वडाखालच्या मारोतीजवळ चांगलंच ऊन चमकतंय. या उन्हात पदरानं डोकं झाकून बायका केव्हाच्या बसल्यात. मधेच वेशीकडच्या वाटेवर धुरळा उडतो. बायकांच्या माना आशेनं रस्त्याकडं  वळतात. कुणाचंतरी तोडलेलं झाड घेऊन जाणारी ट्रॅक्टरची ट्रॉली खडखडत असते. घरची कामंधामं तशीच पडून आहेत. म्हाताऱ्या, तरण्या, संसारी, परकरी पोरी, बायका वाट पाहत बसल्यात. एवढी वाट तर माहेराहून घ्यायला येणाऱ्या गाडीचीही पाहिली नव्हती. आज मात्र चार-चार घंटे अंगातलं रक्त तापवीत बसून राहावं लागतंय. रात्री-बेरात्रीसाठी पुरुष मंडळी कंदील-बॅटऱ्या घेऊन तयार असतात. कालपासून टँकर आलेलाच नाहीये. चारशे उंबऱ्याचं तहानलेलं गाव. दुष्काळी गाव म्हणून निर्माण झालेली नवीन ओळख. नेते आले. तळमळीने बोलले. त्यांचे बोल हवेत विरले. गाव कोरडाच. विहिरी आटल्या. नदीत तर वाळूही शिल्लक नाहीये. प्लेगच्या साथीपेक्षाही भयंकर अशी आत्महत्येची साथ आलीय. रानात उगवलेलं वाळून गेलं. बंद  पडलेल्या हापशाजवळ भांडे, कळशा, बघोन्यांची रांग लागलीय. त्या रांगेतल्या नंबरवरून भांडाभांडी, तर कधी मारामारीही झाली. बायकांनी एकमेकींच्या झिंज्या  धरल्या. पण टँकर काही वेळेवर येईना. परवा तर एका बाईला रांगेत घेरी आली. तिच्या तोंडावर पाणी मारावं तर पाण्याची बोंब. कुणीतरी घरातला रांजण खरवडून ग्लासभर पाणी आणलं म्हणून भागलं. नुस्तंच आभाळ भरून येतं. मधेच कधीतरी उंदीर मुतल्यासारखा पाऊस पडतो. एखाद्या कंजूष दानशूरानं पाखरासाठी स्वत:चा खरकटा हात झटकावा तसे चार शिंतोडे पडतात.
चिंताक्रांत बायका बसल्यात ओटय़ावरच्या तुटपुंज्या सावलीत. बोलणार तरी काय? बोडख्या कपाळासारखी शांतता. न बोलावं तर वेळ कसा कटणार? म्हणून बायका बोलतायत. चार बायका खोदून खोदून विचारतायत प्रयागाबाईला. घडाघडा बोलतायत प्रयागाबाई.. ‘‘असा वंगाळ वकत. तरीबी ट्रॅक्स करून आम्ही आठ-धाजण पोरगी पाहायाला गेल्तो. पाव्हणेबी आपल्यासारखेच. पन पाऊसकाळ बरा असलेले. खाऊनपिऊन सुखी. तरतरीत पोरगी. नाकीडोळं देखणी. चांगली बारावी शिकल्याली. दाखवायाचा कार्येक्रम यवस्थित झाला. आम्हाला पोरगी पसंद पडली. खरं तर तिथंच कुंकाचा कार्येक्रम उरकायचा; पन हे दुष्काळाचं घोडं मधीच आलं. पार दिवाळीपतुर सारं लांबलं. गोडाधोडाचं जेवण झालं. आम्ही गावाची वाट धरली. कधी नव्हं ते आमच्या पोराला पोरगी पसंद पडलेली. त्यामुळं पोरगं खुशीत व्हतं. सुनबाईला पुढी शिकवायाचा त्याचा इचार होता. दोघाचा जोडा लक्ष्मी-नारायणाचा..’’ तेवढय़ात न राहवून एक बाई बोललीच- ‘‘मंग माशी शिंकली कुठं?’’ प्रयागाबाई गहिवरल्या. ‘‘कशान् की काय माय, कुण्या चांडाळाची नजर लागली. चार रोजानी पाव्हण्याचा कागुद आला. ठरलेलं लगीन मोडलं. काय तर म्हणं आमचं ठिकाण पसंद न्हाई.’’ जमलेल्या  बायकांना टँकरच्या प्रतीक्षेतही ठिकाण का पसंत नाही याची उत्सुकता होतीच. नाकारण्याचं नेमकं कारण ऐकायला उत्सुक असलेली एक म्हातारी बोललीच, ‘‘एवढं राजबिंडं, हुश्शार पोरगं. ठोकरून लावायला काय धाड बडवली त्या तालेवारायला. काय काळ आला रं देवा!’’ तेवढय़ात रस्त्यावरचा धुरळा उडाला. आता मात्र पाण्याचा टँकर आलेला होता. बायका सावध झाल्या. शत्रूची चाहूल लागताच सैनिकांनी शस्त्र रोखून सज्ज व्हावं तशा हांडे-कळशा घेऊन बायका तय्यार झाल्या. भांडय़ाला भांडी लागली. गावात गलका झाला.. ‘टँकर आलाय, टँकर आलाय.’ या गोंधळात प्रयागाबाईच्या पोराची सोयरीक मोडण्याची गोष्ट पूर्ण झाली नाही. पण त्या मोडलेल्या सोयरिकीची सल कायम होती. खरं तर प्रयागाबाईचा पोरगा चांगला धट्टाकट्टा. डी. एड. झालेला. शिक्षकाच्या नोकरीसाठी दहा लाख देणं शक्य  नव्हतं, नाहीतर आयत्या पगाराच्या नोटा मोजत बसला असता. घरात दहा एकर शेती. शेवटी बापाबरोबर शेती करू लागला. तीन वर्षांपासून पाऊस नाही. परिस्थिती बिघडली. गाव कंगाल झालं. प्यायलासुद्धा पाणी नाही. कुणाच्या घरी दिवसा पाहुणा आला तर घरात बाई दिसणार नाही. हांडे-कळशा घेऊन बाई बसलेली टँकरच्या रांगेत. नाहीतर दूरवरच्या  विहिरीतलं पाणी खरडण्यासाठी पायपीट करायला गेलेली. शेत ओसाड झालेलं. तिथं काही काम नाही. मग बापे माणसं अंगणातल्या खाटेवर बिडय़ाचा धूर काढीत, नाहीतर तंबाखू चघळत बसलेले.

आधी टँकर गावातल्या कोरडय़ा विहिरीत रिकामा केला जायचा. टँकरच्या पाइपाचं पाणी थेट विहिरीत सोडलं जायचं. वरतून खाली खडकावर पडणाऱ्या पाण्याचा मोठा आवाज व्हायचा. खालच्या गाळात पाण्याची धार पडल्यामुळं पाणी गढूळ व्हायचं. तसं गढूळ पाणी मग पोहऱ्यानं शेंदून घ्यावं लागायचं. त्यामुळं पाइपातून विहिरीत पाणी पडतानाच काठावरून भांडे-कळशा भरून घेण्यासाठी धडपड सुरू असे. पाइपाच्या धारेला भांडं धरलं की फोर्समुळं चटकन् भरून जाई. ही वरच्या वर भांडं भरायची पद्धत सर्रास झाली. एक दिवस तेरा-चौदा वर्षांची परकरी पोरगी वरच्या वर घागर भरू लागली. घागरीचं तोंड लहान. तिनं पडतं पाणी धरण्यासाठी विहिरीच्या आतल्या बाजूनी घागर धरली. घागर भरत गेली. वजनदार झाली. ती वजनदार घागर सांभाळताना या पोरीचे काठावरचे पाय आधर झाले. आत तोल गेला. घागरीसगट पोरगी खडकावर आदळत तळाशी गेली. भलामोठा आवाज करणारी टँकरची मोटार कुणीतरी बंद केली. मोटार शांत झाली. घागरीसकट मुलीला वरती काढलं. मुलगीही शांत झालेली होती. गावातला गलका मात्र वाढतच गेला. बातमी पंचक्रोशीत पोहोचली.घटना घडत गेल्या. बापे चिंताक्रांत झाले. बायका डोळ्याला पदर लावू लागल्या. तरी टँकर थांबला नाही. एका परकरी पोरीचा जीव गेला म्हणून थेट विहिरीत पाणी टाकणं बंद झालं. आता बंद पडलेल्या हापशाजवळ टँकर येऊन उभा राहायचा. टँकरची वाट पाहत बायका-पोरी रांगेत बसून तोंड हलवायच्या. मग जुनेपाने विषय निघायचे. एक दिवस नेहमीप्रमाणं टँकरची वाट पाहत बायका बसलेल्या. एकीनं प्रयागाबाईला छेडलंच- ‘‘कामुन मोडली असंल त्यायनी सोयरीक?’’ प्रयागाबाईचंही साठलेल्या अपमानाचं बेंड ठसठसत होतंच. बाई बोलायला लागल्या आणि एक भयंकर गोष्ट बाहेर आली. सोयरीक मोडली तरी मोडण्याची कारणं स्पष्ट होत नव्हती. हुंडय़ाचा प्रश्न सुटलेला होता. मुलगा आणि मुलीनं एकमेकांना पसंत केलेलं होतं. तरीही मुलीकडच्यांनी सोयरीक मोडली होती. मुलाचे वडील मुलाच्या हट्टामुळे स्वत: जाऊन चर्चा करून आले तेव्हा खरं कारण पुढं आलं. मुलीच्या वडलांचं म्हणणं होतं- या गावात दिलेल्या प्रत्येक पोरीचं आयुष्य पाणी भरण्यातच बर्बाद होणार. या गावाची दुष्काळी ख्याती कानी येत गेली म्हणून ही सोयरीक मोडली. तसं पाहिलं तर मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यात तथ्य आहे. या गावात पोरगी देणं म्हणजे तिला कोरडय़ा विहिरीत ढकलून दिल्यासारखंच आहे. पण या मोडलेल्या लग्नाचा परिणाम प्रयागाबाईच्या मुलावर झाला. चार दिवसांनी पोरगं गायब झालं. पाव्हण्यारावळ्यांकडं विचारणा केली.  जमेल तिथं शोध घेतला. पण पोरगं काही सापडेना. ‘हरवला आहे’ म्हणावं तर चांगलं लग्नाचं पोरगं हरवेल कसं? पोलिसात तक्रार दिली. शेवटी काही लोकांच्या सांगण्यावरून जिल्ह्याच्या पेपरात  ‘घरातून निघून गेला आहे’ अशी जाहिरात देण्याचं ठरलं. जाहिरात छापून आलीही असेल. कदाचित निघून गेलेला पोरगा वापसही आला असेल. पण आता टँकरच्या रांगेत बसलेल्या बायका शांत बसून राहतात. एकमेकीला पोराची सोयरीक मोडल्याचं कारण विचारीत नाहीत. त्यांनी ते अनुभवलेलं असतं.

ज्यांना ही ‘निघून गेला आहे’ची कहाणी फारच कल्पनाविलास वाटत असेल त्यांनी आमच्या भागात येऊन बघावं. प्रारंभी कर्तव्यदक्षतेने दाखल झालेला आता बेपत्ता झालाय. ‘हरवला आहे’ असं मी  म्हणणार होतो; पण नंतर लक्षात आलं- रोज त्याच्याबद्दल अनेक बातम्या कळतायत.. ‘आज तिकडं होता’, ‘परवा त्यानं धुमाकूळ घातला.’ म्हणून ‘हरवला आहे’ असं म्हणता येणार नाही. मग आता ‘निघून गेला आहे’ असंच म्हणू या..
‘वक्तशीर मुलगा

पाठीवर दप्तर घेऊन

शाळेत वेळेवर पोहोचतो

तसा येऊन पोहचला पाऊस,

एखादं आदिम तत्त्वज्ञान रुजवावं

तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं

जमिनीच्या पोटात

 

मग भुरभुर वारा सुटला..

छोटय़ा स्टेशनवर न थांबता

एक्स्प्रेस गाडी

धाडधाड निघून गेल्याप्रमाणे

काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,

वाट चुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा

अचानक पाऊस बेपत्ता झाला

 

बियांच्या पोपटी अंकुरानं

जमिनीला धडका मारून

वर येण्यासाठी रचलेले मनसुबे

दिवसागणिक वाळून गेले,

जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप

दवाखान्यातल्या व्हरांडय़ात

विमनस्क फेऱ्या मारतो

तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

 

लांबवर टाळ-मृदंगाच्या गजरात

पंढरपुराकडे निघालेली दिंडी

आणि इथं काळ्या शेतात

मरून पडलेला हिरवा पांडुरंग!’

आता याचंही भ्रमिष्टासारखं बेपत्ता होणं, अचानक निघून जाणं समजून घ्यायला हवंय. याचीही एखादी सोयरीक मोडली

नसेल कशावरून?
dasoovaidya@gmail.com