प्रा. विजय तापस vijaytapas@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधिलिखिताच्या संदर्भात माणूस काय अन् नाटक काय, या अजब चिजाच ठरतात. प्रत्येक  नाटकाचं भागधेय, त्याची कुंडली आणि त्या, त्या नाटकाचे भोग काय असतील हे आजतागायत कुणीही सांगू शकलेलं नाही. याचं साक्षात उदाहरण म्हणजे ‘गृहदाह’! गोविंद केशव भट यांनी १९४३ मध्ये ‘गृहदाह’ नाटकाला कागदावर जन्म दिला. नाटक जन्माला आलं, त्याचे काही प्रयोगही झाले आणि नाटकाचा भाग्ययोग इथेच संपला. सारेच ग्रह एकाच वेळी वक्री झाले. पुढच्या काळात हौशी मंडळींचा सहवासच बहुधा नाटकाला लाभला. पुढे तर हे नाटक अस्तंगतच झालं. इतकं, की पहिल्याच प्रवासात पार सागरतळाशी विसावलेल्या अतिश्रीमंत टायटॅनिक जहाजाचीच आठवण यावी.

मात्र, मला ते नाटक एक सामाजिक दस्तावेज म्हणून अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यातही एखादा परभाषक वा परदेशी अभ्यासक थेट वास्तवालाच पोटात घेणाऱ्या मराठी नाटकांचा शोध घेत असेल तर त्याच्या हाती जी नाटकं ठेवावीशी वाटतील, त्यात हे नाटक आपण नक्कीच ठेवू. लग्नात सात जन्मांची सोबत करण्याच्या आणाभाका घेतलेल्या स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधांतलं तुटलेपण, दुरावा दाखवणारा बेल्जियमी आरसा म्हणजे हे नाटक. सिनेमात काम करणाऱ्या स्त्रियांच्या ‘वाटेवरचे काटे’ घरापर्यंतही कसे पसरलेले असतात हे अधोरेखित करण्याचा एक प्रयत्न म्हणून बायकोने नवऱ्याला न विचारता एखादा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने दुखावलेला नवरा, वरकरणी तसं अजिबातच न दाखवता कमालीच्या थंडपणे तिला एकटं कसं पाडू शकतो, हे दाखवण्यासाठी किंवा स्त्रीने स्व-उत्कर्षांसाठी घेतलेला निर्णय खुद्द तिच्या आणि इतरांच्याही आयुष्यात काय आणि किती उलथापालथ घडवू शकतो, हे प्रामाणिकपणे दाखवणारं नाटक म्हणून ‘गृहदाह’ कोणाही संवेदनशील माणसाला इत्थंभूत पटणारं आहे. मला ‘गृहदाह’चं एक वेगळेपण हे वाटतं की, कसलाही आक्रस्ताळेपणा वा भावनिक आकांडतांडव न करता ते संयतशील स्वभावाने व्यक्त होत राहतं. हे नाटक म्हणजे एक विलक्षण गुंतागुंतीचा नमुना आहे. नाटककार नाटकाची रचना, हाताळणी इतकी पेचदार करतो की रूढ वाटेने जाऊ शकणारं नाटक अनेकस्तरीय होतं आणि वाचकाला वा प्रेक्षकाला ‘बिट्वीन द लाइन्स’ लपलेलं गुंतागुंतीचं वास्तव वाचायचं आव्हान देतं. आपण चांगल्या नाटकाकडून हीच अपेक्षा करतो ना?

नाटय़कलाप्रिय गो. के. भट यांचा विशेष असा की इंग्रजी, मराठी व गुजराती या भाषांत त्यांनी सारख्याच तोलामोलाचं काम केलं. मुख्य म्हणजे साहित्याची अर्थबहुलता जाणून समोर आलेल्या संहितेचं अत्यंत पटणारं अर्थनिर्णयन-कनिव्हसिंग इंटरप्रिटेशन- ते ज्या पद्धतीने करतात तो त्यांचा अफलातून विशेष आहे. गो. के. भट हे विद्वान होते, पण बुद्धिजड नव्हते. ते अत्यंत सर्जनशील होते. म्हणूनच तर त्यांनी कथा लिहिल्या, कादंबरी लिहिली आणि सर्जनशील समीक्षाही लिहिली. याचाच प्रत्यय आपण ‘गृहदाह’मधून घेतो.

‘गृहदाह’ लिहिणाऱ्या भटांचं वर्णन मी ‘अ प्लेराइट ओपन टू थिएट्रिकल आर्ट’ असं करेन. याचं कारण म्हणजे त्यांनी नाटककार-दिग्दर्शक-नाटय़कलाचिंतक के. नारायण काळे यांनी केलेल्या सूचनांनुसार नाटकाचे पुन: पुन्हा  केलेले अनेक ड्राफ्टस् ‘नाटककाराने लिहिलेला प्रत्येक शब्द अंतिम नसतो, त्यात प्रयोगाच्या अंगाने खूपच बदल संभवू शकतात’ याची समंजस जाण ठेवून गो. के. भटांनी मूळ नाटकात काळेंना हवे तसे बदल करून दिले. यात फायदा नाटकाचाच होऊन त्यात अधिक ‘नाटकपण’ निर्माण झालं. सर्व बदलांनंतर आपल्या समोर जे नाटक उभं राहिलं आहे ते तीन अंकांत विभागलं गेलं आहे. नाटकात प्रवेशरचना नाही. घटना-प्रसंगांची रेलचेल नाही. मात्र, त्यात कथानकाच्या आणि पात्रांच्याही विकासाचा एक निश्चित परिणाम निर्माण करणारा आलेख आहे. नाटक १९४३-४४ सालातलं असलं आणि नाटकात किमान काही गाण्यांना सामावून घेता येतील अशा जागा असल्या तरी ते ‘संगीत नाटक’ करण्याचा मोह भटांनी टाळला आहे.

नाटकात पात्रांची उगीचच गर्दी नाही आणि नाटकाची व कथानकाची म्हणा, वीण टोकाला जाणारी, आक्रस्ताळी नाही. संपूर्ण नाटक अपवाद वजा करता वैचारिक परिपक्वतेच्या सुरात बोलत राहतं. मला वाटतं, या प्रकारचं नाटय़स्वरूप तीनही अंकांत टिकून राहतं, हाच ‘गृहदाह’चा मास्टरस्ट्रोक आहे. नवऱ्याच्या इच्छे-अनिच्छेची पर्वा न करता चित्रपटाच्या दुनियेत जाऊन यशस्वी झालेल्या आणि अधिक यशस्वी होऊ पाहणाऱ्या नायिकेची ही कहाणी आहे. कर्तृत्व, आत्मविकास, पैसा, प्रतिष्ठा मिळवणारी शैला सिनेमाच्या जगात अशी गुंतते की घर ही तिच्यासाठी चार तासांच्या विरंगुळ्याची किंवा विश्रांतीचीच जागा उरते. ती पत्नी म्हणून नवऱ्यापासून आणि आई म्हणून लतापासून काहीशी दुरावली आहे. मात्र, तसं व्हावं ही तिची इच्छा नाही, हे नक्की.

नाटकाचा गाभा भावनिक उमाळे, उसासे, दु:ख, यातना, आक्रोश यांनी अजिबातच डागाळलेला नाही. त्या प्रकारच्या ‘हाय ड्रामा’ निर्माण करणाऱ्या घटना, प्रसंग, स्वगतं यांची गजबज नाटकात जवळजवळ नाहीच. नाटकाची नायिका शैला ही सौंदर्यसम्राज्ञी नाही, पण इम्प्रेसिव्ह आहे. ती नवऱ्याच्या मित्राचा सल्ला मानून सिनेमात काम करण्याचा निर्णय घेते आणि नंतर त्यात यशस्वीही होते. मात्र, तिच्या नवऱ्याला तिचा हा निर्णय मान्य नाही. त्याने कुटुंबाची म्हणून जी कल्पना केलीय त्यात नायिकेचा (पत्नीचा) सिनेमाप्रवेश बसणारा नसला तरी त्याच्या तिच्याशी असलेल्या वर्तनात कुठेही कटुता वा धुमसत्या रागाची छाया नाही. तिथे आत्मक्लेश, मूक वेदना आणि निराशा आहे, पण त्यात तुसडेपणा नाही. तो शैलाच्या निर्णयात सामील नसला, किंबहुना त्याचा तिने सिनेमात जाण्याला विरोध असला, तरी त्याला तिचा दु:स्वास नाही. त्याचा पुरुषी अहंकार कुठेही फणा काढून तीव्रतेने व्यक्त होत नाही. मात्र त्याच्या अहंकाराचं प्रक्षेपण त्याच्या थंड, शांत, कृतींतून होत राहतं. एखाद्या वेळचा अपवाद करता तो फार संयतशील वागतो, बोलतो. बायकोची घरातली अनुपस्थिती हीच त्याला लाभलेली संधी आहे आणि त्याचा तो उत्तम वापर करून घेताना दिसतो. त्याने आलेल्या प्रत्येक संधीचा वापर शैलाचं घराकडे, आजारी मुलीकडे कसं लक्ष नाही हे दाखवून देण्यासाठी केला आहे.

नाटकातला मुख्य विषय आहे तो शैलाने अभिनेत्री म्हणून सिनेमात जाणं आणि त्यात गुंतून पडल्याने तिचं घरातलं अस्तित्व एखाद्या ‘व्हिजिटर’सारखं होणं, हा! यानिमित्ताने नाटकात जो संघर्ष उभा राहतो तो ‘क्लॅश ऑफ इंटरेस्टस’चा आहे. महेशला ज्या शांत आणि स्थिर जीवनशैलीची आस आहे त्यास छेद देणारा, सिनेमात जाऊन नाव, प्रतिष्ठा, पैसा संपादन करण्याचा निर्णय शैलाचा आहे. तिच्या या निर्णयात शैलाचं स्त्रीत्व, स्वत:चा अवकाश निर्माण करण्याचा तिचा हक्क आणि निर्णयाधिकार, तिचं संभाव्य यश, प्राप्त होणारा पैसा असे अनेक धागे गुंतले आहेत. तिला सिनेमात जाण्याचा निर्णय घ्यायला लावणारा प्रदीप हा साहजिकच नाटकातलं एक महत्त्वाचं पात्र झाला आहे. तर शैलाची मैत्रीण असणारी प्रेमा ही या कुटुंबाची सखी.. शैलाच्या चुका तिला दाखवून देणारी टीकाकार आहे. ती तिला सतत वास्तवाची जाणीव करून देत असते.

आपण या नाटकाकडे अधिक बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की, १९२०-२५ नंतरच्या काळात स्त्रीवर्गात स्वत:च्या कौटुंबिक स्थानाबद्दल, स्वत:च्या हक्कांबद्दल जी जागृती निर्माण झाली होती त्याचं प्रतििबबच हे नाटक स्वत:त वागवतं आहे. नाटकातल्या ‘गृहदाहा’त पती-पत्नी संबंध आणि एका स्त्रीने स्वयंप्रेरणेने घेतलेला एक विशिष्ट निर्णय यांचीच कसोटी लागताना दिसते आहे. या पद्धतीने पाहता हे नाटक निर्विवादपणे वास्तवमुखी आहे असं म्हणता येईल. हे नाटय़कथानक तेव्हाच्या प्रागतिक मुंबईत घडतं, हेही अन्वर्थक आहे. नाटकाची वास्तवाभिमुखता अधिक अधोरेखित करण्याचं काम नाटकातले वस्त्रांचे, घरातल्या वस्तूंचे, नेपथ्याचे तपशील करतात. नाटकातला सोफासेट हा तत्कालीन इंडो-पोर्तुगीज शैलीतला असून, तो तेव्हाच्या ‘शेरेटन अँड कंपनी’चा असावा, इतका पुरावाही पुरेसा आहे. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझ्या करिअरिस्ट अ‍ॅप्रोचमुळे आपण एकमेकांना दुरावतो आहोत.. म्हणजेच दोष तुझाच आहे!’ हेच खरं तर शैलाच्या नवऱ्याचं- महेशचं संपूर्ण नाटकाला व्यापून असणारं अनुच्चारीत स्टेटमेंट आहे. याचे अनेक पुरावे तीनही अंकांत नाटककाराने पेरून ठेवले आहेत. विशेषत: नाटकाचे अखेरचे काही क्षण याची साक्ष देणारे आहेत. सिनेअभिनेत्री पत्नीच्या घरात राहण्याचं नाकारून तिचा नवरा मुलीला घेऊन घर सोडतो. तो दुसरीकडे राहायला जाणार आहे. त्या शेवटच्या क्षणी तो बायकोला म्हणतो, ‘‘इथं आम्हाला घर उरलं नाही, पण तिथे तुझंच घर आहे. घरी यायला रस्ते बंद का असतात?’’ यानंतर नवरा घर सोडतो. इथे नाटककार नवऱ्याला इब्सेनची ‘डॉल्स हाऊस’मधली नोरा होऊ देतो, किंवा नोरा होण्याची संधी नायिकेला घेताच येणार नाही अशी चाल नाटककाराचा नायक खेळतो. ही अशी हेतुपूर्ण रचना नाटककार मुळापासून करतो असंही एखादा माणूस म्हणू शकेल. ते कसंही असो, एक मात्र खरं, की भटांनी एक वैशिष्टय़पूर्ण, वैचारिकतेला आवाहन करणारं आणि स्त्रीची नवप्रतिमा उभारणारं नाटक मराठी रंगभूमीला दिलंय, हे नक्की!

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grihadah marathi drama by govind keshav bhat zws
First published on: 15-05-2022 at 01:05 IST