दुमदुमत ये दुडदुडत ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुणझुणत ये खणखणत ये

मृगाच्या पहिल्या सरीसारखा

हासत ये नाचत ये

पण विनंती देवा

यंदाच्या वर्षी तुझा तूच ये!

 

आयुष्यातल्या अंधेरीच्या राजा

लावून डीजे बाजा आणिन तुला मिरवत

एवढी उरली नाही ताकद

गुदस्ताच गारपिटीत सारी धुऊन गेली पत

पण तुझी जडलेली आदत..

तेव्हा हे मोरया

एक सवय म्हणून ये

पण यंदाच्या वर्षी तुझा तूच ये!

 

तशी कमी नाही होणार

तुझी खातिरदारी सरबराई

वावरात नसेना का काही

पण मनात कशी का होईना,

जपून ठेवलीय हिरवाई

त्या अखेरच्या दुर्वा खुडीन, पण तुला पूजीन

 

तशी पोरंपण हौशी आपली

उलटय़ा पिपावरच धान्याच्या मांडलीय आरास

म्हणाले : पप्पा, कसं दिसतंय घर आता?

म्हणालो : टीव्हीतल्यासारखं,

एकदम झकास!

त्यांच्या मम्मीला मात्र चांगलं माहीत आहे

या मखराचे आधार कधीचे सुटलेत

त्या लुकझूक लाइटच्या माळांमधले

निम्मे बल्ब तर नक्कीच गेलेत

बाकीचे कधी उडतील सांगता येत नाही

ती धीराची सहन करतेय उरातली बाकबूक

तुला सहन होत असेल तर ये

पण यंदाच्या वर्षी तुझा तूच ये!

 

काय सांगावं तुझ्या येण्याने

बरसती चिकमोत्यांच्या माळा

उभ्या रानातून फडकेल चौरंगी गोंडा

तुला दु:खहर्ता म्हणतात ना?

मग नक्कीच दुष्काळाच्या माथी पडेल धोंडा!

हाहाहा! हसलास ना तूही मनातून?

पण आशेला मरण नसतं बाबा!

तसे तर आताशा रोजच पाहतोय आम्ही

या थिजलेल्या डोळ्यांनी

आमचे सुखकर्ते आणि दु:खहर्ते!

त्यात तू एक.. केवलं कर्तासि!

 

तर मग येतोस ना?

ये!

दुष्काळी पॅकेजसारखा ये

दौऱ्यावरील पुढाऱ्यांच्या ओशट

सहानुभूतीसारखा ये

टँकरमधील पाण्याच्या

स्वर्गीय अनुभूतीसारखा ये

मनरेगाच्या कामासारखा ये

विम्याच्या दामासारखा ये

चारा-छावणीतल्या पाचाटासारखा ये

धो-धो कोसळणाऱ्या त्या पिसाटासारखा ये

ये

पण या वक्ती माफ कर बाप्पा

दुमदुमत ये, दुडदुडत ये, रुणझुणत ये, खणखणत ये

पण तुझा तूच ये!

(मूर्ती कोणी उधारीवर देत नाही रे!!)
balwantappa@gmail,com

मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny critics
First published on: 13-09-2015 at 07:24 IST