‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या पहिल्याच मालिकेमुळे अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेमुळे तिला सर्वत्र एक नवीन ओळख मिळाली. यानंतर देखील मृणालने अनेक मालिकांमध्ये काम केलं. ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’ तिने प्रमुख भूमिका साकारलेल्या या सगळ्याच मालिका गाजल्या. करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘हे मन बावरे’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेल्यावर पुढे काही दिवसांतच मृणाल तिच्या पतीबरोबर अमेरिकेला राहायला गेली. आता चार वर्षांनी ती पुन्हा एकदा भारतात परतली आहे. आज चार वर्षांनी देशात परतल्यावर मृणालची क्रेझ अगदी आधीसारखीच आहे. नुकतीच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी तिने अमेरिकेला जायच्या निर्णयाविषयी सांगितलं आहे.
मृणाल सांगते, “‘हे मन बावरे’ मालिका ऑक्टोबरला संपली आणि मी डिसेंबर महिन्यात अमेरिकेला जायचा निर्णय घेतला. त्यावेळी माझे वडील मला सोडून गेले ( निधन झालं ). त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात मी थोडी डिस्टर्ब होते. त्यानंतर मी स्वत:साठी जरा विचार केला. तेव्हा असं जाणवलं की, या क्षणाला मी माझ्या कुटुंबीयांना सुद्धा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे मी तो निर्णय ठरवून घेतला होता. अमेरिकेला गेल्यावर मी चार वर्षे तिकडे राहिलो. त्यावेळी मला कधीच मी कामापासून लांब आहे असं जाणवलं नाही. कारण, सगळे लोक माझ्या संपर्कात होते. आमच्या बातम्या होत होत्या. मी सगळ्यासाठी खूप ग्रेटफूल आहे. मला असं वाटायचं की मृणाल चार वर्ष नाही म्हणजे लोक आता विसरलेत पण, असं अजिबात झालं नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. मी खरंतर सोशल मीडियावर सुद्धा फार सक्रिय नाहीये. तरीही लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला. मी कामाला मिस केलं पण, माझ्या घरच्यांना वेळ देणं खूप गरजेचं होतं.”
“माझी मुलगी खूप गोड आहे. नुर्वीबरोबर माझा दिवस कसा जातो मलाही कळत नाही. तिच्या वेळा जपण्यात माझा सगळा वेळ जातो. तिच्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलंय आणि अर्थात आता तिच्या वेळा सांभाळून मी काम करणार आहे.” असं मृणालने सांगितलं.
हेही वाचा : बाळाच्या जन्मानंतर कार्तिकी गायकवाडने शेअर केला डोहाळे जेवणाचा Unseen व्हिडीओ! म्हणाली, “आईची भूमिका…”
यानंतर मृणालने तिच्या आईला आभासी फोन केला होता. अभिनेत्री आईला उद्देशून म्हणते, “आई कशी आहेस? मला असं वाटतं मी या चार ते पाच वर्षांत तुझ्याशी नीट बोलले नाहीये. पप्पा गेल्यापासून तू, मी, अभिजीत आपण तिघे एकत्र बसून बोललोच नाही. एखादी घटना एखाद्याच्या आयुष्यावर किती परिणाम करू शकते…मला कधी तुझ्याशी बोलताच आलं नाही. तू काळजी घे आई…आणि या सगळ्यातून बाहेर पड. कारण, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाचा एक भाग असतात. यातून मला एवढंच सांगायचं आहे की, आई लोकांचा विचार करू नकोस…त्यांची मने जपणं यातून बाहेर ये. तू पप्पांची जागा भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेस…पण, आता स्वत: आनंदी राहा. आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत.”