अभिजात: व्हर्साय : राजवैभवाचा हिरवा शिरपेच

व्हर्साय म्हटलं की प्रथम शाळेच्या पुस्तकातली रक्तरंजित फ्रेंच क्रांती आणि राजविलासितेविरुद्ध प्रजेने केलेला निर्घृण विध्वंसच आठवायचा.

अभिजात (लोकरंग)
( प्रतिनिधिक छायाचित्र )

अरुंधती देवस्थळे
व्हर्साय म्हटलं की प्रथम शाळेच्या पुस्तकातली रक्तरंजित फ्रेंच क्रांती आणि राजविलासितेविरुद्ध प्रजेने केलेला निर्घृण विध्वंसच आठवायचा. पण पॅरिसमध्ये फ्रेंच मित्र जोडप्याने- ‘‘जवळच तर आहे.. तासाभराच्या अंतरावर. आणि आता ते हिस्टरी ऑफ फ्रान्सचे भव्य संग्रहालय आहे. फ्रेंच क्रांतीचा पहिला रक्तपात जिथे झाला तिथे पहिलं विश्वयुद्ध संपवण्याचा महत्त्वाचा करार झाला, हेही महत्त्वाचंच ना?’’ असा आग्रह केला तेव्हा एक लक्षात आलं, फ्रेंच माणसाला आजही क्रांतीचा अभिमानच आहे. समाजाचं चित्र आणि जुलमी राजवट बदलण्यासाठी जे मानवी क्रौर्य पाहावं लागलं, ते न घडतं तर राज्यसत्ता आणि सरंजामशाही संपुष्टात नसती आली. कुठलाही स्वातंत्र्यलढा रक्त सांडल्याखेरीज यशस्वी झालेला नाही असा दृष्टिकोन असल्याने फ्रेंचांना या अमानवी कालखंडाकडे वस्तुनिष्ठतेने पाहता येत असावं.

हा किल्ला सतराव्या शतकाच्या सुरुवातीला- म्हणजे तेराव्या लुईने जंगलात बांधलेलं राजघराण्याचं ‘हंटिंग लॉज’- फ्रेंच स्थापत्याच्या भाषेत सांगायचं तर ‘शातू’- नंतर त्याचा भव्य प्रांगणांचा सहामजली राजवाडा बनला. पुढल्या पिढीच्या सौंदर्यासक्त राजा चौदाव्या लुईने जंगल जरा बाजूला सारून त्यात रम्य बागा फुलवल्या.. त्या अजूनही टिकून आहेत. त्याच्या कारकीर्दीत पॅरिसपासून दूर, पण फार दूर नसलेलं- राजाच्या एकछत्री साम्राज्याचा बालेकिल्ला बनलेलं व्हर्साय! ८.५ कि. मी. क्षेत्रफळाचा हा क्लासिकल आणि बरोक शैलीतील राजवाडा म्हणजे सत्ता आणि विलास यांचा परमिबदू आता युनेस्कोने वल्र्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केला आहे. समोर ३०,००० एकर पसरलेली बाग.. त्यात १४०० कारंजी आहेत म्हणे. प्रवेशद्वारानजीकच घोडय़ांच्या सुसज्जित पागा. इटालियन शैलीत उघडय़ा गच्चीवजा जागा बनवल्या. मध्यभागी कारंजं आणि भव्य दगडी बांधकामातून बरोक रोमन पद्धतीचा राजमहाल घडत गेला. यावर तीन पिढय़ा म्हणजे जवळजवळ पन्नासेक वर्ष काम चालू होतं म्हणतात. इथल्या दरबारात एका वेळी सहा-सात हजार दरबारी त्यांच्या लवाजम्यासकट असायचे.. एवढी विशालता आणि महालांची अति वैभवसंपन्न सजावट. इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काढलेली याची असंख्य चित्रं आधी इथे तिथे पाहण्यात आली होती. ती आपण नीट पाहायला हवी होती हे जाणवलं.

हा राजवाडा बनवण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट फ्रान्समध्येच बनलेली असावी असा राजघराण्याचा दंडक होता. राजाची दोन अपार्टमेंट्स- एक कामकाजासाठी आणि दुसरं खासगी जीवनासाठी. राजाच्या उठण्या-झोपण्याचाही विधीपूर्वक समारंभ.. त्यात दरबाऱ्यांना हजर राहावं लागे. जमिनीपासून छतापर्यंत पोहोचणाऱ्या काचेच्या पांढऱ्याशुभ्र फ्रेम्सच्या उंच, डौलदार खिडक्या (फ्रेंच विंडोज), अर्थात तशीच दारं!! छतावर रंगीबेरंगी चित्रं- बायबल आणि रोमन पुराणकथांवर आधारित. मधे असीम वाटणारा शिशमहाल.. तिथल्या आरशांमधून राजवैभवाचं भव्यत्व अनंत वेळा जाणवणारं. त्याच्या दोन्ही बाजूंना ‘हॉल ऑफ पीस’ आणि ‘हॉल ऑफ वॉर’ची दालनं. हा ‘हॉल ऑफ मिर्स’ बनवण्यासाठी शेकडोंनी आरसे लागणार होते. उत्कृष्ट आरसे बनवण्यात इटलीच्या कारागिरांचं कौशल्य जगजाहीर. म्हणून त्यांना भरपूर बिदागी देऊन पॅरिसला बोलावलं आणि त्यांच्याकडून ‘काम संपल्यावरच परत जाऊ’ असा करारही करून घेतलेला.

राणीच्या कक्षांमध्ये अवाढव्य पलंग, प्रसाधनांचा लांबरुंद प्लॅटफॉर्म. यातलं बरंच काही १७८९ च्या झुंडीने केलेल्या आक्रमणात जनतेने लुटून नेलं आणि नंतर देशोदेशीच्या राजघराण्यांना, संग्रहालयांना वैध- अवैध मार्गाने विकलंही गेलं. संतप्त जमावापासून जीव वाचवायला राणी मेरी आंत्वोनेटने इथूनच चोरदरवाजाने निसटण्याचा असफल प्रयत्न केला होता. अमेरिकन लेखिका जेनिफर डॉनेली म्हणते, Little by little, the old world crumbled, and not once did the king imagine that some of the pieces might fall on him.फ्रान्सच्या इतिहासातलं हे सुवर्णयुग. आर्थिक स्थिती मजबूत, बलशाली सेना आणि सांस्कृतिक समृद्धी यामुळे जे जे फ्रेंच, ते उच्च अभिरुचीपूर्ण असा एक दबदबा युरोपभर निर्माण झालेला. लुई स्वत:ला ‘अपोलोचा अवतार- सन किंग’ म्हणवत असे. असा राजा- की तो स्पर्श करेल ती गोष्ट चमकून उठे. राजघराणं निरंकुश सत्तेने राज्य करण्यासाठीच देवाने पाठवलं आहे, हा त्याचा दृढ विश्वास होता. तसे तो अनेकदा बोलूनही दाखवत असे.

स्वान्त सुखाय जगणाऱ्या राजघराण्यात कला, सौंदर्य ओळखणारी पारखी नजर आणि विलासी वृत्ती दोन्हींचा जबरदस्त मेळ. रॉयल ऑपेरा हॉलमध्ये संगीत व सामूहिक नृत्याचे कार्यक्रम आणि मेजवान्या आयोजित करण्यात येत. त्यादरम्यान व्हर्सायचा रॉयल ऑपेरा जगात सगळ्यात श्रेष्ठ मानला जात असे. नंतर इथे सरकारी सभा, मंत्रिमंडळाच्या बैठका होऊ लागल्या. दररोज सकाळी राजवाडय़ातील शुभ्र सोनेरी चॅपेलमध्ये राजा, त्याचे कुटुंबीय आणि दरबारी एकत्र समारंभपूर्वक धीरगंभीर प्रार्थना करीत. राण्यांचे कक्ष, त्यांच्या वापराच्या वस्तू, पोशाख आणि संबंधित ऐतिहासिक घटनांचे तपशील, कागदपत्रं शिस्तवार सांभाळून ठेवलेली आहे. पुस्तकांनी भरलेली भिंतीतली कपाटं आणि अभ्यासिका, क्रीडागृहांत बैठे खेळ, आतल्या सज्जात युरोपातल्या राजवाडय़ांमध्ये टिपिकल असणारा प्रामुख्याने सोनेरी, लाल आणि पांढऱ्या रंगांचा वापर. कोरीव, नक्षीदार फर्निचर. लुई घराण्यात ऐय्याशीला काही सीमाच नव्हती. आम जनतेच्या सुखदु:खाशी, विशेषत: समस्यांशी त्यांना काही देणंघेणंच नव्हतं. म्हणूनच जनतेचाही त्यांच्यावर प्रचंड रोष. आणि सहनशीलतेची मर्यादा संपल्यावर ‘लिबर्टी, फ्रॅटर्निटी अँड इक्वालिटी’ या त्रिसूत्रीवर आधारित समाजरचना मागणारी फ्रेंच क्रांती झाली.. आणि राजघराण्याच्या सत्तापर्वाचीही अंताकडे वाटचाल!

सर्वात सुंदर इथल्या विस्तीर्ण बागा. त्यातील वाहता पाट, कारंजी आणि शिल्पं. नंदनवन असेलच कुठे, तर ते असंच असावं. हिरव्यागार उंच वृक्षराजीने वेढलेलं कारंजातलं रथारूढ अपोलो आणि त्याच्या घोडय़ांचं भव्य शिल्प! आणखी एका अशाच महाकाय शिल्पात अपोलोचा श्रमपरिहार करणाऱ्या जलपऱ्या दिसतात. हिरवळीवरल्या एका खडकाळ उंचवटय़ावर घोडय़ांचं सुंदर शिल्प नेऊन ठेवलंय. ज्याने कोणी हे नैसर्गिक कोंदण शोधून तिथे हे शिल्प मांडायची कल्पना सुचवली, तो थोरच! अगणित शिल्पं.. खरोखर नीट वेळ देऊन पाहावीत अशीच. पण एका दिवसात आपल्या शक्तीनुसार पाहून त्यात समाधान मानावं लागतं. सौंदर्ययात्रेला अंत नसतोच कधी.

‘हिस्टरी ऑफ फ्रान्स’ संग्रहालयात राजघराण्याच्या संग्रही असलेली श्रेष्ठतम कलाकारांची ६००० हून अधिक चित्रं, ३००० वर शिल्पं हा कलेचा केवळ अजोड खजिना आहे- जो दुनियेतील इतर कुठल्याही सम्राटाकडे नसावा. यातील कक्ष आणि दालनांची संख्या २३०० हून अधिक आहे. यावरूनच एकंदर भव्यतेचा अंदाज येऊ शकतो. दालनाचा प्रत्येक कानाकोपरा वैभवशाली पद्धतीने सजवलेला. शिवाय ॲक्सेस, एक्स्टेंशन्स- ज्यात आता प्रवाशांना काही दिवसांसाठी राहण्याची लॉजसारखी सुविधा उपलब्ध आहे.

राजवाडय़ाच्या आवारात राहायचं तर दर्जेदारपणेच. त्याच्या किमतीही आणि खाणंपिणंही खासच. इथे हिरवळीवर किंवा शेजारच्या क्वीन मेरी आंत्वोनेट इस्टेटमध्ये फ्रेंच अभिजात संगीताचे अतिशय देखणे शो होतात. राजवाडय़ाच्या आखीवरेखीव आयुष्यातून वेळोवेळी निसटून मोकळा श्वास घ्यायला मेरीने ही निसर्गरम्य, माळ्यांकडून बागकामाचे कमीत कमी संस्कार झालेली इस्टेट स्वत:साठी राखून ठेवली होती. चौदावा लुई म्हणत असे, ‘‘मी व्हर्साय माझ्या दरबारासाठी बनवला. मार्ली मित्रमैत्रिणींसाठी आणि मग त्रेनान स्वत:साठी.’’ सगळी दुनियादारी विसरून फक्त स्वत:बरोबर राहायची गरज राजालाही असणारच. या खास राजमहालात सगळ्या कक्षांत फुलाफुलांची सजावट. भिंतींवर, चित्रांतून, ड्रेपरीतून.. अगदी खांबांवरसुद्धा! ‘रंगीबेरंगी टय़ूबरोझेसची विपुलता इतकी, की त्याच्या घमघमाटाने संध्याकाळी नाजूकसाजूक दरबारी बायकांना श्वास घेणं मुश्कील व्हायचं.. काही जण घनदाट सुवासाने आजारी पडत,’ असं राणीने सतराव्या शतकातल्या तिच्या दैनंदिनीत नोंदवून ठेवलंय. वॉल्डोर्फ एस्टोरिया त्रेनान पॅलेसमध्ये राहून राजेशाही जीवनाची अगदी जराशी झलक पुन:पुन्हा अनुभवणारे एक स्थापत्यकार मित्र सांगतात, ‘‘या १८ व्या शतकात पुऱ्या झालेल्या शातूची शानच आगळीवेगळी. सोनेरी मुलाम्याचे पत्रे लावून उभारलेल्या भिंती आणि छत, झुंबरं आणि आरशांची सजावट वगैरे राजवैभव आहेच.

पण इथे पाऊल टाकल्याक्षणी सामोऱ्या येणाऱ्या फ्रेंच शैलीच्या विस्तीर्ण बागा मनाला गारवा देणाऱ्या. तुमचा जेवढा काही मुक्काम असेल त्यात अगदी नखशिखांत राखलेल्या सुंदर हिरवळींवरून हिंडता हिंडता अगणित सौंदर्यस्थळं तुम्हाला शोधून शोधून पाहता येतात. राजवाडय़ाच्या ८०० हेक्टरमध्ये पसरलेल्या बागेचं सौंदर्य निसर्गदत्त वनराई आणि त्यातून जाणारे रस्ते आणि वेगवेगळी वैशिष्टय़े योजून वाढवलेल्या लहान-मोठय़ा राई- म्हणजे स्टार ग्रोव्ह, वॉटर थिएटर ग्रोव्ह, मिरर पूल ग्रोव्ह. मोठय़ा बागांमधल्या लहान गार्डन रूम्स देखरेखीची उस्तवार सांभाळायला. शातूच्या गच्चीवरून बघावं तर नजर क्षितिजाला टेकेस्तोवर फक्त वाहणारा पाट आणि कोरीव मांडणीसारखी बाग.’’ थोडक्यात- डोळे उघडे असून मिटल्यावर मिळावी तशी अथांग शांती!!

अनुभव अगदी पूर्णत्वाला न्यायचा असेल तर ‘ओअर दूकास’मध्ये अभिजात फ्रेंच पाककलेचा पंचेंद्रियांनी आस्वाद घ्यावा. एखाद्या पदार्थाला डेलिकसी का म्हणावं, हे फ्रेंच पारंपरिक पाककौशल्य दाखवून देतं. पदार्थाचा स्वादच नव्हे, त्याची पेशकशही इतकी सुंदर, की खाण्याआधी खाऊन संपवून टाकायचा की नेत्रसुख आणखी जरा लांबवायचंय, हे ठरवावं लागतं . ‘व्हिनीउसरीस’ म्हणजे छोटय़ा हलक्या प्रेस्ट्रीज सकाळी न्याहारीत किंवा दुपारी चहाबरोबर, खरं तर कधीही अनुभवण्यासारख्या. रसनेवर विरघळणारा आणि मग तोंडात हरवून जाणारा तलमपणा. त्याचा स्वाद मागून रेंगाळत राहतो. नुसती कॉफी मागवलीत तरी बरोबर स्वादिष्ट कॉफीच्या त्या- त्या स्वादाशी मिळतीजुळती दोन बिस्किटं. कुठलंही फ्रेंच जेवण वाईनखेरीज अधुरं. काय खात आहात यावर बरोबरची वाईन ठरत असते. नुसतं लाल की पांढरी, स्पार्किलग की श़ँम्पेन यावर संपणारी निवड नसते ती! फ्रान्सच्या कुठल्या भागातून कुठल्या प्रकारची वाईन निवडलीय यावरही यजमानांची जाण कळत असते! एक अक्षर न बोलता, नितांत निळ्या- हिरव्या क्षितिजावर डोळे जडवून फ्रेंच वारुणी आणि चीजच्या साथीने संधिप्रकाश न्याहाळणं म्हणजे आयुष्यातला एक अतिशय सुंदर दिवस जगणं.
arundhati.deosthale@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Green crown royal splendour the french revolution magnificent museum of the history of france amy

Next Story
कलास्वाद: प्रभातचा ‘संत तुकाराम’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी