढी तयार होऊ शकेल. हाच उद्देश समोर ठेवून ‘गांधीजन’ हा पुस्तक प्रकल्प हाती घेण्यात आला आणि पूर्णत्वाला नेला आहे.

गांधीजी हे केवळ विसाव्या शतकातीलच नव्हे, तर जगाच्या आजवरच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तित्त्व होते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत त्यांनी मूलगामी विचार मांडला व तेथेच न थांबता तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यांची सारी धडपड केवळ ब्रिटिशांची सद्दी संपवून भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळावे यासाठी नसून अिहसा, सत्य व समतेच्या आधारावर शोषणरहित स्वराज्य स्थापन व्हावे यासाठी होती. त्यासाठी त्यांनी लाखो स्त्री-पुरुषांना प्रेरणा देऊन कार्यरत केले. गोषा-पडद्यात वावरणाऱ्या स्त्रियांना रस्त्यावरील आंदोलनात उतरविले. त्यांना निर्भयपणे समाजात वावरता यावे म्हणून पुरुषांची मानसिकता बदलविण्याचे प्रयत्न केले. अस्पृश्यतानिवारणाशिवाय स्वातंत्र्य व्यर्थ आहे अशी भूमिका घेऊन सवर्ण हिंदूंचे मानस बदलण्यासाठी मोठा लढा दिला. काँग्रेस पक्षाला इंग्रजी बोलणाऱ्या बॅरिस्टरांच्या तावडीतून सोडवून मातृभाषेत व्यवहार करणाऱ्या दलित-बहुजन, शेतकरी-श्रमिक, अलुतेदार-बलुतेदार यांच्या स्वाधीन केले. त्यातूनच देशाच्या राजकीय लोकशाहीकरणाची प्रक्रिया वेगवान झाली. खादी, ग्रामोद्योग, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रांत क्रांतिकारक परिवर्तन करून ग्राम-केंद्रित, पर्यावरणस्नेही समाजाच्या निर्मितीचा विचार त्यांनी जगासमोर मांडला. त्यांच्या सहकाऱ्यांनी यातील एकेक पैलूसाठी आपले आयुष्य वेचले व त्या क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी बजावली.

दुर्दैवाने आजच्या पिढीला हा सर्व इतिहास अज्ञात आहे. इतकेच नाही तर या सर्व महान व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात पूर्वग्रह व अकारण द्वेष भरलेला आहे. आज आपण ज्या समाजात वावरतो, विकासाचे, लोकशाहीचे, खुल्या वातावरणाचे लाभ घेतो, त्याच्या पाठीशी या महान विभूतींचे परिश्रम व त्याग आहे याचा बोध या चरित्र-मालिकेतून नव्या पिढीला व्हावा अशी अपेक्षा आहे. म्हणूनच ही मालिका सर्वच सुजाण वाचकांसाठी निर्माण केली असली तरी मराठी-इंग्रजी माध्यमातून शिकणारा किशोरवयीन वाचक हा तिच्या केंद्रस्थानी आहे. प्रस्तावित पुस्तकांमुळे चरित्रनायक/ नायिका यांच्या जीवन व कार्याविषयी वाचकांच्या मनात आदर व कुतूहल निर्माण व्हावे, त्यांच्याविषयी मनात असणाऱ्या शंका-कुशंका दूर व्हाव्यात व कोणत्या मूल्यांच्या आधारावर त्यांनी या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले आयुष्य वेचले याविषयीची स्पष्टता त्यांच्या विचारांत यावी हा या मालिकानिर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे.

या मालिकेचा लेखकवर्ग अतिशय वैशिष्टय़पूर्ण आहे. ३८-८८ या वयोगटातील आठ लेखकांनी ही चरित्रे लिहिली आहेत. यात काही सिद्धहस्त, वाचकांना परिचित असणारे लेखक आहेत, तर काही पहिल्यांदाच वाचकांसमोर येत आहेत. यातील प्रत्येकाने अतिशय मेहनत घेऊन, चरित्रनायक/ नायिका यांचा काळ, तेव्हाचे सामाजिक-राजकीय पर्यावरण, नायक/ नायिकेची जडणघडण, विचार व भावना यांच्याशी समरस होऊन हे लेखन केले आहे. सरोजिनी नायडू, सरहद्द गांधी या व्यक्तित्वांविषयी बहुतेक वाचकांना त्रोटक माहिती आहे. सरोजिनीबाईंनी राजकारण व साहित्य या दोन्ही क्षेत्रांत जे प्रचंड काम केले आहे, ते यानिमित्ताने लालित्यपूर्ण शैलीत मराठी वाचकांसमोर पहिल्यांदाच मांडण्याचे कार्य मराठीतील प्रसिद्ध कवयित्री सिसिलिया काव्र्हालो यांनी केले आहे. फाळणीच्या विरोधात अखेपर्यंत ठाम भूमिका घेऊन लढणारा व पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही तिथे सर्वधर्मसमभावाची पताका फडकवीत ठेवणारे सरहद्द गांधी इतिहासाचे प्राध्यापक श्याम पाखरे यांनी ऐतिहासिक दाखले देत जिवंत केले आहेत. प्रज्ञावान विनोबांचे अवघे आयुष्य आपल्याला विस्मयचकित करणारे आहे. भूदान, आध्यात्मिक साधना, मौलिक लेखन या क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा परिचय गांधीविचार व गांधीजन यांच्याशी जवळीक असणाऱ्या लेखिका मीना कारंजीकर यांनी करून दिला आहे. त्यातून विनोबांविषयीचे काही गैरसमज दूर होण्यासही मदत होईल. साने गुरुजींची खरी ओळख ‘श्यामची आई’च्या पलीकडे जाणारी आहे. गुरुजींच्या कामाचा वारसा पुढे चालविणाऱ्या कार्यकर्त्यां सुचिता पाडळकर यांनी त्यांच्यातील प्रखर समतावादी, संघटक, लेखक, आंदोलक, अनुवादक, शेतकरी-कामकरी समूहाचा नेता अशी विविध रूपे प्रस्तुत चरित्रातून रेखाटली आहेत. कस्तुरबा म्हणजे केवळ गांधींची सावली नव्हती. जुन्या वळणाची, पण स्वतंत्र बाण्याची स्त्री होती ती. गृहिणी-पत्नी ते जगन्माता या तिच्या अनोख्या व खडतर प्रवासाचा आलेख तिच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या सुनंदा मोहनी यांनी चित्रित केला आहे. आधुनिक भारताच्या निर्मात्या नेहरूंचे कर्तृत्व समर्थपणे विशद करण्यासाठी राजकीय-आर्थिक प्रश्नांची उत्तम जाण असणाऱ्या लेखकाची गरज होती. ती हेमंत कर्णिक यांच्या रूपाने पूर्ण झाल्यामुळे वाचकांसमोर आलेले नेहरू-चरित्र समकालीन भारतीय-वैश्विक पटलावरील नेहरूंच्या कामगिरीचे यथार्थ मूल्यांकन करणारे ठरले आहे, यात शंका नाही. आजच्या मुस्लीम-विरोधाने बरबटलेल्या वातावरणात मौलाना आझाद या विलक्षण कर्तबगार व देशप्रेमी नेत्याची, देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्याची व थोर पत्रकाराची जीवनकहाणी एक युवा पत्रकार नंदू गुरव यांनी रंगवली आहे. त्याचबरोबर सनातन, तरीही प्रागतिक विचारांचा आग्रह धरणारा, परंपरा आणि परिवर्तन यातला दुवा, विश्वाचा नागरिक, क्रांतिकारक संत असे गांधीजींचे विविध पैलू उलगडून दाखवत त्यांचा परिचय करून दिला आहे. गांधीविचारांचे अभ्यासक, कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी. या चरित्रांमधून वस्तुनिष्ठ असा इतिहास पुढे येतो. तो देशाविषयी प्रेम असणाऱ्या सर्वानीच वाचायला हवा असा आहे.

चरित्रविषय व लेखक यांतील वैविध्य जपत असतानाच त्यांच्याकडून चरित्र मालिकेच्या मूळ उद्देशानुसार लिखाण करून घेणे, ते वाचक-स्नेही व त्यासोबतच अभ्यासाधारित असल्याची खातरजमा करणे हे अवघड कार्य या प्रकल्पाच्या समन्वयक व पुस्तकांच्या संपादक अनुराधा मोहनी यांनी यशस्वीरीत्या पार पाडले आहे. त्यामुळे ‘गांधीजन’ हा आठ पुस्तकांचा संच किशोरवयीन मुलांना खऱ्या इतिहासाची ओळख करून तर देतोच, पण सर्वसामान्य वाचकांनाही तो वेगळी दृष्टी बहाल करतो.

यातील बहुसंख्य चरित्रनायक/ नायिका यांची चरित्रे आज सहजतेने उपलब्ध नाहीत. जी आहेत ती जुनी आहेत. आजच्या नव्या पिढीला पडणारे प्रश्न व त्या अनुषंगाने या चरित्रांकडे पाहण्याची दृष्टी त्यांच्यातून मिळणे शक्य नाही. मात्र प्रस्तुत चरित्रमालेतून ही महत्त्वाची गरज पूर्ण होते. या दृष्टीने या ‘गांधीजन’ चरित्रमालेला विशेष महत्त्व प्राप्त होते. शिवाय आजच्या तरुणांना समजेल अशी सोपी, ओघवती भाषा व उच्च निर्मितीमूल्ये यामुळे ही चरित्र मालिका त्यांच्या पसंतीस उतरली आहे.

‘गांधीजन चरित्रमाला’
(आठ पुस्तकांचा संच), संपादन – अनुराधा मोहनी, मनोविकास प्रकाशन, संपूर्ण संचाची किंमत- १३०० रुपये.