|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी
‘‘ओह!’’
‘‘तुझं नाव काय असं विचारत होतो मी.’’
‘‘हंऽ’’
ती हसतमुख माझ्याकडे पाहतेच आहे.
‘‘सांगतेस ना?’’
‘‘अरे, ‘ओह’ हेच माझं नाव आहे.’’
‘‘ओह!’’ मी चकित होत पाहतच राहिलो.
असं कोणाचं नाव असू शकतं, हा धक्का मजेशीर होता. आपल्या कल्पनेचा दायरा किती सीमित आहे याची मनाशी बोच निर्माण करीत होता. माणसांची नावं अमुक अमुक वा ढमुक ढमुक नसली तर ती काही नावंच नव्हेत, असा कूपमंडुकी खाक्या. जगात फिरताना मग ठेचा लागतात अशा. तुमच्या प्रतिक्रिया तुम्हालाच लाजवून जातात. का एवढे दचकलात, असं विचारलं तर धड कारणही सांगता येत नाही. ‘ओह’चं नाव ऐकून तसं झालं माझं. तिला मात्र मी इतका का चकित होतोय, याचा थांग लागेना. पण फार उत्सुकता दाखवून मला अधिक अडचणीत न आणता तिनं तिच्या यंत्रावर सिगरेट वळली, शिलगावली आणि मला दिली. दोन दिवसांपासून मी तिला पाहत होतो. अचूक वाटावं असं तिचं वागणं, बोलणं आणि काम तिच्याबद्दल कुतूहल निर्माण करत होतं. बँकॉकमधल्या चित्रीकरणं करून द्यायची कंत्राटं घेणाऱ्या कंपनीत ती साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करीत होती. ही कंपनीही भारीच. या कंपनीत पूर्णवेळ नोकरी करणारे फक्त सातजण. बाकी सगळे मुक्त कंत्राटी काम करणारे फ्रीलान्सर्स. ड्रायव्हरवगळता सर्व भरणा बायकांचा. अगदी निर्मिती व्यवस्थापकापासून इमिग्रेशन व्यवस्थेपर्यंत सगळा कारभार बायांच्या हाती. या साऱ्या बायका फ्रीलान्स काम करणाऱ्या. कंपनी बॉलीवूड ते हॉलीवूड सगळ्यांची स्थानिक चित्रीकरणं करून देणारी. तीही चोख.
तर, अशा या चमूतली ‘ओह’ ही एक पन्नाशीतली बाई. बोलण्याच्या ओघात तिनंच जेव्हा वय सांगितलं तेव्हाही मी चकित झालो. बाई पन्नाशीची बिलकुल वाटत नव्हती. सकाळी सगळ्यांच्या आधी सेटवर यायची. बरोबर तिची सहा वर्षांची बाहुलीगत दिसणारी पोरगी. हसतमुख दरडावणीनं ती सगळ्यांना कामाला लावायची. अन् यंत्रणा हलू लागली, की शांतपणे कोपऱ्यात जाऊन यंत्रावर सिगरेट वळायला घ्यायची. लवकरच आमची ओळखदेख अन् मत्रीही झाली. तिचं सिगरेटचं यंत्र आणि साहित्य निराळंच होतं. फिल्टर लावलेल्या कागदी पोकळ पुंगळ्या एका डबीत हारीनं लावून ठेवलेल्या. एका पाकिटात सुटी तंबाखू. एका चपटय़ा डबीगत दिसणारं यंत्र. यंत्रात सुटी तंबाखू घालून तोंडावर पोकळ पुंगळी लावायची अन् दट्टय़ा पुढे-मागे करायचा. त्यासरशी तंबाखू पोकळ कागदी पुंगळीत घट्ट दाबून बसवली जाऊन सिगरेट तयार! ज्या सफाईनं ती सिगरेट वळे, त्याच सफाईनं चित्रीकरणही मार्गी लावत असे. दिवसागणिक ठरलेलं सारं चित्रीकरण पार पाडणं ही तिची प्रमुख जबाबदारी. स्थानिक गोष्टींची, माणसांची, उपलब्धतेची सखोल जाण आणि वेगवेगळ्या देशांतून आलेल्या चित्रीकरण चमूंच्या निरनिराळ्या अपेक्षांना पुरे पडण्याची हातोटी ही ओहची खासियत असावी. भारतीय लोकांबरोबर चित्रीकरण करण्याची ही तिची दुसरी वेळ. मागच्या वेळी शिकलेले सगळे हिंदी शब्द टिपून ठेवलेली छोटी डायरी तिच्या हाताशी असे. त्यात डोकावून कधी ‘चलो.. चलो.. चलो’ असा पुकारा करीत मंडळींना घाई करीत मधेच थाई भाषेत ती एखाद्या लाइटबॉयला उपहासानं दटावे.
‘‘ही तुझी बाहुली कंटाळत असेल..’’ मी तिला विचारलं.
‘‘सवय झालीये तिला थोडीफार. ती चित्रं काढत बसते. तिची आजी आजारी पडली नेमकी. नाही तर तिला आईकडे ठेवते शूटिंग असलं की.’’
‘‘आणि तिचे वडील?’’ माझा भोचकपणा.
‘‘चॅकऽऽऽ’’ नुसता नकारदर्शक उद्गार. चेहऱ्यावर नापसंतीची रेषा. – ‘‘तो राहत नाही आमच्यासोबत. तिच्या जन्मानंतर लगेच सोडून गेला. थायलंडमधील पुरुष असेच आहेत. ते निघून जातात दुसरी तरुण मुलगी मिळाली की.’’
‘‘पण मग आर्थिक मदत तरी करतो का? मुलीला भेटायला येणं वगरे?’’
‘‘छे! तसलं काही नाही. अगदीच कधीतरी डिनरला बोलावतो. मग कधी वेळ असला तर जाते मी पोरीला घेऊन. पण अशी वेळ फार येतच नाही. त्याला त्याचा नवा संसार आहे. संसार म्हणजे मत्रीण!’’
‘‘म्हणजे तुमचा रीतसर डिव्होर्स झालाय का?’’
‘‘नाही रे. लग्नच झालं नव्हतं, तर डिव्होर्स कसा होईल? इथे पुरुष लग्नबिग्न करीत नाहीत. लिव्ह इन्मध्येच राहतात बरेच लोक. श्रीमंत लोक करतात लग्नबिग्न. आणि मग मुलं झाली की दुसरी बाई शोधतात आणि तिच्याकडे जातात. थायलंडमध्ये तुला खूप ‘सिंगल मदर’ आढळतील.’’
ओह सहजपणानं तिथलं सामाजिक वास्तव सांगत होती. लहान असतानाच मुलाला मुलीसारखं वाढवण्याच्या नव्या ट्रेंडबद्दलही ती सांगत होती.. ‘‘कुणा एका बॉक्सरनं लिंगबदल शस्त्रक्रियेद्वारे स्वत:ला स्त्री बनवलं अन् थायलंडमध्ये ‘लेडी बॉय’ बनण्याचं फॅड आलं. त्यामुळे बायकांची संख्या जास्त आणि पुरुष कमी असं आमचं झालंय. साहजिकच पुरुषांची मनमानी चालते. अन् मग स्त्रियांना पसा कमावण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. त्यात ग्रामीण भागातून उपजीविकेच्या साधनांअभावी बँकॉकसारख्या शहरात येण्यावाचून मार्ग उरत नाही. अत्यंत महागडं असं हे शहर मग आमचं चरित्र घडवतं. साहजिकच बऱ्याच मुली, बायका या मसाजपासून शरीरविक्रयापर्यंतचे सारे व्यवसाय करतात. तुमच्या भारतातून लाखोंनी पर्यटक येतात. त्यांचे अनुभव फारसे चांगले नाहीत. अर्थात त्यांच्याकडे पसे असतात, त्यामुळे ते सभ्य वागतीलच याची शाश्वती नसते. त्यात भाषेचाही मोठा अडसर होतो. इकडे बऱ्याच जणांना इंग्रजी धड येत नाही..’’
‘‘पण मी तर काही पुरुषांना पोरं शाळेत घेऊन जाताना पाहिलंय.’’
‘‘त्यांना मिळायची असेल दुसरी कोणीतरी!’’ ओहनं हसत विनोद केला.
‘‘अरे, मी तुला सर्वसाधारण चित्र सांगितलं. शंभर टक्के पुरुष असेच वागतील असं नाही. नुकतंच आमच्या राजानं त्याच्या अंगरक्षकांच्या चमूतील एका मुलीशी लग्न करून तिला राणी केलं. एकेकाचं नशीब!’’
नंतरही गप्पा होत राहिल्या. अत्यंत उत्तम कार्यसंस्कृती असलेली, शिस्तीची आणि व्यावसायिक वृत्तीची माणसं अशी मला थाई मंडळींची ओळख लागत होती. ओहनं त्या सुबक समाजातलं अंतरंग उघडून दाखवल्यावर मात्र नकळत मी पुरुषांकडे दूषित नजरेनं पाहू लागलो. मग त्यावर उतारा म्हणून चार-दोन ड्रायव्हरांशी बोललो. एक-दोन स्थानिक पुरुष कलाकारांशी बोललो. तेव्हा जाणवलं, ओहचं ‘थाई पुरुष वाईट आहेत’ हे म्हणणं फारसं चुकीचं नाही. खूप काळजी वाटली ओहची. म्हणून काळजीनं तिला म्हटलं, ‘‘फार सिगरेट ओढू नकोस.’’
काय काकूबाईपणा करतोय, अशा तुच्छतेनं तिनं माझ्याकडं पाहिलं अन् हसत म्हणाली, ‘‘यू टू!’’
मी तिच्याकडे पाहतच राहिलो. ‘मीही इतर पुरुषांसारखाच!’ असा तर या ‘यू टू!’चा अर्थ नाही ना? आजवरच्या माझ्या जगण्यातल्या पुरुषीपणाचा, एकाधिकार गाजवण्याच्या सवयीचा, स्त्रीकडे बरोबरीनं वा सन्मानानं न पाहण्याच्या अनेक प्रसंगांचा कमालीचा तिटकारा वाटून गेला. धाडसाअभावी कधीच मित्रांच्या टोळ्यांबरोबर ‘जीवाचं बँकॉक’ करायला आपण इथे येऊ शकलो नाही याची आजवर वाटणारी खंत संपूनच गेली. स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणारी ‘पुरुष’ नावाची आदिम जमात संख्येनं कमी होतेय; अन् स्वकर्तृत्वानं अनोळखी लोकांमध्ये स्वत:ची स्तिमित करणारी ओळख निर्माण करणाऱ्या अनेक स्त्रिया ही जगरहाटी चालवायला पुढे येत आहेत.
‘‘ओह! मला तुझा अभिमान वाटतो.’’
‘‘ठीक आहे. पण यावर तुला सिगरेट मिळणार नाही. मी मोजक्याच पुंगळ्या घेऊन येते. चलो.. चलो.. चलो.’’ हसत बाई कामाला लागली.
‘‘काय मग? काय केलं बँकॉकला?’’ या मित्रांनी गालात जीभ घोळवत विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिलं- ‘‘मत्रीण कमावली.’’
‘‘ओऽऽऽ हऽऽऽ.’’ मित्रांनी डोळे चमकावून टाळ्या दिल्या.
मी निर्विकार उत्तरलो, ‘‘बरोबर, ‘ओह’ तिचं नाव.’’
..अन् मग अशाच प्रवासात तो भेटला. डेमियन! गोरापान, तरणाबांड, सुस्वरूप अन् हुशार. पोलंडच्या क्रॅकॉव शहरात जन्मलेला अन् माध्यमिक शिक्षण एडिंबरा या स्कॉटिश शहरात पूर्ण केलेला डेमियन ग्लासगो युनिव्हर्सिटीचा फेरफटका मारायला माझ्यासोबत आला होता.
‘‘तुमच्या देशातली निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत तू सहभागी नाहीस का? बाहेर कसा फिरतोयस?’’
‘‘कामामुळे. मलाही उत्सुकता आणि महत्त्व आहेच. तुला बरी माहिती आमची निवडणूक?’’ मी कौतुकानं विचारलं.
‘‘मला उत्सुकता वाटते तुमच्या लोकशाहीबद्दल. आमचा मित्रांचा गट आहे. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. नुकतंच आम्ही झाडं लावण्याचं एक अभियान राबवलं. मी प्रथमच स्वहस्ते खड्डा खणला आणि झाड लावलं. हे बघ.. फोड आलेत हातावर.’’
बावीस-तेवीस वर्षांचं वय, तीक्ष्ण समज अन् बुद्धी. पण डोळ्यांत हरवलेपण. काहीतरी सल उरात बाळगल्यागत अस्वस्थता. डेमियनबद्दल मी वर्षभर माझ्या पोरीकडून ऐकत आलो होतो. तो तिचा फ्लॅटमेट वा वसतिगृहातील सहनिवासी. एकूण सहा पोरापोरींतला एक. कॉम्प्युटर इंजिनीअिरग शिकणारा. अस्वस्थ आत्मा. आई-वडिलांचा दुस्वास करणाऱ्या अन् मोठय़ा भावाशी घट्ट नातं सांधलेल्या डेमियनबद्दल कुतूहल वाढवणाऱ्या इतरही गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या. तो अमली पदार्थाची नशा करतो आणि त्याचा व्यवसायही करतो, ही त्यातलीच एक धक्कादायक गोष्ट. अमली पदार्थ घातलेले मफिन्स सामायिक स्वयंपाकघरात बेक करतो म्हणून इतर पाचही पोरांचा त्याच्यावर राग. पण उत्तम वाचन, जगभरातल्या राजकीय व सामाजिक घडामोडींची अद्ययावत माहिती, ग्लोबल वॉर्मिगसारख्या प्रश्नांवरती काम करण्याची इच्छा अन् धडपड असे काही गुणही जमेस.
पठ्ठय़ा भेटला एकदाचा. सगळे पूर्वग्रह बाजूला सारून मी त्याच्याकडून सिगरेट मागितली अन् जरा दोघांत सलगी तयार केली. मग तो मला चिकटला. एरवी स्वत:च्याच विश्वात रमणारा हा पोरगा दोन दिवस माझ्याबरोबर ग्लासगो पाहत फिरत होता. हळूहळू सलावत बोलैला बरंच.. आई-वडिलांची सततची भांडणं पाहण्यात गेलेलं लहानपण. वडिलांनी मारल्यामुळे रक्तबंबाळ झालेली आई. तिचं सतत भांडणं उकरून काढणं, आदळआपट करणं. महिनोन् महिने कामानिमित्त बोटीवर निघून जाणारे वडील. तरुण वयात मोठय़ा भावाचं समलिंगी अस्तित्व उघड होणं.. या प्रतिमांनी आणि अनुभवांनी डेमियनचा दृष्टिकोन अन् एकटेपण तयार केलं होतं. कुणी आस्थेनं बोललं तर लहान मूल होणाऱ्या या पोरात प्रचंड भीती साठून राहिली असल्याचं जाणवत होतं. तो म्हणालाही अखेर.. ‘‘मला माणसांची भीती वाटते. अनेक गोष्टी करायला भाग पाडतात माणसं. मला शक्य झालं तर मी एकटा राहीन. अर्थात मला माझे मित्र खूप आवडतात. त्यांचा आधार वाटतो.. युरोपातली बरीच तरुण मुलं व्यसनाधीन आहेत. मी फार वेगळा नाही. तुमचा खर्च तुम्हाला भागवावा लागतो. मग कमाईचं साधन म्हणून मी हा छोटेखानी व्यवसाय करतो. त्यात फार विशेष काही नाही. माणसं एकटी आहेत आणि माझ्या मफिन्सनी त्यांना बरं वाटतं. बस्स. चांगलं-वाईट या थोतांड संकल्पना आहेत. इथं जग हवामानबदलामुळे नष्ट होत आलंय आणि इथल्या कुठल्याच सत्तेला किंवा जनसमूहाला तीव्रतेनं त्याबद्दल काहीही करावंसं वाटत नाही. माणूस संपला तर काय एवढं जातंय? आणि एवढंसं ड्रग घेऊन कोणी मरत नाही.’’
पोराचा ग्लासवेजीयन अॅक्सेंट वजा करीत त्याचं म्हणणं समजून घ्यायला मला वेळ लागत होता. किंबहुना, एकूणच त्याचा हा दृष्टिकोन पचवणं जड जात होतं.
‘‘तुमच्या एकाही पक्षानं निवडणुकीमध्ये क्लायमेट चेंजचा मुद्दा घेतलेला नाही. तुमचे उजवे पक्ष सत्तेवर येणार. त्यांनी हा मुद्दा हाती घ्यायला हवा. जगभरात उजवे लोक सत्तेवर येत आहेत. ते त्यांच्या प्रादेशिक अस्मितांचं राजकारण करून सत्ता मिळवतात. पण यातल्या कुणीही स्थानिक निसर्गाला या अस्मितेत स्थान दिलेलं नाही. हे चुकीचं आहे. बऱ्याच जणांना हे कळतच नाही. मला यासाठी काम करायचंय. मी युरोपातल्या चळवळीत सहभागी होत असतो.’’
बऱ्याच दिवसांत ज्याला आपलं बोलणं समजेल असा कुणीही भेटला नसल्यागत डेमियन माझ्याशी बोलत होता. मला त्याचं अप्रूप वाटत होतं. त्याच्याबद्दल माया दाटून येत होती आणि पोटात तुटत होतं. मी म्हणालो, ‘‘गडय़ा, पण हे सगळं करायला तरुणांनी मनानं अन् शरीरानं सशक्त राहायला हवं. स्वत:चाच झिजवून नाश करून काय फायदा? निर्मितीबरोबरच विलयाचा विचार येतो. पण स्वत:चा नाश करून जग बदलत नाही. व्यसनाकडे मी मोकळेपणानं पाहू इच्छितो. त्याचे फायदे मला ठाऊक नाहीत. पण तुझ्यातली निर्माणाची ऊर्जा मात्र मला जाणवते आहे. ती टिकून राहील एवढं बघ.’’
बहरहाल, संध्याकाळपर्यंत फक्त एखाद् दुसरी सिगरेट प्यायलेला डेमियन संध्याकाळ होताच मात्र अस्वस्थ होऊ लागला. घाईनं त्यानं माझा निरोप घेत म्हटलं, ‘‘माझ्याकडे एका क्लबचे पासेस आहेत. येत असशील तर सांग.’’ मी आभार मानत नकार दिला, तशी तो निघून गेला.
‘‘गेला प्यायला.’’ त्याचे इतर फ्लॅटमेट्स नाराजीनं उद्गारले.
‘‘ओह्! डेमियन!’’ मी मनाशी व्याकुळलो.
या नित्य बदलणाऱ्या वस्तूंनी, बाजारांनी, पिढय़ांनी भरलेल्या जगात ही दोन संवेदनशील माणसं आपापल्या परीनं भोवतीचं जग सुस करून घेण्याचा शर्थीनं प्रयत्न करीत आहेत. मात्र, आपल्या पूर्वग्रहांनी, संकुचित दृष्टिकोनांनी अन् तोकडय़ा कल्पनेनं माझ्यासारखे अनेक त्यात अडथळे आणत आहेत. या संघर्षांत तुमचीच सरशी होवो.
ओह अन् डेमियन!
girishkulkarni1@gmail.com