scorecardresearch

आदर्श व्यक्ती, बुलंद गायिका

१९९८ मधली एक प्रसन्न सकाळ. पुण्यातल्या हॉटेल ‘स्वरूप’मधली मालिनीताईंची नेहमीची खोली.

lokrang 7
आदर्श व्यक्ती, बुलंद गायिका

डॉ. चैतन्य कुंटे

१९९८ मधली एक प्रसन्न सकाळ. पुण्यातल्या हॉटेल ‘स्वरूप’मधली मालिनीताईंची नेहमीची खोली. तानपुरा घेऊन ‘पूछो काय मोसे’ ही तोडी रागातली कुमारजींची बंदिश त्या अगदी तल्लीनतेनं गात होत्या.. कुमारजींच्याच शैलीत. कितीतरी वेगळय़ा स्वरोच्चारांनी, स्वरवाक्यांनी त्यांनी बंदिश सजवली. मी विचारलं, ‘‘तुम्ही असं परंपरेपेक्षा वेगळं गाणं एरवी मैफलीत का गात नाही?’’

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

त्या हसून म्हणाल्या, ‘‘तो अधिकार कुमारजी, किशोरीताई अशा मोठय़ा लोकांचा आहे, माझा नाही. मी असं गाऊ शकते, पण माझ्या गुरुजनांनी शिकवलेल्या गायकीचा निर्वाह करणं हेच माझं कर्तव्य आहे. शिवाय मैफलीत माझ्यासमोर संगीताचे अनेक विद्यार्थी असतात, तेव्हा मी परंपरेचं गाणं गायलं नाही तर त्यांना वाटेल की आपणही असं केलं तरी चालतंय की.. योग्य व प्रस्थापित रागरूपं, बंदिशींची मूळ रूपं मांडणं ही माझी जबाबदारी आहे, ते सोडून मी स्वैरपणे गायले तर पुढच्या पिढीसाठी मी चुकीचा पायंडा पाडल्यासारखं होईल.’’ परंपरेविषयी अशी जबाबदारीची भावना मालिनीताईंनी कायम जपली.

मालिनीताईंचा (पूर्वाश्रमीच्या प्रभा वैद्य) जन्म ७ जानेवारी १९४१चा, अजमेरचा. आई-वडील शारदाबाई व वासुदेवराव वैद्य यांचे आदर्शवादी संस्कार त्यांच्या व्यक्तित्त्वाचा पाया होता. ग्वाल्हेर घराण्याच्या पं. राजाभैया पूंछवाले यांचे शिष्य पं. गोविंदराव राजूरकर हे अजमेरच्या गायनशाळेत प्राचार्य होते. त्यांच्याकडे विद्यालयीन पद्धतीने सात वर्षे शिकत असताना मालिनीताईंना राजस्थान संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली. ग्वाल्हेरच्या शिक्षण विभागाच्या ‘संगीतरत्न’ आणि ‘संगीतनिपुण’ या पदव्या त्यांनी मिळवल्या. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातही उत्तम चमकणाऱ्या मालिनीताईंना खरं तर गणित विषयातच कारकिर्द करायची होती. त्यानुसार त्यांनी राजस्थान विद्यापीठातून गणित विषयात पदवी मिळवली. तीनेक वर्षे अजमेरच्या सावित्री गर्ल्स कॉलेजमध्ये गणित, इंग्रजी व संगीत हे विषय शिकवले.

वसंतराव राजूरकर यांच्याशी ७ जुलै १९६४ रोजी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पं. राजाभैयांचेच शिष्य असणारे पती वसंतराव आणि सासरे वामनराव यांच्याकडे त्यांचं संगीतशिक्षण सुरू राहिलं. मालिनीताईंचे कलागुण जाणून वसंतरावांनी त्यांना मैफलीत गाण्यासाठी उद्युक्त केलं, त्यांच्या संगीत व्यासंगाला पाठिंबा दिला. १९६४ साली मालिनीताईंची पहिली जाहीर मैफल अजमेरच्या महाराष्ट्र मंडळात झाली. पुढे हैद्राबाद, धारवाड, हुबळी, इ. ठिकाणी कार्यक्रम सुरू झाले. १९६६ साली मुंबईत पहिला कार्यक्रम झाला आणि उपस्थित असलेल्या विदुषी माणिक वर्मा, पं. जसराज यांनी कौतुक केलं. याच वर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्या गायल्या व त्यांचं नाव ठळकपणे रसिकांपुढे आलं. पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे यांनी खूप कौतुक केलं. पं. भीमसेन जोशी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांना दर वर्षी आग्रहानं पाचारण करत, यावरून मालिनीताईंची एका दिग्गज कलाकारानं केलेली पारख आणि रसिकप्रियता या दोन्ही बाबी लक्षात येतात.

मालिनीताईंच्या ख्याल गायकीबाबत असं म्हणता येतं की ‘विद्यालयीन संगीतशिक्षण पद्धतीतून मैफलीच्या दर्जापर्यंत आलेल्या गायकीचं हे एक उत्तम प्रातिनिधिक उदाहरण आहे.’ विद्यालयीन पद्धतीत शिकूनही आपल्या गायकीला बाळबोध न ठेवता, तालमीच्या गायकीतील अस्सलपणा, मूलतत्त्वं, सौंदर्यस्थळं त्यांनी अंगीकारली. रियाज आणि चिंतनातून गायकीला बुलंद केलं. (तथाकथित घराणेदार तालीम घेतलेल्यांपेक्षाही अधिक कसदार आणि निष्ठेने जपलेली गायकी त्या गात, हे अनेकांनी खासगीत मान्यही केलंय.) के. जी. गिंडे, बाळासाहेब पूंछवाले, जितेंद्र अभिषेकी अशा बुजुर्गाच्या मार्गदर्शनातून त्यांनी गाणं समृद्ध केलं. एके काळी पं. कुमार गंधर्व, गंगूबाई हनगल, माणिक वर्मा यांचा प्रभाव त्यांवर होता, यथावकाश या प्रभावांतून बाहेर येत त्यांनी स्वत:ची खास धाटणी बनवली आणि ती रसिकप्रियही झाली. स्वच्छ खुला आवाज, स्पष्ट गानोच्चार, रागशुद्धता, बंदिशींची नेटकी मांडणी, खेळकर सरगम, दाणेदार आखीवरेखीव तान, एकंदर गायनात जोमदारपणा, प्रसन्नता ही त्यांच्या गायकीची वैशिष्टय़ं. ऐन उमेदीच्या काळात त्या मैफलीत सहजपणे, न थकता चार तास गात.. खुल्या आवाजात, जोरकस गायकी ताकदीनं इतका वेळ मांडणं हे काही सोपं काम नाही. त्यांचा ‘स्टॅमिना’ थक्क करणारा होता. पारंपरिक बंदिशींबरोबरच रातंजनकर, गोविंदराव नातू, भावरंग, दिनरंग, रामरंग अशा आधुनिक वाग्गेयकारांच्या बंदिशी मैफलींतून सातत्यानं मांडून लोकप्रिय करण्याचं श्रेयही मालिनीताईंना जातं.

मैफल मांडायची कशी याबद्दलही त्यांचे विचार मननीय होते. परंपरेनं घालून दिलेले दंडक न मोडता रागांचा आणि रचनांचा क्रम मैफलीत कसा ठेवावा, आणि मैफलीत शेवटपर्यंत रंगत कशी राखावी त्याबद्दल त्या जागरूकपणे विचार करत. एकाच शहरात लागोपाठ होणाऱ्या मैफलींत त्या वेगवेगळे राग आवर्जून गात. एखादा राग पुन्हा निवडला तरी त्यातल्या बंदिशी वेगळय़ा निवडत. रसिकांना तेच-ते न देता दर वेळी काय निराळं देता येईल असा विचार त्या करत. केवळ दुपारच्या, उत्तररात्रीच्या रागांच्या विशेष मैफली, ‘टप्पा-तराना मैफिल’, आचार्य रातंजनकरांच्या बंदिशींची मैफल असे वेगळे आविष्कार करताना त्या पुरेपूर मेहनत घेऊन ‘अभ्यासोनी प्रकटल्या’! तरीही कुणी त्यांच्याकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली तर त्या म्हणत, ‘‘मी अजूनही विद्यार्थीनीच आहे. मी काय शिकवणार? ज्यांच्याकडून शिकावे असे अनेक ज्येष्ठ आहेत, त्यांच्याकडे शिका.’’ मात्र एक खरे की, त्यांच्या गाण्याचा प्रभाव आजच्या पिढीतल्या कित्येक कलाकारांवर आहे.

ख्याल आणि टप्पा हे त्यांचे खास गळय़ावर चढलेले गानप्रकार. ग्वाल्हेर परंपरेतले तराने, खयालनुमा तराना, त्रिवट, गवैयाना भजन, अष्टपदी, टपख्याल, बंदिश की ठुमरी, रागमाला, सरगमगीत हे वैशिष्टय़पूर्ण गीतप्रकारही त्या प्रभावीपणे गात. प्राथमिक स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या, एरवी बाळबोध वाटणाऱ्या लक्षणगीत, सरगमगीताच्या बंदिशीही मैफलीत त्या अशा काही झोकात, कल्पकतेनं गात की त्या बाळबोध न वाटता नव्याने सौंदर्यपूर्ण वाटत! कारकीर्दीच्या आरंभी त्या बडे गुलाम अली खांसाहेबांचे दादरे, ‘राम बिन सिया अकुलानी’सारख्या कुमारजींच्या रचना, झूला, मराठी नाटय़पदेही ढंगदार गात. मात्र उत्तरायुष्यात त्यांनी मुख्यत्वे ख्याल आणि टप्पाच गायला. आम रागांसह बसंतमुखारी, चारुकेशी, कैशिकरंजनी, चक्रधर, देवरंजनी, गुणरंजनी, विजयानगरी, भूपालतोडी, सालगवराळी, सरस्वती, धानी, इ. अधुनाप्रसिद्ध रागही त्यांनी वारंवार मैफलीत गायल्यानं ते प्रचलित होण्यास चालना मिळाली. या रागांवर मालिनीताईंच्या गाण्याची विशेष मोहर उमटली आहे.

टप्पा गायन ही मालिनीताईंची खासियत. बुद्धी व गळा या दोन्हीच्या तयारीची मागणी करणारी ही गानविधा १९६०-७०च्या दशकात काहीशी लुप्तप्राय होत असताना मालिनीताईंनी टप्प्याला नवसंजीवनी दिली. राजाभैयांच्या ग्वाल्हेरी धाटणीची, पंजाबी ठेक्यातील चुस्त, मदभरी टप्पा गायकी त्यांनी मैफलींतून सातत्याने मांडली व तिला पुन्हा झळाळी दिली, त्यात प्रयोगशीलता आणली. साधारणत: ५-१० मिनिटेच गायला जाणारा टप्पा त्यांनी विस्तृतपणे २०-२५ मिनिटांपर्यंत मांडला. ही नुसती वेळेची वाढ नव्हती – त्यांनी टप्पा गायकीतील सांगीतिक आशय, घटकांचा वैविध्यपूर्ण वापर यांतही नावीन्यपूर्ण भर घातली, हा गानप्रकार एका उंचीला नेला. आजच्या पिढीला टप्पा गायकीची आवड त्यांनीच लावली. त्यामुळे या दुर्लक्षित गानशैलीकडे अनेक तरुण कलाकार पुन्हा वळले – हे मालिनीताईंचं मोठं योगदान आहे.

केवळ राजूरकर सरांच्या आग्रहामुळे त्यांनी संगीतक्षेत्रात कारकीर्द केली- त्यांना कधीच व्यावसायिक गायिका व्हायचं नव्हतं. मात्र पतीच्या इच्छेखातर त्यांनी हे कर्तव्य उत्तम निभावलं. सर्व कौटुंबिक कर्तव्यं योग्य प्रकारे सांभाळून त्यांनी गायनक्षेत्रातली कारकिर्दही उत्तम केली. (त्याबाबतीत ‘‘गंगूबाई हनगल, माणिक वर्मा या माझ्या आदर्श आहेत,’’ असं त्या नेहमी सांगत.) दिवाळीसारख्या सणांच्या दिवसांत त्या बाहेरगावचे कार्यक्रम घेत नसत. का? तर ‘‘मी सर्वप्रथम एक गृहिणी, आई आहे- गायिका नंतर! त्यामुळे कुटुंबीयांप्रती असलेल्या कर्तव्याला मी प्राधान्य देते. घरच्या लोकांना नाखूश करून रसिकांना खूश करणे, हे मला पटत नाही,’’ असं त्या म्हणत. आपले संगतकार हे आपले जिवाभावाचे सुहृद आहेत अशा भावनेने त्या सदैव सन्मानपूर्वक वागत. ‘‘माझ्या कलाप्रस्तुतीत त्यांचा माझ्याइतकाच, मोलाचा वाटा आहे.’’ असे त्या सांगत. कोणत्याही प्रकारे त्यांचं नुकसान होऊ नये, त्यांचं मन दुखावलं जाऊ नये याची काळजी त्या घेत. डॉ. अरिवद थत्ते, प्रमोद मराठे, सुभाष आणि भरत कामत, सुहास शास्त्री अशा सहकलाकारांशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळय़ाचे संबंध होते- केवळ व्यावसायिक नाहीत.

अनेक दशकांचा ‘अॅलर्जिक ब्रॉन्कायल’ दमा, उत्तरायुष्यात गुडघ्यांच्या विकारासह अनेक व्याधींवर मात करून त्या जिद्दीने गायल्या. घर आणि संगीत या दोन्ही आघाडय़ा तेवढय़ाच निष्ठेनं सांभाळल्या. मात्र ज्यांच्या आज्ञेनं त्यांनी गाणं चालू ठेवलं होतं त्या राजूरकरसरांच्या निधनानंतर जाहीर मैफली करण्यातला त्यांचा रस संपला. हळूहळू त्यांनी कार्यक्रम घेणं कमी केलं, पुरस्कार स्वीकारले नाहीत आणि यथावकाश सार्वजनिक जीवनातून योग्य अर्थाने त्या ‘निवृत्त’ झाल्या. शेवटच्या काही वर्षांत आपलं आजारपण कुणावर ओझं होऊ नये असं त्यांना वाटे आणि त्यांची उत्तम सेवा करणाऱ्या लाघवी मुली- निवेदिता आणि संगीता- यांनाही आपला त्रास होऊ नये म्हणून जणू काही त्यांनी निरवानिरव सुरू केली. त्यांच्या संग्रहातील संगीतविषयक पुस्तके, ध्वनिमुद्रणे यांचा संग्रह त्यांनी पुण्याला आमच्या ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज्’ला दिला. पण देतानाही त्या म्हणाल्या, ‘‘माझी ध्वनिमुद्रणं आहेत म्हणून भीड बाळगून ती ठेवू नका. तुम्हाला त्यातलं जेवढं योग्य वाटेल तेवढेच ठेवा.’’ किती हा साधेपणा!

मालिनीताईंशी माझा परिचय गुरू डॉ. अरिवद थत्ते यांच्यामुळे झाला. त्यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती समारंभात प्रकाशित ‘छंदोवती’ स्मरणिकेच्या संपादनाच्या निमित्तानं त्यांच्याशी खूपच जवळचा संबंध आला. पुढे टप्पा गायकीवरील माझ्या संशोधनाच्या दरम्यान मालिनीताई आणि राजूरकर सर या दोघांनी मला अनेक टप्पे शिकवले – त्यामुळे त्या माझ्या गुरूच. पण त्यांचा साधेपणा इतका की नंतर कधी कधी त्याच मला एखादी शंका विचारीत आणि मला लाजल्यासारखे होई; तर त्या म्हणत, ‘‘अहो, तुम्ही खूप अभ्यास केला आहे या विषयाचा, त्यामुळे तो तुमच्या ज्ञानाचा मान, तुमचा अधिकार आहे!’’ (वयानं, कर्तृत्वानं मी इतका लहान असूनही त्या कायम ‘अहो चैतन्य’ असंच म्हणत.) माझ्या बंदिशींचा संग्रह त्यांना भेट दिल्यानंतर त्यांनी आवर्जून फोन करून कौतुक केलं, म्हणाल्या, ‘‘किती सुंदर बंदिशी आहेत. मी रोज एकेका बंदिशीचं नोटेशन वाचते आणि माझ्या मनातल्या मैफलीत गाते.’’ या बंदिशींना मिळालेली ही फारच मोठी, निखळ दाद आहे! त्या जितक्या साध्यासरळ तितक्याच तत्त्वनिष्ठ आणि करारी. ‘आधी चांगली व्यक्ती, नागरिक असावं, नंतर कलाकार’ अशी वृत्ती असल्यानं परिपक्व, समतोल विचारांच्या, प्रांजळ, निगर्वी व पारदर्शी स्वभावाच्या मालिनीताईंनी आपल्या माणुसकीच्या तत्त्वांना कधीही मुरड घातली नाही. म्हणूनच संगीतजगतातल्या गटबाजी, राजकारण, भोंदूगिरी, ग्लॅमरपासून त्या सदैव अलिप्त राहिल्या. कलेतल्या आणि जगण्यातल्या मूल्यांना जपणाऱ्या मालिनीताई सदैव एक आदर्श, दीपस्तंभ म्हणून राहतील, यात शंका नाही.

मैफल मांडायची कशी याबद्दलही मालिनी राजूरकर यांचे विचार मननीय होते. परंपरेनं घालून दिलेले दंडक न मोडता रागांचा आणि रचनांचा क्रम मैफलीत कसा ठेवावा, आणि मैफलीत शेवटपर्यंत रंगत कशी राखावी त्याबद्दल त्या जागरूकपणे विचार करत.. ख्याल आणि टप्पा या गायनप्रकारांवर विलक्षण प्रभुत्व असलेल्या राजूरकर यांना ही शब्द आदरांजली..

keshavchaitanya@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-09-2023 at 00:01 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×