त्रिं. ना. आत्रे यांचा ‘गावगाडा’ हा महाराष्ट्रीय ग्रामीण जीवनाचा समाजशास्त्रीय दस्तावेज असणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ १९१५ साली प्रसिद्ध झाला. त्याला आता शतकभराचा अवधी लोटत आलाय. मधल्या काळात ना. गो. चाफेकर, म. मा. जगताप, वि. म. दांडेकर यांचे गावगाडय़ाविषयीचे लिखाण प्रसिद्ध झालेले आहे. आणि आता नुकतेच अनिल पाटील-सुर्डीकर यांचे ‘गावगाडा शतकानंतर..’ हे प्रसिद्ध प्रसिद्ध झाले आहे. मराठीत मूलभूत स्वरूपाच्या समाजशास्त्रीय लेखनाची परंपरा फारशी आढळत नाही. छोटे छोटे समूह आणि त्यांच्या जीवनरीती यासंबंधीचे लेखनही फारसे झालेले नाही. या पाश्र्वभूमीवर हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.
या पुस्तकातील विविध लेख ‘आजचा सुधारक’ या नियतकालिकातून २००५ ते २०११ या काळात प्रसिद्ध झालेले आहेत. हे काही शिस्तशीर स्वरूपाचे संशोधन करून लिहिलेले समाजशास्त्रीय स्वरूपाचे पुस्तक नाही. लेखकाची दीर्घकाळ घडण खेडय़ात झालेली आहे. त्यांना ग्रामीण जीवनाचे व तिथल्या बारीकसारीक रीतीभातीचे ज्ञान आहे. मुख्य म्हणजे हे लेखन स्वानुभवाधारित आहे. पाटील यांनी वर्तमान ग्रामजीवनाचा नकाशा मांडण्यासाठी जो परिसर निवडला आहे, तो पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाडय़ाच्या लगत असणारा परिसर. हा भाग दुष्काळग्रस्त कोरडवाहू असला तरी तो महाराष्ट्राच्या सर्व परिसराला कमीअधिक प्रमाणात लागू पडतो.
या पुस्तकात एकंदर पंधरा लेखांचा समावेश आहे. बहुतांश लेखांच्या पूर्वार्धात आधीच्या खेडय़ाचे म्हणजे लेखकाच्या बालपणीच्या, म्हणजेच चाळीसेक वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील खेडय़ांची तपशीलवार माहिती आहे आणि उत्तरार्धात गेल्या वीस वर्षांत ग्रामीण संस्कृतीत जे नवे बदल झाले त्या बदलांचा आढावा घेतला आहे. पूर्वार्धातील विवेचनातून महाराष्ट्रातील विशिष्ट प्रदेशातील ग्रामीण संस्कृतीविषयीची समाजशास्त्रीय स्वरूपाची माहिती आली आहे. त्यात समूहाचा स्थानिक इतिहास, खाद्यसंस्कृती, जीवनरीती ते भाषेपर्यंतचा मागोवा आहे. बदलत्या काळानुसार गावगाडय़ातील राजकारण, जात, धर्म व शेतीव्यवस्थेचे विवेचन आहे. खेडय़ाची भौगोलिक संरचना, समूहभाव व मनुष्यस्वभावाची निरीक्षणे आहेत. लेखकाची गुंतवणूक त्या काळात असल्यामुळे ही समाजचित्रे उत्कट संवेदनशीलतेने सांगितली गेली आहेत. त्यामुळे त्यामध्ये काहीशी स्मरणरमणीयताही आहे.
या पुस्तकातील लेखांचा मुख्य उद्देश आहे, तो गेल्या वीस वर्षांतील बदललेल्या खेडय़ाचे लोकमानस व्यक्त करण्याचे. वर्तमान स्थितीतील खेडय़ाचे भावविश्व त्यातून अधोरेखित झाले आहे. एका अर्थाने गेल्या वीस वर्षांतील बदललेल्या खेडय़ाचा भौतिक व मानसिक नकाशा मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. या बदललेल्या नकाशाची समाजशास्त्रीय मीमांसाही केली आहे. आधुनिकीकरणाच्या टप्प्यावरील ग्रामीण संस्कृतीतील बदललेले राजकारण व समाजकारण आणि शेतीचे नवे अर्थशास्त्र सांगितले आहे.
अनिल पाटील यांच्या सबंध लेखनाचा गाभा शेतकऱ्यांच्या होत असलेल्या शोषणाचा आहे. आतबट्टय़ाच्या शेतीचे समूहमानसशास्त्र त्यांनी सांगितले आहे. शेतकरी गावच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे जाऊन आता नोकरदार वर्ग या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे अशी मीमांसा त्यांनी केली आहे. रा. वि. टिकेकर यांनी एकोणिसाव्या शतकात शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या राज्यसंस्था, नोकरदार व सावकार या त्रिवर्गाचा समावेश ‘लुटुतेदार’ या शब्दात केला होता. वर्तमान शेतकऱ्यांविषयीची लुबाडणूक करण्यात हे तीन वर्ग आजही कार्यरत आहेत असे पाटील यांना वाटते. पंढरीच्या वारीची उदात्तीकरण करणारी मीमांसा आपल्याला माहिती आहे. मात्र पाटील यांचे म्हणणे असे आहे की, शेतकऱ्यांच्या अफाट संख्येच्या पंढरीच्या वारीचे साफल्य हे शेतकऱ्यांच्या निराशेत व वैफल्यात आहे. शेतकऱ्यांच्या या सार्वत्रिक लुबाडणुकीमुळे व असाहाय्य अवस्थेमुळे ‘आहे हे असेच चालायचे’ असे त्यांना वाटते. थोडक्यात शेतकऱ्यांच्या कळवळ्यापोटी तळमळीने केलेले  हे लेखन आहे. शेतीच्या दुरवस्थेची अनेकविध कारणे नोंदवली आहेत. तसेच नागर लोकांची गावगाडय़ाकडे पाहण्याची दूषित दृष्टीही सांगितली आहे.
या पुस्तकाचा एक महत्त्वाचा लक्षणीय विशेष म्हणजे त्याची शैली. ती प्रगल्भ स्वरूपाची आहे. ती वाचनीय आहे. ित्र. ना. आत्रे यांच्या मिस्कील संवादशैलीशी नाते सांगणारी आहे. आत्रे यांनी आपल्या ग्रंथाचे प्रास्ताविक ‘नमस्कार! वाचकश्रेष्ठ’ या शब्दांनी केले आहे. याच शब्दप्रयोगांनी पाटील यांची ही लेखमाला प्रसिद्ध झालेली आहे. त्यातून वाचकांशी गावगाडय़ाविषयीचा सतत संवाद चालू असल्याचे जाणवते. वाचकांना सतत निवेदनात गुंतवून ठेवले आहे. तात्पर्य काय, परवा एकदा, आपण नेहमी ऐकतो, आम्ही लहान असताना, आता आपण, या प्रकारच्या बोलीरूपांतून त्यांनी वाचकांशी संवाद साधला आहे. ग्रामीण संस्कृतीतील अनेक वैशिष्टय़पूर्ण शब्द जागोजागी वापरले आहेत. ‘साधारणत: बशीच्या आकाराच्या रानात हे कुस्त्यांचे फड भरतात’ अशी अनेक वैशिष्टय़पूर्ण वाक्ये वाचायला मिळतात.
‘गावगाडा शतकानंतर..’मधील लेखन हे शिस्तशील समाजशास्त्रीय स्वरूपाचे नव्हे, तसेच समग्र महाराष्ट्राविषयीच्या गावगाडय़ाला लागू पडेल असेही नाही. तसेच काही ठिकाणी आधुनिकीकरणातील काही सामाजिक बदलांकडे एकांगी दृष्टिकोनातूनही पाहिले गेले आहे.
संपादकीय टिपणात नंदा खरे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘कृषिजन संस्कृतीचे मोठे चित्रकार राजन गवस’ यांची या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी त्यात गावगाडय़ातील बदलाविषयीचे साक्षेपी विवेचन केले आहे.
‘गावगाडा शतकानंतर..’ – अनिल पाटील,
मनोविकास प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – १७४, मूल्य – १९० रुपये.
*  रणधीर शिंदे
madhurang76@yahoo.co.in

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला