पराग कुलकर्णी

जगात एवढी विषमता का आहे? काही देश अति-श्रीमंत आहेत, तर काही अति गरीब. माणसाची सुरुवात आफ्रिकेत झाली, तरीही आज इतक्या वर्षांनंतरही आफ्रिका मागास आहे. तर त्यामानाने अनेक पाश्चिमात्य देश प्रगत म्हणून ओळखले जातात. इतिहासातही डोकावून पाहिले तर असे लक्षात येतं की, युरोपियन सत्तांनी ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका, अमेरिका या खंडांवर आक्रमण केलं. तिथली संस्कृती नष्ट केली आणि जगावर राज्य केलं. हे असं का झालं? आणि हे असंच का झालं- दक्षिण अमेरिकेतल्या ‘इंका’, ‘माया’ या संस्कृतींनी जगावर राज्य का केलं नाही? युरोपियन गोरी माणसं ही खरंच इतर लोकांच्या मानानं श्रेष्ठ होती, का यामागे अजूनही दुसरं कोणतं कारण असू शकतं? हे सारे प्रश्न जेर्डडायमंड या अमेरिकी पक्षीनिरीक्षकाला पडले. जेव्हा न्यू गिनी बेटांवरच्या एका मूळ रहिवासी असलेल्या काळ्या माणसाने डायमंड यांना विचारले – ‘‘तुम्हा गोऱ्या लोकांकडे खूप जास्त वस्तू आहेत आणि आमच्या काळ्या लोकांकडे खूपच कमी, असं का?’’ जेर्डडायमंड यांना या प्रश्नाने एक दिशा दिली आणि त्यांनी याचा खोलात जाऊन वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायचे ठरवले. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी १९९७ साली त्यांचे निष्कर्ष  ‘गन्स, जर्म्स अँड स्टील’ (Guns, Germs and Steel’) या पुस्तकातून मांडले.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?

डायमंड यांच्या मते, माणूस शेती करायला लागला ही माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक खूप महत्त्वाची गोष्ट होती. शेतीच्या शोधामुळे अनेक गोष्टी घडल्या. एक म्हणजे- माणूस त्याचे भटके आयुष्य सोडून शेतांजवळ एका ठिकाणी राहू लागला. आधीच्या टोळ्या आता एका जागी स्थिर होऊन त्यातूनच छोटे समूह, गाव, शहरे आणि पुढे त्यांच्या एकत्रीकरणाने मोठी मोठी साम्राज्ये उभी राहिली. शेतीचा अजून एक मोठा फायदा असा झाला की, उपलब्ध धान्याचे आणि अन्नाचे प्रमाण वाढले आणि सर्वानीच शेती केली पाहिजे किंवा अन्न शोधले पाहिजे ही गरज उरली नाही. यामुळे लोकांना जास्त वेळ इतर कामांसाठी मिळायला लागला. यातूनच माणसाला इतर अनेक शोध लावता आले, भाषा, कला, तंत्रज्ञान, सामाजिक व्यवस्थांच्या पद्धती विकसित करता आल्या आणि हळूहळू ज्याला आपण संस्कृती म्हणतो ती निर्माण होत गेली. शेतीसोबतच गाय-बैल, घोडे, कुत्रे यांसारखे पाळीव प्राणी बाळगणे हा देखील एक मोठा बदल होता. यामुळे शेतीच्या कामात मदत तर झालीच, पण त्याचबरोबर माणसांचे, वस्तूंचे, विचारांचे आणि कल्पनांचे दळणवळण वाढण्यासही खूप मदत झाली.

थोडक्यात काय तर- शेती, पाळीव प्राणी या गोष्टी ज्या माणसांनी आपल्याशा केल्या त्या माणसांच्या प्रगतीचा वेग प्रचंड वाढला. पण हे नेमके झाले कुठे? याच्या अभ्यासासाठी डायमंड यांनी जगाचे ४ खंड विचारात घेतले. ऑस्ट्रेलिया, युरेशिया (युरोप आणि आशिया एकत्र, कारण हे भूभाग जोडलेले आहेत), आफ्रिका आणि अमेरिका. अनेक विषयांच्या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की, योग्य तापमान, त्या तापमानात टिकणारी आणि योग्य ते पोषणमूल्य असलेली पिके, त्यासाठी लागणारी जमीन, शेती करण्यासाठी लागणारे पाळीव प्राणी या सर्वाचेच प्रमाण युरेशियामध्ये जास्त होते. उदा. माणसाला उपयोगी पडतील असे १४ पाळीव प्राणी (मेंढी, गाय, घोडा, कुत्रा, इत्यादी) युरेशियामध्ये होते तर दक्षिण अमेरिकेत फक्त एक (लिमा) आणि ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि आफ्रिकेत एकही नाही (आफ्रिकेत खूप जंगली प्राणी होते, पण ते पाळीव प्राणी नव्हते). याचाच अर्थ असा की शेतीचा शोध आणि प्रसार युरेशियामधे होणे स्वाभाविक होते आणि तसेच घडले. बाकी काही ठिकाणी (दक्षिण अमेरिका) शेतीचा शोध उशिरा लागला तर काही ठिकाणी (ऑस्ट्रेलिया) तो कधीच लागला नाही. शेतीचा शोध हा एका खूप मोठय़ा बदलांच्या साखळीची सुरुवात होती, ज्यात मग पुढे समुद्र पार करता येतील अशा जहाजांचा, छपाई यंत्राचा, बंदुकीचा आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश होत गेला. या अशा अनेक छोटय़ा स्वतंत्र शोधांमुळे युरेशियातल्या काही देशांना पुढे मोठी बाजी मारता आली.

मानवाने शोधून काढलेल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने आपल्या इतिहासाला आकार दिला हे आपण समजू शकतो, पण त्याचबरोबर अजून एक घटक आपल्याही अजाणतेपणी काम करत होता- आजार पसरवणारे जंतू (Germs). माणूस जसा प्राण्यांच्या सहवासात राहायला लागला, तसे प्राण्यांपासून होणारे संसर्गजन्य आजार त्यालाही होऊ लागले. त्यातच तो मोठय़ा समूहात एकत्र राहत असल्याने हे आजार पसरण्यास वेळ लागत नसे. याचा एक परिणाम असा झाला की, अनेक लोक या आजाराने सुरुवातीला मृत्युमुखी पडले. पण पुढे हळूहळू या रोगांच्या विरोधातील प्रतिकारशक्तीही माणसात विकसित होत गेली आणि त्या रोगांवरही औषधे पुढे शोधण्यात आली. अर्थात, ज्या संस्कृती या टप्प्यावर आधी पोहोचल्या त्यांना याचा जास्त फायदा झाला. १४९२ मध्ये कोलंबस अमेरिकेत पोहोचला आणि त्यानंतर अनेक युरोपियन लोक अमेरिकेत आले आणि त्यांचा तिथल्या स्थानिक आदिवासी लोकांशी संपर्क आला. एका अभ्यासानुसार, कोलंबसच्या येण्यानंतर काही काळातच ९५ % स्थानिक आदिवासी लोक युरोपियन लोकांनी आणलेल्या वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांनी (देवी, गोवर, फ्लू) मृत्युमुखी पडले, तोपर्यंत त्यांचा या आजाराशी कधीच सामना झाला नव्हता; आणि त्यामुळे युरोपियन लोकांमध्ये विकसित झालेली प्रतिकारशक्ती आदिवासींमध्ये नव्हती. अशाच प्रकारे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतलेही अनेक स्थानिक मूळ निवासी आणि त्यांच्या संस्कृती युरोपियन लोकांनी आणलेल्या नवीन रोगांसमोर तग धरू शकल्या नाहीत.

डायमंड यांनी वैज्ञानिकदृष्टय़ा अभ्यास करून अनेक निष्कर्ष मांडले, ज्यातून आपल्याला आपल्या आजवरच्या प्रवासाची खूप  माहिती मिळते, तसेच जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टीही मिळते. या साऱ्या संशोधनाचं सार आणि आपल्याला सुरुवातीला पडलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर शेवटी एकच आहे- भौगोलिक परिस्थिती! वेगवेगळ्या प्रदेशांतल्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्या त्या प्रदेशातील लोकांना काही फायदे झाले, तर काही तोटे आणि यातूनच काही संस्कृतींची भरभराट झाली. तर काही लयास गेल्या- ज्यातून आजची विविधतेची आणि विषमतेचीही परिस्थिती निर्माण झाली. पण ही गोष्ट इथेच संपते का? भूगोलाने सांगितलेली ही इतिहासाची कालची गोष्ट आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण इतिहास-भूगोलाच्या मर्यादा झुगारून देऊन, येणाऱ्या काळासाठी एक नवीन गोष्ट लिहू शकतो का? तुम्हाला काय वाटतं?

parag2211@gmail.com